निरंजन मेढेकर
केतन अगरवाल या पंचविशीच्या तरुणाची सिया गोयल या त्याच्या वाग्दत्त वधूने आणि तिच्या प्रियकराने हत्या केल्याचं प्रकरण सध्या गाजतं आहे. लोहगडावर १८ जूनला ज्याप्रकारे पूर्वनियोजित कट रचून ही हत्या केली, त्याने समाजमन ढवळून निघालं आहे. हे प्रकरण दररोज नवनवीन वळणं घेत आहे. पण सगळ्यात धक्कादायक म्हणजे वरवर कोणतंही टोकाचं कारण दिसत नसतानाही एका अवघं विशीचं कोवळं वय असलेल्या मुलीनं आपल्या नियोजित पतीचा थंड डोक्यानं थेट ४०० फूट दरीत ढकलून केलेला खून.

कोणतीही व्यक्ती आपल्या जोडीदाराची किंवा होणार्‍या जोडीदाराची हत्या का करते, यावर इस्रायली प्राध्यापक आणि संशोधक ॲरन बी आणि रुहाना जी यांनी अभ्यास केला. त्यांनी जोडीदाराला संपवलेल्या ३० लोकांच्या मुलाखती घेतल्या. या संशोधनातून २००८ मध्ये लिहिलेल्या ‘इन द नेम ऑफ लव्ह’ या पुस्तकाचा संदर्भ देेत निरीक्षणं नोंदवताना मानसशास्त्रज्ञ गौरी जानवेकर यांनी सांगितलं, ‘‘जेव्हा पुरुष स्त्रीला मारून टाकण्यापर्यंतच्या विचारापर्यंत पोहोचतो तेव्हा बहुतेकदा ती त्याला सोडून जाण्याचं ठरवत असते.

तोपर्यंत तो पुरुष त्या नात्यात तिच्यावर पूर्णपणे अवलंबून राहायला लागलेला असतो. आता आपण तिच्याशिवाय कसं आणि का जगायचं हे त्याला समजत नाही. जेव्हा ही व्यक्ती आपल्याला सोडून जाणार हे लक्षात येतं तेव्हा राग, संताप, हतबलता अशा अनेक भावनांचा तो अनुभव घेतो. आणि मग अगदी ठरवून, नियोजन करून तो तिला ठार मारून टाकतो. याला समाजात प्रेमाची जी काही विशिष्ट प्रकारची विचारसरणी तयार झालेली असते ती कारणीभूत असते. म्हणजे प्रेमात किती वेडं व्हायचं असतं, ते किती उत्कटतेनं करायचं असतं, वगैरे वगैरे. हे पुरुष या विचारसरणीचे बळी असतात असं अभ्यासक नमूद करतात. त्याला तो पुरुष ‘क्राइम ऑफ पॅशन’ म्हणतो.’’

दुसरीकडे एखादी स्त्री पुरुषाला ठार मारते त्याची कारणं पूर्णपणे वेगळी असतात. गौरी सांगतात, ‘‘बाई जेव्हा पुरुषाला ठार करते तेव्हा तो ‘क्राइम ऑफ पॅशन’ नसतो. जेव्हा तिला त्याशिवाय सुटकेचा दुसरा मार्ग दिसत नाही तेव्हा ती त्याला ठार करते. काही दिवसांपूर्वी दारू पिऊन त्रास देणार्‍या आणि सतत संशय घेणार्‍या नवर्‍याला बायकोने डोक्यात पाटा घालून ठार मारलं अशी बातमी प्रसिद्ध झाली होती. अभ्यासातून असं लक्षात येतं की, याला मारल्याशिवाय आपली सुटका नाही, असं जेव्हा वाटतं तेव्हा ती स्त्री पुरुषाला मारते. असं वाटणं ही चूक असू शकते किंवा अशा वेळी दुसरा पर्याय न सुचणं हीदेखील चूकच आणि शिक्षेपात्र गुन्हाच. फक्त स्त्री-पुरुष दोघांचीही कारणं अशी वेगवेगळी असू शकतात.’’

केतन-सिया-चेतन यांच्या प्रकरणातून एक न टाळता येणारा प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे सध्या ज्यांना  ‘जेन झी’ म्हटलं जातं, त्यांना ओळखण्यात, त्यांचे विचार, मतं, आवडीनिवडी आणि एकूणच भावविश्व जाणून घेण्यात त्यांचे पालक आणि एकूण समाजच सर्वार्थानं कमी पडत आहेत का?

