नीलिमा किराणे

लगभनानंतर प्रत्येकाच्या दैनंदिन जगण्यात बदल होतोच. एकत्र कुटुंब असेल तर नवीन सुनेनं तडजोडी करण्यापेक्षा घरातल्यांनी योग्य त्या तडजोडी करत तिला नवखेपणाची जाणीव होऊ न देणं ही प्रगल्भता. पण प्रत्येक घरातकुटुंबात ती असतेच असं नाही, त्यासाठी त्या घरातल्या त्या नव्या पतीने समंजसपणा दाखवायला हवा. पण कसा?

Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Child Marriage, Supreme Court, Child Marriage Prevention Act,
बालविवाहाचा फेरा : भारत मुक्त कधी होईल?
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास
Solutions to achieve educational goals by inculcating interest in learning
सांदीत सापडलेले…!: उपाय
mazhi maitrin
माझी मैत्रीण: फासला दोनों से मिटाया ना गया…

‘राही, तुमच्या रविवारच्या बैठकीबद्दल कळलं. काय झालंय?’ या मेसेजला, ‘संध्याकाळी भेटायला येते,’ असं राहीचं उत्तर पाहून अनुजाला बरं वाटलं. दोन वर्षांपूर्वी, लग्नानंतरच्या स्वप्नाळू दिवसांत ‘ऋग्वेदसोबत खूप खूश आहे मावशी,’ असं म्हणणारी तिची लाडकी भाची, हल्ली काहीतरी बिनसून दोन-तीन वेळा माहेरी निघून आली होती. अनुजाशी बोलणं झाल्यावर शांत होऊन सासरी परत गेली होती. यावेळी राही महिनाभर माहेरी होती आणि त्याचवेळी अनुजा नेमकी बाहेरगावी गेली होती. गेल्या रविवारी दोन्ही घरातल्या मोठ्यांची ‘बैठक’ होऊनही राही माहेरीच आहे हे अनुजाला आल्यावर समजलं. बैठकीला गेलेल्या नातलगांना विचारून गॉसिप ऐकण्यापेक्षा तिनं काळजीनं राहीलाच मेसेज केला होता.

राहीचे बाबा मर्चंट नेव्हीमध्ये असल्यामुळे पहिल्यापासून आई आणि राहीच जास्त काळ एकत्र असायच्या. नंतर बाबांच्या आकस्मिक निधनानंतर तर दोघीच एकमेकींना उरल्या. वयाची तिशी ओलांडल्यावर, आईच्या अत्याग्रहामुळे राही लग्नाला तयार झाली. ज्याच्याशी लग्न केलं तो ऋग्वेदही पस्तिशीपार. कामाशी अति बांधिलकी असल्यामुळे त्याचंही लग्न मागे पडलेलं. वधूवरसूचक मंडळातून दोघं एकमेकांना सापडले, आवडले आणि लग्न झालं.

ऋग्वेदच्या एकत्र कुटुंबात त्याचे आई-वडील, धाकटा भाऊ आणि वहिनी अर्थात अथर्व-आदिती, छोटी पुतणी आणि घटस्फोटित थोरली बहीण होती. ऋग्वेद प्रेमळ, कर्तव्यतत्पर, प्रत्येकाची काळजी घेणारा आदर्श मुलगा. घरातल्या प्रत्येकाचं काम त्याच्यासाठी अडलेलं असायचं. ‘कौटुंबिक’आपलेपणाच्या नव्या अनुभवानं आणि ऋग्वेदच्या सहवासानं राही सुखावली होती. दोनेक महिन्यांनी मात्र ती गोंधळलेली, वैतागलेली दिसायला लागली. एकदा अनुजाला म्हणाली, ‘‘मावशी, घरातल्या लोकांचं एकमेकांवर प्रेम असूनही अचानक बारीकसारीक गोष्टींवरून भांडणं, वरच्या पट्टीतले वाद होत असतात. जाऊ-नणंदेशी काही बोलले, तर इतरांपर्यंत ते वेगळ्याच पद्धतीनं कसं पोहोचतं, ते मला उमजत नाही. घरात सर्व जबाबदाऱ्या ऋग्वेदच्या आणि कौतुक सतत अथर्वचं असतं. एखादं काम मागे पडलं तरी ऋग्वेदलाच विचारतात, त्यालाही लगेच अपराधी वाटतं. त्याच्या भाबड्या, शब्द पाळण्याच्या स्वभावाचा घरचे फायदा घेतात, गृहीत धरतात. अथर्व स्वत:च्या मनाप्रमाणं, पक्केपणानं वागतो. ऋग्वेद मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांना सांगतो, मतं घेतो. ‘ऋग्वेद भोळा आहे.’ असं सासूबाई सरळ सरळ सर्वांसमोर म्हणतात. त्याचंही त्याला काहीच कसं वाटत नाही?’’

