तार्किक विचारपद्धती

अनेक यशस्वी संशोधक, शास्त्रज्ञांच्या आत्मकथा तुम्ही वाचल्या असतील तर त्यातून अचंबित करणारी माहिती गोळा होते.

डॉ. ऐरिक बर्न या मानस शास्त्रज्ञाने निर्माण केलेले ट्रान्झॅक्शनल अ‍ॅनालिसिस (टी. ए.) आणि न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग (एन.एल.पी) आणि डॉ. एडवर्ड डिबोनो यांनी केलेले संशोधन या सगळ्यांचा उपयोग मन, भावना व विचार यांच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो. बरीचशी मुले एखाद्या प्रश्नाशी झगडत असतात. पण उत्तराची साधी चाहूलही त्यांना लागलेली नसते, आशा वेळी नकारात्मक भावना त्यांच्या मनाचा ताबा घेतात आणि निराशा व पराजयाच्या गत्रेत ते वेगाने जातात. अशा वेळी मनाचा ताबा स्वत:कडे ठेवून तटस्थपणे भावना बाजूला ठेवून आपले काय चुकते आहे याचा शोध घेणे आवश्यक असते. आणि हेच ही विचारपद्धती शिकविते.
अनेक यशस्वी संशोधक, शास्त्रज्ञांच्या आत्मकथा तुम्ही वाचल्या असतील तर त्यातून अचंबित करणारी माहिती गोळा होते. कित्येक नोबेल पुरस्कार विजेते, शास्त्रज्ञ त्यांच्या बालपणात त्या काळाच्या शैक्षणिक निकषानुसार त्यांच्या बालपणी निकृष्ट ठरविले गेले होते. बरीच वेडीवाकडी वळणे घेऊन त्यांचे आयुष्य विशिष्ट ध्येयाकडे मार्गक्रमण करताना दिसते. नुसते शास्त्रज्ञच नव्हे तर बऱ्याच श्रीमंत व्यक्तींबाबत ज्यांना आपण लौकिकार्थाने यशस्वी म्हणतो त्यांचीही तीच कथा आहे. म्हणूनच १६/१७ वष्रे वयाच्या मुलांच्या भवितव्याबाबत जी असुरक्षितता पालकांच्या मनात असते त्यांना मुख्यत: सांगावेसे वाटते की, तुमच्याकडे त्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत आजपर्यंत गोळा केलेला जो डेटा आहे तो खूपच तोकडा आहे व त्या आधारावर त्याच्या भविष्याबाबत साशंक होणे आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता त्याला जाणून देणे तितकेस शहाणपणाचे नाही. भविष्याबाबत आशावादी असणे, उज्ज्वल भविष्याचीच डोळस अपेक्षा ठेवणे व ते तसेच असेल अशी खात्री बाळगणे हे भाबडेपणाचे लक्षण नसून तो स्ट्रॅटेजीचा भाग असायला हवा.
स्वनिश्चित लक्ष्याकडे अचूकपणे मार्गक्रमण करण्यासाठी मनाचे व्यवस्थापन करण्याची शक्ती प्राप्त करणे एवढेच आपल्या हातात असते. आणि हे मन:व्यवस्थापन हे जसं आपण व्यायामशाळेत जाऊन शरीर कमवतो तसेच मनदेखील कमवावे लागते. त्यासाठी मानसिक व्यायामशाळेत जाऊन प्रॉक्टिस करायला हवी. दुर्दैवाने याचे प्रशिक्षण आपल्या सध्याच्या अभ्यासक्रमात नाही. प्रचलित शैक्षणिक माध्यमातून जी कौशल्ये आपल्याला प्राप्त होतात ती खचितच महत्त्वाची व आवश्यक आहेत. पंरतु पुरेशी मात्र अजिबात नाहीत. भावनांवर नियंत्रण मिळविता येणे आणि अत्यंत गुंतागुंतीच्या मानसिक प्रक्रियांचे त्रयस्थपणे निरीक्षण करून त्या प्रक्रियांना हवी ती दिशा मिळवून देणे हे मानव म्हणून आपल्याला शक्य आहे, पण सोपे मात्र नाही. डॉ. ऐरिक बर्न या मानस शास्त्रज्ञाने निर्माण केलेले  ट्रान्झ्ॉक्शनल अनालिसिस (टी. ए.) आणि न्यूरोिलग्विस्टिक प्रोग्रॅिमग (एन.एल.पी) आणि डॉ. एडवर्ड डिबोनो यांनी केलेले संशोधन या सगळ्यांचा उपयोग मन, भावना व विचार यांच्या नियंत्रणासाठी होऊ शकतो. यापकी विचार करणे किंवा मनात विचार येणे ही एक प्रतीक्षिप्त किंवा आपोआपच घडणारी प्रक्रिया नसून त्यावर आपल्याला सहेतुकपणे नियंत्रण करता येते हे डिमोनोने आपल्या संशोधनात दाखविले.
