Literary Activists writer of women Inferior behavior torture Urmila Pawar ysh 95 | Loksatta

जगण्याला भिडणारी लेखिका!

दलित स्त्रियांची दु:खे, त्यांना मिळणारी हीन वागणूक, अत्याचार, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांची लैंगिकता.. हे जटिल विषय आपल्या लेखनातून रोखठोक शब्दांत सामान्यजनांपर्यंत पोहोचवणाऱ्या साहित्यिक-कार्यकर्त्यां उर्मिला पवार.

जगण्याला भिडणारी लेखिका!
साहित्यिक-कार्यकर्त्यां उर्मिला पवार.

छाया कोरेगांवकर

दलित स्त्रियांची दु:खे, त्यांना मिळणारी हीन वागणूक, अत्याचार, त्यांच्या महत्त्वाकांक्षा, त्यांची लैंगिकता.. हे जटिल विषय आपल्या लेखनातून रोखठोक शब्दांत सामान्यजनांपर्यंत पोहोचवणाऱ्या साहित्यिक-कार्यकर्त्यां उर्मिला पवार. दलित स्त्रीवादी साहित्यात महत्त्वाचे  ठरलेले ‘आयदान’ हे आत्मकथन, आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या योगदानाचा दस्तऐवज ठरलेल्या ‘आम्हीही इतिहास घडवला’ पुस्तकाचे सहलेखन आणि सामाजिक योगदानातून, चळवळीतून जगण्याला भिडणाऱ्या उर्मिला पवार यांचा पंचाहत्तरीनिमित्ताने सत्कार केला जात आहे. त्यानिमित्ताने..

उर्मिला पवार यांनी विपुल साहित्यनिर्मिती केली. ‘सहावं बोट’, ‘हातचा एक’, ‘चौथी भिंत’ हे त्यांचे गाजलेले कथासंग्रह आहेत. तसेच ‘मॉरिशियस एक प्रवास’ हे मिश्कील शैलीतील प्रवासवर्णन मनोवेधक आहे. याशिवाय ‘आम्हीही इतिहास घडवला’मधून आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांच्या योगदानाचा दस्तऐवज लिहिण्याची मोलाची कामगिरी त्यांनी पार पाडली आहे. त्यासाठी त्यांची मैत्रीण मीनाक्षी मून आणि स्वत: उर्मिलाताईंनी अथक परिश्रम घेऊन महाराष्ट्र पिंजून काढला. तळमळीने स्त्रियांचे कार्यकर्तृत्व समाजापुढे आणले.

 ‘इलास पावन्यानू बसाबसा’ आणि ‘मुक्ती’ या एकांकिकाही त्यांनी लिहिल्या आहेत. दलित लेखिका आणि त्यांचे साहित्य, कोकणातील दलितांचे रीतिरिवाज आणि लोकगीते, अशा प्रकारचे संशोधनात्मक लेखनही केले आहे. त्यांनी लिहिलेले ‘आयदान’ हे आत्मकथन विशेषत्वाने गाजले. त्यांना राष्ट्रीय पातळीवरचे अनेक मान मिळाले असून त्यांच्या एकूण साहित्याला आजपर्यंत ३० च्या वर पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उर्मिला पवार म्हणजे जाज्वल्य उत्साहमूर्तीच!

 चिवट जीवनेच्छा, कामाची चिकाटी आणि त्यासाठी लागणारी अथक ऊर्जा ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्टय़े आहेत. पंचाहत्तरी ओलांडल्यानंतर आजही त्या उत्साहाने सळसळत असतात. म्हणूनच सत्तरीनंतर कॉम्प्युटरचे शिक्षण घेऊन नव्या तंत्रज्ञानाशी आणि बदलत्या काळाशी स्वत:ला जोडून घेण्यात त्या अग्रेसर असतात. त्यांचा हा गतिमान प्रवास अनेकांसाठी मार्गदर्शक ठरणारा! 

उर्मिलाताई कोकणातल्या फणसावळे या खेडेगावात जन्मलेल्या. जातवास्तवाचे आणि दारिद्रयाचे चटके सोसत शिक्षित झालेल्या. आत्मभान जागृत झाल्यानंतर साहित्याशी आणि सामाजिक चळवळीशी स्वत:ची नाळ जोडून घेणाऱ्या! नोकरी करणारी स्त्री म्हणून घराबाहेरच्या आणि कुटुंबातल्या जबाबदाऱ्या सांभाळत लेखणीशी अतूट नाते ठेवून असणाऱ्या उर्मिला पवार. साहित्यनिर्मितीत त्या खऱ्या अर्थाने रमल्या कथालेखनात. त्यांच्या कथा खुसखुशीत, कधी चिमटे काढत समाजवास्तव दाखवणाऱ्या आहेत. दलित, कष्टकरी स्त्रियांच्या भोगवटय़ाचा, शोषणाचा अवकाश त्यांनी अत्यंत समर्थपणे आपल्या कथालेखनातून मांडला आहे; पण तरीही ‘आयदान’ आणि उर्मिला पवार असे एक घट्ट समीकरण साहित्यप्रांतात आजही ओळखले जातं. याचं कारण म्हणजे दलित स्त्रीचा भोगवटा, बाईपणासकट अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष, स्त्रियांची लैंगिकता या विषयावर त्यांनी बेधडक लेखन केले. म्हणूनच ‘आयदान’ हे त्यांचे आत्मकथन दलित स्त्रीवादी साहित्यातले दमदार पाऊल ठरलं. अर्थात आंबेडकरी समूहाचा सामाजिक रोष, टीका-टिपण्णी याचा त्यांना सामना करावा लागला. मात्र ‘आयदान’मधील वास्तव, भेदकता, संघर्ष याची साहित्य क्षेत्राला दखल घ्यावी लागली. त्याचे हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि कन्नड भाषांत अनुवाद झाले. कोलंबिया विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात इंग्रजी भाषांतराचा समावेश झाला. कोकणातल्या एका खेडय़ातून आलेल्या उर्मिला पवार यांची आंतरराष्ट्रीय साहित्य पटलावर नोंद व्हावी, हा त्यांचा साहित्यिक प्रवास प्रेरणादायी तर आहेच, पण अचंबित करणाराही आहे.

 सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले. अनेक स्त्री संघटनांमध्ये, सामाजिक चळवळींमध्ये त्या कार्यरत होत्या. ‘संवादिनी’ ही महिला संघटना स्थापन करून- ज्यात हिराताई बनसोडे, हिराताई पवार, कुसुम गांगुर्डे अशा कार्यकर्त्यां होत्या, या संघटनेमार्फत स्त्री अत्याचारांविरुद्ध आवाज उठवून, आंदोलन करून पीडित स्त्रियांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तसेच स्त्रिया लिहित्या, बोलत्या व्हाव्यात म्हणून साहित्यिक उपक्रमही राबवले. खैरलांजी हत्याकांड प्रकरणानंतर स्त्रियांचा मोर्चा घेऊन मंत्रालयावरही त्यांनी धडक मारलेली आहे. त्यांच्याकडे उत्कृष्ट संघटन कौशल्य आहे. स्त्रियांच्या जाणिवा सतत जागृत राहाव्यात म्हणून व्यक्तिश: संपर्क करून त्या संघटन बांधतात. त्यांनी अनेक तरुण लेखक-लेखिकांना मार्गदर्शन करून, प्रोत्साहन देऊन उजेडात आणले आहे. व्यक्तिश: माझ्यावर त्यांचा मोठा वरदहस्त आहे.

 व्यक्तिगत आयुष्यात त्यांच्यावर अनेक कौटुंबिक आघात झाले. वैद्यकीय शाखेत असणाऱ्या तरुण मुलाच्या मृत्यूचे दु:ख त्यांना पचवावे लागले, पण त्या दु:ख कुरवाळत बसल्या नाहीत, उलट दु:ख पदरासारखं कमरेला खोचून जीवनाला धीटपणे आणि तेवढय़ाच समरसतेने सामोऱ्या गेल्या. दु:खाचा हिशोब मांडण्यापेक्षा जगण्याचे अवघड गणित सोडवण्याकडे त्यांचा कल आहे. ही त्यांची जीवनविषयक सकारात्मकता स्पृहणीय आहे. उर्मिलाताई उत्तम कथालेखिका आहेत, साहित्यिका आहेत; पण साहित्याचा परिपोष त्या जीवनानुभव देण्याघेण्यातून करतात. सामाजिक योगदानातून, चळवळीतून जगण्याला भिडतात आणि सामाजिक- कौटुंबिक समस्यांच्या निरगाठी सोडवण्याचा प्रयत्न करतात.

उर्मिला पवार यांच्या पंचाहत्तरीच्या निमित्ताने ‘सम्यक साहित्य संसद, सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने येत्या शनिवारी २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मुंबईत त्यांच्यावरील गौरवग्रंथाचे प्रकाशन होणार आहे. डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात उर्मिलाताईंना ‘आबा शेवरे जीवन गौरव पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येणार आहे. याच वेळी सुनील हेतकर लिखित ‘इस्तव’ या कथासंग्रहाचे प्रकाशन होणार असून डॉ. श्रीधर पवार यांना ‘उत्तम सर्वोत्तम राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

आजवर अनेक पुरुष साहित्यिक, विचारवंत, कार्यकर्ते यांचे गौरवग्रंथ काढून त्यांचा मानसन्मान करण्यात आला आहे. त्यामानाने अशा सन्मानांच्या मानकरी स्त्रिया अभावानेच आढळतात. त्यामुळे या पार्श्वभूमीवर उर्मिला पवार या आंबेडकरी साहित्यिका आणि कार्यकर्तीचा सन्मान होणे खूप औचित्याचे ठरते.

 त्यांच्या ऊर्जेचा आणि उत्साहाचा झरा असाच अखंड खळखळत राहो आणि त्यांच्या हातून अशीच साहित्यनिर्मिती होत राहो, आणि सामाजिक कामांतले योगदान वाढत राहो, ही सदिच्छा!

chhayabkbob@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-10-2022 at 00:04 IST
Next Story
मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : फास