आयुष्य पणाला लावून समाजासाठी काम करणाऱ्या मेघालय, आसाम, अरुणाचल, मणिपूर या पूर्वाचलच्या चार दुर्गम राज्यांमधील धडाडीच्या स्त्रियांचं कार्य कॅमेऱ्यात टिपून ते जगासमोर मांडण्याचा उपक्रम ‘विद्युल्लता’ या खास स्त्रियांच्या गटाने हाती घेतला आहे. त्यातल्या काही निवडक वीरांगनांच्या या कहाण्या.
‘‘उ गवत्या सूर्याची कोवळी किरणे ज्या भूमीला प्रथम स्पर्श करतात तो अरुणाचल प्रदेश.  या निसर्गसंपन्न प्रदेशाला ग्रहण लागलंय ते अपहरणाचं. इथे अपहृत मुलं, मुली व स्त्रियांचं प्रमाण चिंताजनक आहे. मात्र त्याला आव्हान देण्याची ताकद दाखवली ती ‘पद्मश्री’ बिन्नी यांगा यांनी. लहान मुलं, स्त्रिया यांचे अपहरण करून त्यांची विक्री करण्याच्या अमानुष कृत्याविरुद्ध प्रचंड ताकदीने लढा देऊन अपहरण झालेल्या २०० जणींची त्यांनी सुटका केली आहे. अशा होरपळलेल्या अनेक मुलींची आई होऊन, अनेकींची बहीण होऊन बिन्नी त्यांच्या मागे ठामपणे उभ्या आहेत. सुटका करून आणलेल्या अनेक मुलींना सुरुवातीला त्यांनी स्वत:च्या घरातच आसरा द्यायला सुरुवात केली. त्यातल्या अनेकींना व्यवसाय काढून देत स्वत:च्या पायावर उभे केले आणि त्याही पलीकडे जाऊन त्यांनी ७० हून अधिक जणींची लग्नंही लावून दिली..’’
 .. त्या बिन्नी यांगा आपल्यासमोर उभ्या राहतात फोटोच्या माध्यमातून. तो योग जुळवून आणलेला असतो ‘विद्युल्लता’ने. आपण जे पाहिलं त्याचा अनुभव, अनुभूती इतरांना देण्यासाठी छायाचित्रण कलेसारखे दुसरे वरदान नाही. ‘फोटो सर्कल’ या ठाणे जिल्ह्य़ातील सेवाभावी संस्थेने हे हेरले आणि त्यांच्या ‘विद्युल्लता’ या खास स्त्रियांच्या गटाने एक अनोखा योग जुळवून आणला. समाजासाठी आयुष्य पणाला लावून काम करणाऱ्या पूर्वाचलमधील धडाडीच्या स्त्रियांचे कार्य कॅमेऱ्यात टिपून ते जगासमोर मांडण्याचा स्तुत्य उपक्रम गटाने हाती घेतला आहे. मेघालय, आसाम, अरुणाचल, मणिपूर या पूर्वाचलच्या चार दुर्गम राज्यांमधील या स्त्रिया प्रसिद्धीच्या झोतात फारशा आलेल्या नाहीत, मात्र त्यांच्या कार्याची दखल घ्यावी इतके उत्तुंग कार्य त्यांनी नक्कीच केले आहे. त्यातल्याच काही जणींना त्यांनी फोटो प्रदर्शनाच्या माध्यमातून समाजापुढे आणायचा प्रयत्न सुरू केला आहे. स्वप्नाली मठकर, वेदिका भार्गवे, संघमित्रा बेंडखळे या तरुण उच्चशिक्षित मुलींनी संजय नाईक यांच्याबरोबर जाऊन या ‘वाघिणीं’च्या कार्याला उजाळा दिला आहे. अ.भा.वि.प. च्या आशीष भावेने योजनाबद्ध आखणी करून, शिवाय दुभाषाचं काम स्वत:हून केल्याने त्यांचा राजमार्ग मोकळा झाला.. हे प्रदर्शन राज्यातील विविध ठिकाणी भरवण्याचा त्यांचा मानस आहे.  