माझ्या अनुभवानुसार जेव्हा मुले आयआयटी किंवा आयआयएम कॅटसारख्या परीक्षांमध्ये विचारल्या जाणाऱ्या कूटप्रश्नांचा विचार करतात तेव्हा त्यांना या पद्धतीचा खूपच उपयोग होऊ शकतो. उदा. बरीचशी हुशार मुले एखादा प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात तेव्हा ती निराश झालेली दिसतात. त्यांचा बराच वेळ वाया गेलेला असतो आणि उत्तराची साधी चाहूलही त्यांना लागलेली नसते, आशा वेळी नकारात्मक भावना त्यांच्या मनाचा ताबा घेतात आणि निराशा व पराजयाच्या गत्रेत ते वेगाने जातात. अशा वेळी मनाचा ताबा स्वत:कडे ठेवून तटस्थपणे भावना बाजूला ठेवून आपले काय चुकते आहे याचा शोध घेणे आवश्यक असते. आणि हेच ही विचारपद्धती शिकविते. उदाहरण द्यायचे झाले तर मी एकदा वर्गात एका प्रकरणातली काही गणिते सोडवत होतो. मध्येच एका मुलाने उठून एक शंका विचारली. तिचा संबंध या प्रकरणाशीच असावा असे गृहीत धरून मी बराच वेळ तो प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला, पण तो काही केल्या सुटेना. कल्पना करा २५ ते ३० वष्रे अनुभव असलेल्या शिक्षकाला आपण सांगितलेली शंका सोडविता येत नाही यामुळे मुलांच्या मनातील माझी प्रतिमा ढासळते आहे याचे प्रचंड दडपण मनावर यायला लागले, त्यामुळे  विचार करण्याची शक्ती आणखीनच कुंठित होत गेली. आपले काय चुकतेय हे कळण्यासाठी मनाच्या ज्या भागाचा वापर होतो त्याचा भावनांनी ताबा घेतला आणि प्रश्नाचे उत्तर अधिकच दूर दूर जाऊ लागले. सुदैवाने टीएचे प्रशिक्षण मी घेतलेले असल्यामुळे यातून कशी सुटका करून घ्यावी हे मला माहीत होते. क्षणभर मी वर्गाबाहेर आलो आणि वेगळाच विचार करू लागलो आणि क्षणार्धात मला प्रश्नाचे उत्तर आले. माझी चूक मला उमगली. मुळात त्या प्रश्नाच्या उत्तराचा त्या प्रकरणाशी अजिबात संबंध नव्हता आणि नकळत गृहीत धरलेले एक गृहीतक उत्तराच्या आड येत होते. त्याच वेळी माझ्या लक्षात आले की मुलांच्याही बाबतीत हे असेच होत असणार. एखादा कूटप्रश्न सोडविण्यासाठी आपण नकळत काही गोष्टी गृहीत धरतो. आपली गृहीतके आपल्याला कळत नाहीत. आणि प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही. आपण परत परत त्याच मार्गाने उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण मागचे बरेचसे प्रश्न त्या मार्गाने सुटलेले असतात. मग हा का नाही सुटत, असा एक अताíकक दुराग्रह आपल्या आणि आपल्या उत्तरामधला मोठा अडथळा असतो, परंतु हे समजण्याऐवजी मला हा प्रश्न सुटत नाही म्हणजे मी या परीक्षेत पास होण्याच्या लायकीचा नाही असा विचार येऊन मुले त्यांच्या क्षमतेविषयी साशंक होत जातात आणि निराशा