जगात वावरताना प्रत्येक जण कोणता ना कोणता मुखवटा घालून वावरत असतोच, कधी कळत, कधी नकळत. मग ते जगासमोर स्वत:ला कणखर सिद्ध करण्यासाठी असो, हुशार वाटावं म्हणून असो की कुणी आपल्याला गृहीत धरू नये म्हणून असेल. पण हळूहळू हे मुखवटे म्हणजे आपलं खरं व्यक्तिमत्त्व नाही, याचा विसर पडू शकतो. तो विसर पडू नये यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात?

विशिष्ट पद्धतीचा पेहराव करून, चेहऱ्यावर विशिष्ट पद्धतीचा मुखवटा लावून तुम्हाला एखाद्या लग्नाला किंवा अगदी तुमच्या मित्राच्या लग्नाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या ‘थीम पार्टी’ला जायला आवडेल का? असा वेगळ्याच प्रकारचा अनुभव घ्यायला बहुतेक तुम्ही ‘हो’च म्हणाल, नाही का? पण हाच मुखवटा तुम्हाला दररोज चेहऱ्यावर चढवायला आवडेल का? शक्यतो नाहीच. कारण असे वेगवेगळ्या पद्धतीचे मुखवटे चढवणं किंवा वेगळ्या पद्धतीचा जरासा हटके पेहराव करणं हे मजा म्हणून ठीक आहे, पण रोजच असं करणं हे विचित्रही आहे आणि मूर्खपणाचंही.

मात्र आपल्या अवतीभवतीचे अनेक लोक सतत विविध प्रकारचे अदृश्य मुखवटे घालूनच वावरत असतात आणि हा मुखवटा आहे, हे त्यांच्या लक्षातसुद्धा येत नाही. तुम्हाला एक गुपित सांगतो, आपल्याला आवडो अगर न आवडो, आपण सगळे जण रोज मुखवटे घालूनच वावरत असतो. हे मुखवटे जरा वेगळ्या प्रकारचे असतात. आपल्या पालकांना खूश करण्यासाठी, जगात वावरताना आपण सुरक्षित असावं म्हणून, जगानं आपल्याला स्वीकारावं म्हणून आणि त्या चाकोरीत आपण अगदी ‘फिट’ बसावं, यासाठी आपण आवश्यकतेनुसार वेगवेगळे मुखवटे चढवतो. कधी कधी आपल्याला हसायची इच्छा नसूनही आपण हसतो, एखाद्या विषयाबद्दल आपल्याला शून्य माहिती असताना आपण अगदी ज्ञानी असल्याचा आव आणतो, तर कधी आपण नखशिखांत भीतीने थरथरत असलो, तरी कणखर असल्याचं उसनं अवसान आणायचा प्रयत्न करत असतो. कधी कधी असंही घडतं की इंजिनीयर, डॉक्टरचे मुखवटे लावून आपण अगदी तोऱ्यात फिरत असतो, पण आतून मात्र आपल्याला त्या पेशाची चीड असते. कधी कधी तर आपण नवरा किंवा बायको असल्याचासुद्धा मुखवटा चढवतो, कारण या नात्याच्या बरोबरीनं येणारी जबाबदारी स्वीकारायला आपण आतून तयारच नसतो.

मी ज्या मुखवट्यांबद्दल बोलतोय ते आपल्या व्यक्तिमत्त्वातल्या निरनिराळ्या पैलूंचे मुखवटे आहेत. कसली तरी अनामिक भीती किंवा नाकारलं जाण्याचा धोका यातून या मुखवट्यांचा जन्म होतो. आपलं व्यक्तिमत्त्व घडवण्यात समाजाची आणि संस्कृतीची फार महत्त्वाची भूमिका असते. काही नियम असे असतात जे कुठलाही विरोध न करता आपण मुकाट्यानं पाळतो आणि ते पाळत असताना गरजेनुसार वेगवेगळे मुखवटे आपण चेहऱ्यावर लावायला शिकतो. कसं खावं, कसं बसावं, कसं चालावं, कसं बोलावं, चांगले गुण कसे मिळवावेत आणि एक नऊ ते पाचची सुरक्षित नोकरी कशी मिळवावी? यासाठी बनवण्यात आलेले सगळे नियम आपल्यावर वर्चस्वही गाजवत असतात आणि यातूनच आपलं व्यक्तिमत्त्वही घडत असतं. आपणही हे मुखवटे चेहऱ्यावर वागवत असतो, कारण आपल्या जवळच्या लोकांच्या अपेक्षा सार्थ ठरवण्यासाठी आपल्याला त्यांची गरज वाटते. कालांतरानं या मुखवट्यांची एवढी सवय होऊन जाते, की हे मुखवटे म्हणजे आपलं खरं व्यक्तिमत्त्व नव्हे आणि आपण खरे कसे आहोत हे दाखवण्यासाठी आपण ते केव्हाही उतरवून फेकून देऊ शकतो याचाच आपल्याला विसर पडतो.

‘आपल्या चेहऱ्यावर चढवलेले मुखवटे’ हाच आजच्या लेखाचा विषय आहे. हे लक्षात घ्या, की आपण चढवलेल्या मुखवट्यामुळे आपल्याला हिंमत मिळत असेल, पण याच मुखवट्यांमुळे आपली अवस्था दयनीयसुद्धा होऊ शकते. लहानपणी माझी खूप टर उडवली गेली आणि माझ्या बाबतीत ‘बॉडी शेमिंग’चा, माझ्या शरीरावर टीका करण्याचा प्रकारही घडला. परिणामत: माझा स्वभाव एकलकोंडा झाला. त्यामुळे मी माझ्याच कोशात राहायला लागलो आणि ज्यामुळे मला लोकांसमोर यावं लागेल अशा गोष्टी, असे प्रसंग मी टाळू लागलो. लहान असल्यामुळं साहजिकच मला खूप असाहाय्य वाटत होतं. पण तरीसुद्धा या एकलकोंड्या स्वभावाच्या मुखवट्यामुळे बाहेरच्या जगापासून मी सुरक्षित राहिलो. भावी आयुष्यात शिक्षणाच्या आणि करिअरच्या संदर्भात मी जे पर्याय निवडले, त्यांच्यावर या एकलकोंड्या स्वभावाच्या मुखवट्याचा चांगलाच प्रभाव होता. कालांतरानं माझ्याकडे आणखी काही मुखवटे जमा झाले. अबोल, खेळ न आवडणारा, कशातच तरबेज नसलेला, अजिबात ‘कूल’ नसलेला मुलगा, वगैरे वगैरे…. वाढत्या वयात जरी या मुखवट्यांच्या आड मी सुरक्षित आहे असं मला वाटत होतं, तरी त्यांच्यामुळे नकळतपणे मी त्यांच्या मर्यादेत अडकून पडलो आणि त्यामुळे संपूर्णपणे खरं, जसं आहे तसं आयुष्य मला जगताच आलं नाही. मी केलेल्या निवडींवर, माझ्या निर्णयांवर आणि माझ्या कृतीवर संपूर्णपणे या मुखवट्यांचाच पगडा होता.

मागं वळून पाहताना माझ्या मनात येतं, जर हे मुखवटे मी वेळीच काढून फेकून दिले असते तर आज माझं आयुष्य कसं असलं असतं? या मुखवट्यांच्या ओझ्याखाली दबून जाऊन जगणं किती मुश्कील असतं, नाही का? नुसतं बोलणं सोपंच असतं, बरोबर? व्यक्तिमत्त्वातल्या या मुखवट्यांमुळे आपण एक सुरक्षित आयुष्य जगत असतो. जगात वावरताना याच मुखवट्यांचा उपयोग आपण ढालीसारखा करत असतो. कालांतरानं त्यांची आपल्याला सवय होऊन जाते. त्यांच्यामुळे आपल्याला कसं बोलायचं, वागायचं, इतरांना कसा प्रतिसाद द्यायचा याचे अंदाज बांधता येऊ लागतात. एखाद्या अपरिचित क्षेत्रात बेधडक पाऊल टाकायचं म्हटलं तर असुरक्षितता आणि अनिश्चितता सतत डोकावत असतातच. त्यामुळे त्या वाटेला जाण्यापेक्षा या मुखवट्यांच्या आड सुरक्षित राहणं सोपं वाटतं. समाजाच्या, आप्तस्वकीयांच्या आपल्याकडून असलेल्या अपेक्षांनुसार हे मुखवटे आपण धारण करत असतो. आपल्या बाबतीत होणाऱ्या न्यायपंचायती, टीका आणि नाकारलं जाणं टाळण्यासाठी या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आपण स्वीकारतो. यामुळे त्या मुखवट्याला आणखी उत्तेजन मिळतं, आपल्या खऱ्याखुऱ्या आनंदाला मर्यादा पडतात आणि यातून बाहेर पडणं हे दिवसेंदिवस कठीण होत जातं. काही वेळा गतकाळातील काही दु:खद घटना, त्रासदायक अनुभव यामुळेसुद्धा हे मुखवटे धारण केलेले असू शकतात. वर उल्लेख केलेला माझा अनुभव हे याचंच उदाहरण आहे.

व्यक्तिमत्त्वाच्या विविध छटा दाखवणारे हे मुखवटे धारण करून अल्प काळासाठी आपल्याला दिलासा मिळू शकतो, समाजात मान्यता मिळू शकते, लक्ष वेधून घेतलं जाऊ शकतं, ताणतणावातून सुटका होऊ शकते. पण एखाद्या गोष्टीवर तात्पुरता तोडगा म्हणून हे मुखवटे चढवण्याची सवय लागते. त्यातून दीर्घ काळ टिकणारं समाधान आणि आनंद तर मिळत नाहीच तरीही हे असे मुखवटे लावून वावरणं आपल्या अंगवळणी पडून जातं.

सागर हा झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला एक कणखर मुलगा. आपल्या भावना उघडपणं व्यक्त करणं हे कमकुवतपणाचं लक्षण आहे असं त्याला वाटायचं. त्यामुळे अत्यंत खंबीर पण शांत म्हणून तो प्रसिद्ध होता. एक असा मुलगा, जो कोणत्याही परिस्थितीपुढं कधीही हतबल झाला नाही, हरला नाही. आपली हळवी बाजू उघड करणं ही आपल्याला न परवडणारी गोष्ट आहे असंच त्याला वाटायचं, त्यामुळे आपल्या भावना त्यानं कायम दडपूनच ठेवल्या.

सागरची समाजात खूप चांगली प्रतिमा निर्माण झाली होती. तेव्हा तो जेमतेम विशीत होता, पण कोणतंही संकट आलं तरी त्याचा सर्व मित्र परिवार त्याच्याकडेच धाव घ्यायचा. कुठलीही समस्या तो अगदी चुटकीसरशी सोडवायचा. कुणाचीही मदत न घेता नेहमी सगळं ओझं स्वत:च्याच खांद्यावर वागवायचं, आपल्या भावना कधी उघड होऊ द्यायच्या नाहीत हाच स्वभाव, पण या कणखरपणाची फार मोठी किंमत तो मोजत होता. आतून तो अगदी एकटा होता. इतरांपासून दुरावलेला आणि खोलवर एकाकीपण त्याला जाणवत होतं. या कणखरपणाच्या मुखवट्याचं ओझं वाहणं आता त्याच्यासाठी असह्य झालं होतं.

एके दिवशी त्याची बहीण सुचेता त्याच्याकडे आली. ती फार दुखावलेली होती, डोळ्यात पाणी होतं. नुकतंच तिचं ‘ब्रेकअप’ झालं होतं आणि ते दु:ख बोलून मोकळं करण्यासाठी तिला कुणीतरी हवं होतं. तिच्या भावनोद्रेकामुळे सागर अस्वस्थ झाला आणि त्यानं तिला मन घट्ट करत सगळं विसरून पुढे जाण्याचा व्यावहारिक सल्ला दिला. त्याचं काही ऐकून न घेता सुचेता म्हणाली, ‘‘तू दरवेळी असं का करतोस? आता या क्षणी मला तुझ्या खंबीरपणाची गरज नाहीये, या क्षणी फक्त मला माझा भाऊ हवाय.’’ तिच्या या शब्दांनी त्याच्या वर्मावरच घाव बसला. आजवर कधीच न जाणवलेली दु:खाची एक गाठ आपल्या उरात रुतून बसलीय हे त्याला जाणवलं. त्याच्या लक्षात आलं की दु:खापासून तो स्वत:ला वाचवायचा जो प्रयत्न करत होता, त्यामुळे तो आपल्याच माणसांपासून दुरावला होता. त्याच्या या कणखरपणामुळं त्याचं रक्षण होतंय असं त्याला वाटत होतं पण वास्तविक त्यामुळे तो एकटा पडत चालला होता. त्याच्या या मुखवट्यामुळे केवळ त्यालाच इजा पोहोचत होती असं नाही, तर त्याचं ज्यांच्यावर प्रेम आहे, अशा माणसांनाही त्यामुळे त्रासच होत होता हे प्रथमच त्याच्या लक्षात आलं.

तात्पर्य, या वेगवेगळ्या छटांच्या मुखवट्यांमुळे आपलं एकूण शारीरिक, मानसिक, आत्मिक स्वास्थ्यच धोक्यात येऊ शकतं. आपण धारण केलेल्या मुखवट्यांना अनुसरून वागण्याचा एक ना दिवस तुम्हाला वीट येणारच आहे. पण एक चांगली गोष्ट ही की यावर तोडगा आहे. जितकी जागरूकता अधिक असेल तितका योग्य पर्याय निवडला जातो, योग्य पर्यायाच्या निवडीमुळे योग्य तेच परिणाम दिसतात. हे सतत चेहऱ्यावर धारण केलेले मुखवटे दूर फेकून देण्यासाठी मात्र धाडस लागतं, त्याचबरोबर स्वत:विषयी जागरूकता हवी आणि हा बदल घडताना आपसूकच येणारी अस्वस्थता, गैरसोय स्वीकारण्याची तयारीही हवी. अगदी छोट्या गोष्टीपासून सुरुवात करा. ज्या व्यक्तीवर तुमचा पूर्ण विश्वास आहे, अशा व्यक्तीजवळ अगदी प्रामाणिक मोकळेपणानं व्यक्त व्हा. आपल्याला काय वाटलं पाहिजे यापेक्षा आपल्याला नेमकं काय वाटतं आहे याचा विचार करून पाहा. हळूहळू तुमच्या लक्षात येऊ लागेल की, या मुखवट्याच्या पल्याडचं आयुष्य फार सुंदर आणि समृद्ध आहे, समाधान देणारं आहे आणि यात एकटेपणाला नगण्य स्थान आहे.

तुमच्या संपूर्ण आयुष्यात कोणकोणते मुखवटे तुम्ही धारण केलेत याचा एक क्षणभर विचार करा. जर यातले काही मुखवटे दूर करून तुम्ही अधिक सजगतेनं, खरेपणानं जगू लागलात तर ते आयुष्य कसं असेल? हा प्रवास नक्कीच आव्हानात्मक आहे, पण स्वातंत्र्य आणि सच्चेपणाकडे पडणारं प्रत्येक पाऊल तितक्याच मोलाचं आहे, सार्थ आहे!

sanket@sanketpai.com