त्यांच्यातलीच एक ‘विद्युल्लता’ स्वप्नाली मठकर आपले तेथील अनुभव सांगत होती,
‘.. त्या धडाडीच्या बिन्नी यांगा यांच्या वसतिगृहासमोर, पीडितांच्या जीवनातील अंधकार दूर करणाऱ्या वास्तूसमोर आम्ही उभे होतो. एका मूक मुलीने आमचे स्वागत केले. तेवढय़ात मध्यमवयीन, डोक्यावर केस नसलेल्या बिन्नी यांगा लगबगीने तेथे आल्या. आमच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. शंका खरी ठरली. २००६ पासून त्यांना कर्करोग आहे. ६-७ वेळा केमोच्या चक्रावर त्यांनी मात केलीय. या मुलींसाठी त्यांनी वसतिगृहही सुरू केले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी या कामात स्वत:ला झोकून दिले आहे, त्यांच्या या कामाची पावती म्हणूनच आपल्या सरकारने २०१२ साली त्यांना ‘पद्मश्री’ बहाल केली आहे.
 ‘‘किती अडथळय़ांशी झुंज द्यावी लागते तेव्हा कुठे आशेचे किरण दिसायला लागतात. त्यानंतर यश म्हणजे या लोकांच्या जीवनातील आनंद आणि हीच खरी पद्मश्री.’’ हे सांगताना त्या डोळय़ांतील पाणी लपवू शकत नव्हत्या. कारण त्याचे अनुभवच तसे होते. आमचं स्वागत करणाऱ्या त्या मूक मुलीकडे बोट दाखवून त्यांनी तिची गोष्ट सांगितली. गोष्ट अंगावर काटा आणणारी होती. तिच्यावर झालेल्या अनन्वित अत्याचाराची माहिती न बोलताच कळली होती. तिची वाचा जाणं हाही त्या अत्याचाराचाच एक भाग होता. तिच्या जिभेला चटके दिल्यानेच ती मूक झाली होती.    
अरुणाचलच्या दुर्गम भागातून पळवलेली आणखी एक मुलगी.  या मुलीने अपहरण कर्त्यांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली आणि बोचरी थंडी, घोंघावणारा वारा, संपूर्ण बर्फाच्छादित जमिनीवरून बरेच दिवस लपत-छपत ती चालत राहिली. स्वत:ला जगवण्यासाठी तिच्याकडे साधन होतं बर्फ. फक्त बर्फ खाऊन ती मार्गक्रमण करीत होती. शहराच्या एका चौकात ती पोहोचली आणि तिथेच बेशुद्ध पडली. आज बिन्नी यांगांच्या प्रेमळ छायेत पुन्हा ती माणसात येत आहे. अशा अनेक जणी. अनेकींना या अत्याचारातून बाहेर काढून मानाचं आयुष्य देणाऱ्या बिन्नी याचं काम म्हणूनच मोलाचं आहे.’’
    पूर्वाचल. सप्तभगिनींचा प्रदेश. ब्रह्मपुत्र या मोठय़ा ‘नदी’मुळे सुजलाम्, सुफलाम् झालेला त्याचबरोबर बर्फाच्छादित डोंगर, खोल खोल दऱ्या, घनदाट जंगल यांनी नटलेला. पृथ्वीवरची विविधता येथे एकवटली असल्याने या परिसरात आदिवासींच्या १५०च्या वर जाती-जमाती आहेत. पण इथल्या सीमारेषा सुरक्षित नाहीत. चीन, बांगलादेश येथून प्रचंड घुसखोरी होत असते. गरिबीनेही परिसीमा गाठलेय. रोगराई, शिक्षणाचा अभाव, नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित संकट, इथे भारत आपलाच देश आहे याबद्दलही अज्ञान, अनास्था आहे. या सर्व गोष्टींमुळे ‘जे का रंजले गांजले’ या उक्तीनुसार येऊन अनेक पीडितांना अनेक सेवाभावी संस्थांनी सामावून घ्यायला सुरुवात केली आहे.