व पराजयाच्या गत्रेत ओढले जातात. खरं म्हणजे प्रश्न न सुटण्याचे कारण हुशार नसणे किंवा हुशार असणे हे नसून योग्य तऱ्हेचा विचार न करणे हे आहे. तेव्हा आपल्या मनाला योग्य दिशेकडे वळविणे आवश्यक आहे. जर प्रश्न लॉजिकल असेल तर उत्तर इमोशनल असूच शकत नाही तेदेखील लॉजिकलच असायला हवे. याचे भान विद्यार्थ्यांना नसते आणि यात त्यांचा काहीच दोष नाही, कारण सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत अशा मानसिक अवस्थेला तोंड देण्याचे प्रशिक्षण मिळत नाही.  माझ्या अनेक कार्यशाळांमध्ये याची अनेक प्रात्यक्षिके मी करवून घेतो, त्यासाठी डॉ. ऐरिक बर्न यांनी मनाचे जे मॉडेल निर्माण केले आहे त्याचा उपयोग होतो. त्यांच्या मते मनाचे ३ भाग असतात  १) पॅरेंटल पार्ट –  यात आपल्या आई-वडिलांनी काय बरोबर व काय वाईट या विषयी लहानपणापासून केलेले संस्कार साठविलेले असतात. नतिक काय व अनतिक काय. थोडक्यात मूल्यव्यवस्थेविषयी सर्व विचार या भागात असतात; हा भाग म्हणजे आपल्या पालकांची एक छोटीशी प्रतिकृतीच आपल्या मनात सतत सोबत करत असते. २) चाइल्ड पार्ट – यात सर्व भावना, स्वप्ने, महत्त्वाकांक्षा आनंद, आकांक्षा, वस्तू मिळविण्याचा हव्यास, मजा करणे या सर्व भावना एकत्र झालेल्या असतात.  ३) अ‍ॅडल्ट  पार्ट – यात सारासार विवकेबुद्धी शास्त्रशुद्ध व तर्कशुद्ध विचार करण्याची शक्ती हे सर्व येते. उदा. एकदा मी बाजारातल्या रस्त्यातून पायी चाललो होतो. रस्त्याच्या कडेला टीव्हीची मोठी शोरूम होती तेथे ९० सेंमीचा भव्य टीव्ही डिस्प्लेला ठेवलेला होता. लगेच मनात विचार आला, ‘घेऊया का?’ मी आत गेलो. खिशातून क्रेडिट कार्ड काढून तो विकत घेतला, पावती हातात घेताच त्याची किंमत जाणवायला लागली आणि विचार आला, ‘बापरे आपण काय करून बसलो? याची आपल्याला गरज होती का? एवढे सगळे पसे कधी फेडणार? हे सगळे विचार माझ्या पॅरेंटेल भागाकडून येत होते.  शोरूममध्ये जाण्याची प्रक्रिया माझ्या चाइल्ड पार्टमुळे झाली. बाहेर आल्यानंतर  पॅरेंटल पार्ट, चाइल्ड पार्टला मानसिक दृष्टय़ा ठोकून काढत होता. त्यामुळे एक अपराधी भावना मनात निर्माण होत होती. बाहेर आल्याबरोबर रस्ता क्रॉस करताना लगेच ट्रॅफिक किती आहे, कुठली गाडी आपल्याकडे किती वेगाने येते, आपण रस्ता क्रॉस करू शकू की नाही, हे सर्व विचार येऊ लागले. ते मात्र माझ्यातल्या अ‍ॅडल्ट पार्टमुळे येत होते. म्हणजे क्षणा क्षणात आपल्या मनाचे एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे स्थित्यंतर होत असते. याचा  वापर मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रभावीपणे करता येतो.