‘‘प्रत्येक घराचा आणि माणसाचा स्वभाव वेगळा असतो गं. काही घरांमध्ये जबाबदाऱ्या दादाच्या आणि लाड धाकट्याचे अशी सवय असते. भोळा, पक्का, वात्रट, आगाऊ वगैरे लेबलंसुद्धा लहानपणीपासून असतात. जाणूनबुजून अन्याय वगैरे नसतो त्यात, म्हणून ऋग्वेदलाही ते खटकत नसेल. तू आत्ता या वयात, बाहेरून त्या घरात गेल्यामुळे आणि ऋग्वेदवरच्या प्रेमामुळे तुला त्याचा त्रास होतो. थोडा धीर धर, एकत्र कुटुंबांचं वेगळं डायनॅमिक्स समजून घे.’’ अनुजानं समजावलेलं. राहीनंही ते समजून घ्यायचा प्रयत्न केला. काही काळानं म्हणाली, ‘‘ऋग्वेद प्रत्येकाचं मनापासून करत राहतो. त्यामुळे आम्हाला एकमेकांसाठी वेळ, स्पेस, प्रायव्हसी मिळत नाहीये. घरचे प्रत्येक गोष्टीत ढवळाढवळ करतात. रविवारीच यांना घराची आवराआवरी आठवते. ती करून फिरायला निघालो, की इकडे नको, तिकडे जा, नऊपर्यंत परत या. सव्वानऊ झाले, तर लगेच आईचा फोन येतो. आदितीनं मला एकदा सांगितलं होतं, ‘आम्हालाही सुरुवातीला घरच्यांच्या या ‘सो कॉल्ड’ काळजी नावाच्या कंट्रोलचा त्रास झाला, पण नंतर अथर्व प्राधान्य ठरवायला शिकला. दोघांची स्पेस जपायला शिकला.’ ऋग्वेदला मात्र ते जमत नाहीये मावशी. त्याचा प्रेमळ स्वभाव मला आवडतो, पण भाबडी बांधिलकी नाही आवडत. ‘गुड बॉय’ इमेजमुळे तो इतरांना ‘नाही’ म्हणू शकत नाही. मग हक्काच्या बायकोसाठी असणाऱ्या वेळेतच फक्त तडजोड होते. क्वचित कधीतरी, आम्ही पस्तिशीचे रीतसर नवरा-बायको असताना, ‘नऊच्या आत घरात’चं दडपण पाहून चिडचिड होते. मी पहिल्यापासून स्वातंत्र्यात वाढले, स्वत:चे निर्णय स्वत: घेते. हे वातावरण, ऋग्वेदची ‘श्रावणबाळगिरी’, एकमेकांच्या पायात पाय घालणारं प्रेम मला आयुष्यभर झेपेल का गं?’’

‘‘यालाच तर ‘संसार’ म्हणतात राणी. ऋग्वेद आवडतो, त्याची सोबत हवीय तर त्याच्या घरच्या कम्फर्ट झोनशी जुळवून घ्यावं लागणार. कधी भांडायचं, तर कधी सोडून द्यायला शिकायचं.’’ अनुजानं समजावलं, तेव्हा अस्वस्थपणे विचार करत राही सासरी परतली. त्यानंतर ही बैठकीची बातमी आली.

‘‘हे सार्वजनिक बैठकीचं खूळ कुठून निघालं?’’ राही भेटल्यावर अनुजाच चिडचिडली. राहीचा चेहरा मात्र शांत होता. ‘‘मी महिनाभर माहेरी राहिले, तेव्हा ऋग्वेदचे बाबा आईला फोन करून भेटूयाच म्हणून मागे लागले. खरं तर मी आणि ऋग्वेद भेटत-बोलत होतो, सॉर्ट करायचा प्रयत्न करत होतो, पण माझं न ऐकता आईनं माझ्या काका-काकू वगैरेंनाही बोलावून घेतलं. आता बैठक होणारच म्हटल्यावर मीही ठरवलेलं, ‘आमचं एकमेकांवर प्रेम आहे, फक्त घरात स्पेस मिळत नाहीये, तेवढं समजून घ्या.’ असं बोलायचं, पण प्रत्यक्षात ती बैठक म्हणजे लहान मुलांवरून झालेली आयांची भांडाभांडीच होती. सासूबाईंनी कधीकाळचे प्रसंग काढून इतका विपर्यास केला की, मी बधिरच झाले. ‘तुमच्या मुलीनं दोघांपुरता शिरा करून खाल्ला, आम्हाला विचारलंही नाही’, अशी तक्रार केली.’’ राही म्हणाली.