मेघांचं आलय ‘मेघालय.’ तेथील ‘चेरापुंजी’ची तोंडओळख आपल्याला शाळेतच झालेली, पण तेथील अतिशय हलाखीचं जनजीवन अजूनही अंधारातच आहे. मात्र मातृसत्ताक पद्धती हा समाजाने दिलेला वर. त्यामुळेच अनेक वीरांगना लोकांचं जीवन सुखदायी करण्यासाठी धडपडताना दिसतात. त्यातलीच एक तेरेसा खोङथॉ. बाहेरच्या घुसखोरीबरोबर अंतर्गत दंडेलशाहीविरुद्ध दंड थोपटण्याचं काम या धाडसी तेरेसाने केलं. मेघालयात अनेक ठिकाणी रात्रीचे दरोडे पडत. ते इतके क्रूर असत की माणसाची नुसती लुटालूटच नव्हे तर नामोनिशाणीही ठेवली जात नसे. ही दहशत वर्षांनुवर्षे चाललेली. या काळरात्रीला टक्कर द्यायचीच, असं तेरेसाने ठरवलं. अनेक स्त्रियांचे छोटे-मोठे गट करून त्यांना निर्भय बनवलं. गस्त घालण्यासाठी तयार केलं. अरुंद वाट, रस्त्यांवर दिवे नाहीत. एका बाजूला घनदाट जंगल तर दुसऱ्या बाजूला खोल दरी. या नुसत्या वर्णनानेच शहरवासीयांच्या अंगावर काटा येईल. पण तेरेसाने फक्त काठी व बॅटरी या दोनच गोष्टींच्या साहाय्याने गस्त घालण्यात त्यांना तरबेज केलं. बाजी प्रभूंसारखी खिंड लढवायला त्यांनी सुरुवात केली, आणि अहो आश्चर्यम्, आज दरोडेखोरांना दहशत बसली आहे. हे ऐकताना आपल्या विनोबा भावेंची आठवण उसळी मारून वर आली. विनोबा भावेंनी चंबळच्या खोऱ्यात गुंडांना शस्त्रे खाली ठेवायला लावली तो लढा अहिंसक मार्गाचा, हा निर्भयतेचा लढाही यशस्वी झालेला पाहून ‘शिर हातावर’ घेऊन लढणाऱ्या त्या स्त्री-शक्तीला सलाम करायला हवा. हे यश मिळाल्यावर त्यांना एवढं स्फुरण चढलं की मेघालयाचं शान असलेलं ‘जंगल’ वाचवण्यासाठीही त्यांनी रानावनात गस्त घालून निसर्गराजाची शाबासकी मिळवली.
अशाच एक निर्भया म्हणजे आईनी तालोह. गावातले तरुण काही दिवसांच्या अंतराने मृत्यू पावताहेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. त्यांनी त्याचे कारण शोधायचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं ही तरुण मुलं गावात आलेली दारू आणि ड्रग्ज याच्या अमलाखाली ट्रक चालवतात आणि त्यात त्यांचा मृत्यू होतो आहे. या तरुणांबरोबरच गावातल्या इतरांनाही याचं व्यसन लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं. अनेक गावंच्या गावं या व्यसनाच्या विळख्यात अडकलेली दिसली. आपल्या गावातल्या लोकांना सुधारायचं असेल तर त्यांना व्यसनमुक्त करणं हा महत्त्वाचा उपाय आहे हे त्यांच्या लक्षात आलं.       
