लोकपरंपरेत धर्म म्हणून असतो, तो ‘काम्य धर्म.’ याचा अर्थ मनामध्ये कामना किंवा इच्छा ठेवून केलेलं आचरण! धर्माला दोन बाजू असतात. एक ‘आचार धर्म’ आणि दुसरा धर्म असतो ‘विचार धर्म’, ज्याला ‘तत्त्वज्ञान’ असं म्हटलं जातं. ‘मोक्ष’ मिळवणं हा आपल्याकडे धर्माचा उच्च हेतू मानला जातो. सर्वसामान्य माणसं दैनंदिन जीवनामध्ये चालीरीती, रूढी, निरनिराळे नवस असा जो धर्म आचरणात आणतात, तोच आचारधर्म किंवा काम्यधर्म आहे. ऐहिक जीवन सुखकर व्हावं म्हणून केलेला हा आचार धर्म आहे. चातुर्मासातल्या कहाण्यांचे व्रत करताना काही इच्छा मनात ठेवल्या जातात. ‘‘इतरांच्या जशा इच्छा पूर्ण झाल्या तशा आमच्या इच्छा पूर्ण होऊ देत…’’ अशी ती कामना. इतकंच नव्हे, तर हे कहाणीचं व्रत करायचं आणि त्याचं ‘फळ’ घ्यायचं. त्यामुळे धर्माच्या नावावर ‘फलाशा’ मनात धरून केलेली जी आचरणं आहेत तो ‘लोकधर्म’ आहे.
कहाणीच्या व्रतामध्येसुद्धा ‘‘कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ? काय ‘वसा’ असेल तो मला सांगा,’’ असं प्रत्येक कहाणीमध्ये असतं आणि तो वसा सांगितला जातो, वसा सांगताना म्हटलं जातं, ‘‘मी तुला कशाला वसा सांगू, उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील…’’ तेव्हा ती म्हणते, ‘‘उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकणार नाही.’’ शेवटी, ‘‘तिला जसा अमुक देव प्रसन्न झाला, तिला जसं अमुक फळ मिळालं, तिला जसं सर्व सुख मिळालं, तिच्यावरची जशी संकटं टळली तशी तुमच्या आमच्यावरची टळोत,’’ ही प्रार्थना, खरं तर कामना व्यक्त होते. नंतर कहाणी सुफळ संपूर्ण वगैरे प्रकारे सांगितली जाते. त्यामुळे आपल्या ऐहिक जीवनामधील अडचणी दूर व्हाव्यात यासाठी ही व्रतं प्रामुख्याने स्त्रियांनीच केलेली आहेत. स्त्रीदेवतांशी संबंधित व्रतं जास्त आहेत. ‘सुफलन’ व्रतं स्त्री देवतांशी संबंधित आहेत. विशेषत: शीतलादेवी आदी. बहुतांश वेळा स्त्रिया ही व्रते करतात. उपास करतात. शरीराला क्लेश देतात. आत्मक्लेश करून घेतले की, देवता आपल्याला प्रसन्न होईल अशी धारणा असते आणि म्हणून या परंपरागत चालीरीती, रूढी या माणसांच्या भावनेतून, श्रद्धेतून निर्माण झालेल्या आहेत. ही सर्व निसर्गतत्त्वं ‘यातु’ श्रद्धेमुळे दूर होतील असा विश्वास असतो. या संदर्भात इंग्रजीत सर जेम्स फ्रेझर यांचं ‘मॅजिक अँड रिलिजन’ हे पुस्तक आहे.
धर्माचा आणि यातु श्रद्धेचा अतूट संबंध आहे. ((विश्वामध्ये एक अदृश्य पण कर्तुम, अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी विश्वव्याप्त आदिम शक्ती आहे. ही जगभरच्या मानवाची आदिम श्रध्दा आहे. तिला यातु ‘मॅजिक’ म्हटलं जातं. समूहाने एकत्रित येऊन कामना व्यक्त करणारी प्रतीकात्मक कृती करणं म्हणजे यातु विधी. या अदृश्य यातुशक्तीतूनच परमेश्वर व उपासना या सगुण धर्मसंकल्पनेचा विकास झाला आहे. ))म्हणून रोजची आपली देवपूजा हासुद्धा एक यात्वात्मक विधी ‘मॅजिकल राईट’ आहे.