मुंबई उच्च न्यायालयाच्या (निवृत्त) न्यायमूर्ती मृदुला भाटकर या प्रकरणाच्या निमित्तानं आपलं निरीक्षण नोंदवताना सांगतात, ‘‘मला तो मुलगा पसंत नसल्यानं मला हे लग्न नकोय ही साधी गोष्ट मुलीने आई-वडिलांना सांगायला हवी होती. पण हल्लीची मुलं आई-वडिलांशी अंतरंगातलं बोलत नाहीत. यात मुलांचा फारसा दोष नाही. तर आई-वडील, आजी-आजोबा या मागील दोन पिढ्यांचा त्यांच्या मुलांबरोबरचा संवाद तुटला आहे. मुलामुलींना मनातलं बोलायला मित्रमैत्रिणी नसतात. आभासी जगात त्यांना खूप मित्रमैत्रिणी आहेत, पण प्रत्यक्षात नाहीत. मागच्या पिढ्या कोणत्या ना कोणत्या स्क्रीनमध्ये व्यग्र आहेत. कारण वेळ घालवण्याचं त्यांचं हे एकमेव साधन आहे. माझ्या आधीची पिढी स्वातंत्र्यासाठी लढणारी होती. पण आताच्या ४५ ते ७५ वयोगटातले नागरिक ‘कम्फर्ट झोन’मधून बाहेर येत नाहीत. त्यामुळे आपली जबाबदारी टाळत मुलांना सतत दोष देणं मला पटत नाही.’’

‘जेन झी’सह आधीच्याही पिढ्यांचा प्रचंड प्रमाणात वाढत असलेला ‘स्क्रीनटाइम’ मानवी वर्तनावर, विशेषत: आक्रमकतेत आणि हिंसेला सहज स्वीकारण्याच्या वृत्तीत वाढ करत असेल का, असा प्रश्न पडतो. पोलीस तपासानुसार सिया-चेतनचं प्रेम प्रकरण ऑक्टोबर २०२५ पासून सुरू होतं. तेव्हापासून ते १८ जून २०२६ या साडेआठ-नऊ महिन्यांत एकमेकांसोबत ४२०० वेळा फोनवर बोलले होते. थोडक्यात, ते दिवसाला एकमेकांसोबत १६ वेळा फोनवर बोलत होते.

याशिवाय ‘चॅट’ करत असतील ते वेगळंच. प्रेमात आकंठ बुडालेलं कोणतंही जोडपं असंच वागतं हे समर्थन असलं तरी हा किमान तीन-चार तासांचा त्यांचा केवळ एकमेकांसोबतचा ‘स्क्रीनटाइम’ होता. याव्यतिरिक्तही ते मोबाइलसह अन्य स्क्रीन्सवर असू शकतात. शिवाय त्यांचं प्रेम प्रकरण सुरू झाल्यावर अवघ्या चारच महिन्यांत सियाचा केतनसोबत साखरपुडा झाला होता. या सतत फोनवर राहण्याचा, ऑनलाइन विश्वात वावरण्याचा वर्तनावर गंभीर परिणाम होऊ शकतो असं स्पष्ट करत माध्यम, तंत्रज्ञान व संस्कृती अभ्यासक प्रा. विश्राम ढोले नमूद करतात, ‘‘एखादी व्यक्ती सतत समाजमाध्यमांवर असेल, ‘चॅटिंग-कॉल्स’ करत असेल तर तिचं प्रत्यक्ष जगासोबतचं नातं हळूहळू विरत जातं. वास्तवाचं भान सुटत जातं.

सतत आभासी विश्वात वावरल्यानं अशा व्यक्ती प्रत्यक्ष जगातील कृत्यांच्या परिणामांबाबत हळूहळू असंवेदनशील होत जातात. त्यात श्रीमंत घरांमधील सुरक्षिततेच्या वातावरणामुळे अशा मुलांना रोजच्या जगण्यातील जोखमीचीही जाणीव होत नाही. ‘गेमिंग’ सोडा, साधं समाजमाध्यमांवर पडिक राहिलं तरी इतकी हिंसा बघायला मिळते की, हिंसा हा जणू आपल्या दैनंदिन जगण्यातला सहज भाग आहे असं वाटू शकतं. तत्त्वज्ञ हाना आरन्ट (Hannah Arendt) यांचे शब्द थोडे वेगळ्या पद्धतीने वापरायचे तर ‘दुष्टपणाचं कृत्य हे सर्वसाधारण’ वाटू लागतं (Banality of evil). वास्तवाशी दीर्घकाळ संबंध तुटल्यानं निर्माण झालेल्या असंवेदनशीलतेतून असा कमालीचा कोरडेपणा- कोडगेपणा येऊ शकतो.’’

