मुलामुलींची मैत्री आजही प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरते आहे. त्यांच्यात ‘काहीतरी’ असणारच हे गृहीत धरून त्यांच्या पालकांसह आजूबाजूचे विशेषत: शेजारपाजारचे ‘राईचा पर्वत’ करायला तयारच असतात. सौरवच्या घरीही तेच झालं. त्याची एकच अपेक्षा होती आईबाबांनी तो काय सांगतोय ते एकदा नीट ऐकून तर घ्यावं. जे आजी समजू शकते ते आईबाबा समजून का घेऊ शकत नसावेत? या त्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे का कुणाकडे?
फुटबॉल खेळण्यासाठी सौरव घरून निघाला तेव्हा दिवाणखान्यात फक्त आजी होती. ती वेळच अशी होती की, जेव्हा आई-बाबा घरी पोहोचलेले नसायचे आणि त्याचा मोठा भाऊ कॉलेजमध्ये असायचा. सौरव शाळेतून आला की त्याला जेवण देणं, त्याची दिवसभराची चौकशी करणं आणि तो फार वेळ गॅजेट्समध्ये अडकत नाही ना हे बघणं हे आजीचं काम. नेहमीप्रमाणे सौरभ खाली जायला निघाला आणि आजीनं अलगद हसत त्याला विचारलं, ‘‘फुटबॉलचं शूटिंग आहे का रे? नट्टापट्टा खूपच केला आहेस म्हणून विचारते.’’
सौरवने जेल लावून केस छान सेट केलेले. भरपूर परफ्यूम लावला आणि बहुतेक चेहरासुद्धा धुतला होता. एवढ्या सगळ्या गोष्टी तो घरच्यांबरोबर कुणाच्या लग्नाला जातानासुद्धा करायचा नाही. गेले काही दिवस फुटबॉल खेळायला जाताना त्याची तयारी एकदम ‘टिप टॉप’ असे.
‘‘अरे यार, अशी थट्टा करू नये नातवाची. पाप लागतं.’’ हसत हसत सौरव म्हणाला आणि दरवाजा धाडकन लावून पळून गेला. आजीनं सौरवच्या रूममध्ये जाऊन इकडे तिकडे पडलेले कपडे उचलून ठेवायला सुरुवात केली. त्यामध्येच तिला एक सुंदर छोटीशी केसांची पीन सापडली. ‘इतकी नाजूक आणि रंगीबेरंगी पीन सौरवकडे कशी आली बरं? त्याची आई असलं काही वापरत नाही. अरे देवा, काहीतरी मैत्रीण वगैरे प्रकरण चालू झालेलं दिसतंय. बरोबर आहे म्हणा. १३व्या वर्षी दुसरं काय सुचणार? फक्त आई-बाबांपर्यंत पोहोचू देऊ नकोस म्हणजे झालं बाबा. नाहीतर फारच गदारोळ होईल,’ आजी स्वत:शीच पुटपुटली. आजीने ती पीन उचलून त्याच्याच कपाटात शर्टाच्या ढिगावर ठेवून दिली. ती सौरवला लगेच सापडली असती पण बाकी कोणाला दिसली नसती. त्याच्या कपाटाला हात लावायची घरात आजीशिवाय कोणालाही परवानगी नव्हती.
थोड्याच वेळात सौरवचे आई, बाबा, दादा सगळे एकेक करून घरी आले. घरातली संध्याकाळची गजबज चालू झाली. सगळ्यांच्या एकमेकांना दिवसभराच्या बातम्या सांगणं, ऑफिसमधल्या गोष्टी, कॉलेजमधल्या गोष्टी, सोसायटीतल्या गोष्टी यांची देवाणघेवाण, चहाचे एकापाठोपाठ एक-दोन कप आणि आई-बाबांचं पुन्हा कामाला बसणं आणि दादाचं अभ्यासाला बसणंही झालंच. आजी एक पुस्तक घेऊन शांतपणे वाचत बसली. आता सौरव घरी परत येईपर्यंत सगळे शांत राहणार आणि मग परत एकदा जेवणाच्या निमित्ताने गजबज होणार, याची तिला आता सवय झाली होती.
आजीची चार पानेसुद्धा वाचून संपली नव्हती तेवढ्यात दारावरची बेल वाजली आणि एकदाच नाही तर लागोपाठ तीन वेळा वाजली. ‘कोणाला एवढी घाई झाली आहे?’असं म्हणत आजी पोहोचेपर्यंतच, पुन्हा दार वाजवल्याचा आवाज आला. आजीने दार उघडेपर्यंत आई-बाबा आणि दादा तिघेही दिवाणखान्यात आले. दार उघडून पाहतात तो सोसायटीचे अध्यक्ष बिपीन मुखर्जी एका हाताने सौरवचा दंड पकडून दारात उभे.
आजीने दार उघडताच ते सौरवला जवळजवळ ओढतच आत घेऊन आले आणि मागे दारसुद्धा त्यांनी बंद करून घेतलं. ‘‘काय झालं बिपीनदा?’’ असं बाबा विचारेपर्यंत मुखर्जी दिवाणखान्यात आले. मगच त्यांनी सौरवचा दंड सोडला. ‘‘प्रकाश, बरं झालं तू घरी आहेस. या कार्ट्याला आता घराबाहेर सोडू नको. नाहीतर हा तुरुंगात जाईल.’’
‘‘अहो, काय झालं जरा सांगा तरी.’’ आजी पाण्याचा ग्लास घेऊन आली. बिपीनदांनी तो जवळजवळ त्यांच्या हातातून ओढून घेऊनच पटापट संपवला. ‘‘बिपीनदा, जरा दम घ्या. नीट काय ते सांगा तरी.’’
बाबांनी सौरवकडे बघितलं तर तो मान खाली घालत होता. मध्येच आईकडे बघत होता. मधूनच आजीकडेही बघत होता. काहीतरी मोठा उद्याोग केलेला आहे. हे सगळ्यांच्याच लक्षात आले, पण मोठा म्हणजे काय? हा प्रश्न अजून शिल्लक होता.
दोन खोल श्वास घेऊन, उसासे सोडून अध्यक्ष बोलते झाले, ‘‘प्रकाश, मी आज सौरव आणि नेहाला आपल्या पाण्याच्या टाकीमागे पकडलं. सगळी मुलं फुटबॉल खेळत असताना हा आणि नेहा तिथे टाकीच्या मागे बसलेले. ते दोघं काय करत असतात हे मला माहीत नाही, पण त्या दोघांना टाकीमागे जाताना वॉचमननं सीसीटीव्हीवर अनेकदा बघितलं आहे. आज त्याला रंगेहाथ पकडला म्हणून तुझ्याकडे घेऊन आलो.’’
‘‘नेहा कुठे आहे?’’ आईने घाईघाईनं विचारलं. ‘‘नेहा तिच्या घरी गेली. मी तिला एकटीला पाठवून दिलं. मी तिच्या घरी येऊन काही सांगणार नाही, असं आश्वासनही दिलं आहे. तिचा बाप फार सणकी आहे. त्या भीतीने तिने काही वेडंवाकडं करू नये याची मला पहिल्यांदा काळजी होती. म्हणून मी तिला सांगितलं की, मी सीसीटीव्ही रेकॉर्डिंग डिलीट करून टाकेन आणि फक्त सौरवच्या घरी सांगेन. ती माझ्यावर विश्वास ठेवेल आणि काही वेडंवाकडं होणार नाही.’’