देवाला आपण फुलं वाहिली तर आपल्या आजूबाजूला फुलं, पानं निर्माण होतील. पाणी वाहिलं तर पाणी निर्माण होईल. निसर्गतत्त्वांचा उपयोग प्रतीकं म्हणून आदिम यातु विधीत मोठ्या प्रमाणात केला जातो. माणूस जसजसा प्रगत होतो तसं माणूस जे स्वत: भोगत असतो ते देवाला भोगायला मिळावं, असं वाटतं. म्हणून देवाला अर्पण करावं ही श्रध्दा आहे. माणसाला पुरणपोळी, मोदक खावेसे वाटले की देवाला पुरणपोळीचा, मोदकांचा नैवेद्य लागतो. म्हणून इतिहासकार वि.का. राजवाडे यांनी म्हटलंय, ‘‘जशी संस्कृती तसं हत्यार…’’ आदिम संस्कृतीत दगडाची हत्यारं होती. लोखंडाचा शोध लागल्यावर माणूस लोखंडाचं हत्यार वापरू लागला. आजतर आपण प्रगत झालेले आहोत, पण हत्यार वापरून दुसर्याचा नाश करणं ही आदिम प्रवृत्ती संपलेली नाही. ही कामना मनामध्ये आहेच आणि दिवसेंदिवस ती उग्र रूप धारण करताना आपल्याला दिसतेय.
‘जशी संस्कृती तसा त्याचा देव.’ असं म्हणता येतं. माणसाच्या मनाचं प्रतिबिंब देवांमध्ये असतं. देवांच्या मूर्ती आपण बघितल्या तर, त्या देवतेला जी वस्त्रं, अलंकार घातली जातात, जसं सजवलं जातं त्यात माणूस आपल्या जीवनाचं प्रतिबिंब देवावर आरोपित करत असतो. देवाची स्तोत्रं म्हटली जातात, त्यात शेवटी म्हणतात, ‘‘पुत्रं देही, धनं देही, धान्यं देही…’’ म्हणजे ऐहिक जीवन सुखी करण्यासाठी काही गोष्टींची इच्छा करायची. यासाठी जी आचरणं केली जातात, त्यात मनुष्य आपल्या जीवनाचं प्रतिबिंब पाहत असतो. देवासाठी भूपाळी म्हणणं, त्याचे अलंकार, देवाला पाणी देणं, दूध देणं, इत्यादीद्वारे मनुष्य आपलं जगणं देवाच्या मूर्तीवर आरोपित करत असतो. जगाच्या पाठीवर सगळीकडे हे घडत असतं. फक्त तपशील बदलतो. तत्त्व कायम असतं. वनस्पती सर्वांनाच हव्या असतात. भारतात तुळशी पवित्र असेल तर दुसरीकडे सब्जा पवित्र होतो. कबीरदासांच्या कहाणीत एक दंतकथा आहे. कबीरदास हिंदू होते की मुस्लीम होते यावरून दोन भक्तांमध्ये वाद निर्माण झाला. कबीरदास हे अनाथ मूल म्हणून सापडले होते. परंतु त्यांचे भक्त दोन्ही धमांर्चे होते. हिंदू म्हणाले, मृत्यूनंतर त्यांच्या तोंडात तुळस ठेवायची. तर मुस्लिमांनी सब्जा ठेवावा असं सांगितलं. काही जाणत्या लोकांनी कबीरदासांच्या शरीरावर जे आवरण घातलेलं होतं ते काढलं आणि त्यांना दिसलं की, एका बाजूला सब्जा होता आणि एका बाजूला तुळस. कबीरदास सर्व धर्मांचे होते, हा त्यातला उदात्त अर्थ. परंतु अशा प्रकारच्या कहाण्या माणसाने आरोपित केलेल्या भावनांमधून निर्माण झालेल्या दिसतात. उदा. या देवाने अमुक करावं अशी इच्छा असली की ती कहाणीमध्ये प्रतिबिंबित होते. पंढरीच्या विठ्ठलाने मंदिराबाहेर राहणार्या जनाबाईसारख्या दासीला म्हणजे स्त्रीला मदत करावी अशा प्रकारची भावना मनात असली की तशी कथा निर्माण होते. विठ्ठल उठला, जनाबाईला शेण-सडा करायला त्याने मदत केली. धुणी धुवायला तिच्यासोबत गेला. अशाप्रकारच्या कथा निर्माण होतात. माणसाचं मन या कथा निर्माण करत असतं. जे घडावं असं वाटत असतं पण प्रत्यक्षात घडत नाही. ते देव करवून आणतो, ही मनाला समाधान देणारी गोष्ट या कथांमधून निर्माण होते. म्हणून देवांच्या या कथा आदिम काळापासून आहेत. त्याचं स्वरूप (तपशील)फक्त बदलतं. या धार्मिक कथा कालपरत्वे, स्थलपरत्वे बदलत राहतात.
महाकाव्यातल्या कथासुद्धा निरनिराळ्या ठिकाणी बदलत जातात. कारण मुळात त्या लोककथा आहेत. महाभारत आणि रामायणाच्या कथा सगळीकडे सारख्याच आहेत असं नाही. निरनिराळ्या काळात विविध प्रांतात एकाच देवतेच्या विविध कथा जन्माला येतात. म्हणूनच ‘मौखिक रामायणं’ खूप आहेत. यावर माझं ‘सीतायन’ हे पुस्तक आहे.
असंच महाभारताचंसुद्धा आहे. कर्नाटकामध्ये महाभारतातली मजेशीर गोष्ट आहे. मुलगी आणि तिथलं एक फळ या दोन्हींच्या उच्चारात साधर्म्य आहे. पांडव अज्ञातवासात बाहेरून भिक्षा घेऊन आले. भिक्षेमध्ये खरं तर ते द्रौपदीला घेऊन आले होते. ती भिक्षा नव्हतीच, ती अर्जुनाने जिंकून आणलेली स्त्री होती. त्यांची माता कुंती घरात होती. पांडवांनी ओरडून सांगितलं, ‘‘आई आम्ही ‘हेण्णू’ (स्त्री) घेऊन आलो आहोत.’’ तिला वाटलं ते ‘हण्णू’ नावाचं फळ घेऊन आलेले आहेत. म्हणून तिने सांगितलं ‘‘वाटून घ्या…’’ प्रत्यक्षात कानडीत त्या उच्चाराला जवळ असलेला तो स्त्रीवाचक उच्चार होता जो तिने ऐकलेला नव्हता आणि म्हणून पांडवांनी द्रौपदीची पाच जणांत वाटणी केली, जे त्यांना अभिप्रेत नव्हतं. ही कानडीतली एक लोककथा. अशा प्रकारच्या कथा लोकपरंपरेत जन्माला येत असतात आणि त्या प्रदेशात, भाषेत रूढ होतात.
रामायण, महाभारतातल्या, विठ्ठल, सीतेच्या अशा वेगवेगळ्या कथा भक्तगण निर्माण करतात. याचं कारण भक्तजनाला तसं व्हावं असं अपेक्षित असतं. भविष्याकडे पाहताना कसं पहावं याविषयी केशवसुत सांगतात, ‘‘व्हावे ते आणा ध्यानी…’’ याचा अर्थ भविष्यकाळात जे घडावं असं वाटतं, ते मनात आणा. म्हणजे ते घडेल. तसं आपण देवतांच्या कथांच्या बाबतीत करतो. माणसांच्या मनात रुजलेल्या अपेक्षा, स्वप्नं ही प्रत्यक्षात येतात ती त्या कथेच्या रूपाने येत असतात. मानसशास्त्रज्ञ सिग्मंड फ्रॉईडने आपल्या ‘स्वप्न सिद्धांता’ मध्ये म्हटलंय, ‘‘जे व्हावं असं मनापासून वाटत असतं, पण प्रत्यक्षात होत नाही किंवा मनातल्या एखाद्या भीतीचं प्रत्यक्षात निराकरण होत नाही अशा गोष्टी आपल्याला स्वप्नात दिसतात आणि त्याही प्रतीकात्मक रूपात.’’ त्यासाठी लैंगिकतेचं एक उदाहरण नेहमी दिलं जातं, लैंगिकतेविषयी ज्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत, त्या नेहमी सर्पाच्या रूपाने स्वप्नात प्रतीकंं म्हणून व्यक्त होतात. स्वप्नामध्ये प्रतीकात्मक रीतीने सर्प येतो. त्यावर पुढे मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांनी पुढचा सिद्धांत मांडला. व्यक्तीच्या इच्छा जशा त्याच्या स्वप्नातून व्यक्त होतात, तशा समुहाच्या अबोध मनाच्या काही इच्छा, स्वप्नं असतात, ही स्वप्नं ‘मिथकां’मधून (Myth) (प्राकथा), पुराणकथांमधून व्यक्त होतात. या प्रामुख्याने निसर्गतत्त्वांच्याच कथा असतात. या कथा त्या त्या समाजामध्ये जन्माला येतात. रामायण, महाभारत यासारख्या कथा म्हणूनच मिथकं आहेत. मिथकांचे संशोधक असं म्हणतात