गेल्या काही वर्षांत स्त्रियांकडून होणार्‍या गुन्ह्यांचा टक्का सातत्यानं वाढत आहे हा मुद्दा अधोरेखित करून लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते समीर गायकवाड नमूद करतात, ‘‘२००१ मध्ये स्त्रियांकडून होणार्‍या गुन्ह्यांचं प्रमाण (भारतीय दंड संहितेनुसार) सुमारे ५.४ टक्के होतं, ते २०११ पर्यंत ६.२ टक्के झालं. एकूण अटक झालेल्या स्त्रियांची संख्या १.४४  लाखांवरून १.९३ लाखांपर्यंत वाढली. हे प्रमाण अजूनही पुरुषांच्या तुलनेत २०:१ इतकं कमी आहे. पण वाढ स्पष्ट आहे. स्त्रियांचा खुनातला सहभाग ५.४ टक्क्यांवरून ६.४ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. स्त्रियांचा गुन्हेगारीचा वाटा अजूनही लहान आहे, पण तीव्रता आणि हिंसक स्वरूप बदलत आहे. २०२० पर्यंतच्या आकडेवारीनुसार मागील पाच वर्षांच्या तुलनेत स्त्रियांची अटक १० टक्क्यांनी वाढली आहे. शहरीकरण, पाश्चात्त्यीकरण, आर्थिक स्वातंत्र्याची मागणी, कुटुंब-समाजातील दबाव, गरिबी, बेकारी, बदला घेणे या गोष्टी या सर्वाच्या मुळाशी असू शकतात, असं गुन्हे अन्वेषण विश्लेषकांना वाटतं.’’

केतन अगरवालच्या प्रकरणाविषयी आपली निरीक्षणं मांडताना गायकवाड म्हणतात, ‘‘केतनचं रूप, व्यक्तिमत्त्व हे सियाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं होतं. त्यामुळे त्याला असणारं टक्कल, त्याचं तोतरं बोलणं तिला खटकलं. त्याचं बाह्य व्यक्तिमत्त्व तिला आवडलं नाही. ‘जेन झी’विषयी म्हटलं जातं की, ही पिढी त्यांच्या निवडींबाबत, मतांबाबत अत्यंत ठाम असते. यात लैंगिकता आणि कामजीवनही आलं. या मुलीपाशी ती स्पष्टता आहे.

मागील दशकात स्त्रियांनी, मुलींनी आपल्या नवर्‍याचे, प्रियकराचे खून करण्याच्या जितक्याही घटना उघडकीस आल्या आहेत त्यातील बहुतांश प्रकरणाच्या मुळाशी या भावना दिसतात. आपल्याला हवा तसा आणि हवं ते सुख देणारा जोडीदार हवाय असं आता त्या उघड उघड सांगू लागल्यात. साधारणपणे मोठ्या शहरांमध्ये जे घडतं ते मध्यम आकारांच्या शहरात पुढच्या दशकात रुजतं आणि मध्यम शहरांमधून लहान शहरांत हे लोण अवघ्या दोन-पाच वर्षांत पसरतं. तेच लोण खेड्यापाड्यांत झिरपायला साधारण आणखी पाच वर्षं लागतात. पूर्वीच्या काळी स्त्रिया स्वत:च्या इच्छांना मुरड घालायच्या. आता मुलींच्या-स्त्रियांच्या इच्छा-आकांक्षांचे गळे घोटणं तेवढंसं सोपं नाही, हे या घटनेतून स्पष्ट होत आहे.’’

‘जेन झी’चा आपल्या आई- वडिलांच्या पिढीशी संवाद तुटलाय यामागचं कारण मुलांची आणि पालकांची संवादाची भाषा एक राहिली नाहीये का? या प्रश्नावर प्रा. विश्राम ढोले म्हणतात, ‘‘मुलांची आणि पालकांची ‘आतड्याची’ भाषा आज वेगळी होत आहे. मी मातृभाषा न म्हणता आतड्याची भाषा म्हणतो. याचा अर्थ जे बोललं जातंय ते त्याच्या सार्‍या खोलवरच्या संदर्भासह कळणं म्हणजे आतड्याची भाषा येणं. म्हणजे मुलं आणि पालक अशा दोघांनाही मराठी, इंग्रजी, हिंदी वगैरे येत असतं, पण त्यातून जे बोललं जातं ते त्यांना त्याच्या संदर्भासह, गृहीतकांसह कळत नाही. बोलणं होतं. पण ते कोरडं असतं.