आजी पटकन बोलून गेली, ‘‘तरीच म्हटलं हा फुटबॉलला जाताना एवढा नट्टापट्टा करून का जातो आणि जेव्हा परत येतो तेव्हा थेंबभरही घाम आलेला नसतो. मला आधी संशय यायला पाहिजे होता. पण नाही चाललं माझं डोकं. मी कशाला संशय घेऊ याच्यावर?’’
मुखर्जी म्हणाले, ‘‘आता तुम्ही हे कसं सोडवायचं ते बघून घ्या. दोन्ही मुलं लहान आहेत. थोडं समजून घ्या. उगाच डोक्यात राग घालून वेडंवाकडं वागू नका. एवढी माझी तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेला माणूस म्हणून विनंती आहे.’’ नमस्कार म्हणून हात जोडून ते निघून गेले.
बिपीनदा घराबाहेर पडताच सगळ्यांची नजर सौरवकडे वळली. दादाने फक्त आभाळाकडे डोळे फिरवले आणि तो स्वत:च्या रूममध्ये निघून गेला. जाता जाता मात्र त्याने आईला हाताने इशारा केला की, ‘‘भोगा आपल्या लाडक्याच्या उद्याोगांची फळं.’’ त्याच्याकडे एक रागाने कटाक्ष टाकून आई सौरवकडे वळली, ‘‘तू क्रिकेट सोडून फुटबॉलच्या मागे लागला तेव्हाच मला शंका आली होती की अॅकॅडमीमध्ये जाण्याचं सोडून फक्त बिल्डिंगमध्ये चालणारा खेळ तू का खेळतोयस? तर तुला हे उद्याोग करायचे होते का?’’
‘‘चुकलोच. आम्ही तुझ्यावर विश्वास टाकला. चांगले उद्याोग करून ठेवले आहेस आता. तुझ्याशी जरा बरं वागलं की लगेच आम्हाला शिक्षा होते. नशीब आता बिपीनदा अध्यक्ष आहेत बिल्डिंगचे. आधीचे अध्यक्ष जर असते तर सोसायटीभर दवंडी पिटवली असती त्यांनी. शिवाय नेहाच्या घरच्यांनी तमाशा केला असता तो वेगळाच.’’ बाबा म्हणाला.
बाबा कमालीचा विचारात पडलेला दिसला. नेहमी पटकन काहीतरी मार्ग काढणारा बाबा इतका गप्प बसला आहे, हे सगळ्यांनाच खटकलं. आजींनी त्याला विचारलं ‘‘प्रकाश, काय झालं तू इतका शांत कसा? काय विचार करतोयस?’’
‘‘आई, परवाच आमच्या ऑफिसमध्ये एका सामाजिक कार्यकर्त्याकडून ‘पोक्सो’ कायद्याबद्दल ऐकलं की, अठरा वर्षांपेक्षा लहान म्हणजेच अल्पवयीन मुलांनी एखादी लैंगिक कृती केली आणि त्याबद्दल कोणी तक्रार केली की त्यांना थेट अटक होते आणि त्याला तुरुंगात जावं लागतं. या आशयाचा कायदा आहे. मला अशी भीती वाटते आहे की, नेहाच्या वडिलांना जर हे सर्व कळलं आणि ते जर रागाने पोलिसांत गेले तर सौरवला ‘पोक्सो’खाली अटक होईल की काय? मी आधी वकील मित्राला फोन करू का? किंवा आपल्या देशपांडे काकांना फोन करतो. त्यांच्या पोलिसांमध्ये ओळखी आहेत. कोणाशी तरी बोलायला पाहिजे. नाहीतर भलतंच काहीतरी होऊन बसायचं आणि आपल्याला नंतर खूपच मोठा व्याप व्हायचा.’’
‘‘अरे बापरे. असं काही असतं का रे? मला त्याची कल्पना नव्हती. आमच्या ऑफिसमध्ये फक्त पॉश (POSH) म्हणजे कार्यालयीन कामाच्या ठिकाणी होणाऱ्या स्त्रियांच्या लैंगिक छळाविषयी माहिती दिली होती. अल्पवयीन मुलांविषयीही कायदा असतो हे मला माहीत नव्हतं. सौरव काय करून ठेवलंस रे तू हे?’’ आई कपाळाला हात लावून खालीच बसली.
‘‘काहीही चाललंय तुमचं. कुठल्या कुठे जाऊन पोहोचलात तुम्ही? मी आणि नेहा असं काही करत नव्हतो. आम्ही फक्त गप्पा मारत होतो. सीसीटीव्हीत काही दिसणार नाही. मला माहितीये सीसीटीव्ही कुठे आहे ते. आम्ही टाकीच्या मागे बसलो होतो. तिथे सीसीटीव्ही नसतो.’’ सौरव आपली बाजू मांडत म्हणाला.
‘‘ चूप बस मूर्खा. अक्कल दमडीची नाही आणि उद्याोग करायला निघाला. जाऊन बसायचं आहे का जेलमध्ये? का काय ते लहान मुलांचं बालसुधार गृह ज्याला आता निरीक्षण गृह म्हणतात तिथे? तुझ्यासारख्या उद्याोगी लोकांसाठी तिथे खास सोय केलेलीच असेल.’’ बाबाच्या संतापाचा कडेलोट झाला.
बाबा भडकलेला पाहून सौरव रूमकडे जायला निघाला. आजीने त्याला हात धरून थांबवला. ‘‘थांब रे. तू कुठे निघालास? तुम्ही पोरं असं काही झालं की, रूममध्ये जाऊन बसता आणि दार आतून बंद करता. इथे आमच्या काळजाचं पाणी पाणी जेवढं झालंय तेवढं पुरेसं आहे. अजून वाढवू नको. बस इथेच.’’ आजी म्हणाली. पुढची काही मिनिटं सगळे जण शांत बसले. प्रत्येक जण वेगवेगळ्या दिशेनं विचार करत होता, पण निश्चित काय करावं हे कोणालाच कळलं नाही. शेवटी बाबा आईला म्हणाला, ‘‘मी देशपांडे काकांशी बोलून घेतो. त्याशिवाय माझ्या जिवाला शांतता लाभणार नाही आणि तूसुद्धा जमलं तर नेहाच्या आईशी बोलून घे. ती एकदम सेन्सिबल आहे. आपल्याला तिघांना मिळून तरी उपाय निश्चित काढता येईल. फक्त नेहाचा बाप घरी नाही ना याची खात्री करून मगच तिच्या आईशी बोल.’’ आईने मान डोलावली आणि ती फोन घेऊन खोलीत गेली. बाबा आपला फोन घेऊन दुसऱ्या खोलीत गेला.
आजी आणि सौरव दोघेही इकडे तिकडे बघत बसले. सौरव आजीला म्हणाला, ‘‘नेहा माझी गर्लफ्रेंड नाहीये. मला ती आवडते. पण तिने मला ‘फ्रेंड झोन’ केलंय. आमचे काही सीरियस होणार नाहीये. मी तिचा ‘बेस्ट फ्रेंड’ आहे आणि तिला काहीही वाटलं, कशाचा त्रास झाला की ती माझ्याशी बोलते. आम्ही टाकीमागे बसून तेच बोलत होतो.’’
‘‘अरे, मैत्रिणीशी बोलायचं तर टाकीमागे जायची काय गरज आहे? आता कोण तुझ्यावर विश्वास ठेवणार?’’
‘‘अगं तिथे नाही जाणार तर कुठे जाणार मी आणि नेहा? तिच्या घरी जाऊन गप्पा मारू शकत नाही. आपल्या घरी बसून गप्पा मारू शकत नाही. आम्ही जर फोनवर एकमेकांशी बोलत बसलो तर किती वेळ फोनवर घालवतो आहेस म्हणून आई-बाबा कान पकडतील. सोसायटीमध्ये बाकी कुठे बसलो, तर हे सर्व अंकल आणि आंट्या आमच्याबद्दल ताबडतोब गॉसिप सुरू करतील. आम्ही काय करायचं? नेहा खूप डिस्टर्ब असते. तिच्या घरी सतत भांडणं चालू असतात. मागच्या परीक्षेत ती सायन्समध्ये नापास झाली आहे. हे अजून तिच्या वडिलांना कळलेलं नाही. जर कळलं तर तिचं काही खरं नाही. त्यामुळे ती खूप घाबरलेली असते. मी तिला थोडा धीर देऊन तिचं डोकं शांत करायचा प्रयत्न करत होतो. बाकी काही नाही आजी. मी खरंच सांगतो की आम्ही काही करत नव्हतो आणि नेहा माझी चांगली मैत्रीण आहे.’’
‘‘या सगळ्यावर मी विश्वास ठेवेन रे. पण बाकीचं जग विश्वास ठेवणार आहे का? बघूया. आता काय होतं ते.’’ असं म्हणून मोठा सुस्कारा सोडून आजी परत शांत बसली.
तेवढ्यात आई आणि बाबा दोघेही जण आले. आई म्हणाली, ‘‘मी नेहाच्या आईशी बोलले. सौरव तिचा बॉयफ्रेंड नाहीये हे नेहाच्या आईला माहिती आहे. आणि ती नेहाशी बोलणार आहे. बहुतेक पुन्हा असा उद्याोग होणार नाही.’’
‘‘मीसुद्धा देशपांडे काकांशी बोललो. ते म्हणाले की, १३ वर्षांच्या मुलाला आणि मुलीला फक्त टाकीमागे बसतात म्हणून उचलून तुरुंगात टाकायला कायदा गाढव नाहीये. उगाच घाबरू नको. नेहाचे वडील पोलिसांपर्यंत गेले, तर काय करायचं ते आपण बघून घेऊ. असं म्हणाले आहेत.’’
सौरवशी झालेलं बोलणं आजीने दोघांनाही सांगितलं. बाबांच्या चेहऱ्यावरचा राग थोडा कमी झाला पण अदृश्य झाला नव्हता. आई अजूनही रागावलेली होती. सौरवकडे बघून ती म्हणाली, ‘‘अरे, तू जर आम्हाला सांगितलं असतं तर मी नेहाच्या आईशी बोलले असते ना. तिला जर काही मदतीची गरज असेल तर तिला समुपदेशकाकडे नेणं ही तिच्या आई-बाबांची जबाबदारी आहे. मित्र म्हणून तू जो काय विश्वास देतो आहे तो ठीक आहे, पण उद्या तिने काही वेडंवाकडं केलं तर तू काय करणार आहेस? शिवाय जन्मभर ती गोष्ट तुझ्या डोक्यात अडकून राहील ते वेगळंच. जरा विश्वास ठेवून आमच्याशी बोलला असतास तर काय बिघडलं असतं का?’’
‘‘फार तर फार थोडे रागावलो असतो पण त्या पलीकडे काही झालं नसतं. आजपर्यंत तुला मदत केली नाही असं कधीतरी झालंय का? तू इतके वेगळे वेगळे उद्याोग करतोस तरीही आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी नाही का उभे राहात? थोडा तरी विश्वास ठेव आमच्यावर.’’ बाबाला रागवावं का वैतागावं हेच समजत नव्हतं.
सौरव मात्र अजून मान खाली घालून बसला होता. ‘मोठ्या माणसांवर विश्वास टाकावा का? मी हे आधी सांगितलं असतं तर त्यांनी मदत केली असती का? आणि आताही मी बोललो तर एकदम न भडकता नीट समजून घेऊन ही माणसं खरंच मदत करतील का?’ हा प्रश्न काही त्याच्या डोक्यातून जाईना.
chaturang.loksatta@gmail.com