अरुणाचलला अजूनही वीज नाही ती आसाममधून येते. त्यामुळेच विजेचा सतत लपंडाव. त्याचा फायदा घेऊन इथे चंद्राच्या साक्षीने दारू, ड्रग्ज यांच्या साठय़ाची ने-आण कायम चालत असे. आईनी तालोह याविरोधात ‘हुतात्मा’ व्हायला सिद्ध झाल्या. योजनाबद्ध आखणी करून, अनेकींना हाताशी धरून त्यांनी ते ट्रक अडवायला सुरुवात केली. कित्येक वेळा ‘जगणं-मरणं एका श्वासाचं अंतर’ अशी वेळ यायची. पण हिंमत न हारता त्यांनी हा लढा चालूच ठेवला. मुलांना समजावलं. याचं फळ म्हणून आज बरीच गावं व्यसनमुक्त आहेत. ग्रामस्थ साथ देत आहेतच पण यांना मोलाची साथ मिळाली इटानगरच्या महापौर अरुणी हिगिओ यांची. त्यांच्या सहकार्यामुळे, सरकारच्या मदतीने त्या अनेक सुधारणा करून घेत असतात.
    अशा अनेक जणी आपापल्या परीने समाजाच्या विकासासाठी हातभार लावत आहेत. मग ते संस्कृतिरक्षण असो वा स्त्रियांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी त्यांना दिलेलं प्रशिक्षण असो. याच बरोबरीने शिक्षणाचं महत्त्व पटल्याने अनेकींनी आपापल्या पातळीवर सुरू केलेले प्रयत्नही खूप मोलाचे ठरत आहेत. शिक्षण प्रत्येक घरापर्यंत झिरपलं तरच खरा धर्म, संस्कार, स्वच्छता, देशप्रेम वाढीस लागेल. रोगराई, तंटे, बखेडे कमी होतील. धट्टीकट्टी गरिबी पण कष्ट व जिद्द यांनी साथ दिली तर उद्योगधंदे वाढून हातात पैसा राहील, त्यानेच मुलांचं भवितव्य उजळेल. या डोळस हेतूनेच अनेक जणींनी आपली लढाई सुरू ठेवली आहे. आपलं मेघालय हे सरस्वतीचं, लक्ष्मीचं निकेतन तर होईलच शिवाय ‘एकमेकां साहाय्य करू’ हा संस्कारही या बालबच्च्यांना समाजाभिमुख बनवील याची त्यांना खात्री आहे. त्यातल्याच या आणखी काही जणी.
   जेसिमा सुचियांग ही दुर्गम खेडय़ातील स्त्री. मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी स्वखर्चाने शाळा सुरू केली. त्याच्या बरोबरीने जनजातीतील रोगराई, अस्वच्छता निर्मूलनासाठी स्वत:ची काळजी घेण्याचे धडे त्या परिसरातील लोकांना देत आहेत. या परिसरात हळदीचं उत्पन्न भरपूर म्हणून त्यापासून अनेक प्रकारच्या उद्योगांची सुरुवात केली. हे कार्य अव्याहत सुरू आहे. आज त्यांना शेकडो हाताचं बळ लाभलं आहे. त्यांच्याबरोबरीनेच फोर्सिला डखार या निसर्गावर निरतिशय प्रेम करणारी स्त्री, शाळेबरोबरच निसर्ग-संवर्धनाचा संस्कार मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठी उत्साहाने तिची जंगलभ्रमंती सुरू असते. शाळेतल्या मुलांना सकस दूध व अन्न पुरवण्याचं कामही ती करत आहे.
 एप्रिलदा बारेह याही एका शाळेच्या मुख्याध्यापिका. उत्तम संस्कार, देशप्रेम जागृत करण्यासाठी त्या अनेक उपक्रम राबवत आहेत. हातावर पोट असलेल्या मुलांच्या जीवनात रात्रीच्या शाळेचा लामणदिवा त्यांनी लावला आहे. मुलांना आणि त्यांच्या पालकांना सातत्याने समजावून सांगून अनेकांना त्यांनी या रात्रशाळेकडे वळवलं आहे.
कोंग मीरा या संस्कृतीप्रिय. आपल्या संस्कृतीच्या प्रसारासाठी वृद्ध बायकांकडून त्यांच्या ‘खासी’ भाषेत अनेक धार्मिक गोष्टी चाली-रीती, सण-वार यांची माहिती त्यातील लोकगीतासकट त्या घेत आहेत. हिंदी, इंग्लिश भाषेत अनुवादित करून त्याचा प्रसार करायचा त्यांचा मानस आहे.
  जोनाकी बारो याही तेथील प्राथमिक शाळेतील शिक्षिका, पण स्वप्नांची भरारी उंच. प्रथम त्यांनी आपलं राहतं घर आश्रमशाळेसारखं बांधलं. लोकांना प्रेमाने आपलंसं केलं व त्यांना शेती व इतर उद्योगधंदे शिकवले. त्यांच्या मुलांसाठी शाळेबरोबर संस्कार केंद्रं काढली आहेत. भजन, कीर्तन या भावभक्तिप्रद माध्यमातून सुजाण नागरिक बनवण्याचं ध्येय साकार करत आहे. त्यांच्या या कामामुळेच आज त्यांच्या शब्दाला वजन आहे. एकदा त्यांना कळलं की गावातील एका ‘वजनदार’ माणसाने शहरातील एक अल्पवयीन मुलगी पळवून आणली असून तो तिच्याशी लग्न करणार आहे. त्यांनी अनेकविध खटपटी करून त्या मुलीची सुटका केली. इतकच नव्हे तर तिला तिच्या पालकांकडे सोपवल्यानंतरच त्यांनी नि:श्वास टाकला.
   मणिपूरची नाळ पौराणिक गोष्टींसाठी भारताशी जोडलेली आहेच. श्रीकृष्णाच्या रासक्रीडांचा आविष्कार हे तेथील मुख्य नृत्य. पण हे राज्य मात्र खून, मारामाऱ्या, भांडण, जाळपोळ, लुटालूट यांनी धगधगत होतं. आजही काही प्रमाणात आहेच. या धगधगत्या निखाऱ्यांवर पाणी ओतून तो शांत करण्याचं काम इथल्या सेवाव्रती करीत आहेत. अवघ्या ४० र्वष वयोमान असलेल्या ओ इंदिरा ओइनाम यांना संपूर्ण मणिपूर सुशिक्षित, साक्षर करायचा आहे. त्यांना ‘सेंद्रिय शेतीप्रधान’ राज्य म्हणून नाव मिळवून द्यायचं आहे. बांबूंची कलाकुसर वाढवून भारताच्या नकाशात त्याला औद्योगिक स्थान पटकवायचं आहे. वयाच्या पंधराव्या वर्षीच त्यांना नॅशनल युथ अॅवॉर्ड मिळाला आहे. पुरस्काराला साजेशी घोडदौड आजही सुरू आहे.
 येथे सैनिकांची दहशत खूपच आहे. प्रो. शीला रमणी या संशोधक आहेत. आपल्या ज्ञानाचा उपयोग करून त्या ही दहशत सुसह्य़ करण्याचा प्रयत्न करत आहेत. ८० वर्षांच्या डॉ. जामिनी देवींनीही येथे एक आध्यात्मिक आश्रम उभारला आहे. शांततेचा मार्ग चोखंदळून मणिपूरच्या देवालयांचा वारसाही त्या जपत आहेत. त्यांची अनेक पुस्तकंही प्रसिद्ध झाली आहेत.
  पुरुषार्थालाही लाजवतील अशा तळमळीने अनेक स्त्रिया हे असिधाराव्रत पुढे नेत आहेत. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या सामाजिक प्रश्नाचा परीसस्पर्श झाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरचं विस्तारलेलं हसू समाधानात न्हाऊन निघालं होतं. ‘विद्युल्लता’ स्वप्नाली, वेदिका, संघमित्रा या तरल मनाच्या मुलींनी ब्रह्मपुत्राच्या या भगिनींचा जीवनप्रवाह महाराष्ट्रापर्यंत आणला आहे. त्यांनाही धन्यवाद द्यायला हवेत. कुठे तरी वाचलेल्या ओळींनी मनाचा ताबा घेतला.
ध्येयवेड अंतरात कष्टांची भीती कुणाला!
हितगुज ते काटय़ांशी गुलाबास जपण्याला॥