‘‘काहीही काय?’’ अनुजाला पटेना.

‘‘अगं, त्या दिवशी वर्क फ्रॉम होम होतं, मी दोन कॉल्सच्या मध्ये बाहेर आले, तर सर्वांचा नाश्ता झालेला. माझ्यासाठी पुरेसा नाश्ता शिल्लक नव्हता. म्हणून पटकन माझ्यापुरता शिरा केला, ऋग्वेदला आवडतो म्हणून घासभर दिला, इतकंच. त्यातून ‘ही एकटी करून खाते.’ असा बोभाटा होईल हे माझ्या कल्पनेतही नव्हतं. हे आणि असलं बरंच, त्या बैठकीतच समजलं मला. सासऱ्यांनी ‘एकदा’ ऑफिसमधून आल्यावर मला चहासुद्धा करून दिला होता, तरी मला सासरच्यांची कशी किंमत नाही. आता मी कोणासाठी काय काय करते त्याची यादी वाचायची का यावर? यांच्या मनात कशाकशाचा राग साठलेला, मला पत्ताच नव्हता. मग काका-काकू सरसावले. पूर्वी कधीतरी मी काकूला म्हणालेले, ‘तिकडच्या जेवणाच्या चवी आपल्यापेक्षा वेगळ्या आहेत, त्यामुळे माझा हात लोणच्यावर असतो.’ तिनं ते सिरियसली लक्षात ठेवलेलं. त्यांना म्हणाली, ‘आमची मुलगी तुमच्याकडे लोणच्यावर राहिली.’ यावर ‘माझ्या आईच्या हाताला चव नाही? तुला उपाशी ठेवतात का?’ म्हणून ऋग्वेद भडकला. सगळ्यांचे इगो एकमेकांवर चढत राहिले. कोण बरोबर कोण चूक, तुमचं-आमचं, कुणी कुणासाठी काय केलं, काय नाही, लग्नातले मानापमान… काहीही निघालं. आमच्या प्रायव्हसी-स्पेसचा मुद्दा मी मांडायचा प्रयत्न केल्यावर तर कडाक्याचा विपर्यास आणि भांडणं. शेवटी मी आणि आईनं बोलणंच थांबवलं, सगळे दमल्यावर बैठक संपली, आम्ही घरी आलो.’’

‘‘मग आता? पुढे?’’ अनुजाला झेपेना.

‘‘बैठकीमुळे एक बरं झालं मावशी. हे लोक असे का वागतात? ऋग्वेदला एवढं गृहीत का धरतात? आमची स्पेस…? या प्रश्नांत मी भिरभिरत होते. बैठकीमुळे प्रश्नच बदलले. या घराचा स्वभाव असाच राहिला, तर ऋग्वेदसाठी मी किती काळ तडजोड करू शकेन? या प्रश्नापाशी पोहोचले. त्यावर विचार करताना लक्षात आलं, सासरच्यांवर माझे कितीही आक्षेप असले, तरी ते दुय्यम आहेत. आमच्या प्रायव्हसीबाबत मुख्य जबाबदारी ऋग्वेदचीच आहे. माझ्या गरजा, माझं म्हणणं ऋग्वेदलाच नीट समजत नाहीये, तर सासरच्यांचं काय? आमच्या दोघांची ‘बडे भैय्या आणि भाभीजींची’ पारंपरिक इमेज त्याच्याच मनात आहे. मग जोडप्याचं खासगीपण महत्त्वाचं नसतंच, कुटुंब हेच केंद्र असतं.’’