बर्‍याचदा असं दिसतं की, ही मुलं आपल्या पालकांसोबत ‘सेलिब्रेशन’ व्यतिरिक्त इतर भावनिक प्रसंगांमध्ये सोबत नसतात. त्यामुळे दु:खी होणं, एकाकी वाटणं, चिंता वाटणं, भय वाटणं, नैतिक पेच उभा राहणं असे अनुभव मुलांकडून पालकांपर्यंत पोहोचतच नाहीत. कदाचित पालकांकडूनही हे अनुभव मुलांपर्यंत पोहोचत नसावेत. दुसरीकडे आपल्या समाजात गेल्या काही वर्षांत माझा खासगीपणा, माझी ‘स्पेस’, माझा निर्णय, मला कुणासोबत तडजोड करायची नाही ही वृत्ती वाढताना दिसतेय. याचा दोष फक्त माध्यमांचा नाहीये. गेल्या काही वर्षांत शहरी मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय घरांत शिरलेलं विचारांचं हे एक वादळ आहे. त्यातून खुलेपणाचा- स्वातंत्र्याचा अतिरेकी अर्थ पसरतोय. इतरांप्रतिही माझी बांधिलकी असते, त्यांच्यासाठी मला तडजोड करावी लागते हे नाकारण्याला मग अशा विचारातून ता्त्विवक समर्थन देता येतं.’’

केतन अगरवालचा मृत्यू अपघाती नसून ती हत्या आहे हे कळल्यावर आलेल्या कमालीच्या अस्वस्थतेतून या प्रकरणांच्या संदर्भातच मला पहिल्यांदाच कविता स्फुरली. त्यानं लेखाची सांगता करतो…

उच्चभ्रूंच्या या ‘जेन झी’चं बरं असतं

कमावण्याची चिंता नसते

जगण्याची भ्रांत नसते

कुणासाठी तरी झिजण्याची

तिळतिळ तुटण्याची

काळजात हात घालण्याची

प्रेमात पुरतं हरण्याची

कदाचित कधीच आस नसते…

तेवढी तर आयफोनमध्येही

     स्पेस नसते

यांच्या प्रेमाच्या त्रिकोणाचीही

गोष्ट पुरी फिल्मी असते

एवढं कोरडंठाक खरंच होता येतं?

कड्यावरून ढकलताना इतकं

आसुरी सुख मिळतं?

तेव्हाही ‘स्टेटस’वरची ‘सेंटी’ 

पोस्टच आठवत असते

रीलचं अल्गोरिदम तेव्हाही

 डोक्यात घुमत असते

एका क्षणी सगळंच कसं

    मातीमोल होऊ शकतं?

सोबतचं हाडामांसाचं माणूस

    क्षणात होत्याचं नव्हतं होतं

खोट्या आसवांनी घरच्यांशी

    नजर भिडवताना

खोट्या नात्याची आहुती देऊन

    खरं प्रेम कवटाळताना

पोलिसांनी उलटतपासणी करेपर्यंत

पश्चात्तापाची जाणीवही

    फिरकत नसते

आताही कदाचित आईबापच

    दोषी ठरतील

मारलेल्या लेकराचे अन् जिवंतपणी

मरण भोगणारीचेही

कधीच ‘नाही’ ऐकायची सवय

नसलेल्या जनरेशनसाठी

हे अगदी किरकोळ कांड असते

इथे पोर्शवाला पोरगा आरामात सुटतो

त्यानंतर त्याचा बाप बिनधास्त

    पार्टी  करतो…

इथे तर साक्षात ‘अजाण’ कन्या   

आहे

दोन-चार महिन्यांची तर फक्त गोष्टय

उच्चभ्रूंच्या जगात सगळं कसं

    मॅनेज  होतं

हे त्यांच्या पोट्ट्यांना पुरतं ठावूक   

असतं त्यामुळेच तर उच्चभ्रूंच्या या

    ‘जेन झी’चं  बरं असतं!

niranjan@soundsgreat.in