की, मिथकं ही समूह मनाची स्वप्नं असतात. समूहाच्या मनामध्ये आदिम काळापासून जे अनुभव आहेत ते सुप्त अवस्थेमध्ये असतात आणि नंतर ते चित्र, कथा अशा कलांच्या माध्यमातून व्यक्त होतात. ते शिल्पांमधून व्यक्त होतात. समूह मनाला असलेल्या अपेक्षा मिथकांतून व्यक्त होतात आणि ती मिथकं पुन्हा त्या कलावंताच्या अंतर्मनातून उसळी मारून बाहेर येतात तेव्हा ती कलेतून व्यक्त होतात आणि त्यामुळे प्राचीन ते अद्यतन किंवा आदिम ते अद्यतन हा माणसांचा जो प्रवास आहे तो प्रवास त्याच्या चालीरीती, रूढी, धर्म या सगळ्यातून आलेला एक लांब पट आपल्याला दिसतो, त्याला आपण संस्कृती, धर्म अशी नावं देत असतो. हा जो प्रवास आहे तो खंडित होत नाही. म्हणून ही संस्कृती आदिम आहे. नवीनही आहे. संस्कृती आणि धर्म यांची नेमकी सीमारेषा आखणं हे कठीण होतं. त्यामुळे लोकपरंपरेत चालत आलेल्या प्रतिकात्मक चालीरीतींमधून जो ‘धर्म’ म्हणून व्यक्त होत असतो त्याला मी ‘लोकधर्म’ असं म्हणते. ‘लोकेषु आयत: लोकायत:’ लोकांच्या मनातून ते निर्माण झालेलं असतं. म्हणून हा लोकधर्म, लोकायत!
लोकधर्म हा प्रतीकांचा धर्म आहे आणि प्रतीकांच्या आचरणालाच आपण धर्म असं नाव देत असतो. म्हणूनच जन्म, विवाह, मृत्यू याविषयीचे जे विश्वास आहेत ते आपण प्रतीकांच्या माध्यमातून व्यक्त करत असतो. मृत्यूनंतर दरवर्षी श्राद्ध केलं जातं, त्यात अपेक्षा अशी असते, जीवनाचा जो प्रवाह आहे, तो अखंड राहावा. व्यक्ती जाते, देह जातो परंतु ते अस्तित्त्व राहावं. ते अव्यक्त आहे. जशी यातु श्रद्धा अव्यक्त आहे, परंतु ती व्यक्त होताना प्रतीकांतून व्यक्त होत असते. त्यामुळे या सगळ्याचा विचार करताना लोकपरंपरेचा खूप उपयोग होत असतो. लोकपरंपरेतल्या चालीरीती, रूढी, परंपरा यांच्याशी संबंधित उपासना अतिशय नाट्यात्मक असतात. गीतांची, कथेची निर्मिती ही देवता कथांच्या निर्मितीतून होते तशी नाट्य आणि संगीताची निर्मितीसुद्धा प्रतीकांच्या मिथकांच्या माध्यमातून होते.
नाट्योदयाचा हा महत्त्वाचा सिद्धांत मिथकांशी संबंधित आहे. त्यातून नाट्य व्यक्त होत असतं. लोकनाट्यांतून नाट्य क्रमाक्रमाने प्रगत झालेलं आहे. त्यामुळे मराठी, हिंदी, इंग्रजी अशा अनेक भाषांमधली प्राचीन, जुनी नाटकं ही पुराणकथेशी संबंधित आहेत. या नाटकात त्या वेळची मिथकं दिसतात. क्रमाक्रमाने मनुष्य जेव्हा या श्रद्धेपासून अलिप्त होतो, तेव्हा त्या कलेचं रूप बदलतं, पण त्याचं मूळ कायम असतं. म्हणून मराठी नाटकातलं इतर काही बदललं तरी ‘नांदी विधी’ कायम असतो. म्हणूनच सर्व कलांचा उगम हा आदिम यातु श्रद्धेतून निर्माण झालेला आहे आणि त्यातून हा धर्म निर्माण झालेला आहे. हे सगळे विधी ‘काम्य’ प्रकारचे आहेत. हा जो लोकाचारातला धर्म आहे आणि लोकाचारातली कलात्मक अधिष्ठानं आहेत, ते सगळे ऐहिक जीवन सुखाचं व्हावं म्हणून झालेले आहेत, असं म्हणता येईल.
chaturang@expressindia.com