‘‘त्याच्या कुटुंबासोबत राहायला माझी हरकत नाहीये, पण माझी जोडीदाराच्या प्रेमाची व्याख्या वेगळी आहे. पती-पत्नीच्या नात्याच्या काही मूलभूत गरजा असतात हे ऋग्वेदला समजायलाच हवं. सगळे आपलेच आहेत, तर मग ‘आम्ही फिरायला जातोय, उशीर होईल.’ हे सहज सांगता यायला हवं. कौटुंबिक सहली हव्यातच, पण फक्त दोघांची एखादी ट्रीपही हवीच. आमच्यातल्या बाँडिंगसाठी वेळ काढण्याची गरज जर त्याला स्वत:ला वाटत नसेल, तर प्रेम म्हणजे नेमकं काय? मला कुटुंबाच्या गरजा, जबाबदाऱ्या कळतात, पण दरवेळी त्यांनाच प्राधान्य कसं? दिवसातली ५-१० मिनिटं, महिन्यातला एखादा वीकएंड एवढाच वेळ हवाय मला, ‘फक्त माझ्यासाठी आणि मनापासून…’ तेवढ्यासाठी महिनोन् महिने भिकाऱ्यासारखी वाट पाहायची का? किती वर्षं? म्हातारपणापर्यंत?’’ अनुजा ऐकतच राहिली…

‘‘तू म्हणालीस तशी मी सासरची माणसं समजून घ्यायचा प्रयत्न केला, स्वत:च्या चुका शोधल्या, अपेक्षा बदलल्या, वाट पाहण्यात दोन वर्षं गेली तसा संयम संपून माझीही चिडचिड वाढत गेली, त्याच्या घरच्यांवर टीका केल्यावर आमची भांडणं वाढली. दोघांचेही जॉब, रोजचा दोन तासांचा ट्रॅफिक जाममधून प्रवास, घरची कामं यातून जो थोडास्सा वेळ एकमेकांसाठी मिळतो, त्यातही भांडणंच होणार असतील तर मग माझं घर, कम्फर्ट झोन, माझ्या आईला एकटं सोडून कशासाठी आले मी यांच्याकडे? आता बैठकीनंतर सगळेच दुखावलेत. माझ्याबद्दल मनात आढ्या घेऊन फिरणाऱ्या लोकांशी जुळवून घेण्यात मी का वेळ घालवू? हा प्रश्न आता पडतोच. ऋग्वेदला आधीचा कम्फर्ट झोन सोडता आला नाही, तो मोठा झालाच नाही, तर संसारही धड नाही आणि करिअरही स्वत:च्या हाताने घालवलं असं चालेल का मला?’’

‘‘इतकी शांतपणे लॉजिकली बोलतेयस, काय निर्णय घेतलायस?’’ अनुजाने थेटच विचारलं. ‘‘योग्य प्रश्न सापडल्यावर उत्तरही जवळ आलंय. आज तुझ्यासमोर पहिल्यांदा गोष्टी नीट शब्दांत मांडायला जमलंय. आम्ही एकमेकांना आवडतो, दोघांनाही सोबत कायम हवीय याबद्दल शंका नाहीये. आमच्या नात्याची जबाबदारी शेवटी फक्त आमची दोघांची असते हे मला आता पक्कं कळलंय. आत्तापर्यंत आम्ही बरेचदा बोललो, तेव्हा घरच्यांवरूनच भांडलो. आता मात्र कुणालाही मध्ये न आणता फक्त आमच्या दोघांबद्दल, शांतपणे, थोडक्यात आणि नेमकेपणानं मी ऋग्वेदशी बोलणार आहे. त्या बैठकीमुळे आणि एकमेकांपासून महिनाभर लांब राहण्यानं मला काही गोष्टी उमजल्या, तशाच त्यालाही ‘उमजल्या’ तर बदल घडू शकेल. त्यासाठी आमच्या नात्याला आणखी थोडा वेळ देणारे, वाट पाहणारे, मात्र माहेरीच राहणार आहे.’’

‘‘आणि तरीही ऋग्वेदला तुझं म्हणणं समजलंच नाही किंवा ‘गुड बॉय इमेज’ सोडता आलीच नाही तर?’’

‘‘… तर आम्ही दोघेही आपापल्या जागी चांगले आहोत, पण जोडीदार म्हणून योग्य नाही हे अवघड सत्य स्वीकारायला लागेल. खूप वाईट वाटेल, पण जोडीदार कशासाठी? या प्रश्नाचं माझं उत्तर, ‘समंजस, प्रगल्भ सोबत आणि आनंदासाठी’ असं आहे. ते असेल, तर मी हजार तडजोडी करू शकते. अन्यथा लग्न केलंय म्हणून ओढत-खेचत भांडत राहणं मला जमणार नाही.’’ राही ठाम शांतपणानं म्हणाली.

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader