परंपरागत म्हणी, वाक्प्रचार, गाणी, उखाणे ही भाषेची फार मोठी सामुग्री आहे. समूह मनाचा संचित भाषिक आविष्कार म्हणजे ‘म्हण’. स्वाभाविकच म्हणीमधून समाजाचं मन व्यक्त होत असतं. ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ हे त्याचसाठी म्हटलं जातं. जितका अनुभव जास्त तितका तो भाषेच्या वक्रोक्तीतून व्यक्त होत असतो, ‘लेकी बोले आणि सुने लागे…’ असं म्हणत दोन-चार शब्दांमधून, म्हणींतून मोठा अनुभव व्यक्त करता येतो. आमच्या लहानपणीची गोष्ट आहे. आमची एक शेजारीण स्वच्छतेची भोक्ती होती. कोणी म्हणायचं, ती पुन्हा पुन्हा तीच तीच कामं करत असते. घरातल्या वस्तू सतत पुसायच्या, झाडायच्या आणि म्हणायचं, ‘‘बघा…!’’ तिची आई त्यावर म्हणायची, ‘‘अगं धुवावा तेवढा मळ आणि भांडावा तेवढी कळ, असली कामं संपत नाहीत.’’ तर तिची सासू म्हणायची. ‘‘तुम्ही कशाला तिला ते सांगताय? ‘आई तशी लेक आणि दोघींची खोड एक.’ म्हणजे हे शस्त्र ती तिच्या आईवरच सोलटायची. काही झालं तरी सुनेच्या माहेरचं उणंदुणं काढणं हा सासूचा हक्कच.

‘दुसर्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं, पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही,’ हा एकूणच माणसाचा स्वभाव. त्यातून ‘सासू म्हणजे अंथरुणातली पिसू.’ त्यामुळे सासूचंही उणंदुणं लगेच काढलं जायचं, पण सुनांना तसं थेट दाखवता येत नाही. सासूची त्यांना अनेकदा अडगळच वाटते. ती फार कटकटी असली तर मग विचारायलाच नको. अशी सासू जर मेली, तर सुनांना मनातल्या मनात खूप बरं वाटतं, पण बाहेर तसं दाखवता येत नसल्याने मोठमोठ्याने गळा काढून त्या सुना रडतात. अशा सुना रडायला लागल्या की, आजूबाजूच्या स्त्रियांमधली जी शहाणी बाई असते तिच्या ते बरोबर लक्षात येतं. हे रडणं काही खरं नाही. हे कोरडे गहिवर आहेत. त्यावर ती म्हणते, ‘डोळ्याला नाही आसू अन् मेली सख्खी सासू…’

 पारंपरिक स्त्रियांचं शब्दविश्व म्हणी, उखाणे, वाक्प्रचार यांनी नुसतं गजबजलेलं असायचं. अलीकडे शिक्षित झाल्यामुळे लिखित भाषेचं चलन स्त्रियांच्यासुद्धा तोंडात बसलेलं आहे. त्यामुळे बोली भाषेतली सहजता आणि त्यातून निर्माण होणारी अशी वक्रता कमी होत चालली आहे की काय असं वाटतं. ‘म्हणी अनुभवाच्या खाणी’ अशी म्हणीवरचीसुद्धा म्हण होते. जितका अनुभव जास्त तितका तो वक्र भाषेतून व्यक्त होतो त्यामुळे पुष्कळदा थेट कोणाला बोलता येत नसलं, त्यांचं उणंदुणं काढता येत नसलं की म्हणायचं ‘लेकी बोले आणि सुने लागे…’ म्हणजे लेकीला उद्देशून बोलायचं परंतु ते सुनेच्या मनाला लागलं पाहिजे. तसंच बोलता बोलता कोणी फारच वाचाळपणा करू लागलं की लगेच म्हटलं जायचं, ‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ असं म्हणीतूनच समोरच्याला विरोध  केला जायचा.

मुळात भाषा ही लोकनिर्मित, लोकरक्षित आणि लोकांनी वहन केलेली अशी एक सजीव संस्था आहे आणि म्हणून भाषेचं जितकं मौखिक चलन असेल, तोंडी चलन असेल, तेवढा भाषेचा विलास आपल्याला भरभरून दिसतो. तो बोली भाषेमध्ये प्रकर्षाने दिसतो. म्हणी आणि उखाणे म्हणजे ‘प्रोव्हर्ब्स’ आणि ‘फ्रेजेस’ यांच्यामधून होणारा भाषेचा विलास फार मजेशीर असतो. तो एक भाषिक चमत्कार असतो असं म्हणायला हरकत नाही. दोन-चार शब्दांमधून मोठा अनुभव व्यक्त होतो आणि तो समाजाचा सामूहिक अनुभव असल्यामुळे त्याचा प्रसार आणि स्वीकारही लवकर होतो. एखाद्याला जर विशिष्ट समाजाचा समाजशास्त्रीय अभ्यास करायचा असेल तर त्या समाजाच्या भाषेची परंपरागत बोली, म्हणी, वाक्प्रचार, गाणी, उखाणे आणि शिव्याही ही फार मोठी सामुग्री आहे. समूह मनाचा संचित भाषिक आविष्कार म्हणजे ‘म्हण.’ स्वाभाविकच म्हणींमधून समाजाचं मन व्यक्त होत असतं.   

म्हणींमध्ये स्त्री-पुरुष असा भेद नसतो, परंतु जास्तीत जास्त म्हणी स्त्रियाच्या तोंडी असतात. कारण त्यांचा एकूणच तोंडी व्यवहार जास्त असतो. शब्दार्थाच्या पलीकडचा व्यापक अर्थ त्या व्यक्त करतात असं म्हणता येईल. म्हणूनच, बाई ही म्हणीची आई असते. स्त्रियाचा प्रपंचामध्ये सहभाग किती? एक काळ असा होता की, सर्व श्रमकरी वर्गातल्या स्त्रिया आपल्या नवर्याबरोबर काही काळ तरी त्यांचं काम करायच्या. मात्र ब्राह्मणाचं पौरोहित्य हे काम बाहेरचं असल्याने त्या करू शकत नसत. त्यावेळी बोली भाषेत एक म्हण म्हटली जायची, ‘सगळी बायको साळ्याची, अर्धी बायको माळ्याची आणि रीणकरीण बायको बाह्मणाची.’ म्हणजे, कापड विणणारा- साळी. त्याच्या बरोबरीने त्याची बायको काम करते. माळी बागेत काम करणारा त्याचीही बायको निम्मं-अर्ध काम करते म्हणून अर्धी बायको माळ्याची आणि ब्राह्मणाची बाई रीणकरीण ती मात्र घराच्या बाहेर जाऊन काहीच करत नाही म्हणून रीणकरीण बायको बाह्मणाची. ती फक्त ऋण करते, कर्ज करते. अर्थात आज हे कोणाला मान्य होणार नाही. परंतु पूर्वीच्या जातीबद्ध समाज परिस्थितीचं प्रतिबिंब त्या म्हणींमधून दिसतं असं आपल्या लक्षात येतं. आणखी काही म्हणी आहेत. त्या आजच्या काळात अर्थातच लागू होत नाहीत. परंतु एके काळच्या समाज स्थितीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने त्या महत्त्वाच्या होत्या. त्याकाळी आणखी एक म्हण होती. प्रत्येक जातीप्रमाणे त्यांचे व्यवसाय त्या म्हणीतून समजायचे. ‘म्हारा घरी गाणं, कुणब्या घरी दाणं अन बामना घरी लिवणं..’ म्हणजे  महाराच्या घरात गाणं. महार स्त्रियांचे आणि पुरुषांचे गाण्याचे आवाज फार चांगले आहेत. अशी माणसं लोकसंगीतात, लोकनाट्यामध्ये आपल्याला दिसतात. शेती करणार्याच्या घरामध्ये धान्य (दाणं) असतं आणि बाह्मणा घरी लिवणं, याचा अर्थ त्याकाळी फक्त ब्राह्मण जमातीचेच पुरुष लिहीत-वाचत होते. इतरांना लिहिण्या-वाचण्याची अद्याप मुभा नव्हती, अशा काळातली ही म्हण आहे. काळाचे प्रतिबिंब त्या म्हणीमध्ये आपल्याला उमटलेलं दिसतं.

म्हणींमधून मुलगा आणि मुलगी याच्यामधला फरक तर फार ठळकपणे दिसतो. कोणाला मुलगा झाला तर त्याचं कौतुक व्हायचं, परंतु मुलगी झाली तर लगेच म्हण यायची, ‘जिच्या पदरी पाप तिला लेकी आपोआप’ म्हणजे मुलगी होणं हे पापाचं लक्षण.  मात्र पहिली मुलगी झाली तर ‘पहिली बेटी तूप रोटी’ म्हणून तिचं कौतुक व्हायचं, परंतु पाठोपाठ जर मुली झाल्या तर त्या ‘पापाच्या राशी’ म्हणून त्यांचा तिरस्कार व्हायचा. मुलग्याचे आणि मुलीचे मूल सांभाळण्याच्या बाबतीत म्हणजे नातवंडांच्या बाबतीतही थोडासा दुजाभाव असायचा. म्हणजे, मुलीचं मूल असलं की त्याला फारसा मान दिला जायचा नाही. परंतु मुलाचा मुलगा किंवा मुलगी असली तर त्यांचं जास्त कौतुक व्हायचं. म्हणून ‘लेकाच्या तू मुला, उचलून घेतो तुला, लेकीचा तू मुला बस जा सांदीला’ किंवा ‘शेंडाच्या सावलीला…’ ‘शेंडं.’ म्हणजे काड्या काड्याचं एक निवडुंगाचं झाड असतं त्याची सावली पडत नाही. त्याच्या खाली ते मुलीचं मूल बसलं तरी चालतं. असा दुजाभाव असण्याचं आणखी एक कारण लेकीचं पोर म्हणजे ‘जावयाचं पोर अन् हरामखोर’ म्हणजे पितृप्राधान्याला इथे महत्त्व. जावयाचं पोर असल्यामुळे ते हरामखोरी करणार… अशा प्रकारे कुटुंब व्यवस्थेमधले नातेसंबंध, समाजातले जातीसंबंधांचे प्रतिबिंब आपल्याला म्हणीत दिसतात. 

वडिलांनी दुसरं लग्न केलं तर त्याच्याबद्दलही निषेध केला जातो. सावत्र आईचाही निषेध केलेला दिसतो, अशा अनेक गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याला म्हणीमध्ये दिसतं. नवर्याच्या बाबतीत तर काही विचारायलाच नको. आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे निदान म्हणीतून तरी बाईने नवर्यावर फारसा विश्वास दाखवलेला दिसत नाही. कारण नवरा बाहेरच्या बाईच्या कधी नादी लागेल तेही सांगता येत नाही. ‘घरचीचं ते मिठवणी अन् बाहेरचीचं ते मिठ्ठापानी’ यातून नवर्याचा बाहेरख्यालीपणा दिसतो.

घरातली बायको वाटेल तेवढा मार खाते म्हणून तिला म्हणायचं, ‘बाई म्हणजे घरातलं जित्राब (जनावर)’ किंवा ‘बाई म्हणजे पायातली वहाण.’ तिला डोक्यावर घ्यायचं नाही ‘ज्याची बाईल धाकात त्याचे आईबाप सुखात’ म्हणून बायकोला कायम धाकात ठेवायचं, स्त्रियाची ही नियती म्हणून स्त्रियांनी स्वीकारलेली असते. म्हणून नेहमी म्हणतात, ‘साप म्हणू नये बापडा अन् नवरा म्हणू नये आपला’ तो कधी उलटेल हे काही सांगता येत नाही.

बालविवाहाच्या दुष्परिणामांचेही प्रतिबिंब म्हणीमध्ये पडलेले दिसते. ही बालवधू जेव्हा तरुण वयात येते आणि तोपर्यंत तो नवरा तिसर्या, चौथ्या लग्नाचा असला तर म्हातारा व्हायला लागतो म्हणून ‘नवरी आली रूपात आणि म्हातारा निघाला कुपात’ अशी म्हण आली. गोर्या बायकोबद्दल लोकपरंपरेत फारसा आदर दिसत नाही. लोकांचं लक्ष तिच्याकडे जातं म्हणून बाईचं गोरेपण हे उलट नवर्याच्या चिंतेचा विषय असतो. लोकपरंपरेमध्ये गोर्यागोमट्या स्त्रियांचा निषेधच केला आहे. ‘एक गोरी आणि हजार खोड्या चोरी’, ‘बायको गोरी अन् दादल्याला पडली दोरी.’ अशा म्हणी आल्या. ती नुसती दिसायला चांगली असते. म्हणून नवरा अस्वस्थ असतो. संसारी बाईला अशा प्रकारे निरनिराळ्या अनुभवांना तोंड द्यावं लागतं आणि त्याची प्रचीती या म्हणींमधून येते. जो कोणी तिचं पालनपोषण करेल त्याच्याशी ती इमानदार राहते आणि म्हणून एखादी वक्र मार्गाला जरी गेली तरी बाईला समजून घेतलं जातं. ‘जो देईल पेजेला, तो घेईल शेजेला.’ कोकणामध्ये ही म्हण फार प्रसिद्ध आहे, जो पेज म्हणजे निदान पोटाला अन्न घालतो, तो शेजेला घेणारच. स्त्रियांनी ही नियती स्वीकारलेली दिसते.

म्हणींमधून स्त्री जीवनाचं, समाज जीवनाचं प्रतिबिंब दिसतं.अनुभवातून बोलता बोलता म्हणी तयार होतात. ‘म्हणता म्हणता म्हण झाली आणि बोलणार्याच्या तोंडी गेली’ अशी म्हणीवरचीसुद्धा एक म्हण होते.

म्हणी आणि उखाणे यांच्यामधून होणारा भाषेचा विलास फार मजेशीर असतो. तो एक भाषिक चमत्कारच असतो. आणि तो समाजाचा सामूहिक अनुभव असल्यामुळे त्याचा प्रसार आणि स्वीकारही लवकर होतो. समूह मनाचा संचित भाषिक आविष्कार म्हणजे ‘म्हण.’

uchaturang@expressindia.com