   बरेचसे पालक माझ्याकडे तक्रार घेऊन येतात की माझा मुलागा खूप अभ्यास करूनदेखील परीक्षेच्या वेळी ब्लँक होतो. असे का?  तर त्यावर उत्तर असे की प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आपला अ‍ॅडल्ट पार्ट जागृत असायला हवा. मुलगा जेव्हा प्रश्नपत्रिका बघतो तेव्हा जर तो घाबरलेला असेल तर त्याचा चाइल्ड पार्ट जागृत झालेला असतो. आणि चाइल्ड पार्ट प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. तेव्हा चाइल्ड पार्टमधून अ‍ॅडल्ट पार्टकडे नेणारे एखादे बटन त्याच्याकडे असायला हवे, उदा. त्याने एवढा जरी विचार केला की कुठल्या पार्टमधून मी सध्या उत्तर देत आहे. तर हा प्रश्न हेच ते बटन असू शकते, कारण असा प्रश्न फक्त अ‍ॅडल्ट पार्ट विचारू शकतो.
    डॉ. डिबोनोने सहा िथकिंग हॅटची निर्मिती केलेली आहे, त्यात एखादा विचार किंवा एखादी कल्पना मनात आली तर  तिची  योग्यता पडताळून पाहण्यासाठी या हॅट्सचा उपयोग केला जातो. उदा. एखादी जागा बघून मला जर असे वाटले की इथे हॉटेल काढणे योग्य आहे. तर या प्रस्तावाची व्यावहारिकता मोजून पाहावी लागते, त्यासाठी वेगवेगळ्या भूमिकांमधून या विचाराकडे बघावे लागते. उदा. ही कल्पना अतिशय टाकाऊ आहे आणि यात प्रचंड धोके आहेत, असे गृहीत धरून सगळ्या धोक्यांचा शोध घेणे असे जर केले तर सगळेच रिस्क फॅक्टर्स लक्षात येतात. अशाच तऱ्हेचा विचार वर्गात जेव्हा मला प्रॉब्लेम सुटत नव्हता त्या वेळी मी केला. आपण जी पद्धत वापरत आहोत ती पूर्णपणे मूर्खपणाची आहे, अशी भूमिका मी मुद्दामच घेतली. त्यात काय मूर्खपणा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा ताबडतोब कळले की या प्रकरणाचा व त्या प्रश्नाचा काहीही संबंध नाही आणि मला लगेच उत्तर मिळाले. एखादा विचार जेव्हा आपल्या मनात येतो तेव्हा त्या विचाराबाबत एक अकारण आपलेपण आणि त्याला लागून एक अस्मिता जागृत होते. ही अस्मिता अता असते, त्यामुळे विचाराची तर्कशुद्धता धोक्यात येते तेव्हा आपण विरुद्ध टोकाची भूमिका घेतली तरच हा धोका लक्षात येतो, पण हे सगळे घडण्यासाठी मी मागे म्हटल्याप्रमाणे आपण एका मानसिक व्यायामशाळेत रोज जाण्यास हवे.
टीए, एनएलपी व डॉ. डिबोनो यांच्या विचारांचे फारच त्रोटक विश्लेषण या लेखात मांडले आहे उद्देश एवढाच की त्यांच्या संशोधनाचे महत्त्व अधोरेखित व्हावे.आजची शिक्षण पद्धती बरीचशी शिक्षकप्रधान आहे ती विद्यार्थीप्रधान व्हायला हवी, कसे शिकवावे यावर भर देण्यापेक्षा कसे शिकतील याकडे जास्त लक्ष देण्यास हवे. ज्या विद्यार्थ्यांला आपण शिकवतो आहोत त्याच्या मनात स्वत:च्या क्षमतांविषयी अकारण अविश्वास निर्माण न होणे आणि आत्मविश्वासाची निर्मिती करणे व त्याच्या सामर्थ्यांची त्याला पूर्णत्वाने ओळख करून देणे हे शिक्षणाचे उद्दिष्ट असायला हवे. आतापर्यंत मी जे लेख लिहिले त्यातून एका जरी विद्यार्थ्यांचे भविष्य घडले तरीदेखील या लेखांचा उद्देश सफल झाला असे मी समजेन.    
 pmjakatdar@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Logical thinking methods

ताज्या बातम्या