कवी नारायण सुर्वे आपल्या ‘दोन दिवस’ कवितेत म्हणतात,

‘दोन दिवस वाट पाहण्यात गेले,
दोन दु:खात गेले
हिशोब करतो आहे,
आता किती राहिलेत,
डोईवर उन्हाळे…’

या ओेळी काही वृद्धांच्या बाबतीत अगदी थेट लागू पडतात.

मागच्या लेखात (११ एप्रिल) वृद्धांच्या छळाच्या टोकाच्या प्रकरणांबद्दल लिहिलं होतं. टोकाची असली, तरी ती अपवादात्मक नसणं, त्यांची संख्या वाढती असणं धोक्याचं आहे. त्यामुळे प्रश्न घोंगावत राहतात. छळ, पाल्यांची ही क्रूर वर्तणूक कशी थांबवता येईल? ही परिस्थिती बदलणं शक्य होईल का? असा विचार करत असताना दोन व्यक्तींकडून थोडा दिलासा मिळाला.

कर्करोगातून बर्‍या झालेल्या, मोठ्या मुलापासून जाचमुक्त झालेल्या ८० वर्षांच्या आजोबांबद्दल मागच्या लेखात लिहिलं होतं. त्यांचा धाकटा मुलगा त्यांना प्रेमाने सांभाळतोय, हेही सांगितलं होतं. या धाकट्याशी माझं अलीकडेच बोलणं झालं. तो सतत भावुक होत होता. त्याचे डोळे पुन्हा पुन्हा पाण्याने भरत होते. ‘‘माझ्या मुलांना मी वाढवतो तेव्हा जाणवतं, की आम्हा चौघा भावंडांना वाढवताना आई-बाबांना किती त्रास झाला असेल. माझ्या मोठ्या भावाने छळ केला बाबांचा. त्यामुळेच तब्येत बिघडली बाबांची. मी घाबरून गेलो होतो. तोंडाचा कर्करोग. जेवण-खाणं बंद. तोंडात नळ्या. मधल्या दोघी विवाहित बहिणींनी जराही मदत केली नाही. मी सगळ्यात धाकटा. मी बाबांचा सगळा भार उचलला. आता ते बरे झालेत. आता बाबांना नीट जेवताना बघितलं की त्यांच्या पाया पडावंसं वाटतं. आता ते मजेत राहतात. शेवटपर्यंत मी त्यांची अशीच काळजी घेणार…’’ त्याच्या बोलण्यात ठाम निर्धार होता.

‘‘माझं चुकलं. मी स्वभावाने रागीट. सासूबाईंचा रागराग केला…’’ सासूशी प्रयत्नपूर्वक संबंध सुधारणारी पंचेचाळिशीची सून सांगत होती. ‘‘त्यांच्या मालकीच्या घरात आम्ही राहत होतो. त्या घर विकतील आणि त्यांच्या मुलीला देऊन टाकतील, अशी भीती वाटायची.’’ प्रत्यक्षात मुलगा-सुनेच्या त्रासाला वैतागल्यानेच आजींना घर विकून टाकावंसं वाटू लागलं होतं. मुला-मुलीला घराच्या रकमेतला हिस्सा द्यायचा. काही रक्कम स्वत:साठी ठेवून एखादा वृद्धाश्रम गाठायचा, हा त्यांचा विचार. समुपदेशन केंद्रात जाऊन त्यांनी तसं सांगितलं. केंद्राने मुलगा-सुनेला बोलावलं, समजावून सांगितलं. त्यानंतर ते बदलले. नातीवर आजींचा खूप जीव. तिनेही आजीला आधार दिला. आई-वडील-आजी यांचं नातं सांधण्याचा प्रयत्न केला. सून म्हणाली, ‘‘घरातल्या सततच्या ताणाचा मलाही त्रास व्हायला लागला. हृदयविकाराने गाठलं. ही सख्खी नाती निभावता आली नाहीत तर आयुष्याला अर्थ तरी काय? आजही कधी राग आला की देवळात जाऊन देवाशी बोलते…’’

पहिल्या उदाहरणातला धाकटा मुलगा ज्याचं भावंडांपुढे काही चाललं नाही, तरी तो समजूतदार, कर्तव्यदक्ष आणि प्रेमळ आहे. दुसर्‍या उदाहरणातल्या सुनेलाही तिच्या चुकीच्या वागण्यातली व्यर्थता कळली. तिने आता समजदारी दाखवली आहे. आणखी एक प्रकरण. त्यातला छळ थांबवण्यासाठी काही करता आलं असतं का, तेही बघायला हवं. माटुंग्याच्या प्रतिष्ठित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी निवृत्त झाल्यावर त्यांची तीनही घरं तिन्ही मुलांच्या नावावर केली. (असं करताना त्यांनी कुणा हितचिंतकाशी सल्लामसलत करायला हवी होती. नाती-व्यवहार यात गल्लत नको, हे लक्षात घ्यायला हवं होती. मुलं विश्वासाला पात्र असण्याची खातरजमा करून घ्यायला हवी होती.) या घरांपैकी तीन बेडरूमच्या घरात ते आणि त्यांची पत्नी मोठ्या मुलासह राहत होते. मुलाकडून त्रास सुरू झाला. आई-वडिलांची रवानगी घरातल्या गॅलरीत. स्वयंपाकखोलीत यायला आईला बंदी. वडिलांच्या निवृत्तिवेतनावर ताबा घेतला गेला. औषधापुरते पैसेसुद्धा आई-वडिलांकडे राहिले नाहीत. मुलाने पहिली आगळीक केली, तेव्हाच आई-वडिलांनी विरोध करायला हवा होता. कुटुंबातल्या, मैत्रीतल्या विश्वासू व्यक्तीशी चर्चा करायला हवी होती. अन्याय-अत्याचार मुकाट्याने सहन करणं हाही एका परीने गुन्हाच असतो. नात्यातला दुरावा एक वेळ स्वीकारावा, पण अत्याचार, छळ नाही. हे पती-पत्नी माटुंगा पोलीस ठाण्याजवळच्या फूटपाथवर त्यांच्या एका विद्याथ्र्याला दिसले.

पत्नीला मधुमेह, तिचा गँगरीन झालेला पाय प्लास्टिकमध्ये बांधलेला. विद्याथ्र्याने त्यांना पोलीस ठाण्यात नेलं. योगायोगाने ‘स्त्रीमुक्ती संघटना’, ‘कौटुंबिक सल्ला आणि समुपदेशन केंद्रा’च्या गीता जाधव केंद्राच्या कामासाठी तिथंच गेल्या होत्या. पोलिसांनी लक्ष घातलं. प्रकरण समुपदेशनासाठी केंद्राकडे सोपवलं. दीड-एक वर्ष जोडपं फूटपाथवर राहिलेलं. कित्येक महिन्यांत चहाही प्यायले नव्हते. त्यांची तीनही मुलं बड्या कंपन्यांमध्ये चांगल्या पगारावर काम करणारी. मुलांनी सहकार्य करायला साफ नकार दिला. हा छळ घरातल्या घरात थांबवता येत नाही, हे उमजल्यावर प्राचार्यांनी आधीच पोलीस, समुपदेशन केंद्र यांची मदत घ्यायला हवी होती किंवा मुलांच्या मित्रांशी, कार्यालयातल्या सहकार्‍यांशी संपर्क करायला हवा होता. मुलांनी सहकार्य करायला साफ नकार दिला. त्यांना घराबाहेर काढणार्‍या मुलाने संभावितपणे सांगितलं, की आई-बाबा पुन्हा घरी येऊन राहू शकतात. पण त्याच्याचकडून इतका छळ सहन केलेलं हे जोडपं ही हिंमत कशी करणार? ‘‘कारवाई करू’’, असं पोलिसांनी सांगूनही मुलं बधली नाहीत. दरम्यान, नऊ महिन्यांचा काळ गेला. त्या वेळी प्राचार्यांच्या गावी राहणार्‍या पुतणीने तिच्या नवर्‍याच्या कर्करोगावरच्या उपचारांसाठी मुंबईत ‘टाटा कर्करोग रुग्णालया’जवळ एक घर भाड्याने घेतलं होतं. तिने या जोडप्याला सांभाळलं. उपचारासाठीची पुतणीची पैशांची गरज प्राचार्यांनी निवृत्तिवेतनातून भागवली. इतक्या भल्या स्वभावाच्या पुतणीशी या जोडप्याने आधीच मदतीची विनंती करायला हवी होती.

पुढे कायद्याचा आधार मिळाला. घर पुन्हा प्राचार्यांच्या नावाने झालं. मुलाला कुटुंबासह बाहेर काढलं गेलं. एव्हाना प्राचार्यांनी सत्तरी ओलांडलेली, पत्नी सत्तरीजवळ पोहोचलेल्या. स्वत:च्या घरात राहायला गेल्यानंतर काही दिवसांनी त्या वारल्या. किती दुर्दैवी अंत हा…!

या अत्याचाराकडे निव्वळ बघे बनून राहणारे शेजारी- नातलग- मित्र-मैत्रिणीही तितकेच जबाबदार आहेत. समोर चुकीचं चाललेलं दिसत असूनही ते यात पडले नाहीत, अन्याय करणार्‍याला त्यांनी जाब विचारला नाही, दुर्बल वृद्धांच्या पाठीशी ते उभे राहिले नाहीत. ना हे जबाबदार नागरिक, ना संवेदनशील माणूस. अशाने गुन्हा करणार्‍या पाल्यांवर कोणताही सामाजिक दबाव राहिला नाही. त्यांची भीड चेपत गेली.

अशी प्रकरणं पाहिल्यावर प्रश्न पडतो, की या कुटुंबांमध्ये नाती नीट तयार तरी झाली होती का? पालक-पाल्य नातं टिकण्याचं श्रेय दोघांचंही आणि बिघडायला जबाबदारही तेच दोघं. तरीही, वृद्ध-विकल आई-बापांच्या होणार्‍या मानसिक-शारीरिक छळाचं समर्थन होऊच शकत नाही. अशा गुन्ह्यांकडे दुर्लक्ष कसं करणार?

या वृद्धांशी बोलल्यावर लक्षात येतं की, मृत्यू जवळ आलेला आहे, हे त्यांना समजत असतं. मृत्यूपर्यंतचं आयुष्य सुरक्षितपणे जगायचं असतं. तेवढंदेखील त्यांना मिळत नाही. स्वत:कडे घर, पैसे असूनसुद्धा मिळत नाही. वृद्ध पालकांविषयी सहानुभूतीने लिहिलं की, तरुण, मध्यमवयीन पाल्य त्यांची बाजू सांगायला धावून येतात. पण ‘सबल’ आणि ‘दुर्बल’ यांच्यापैकी एकाची पाठराखण करायची वेळ येते, तेव्हा दुर्बलांचीच केली जाणार. समुपदेशक, मानसोपचारतज्ज्ञ हेच सांगतात. कायदा तर दुर्बलांना न्याय मिळवून देण्यासाठीच असतो.

मानवी नात्यांचा शोध घेणारे, श्रेष्ठ साहित्यकृती देणारे विख्यात नाटककार महेश एलकुंचवार यांच्याशी बोलणं झालं. नात्यांमधली गुंतागुंत, पिढ्यांमधले संघर्ष, बदलत्या काळाचा जीवनमूल्यांवरचा परिणाम हे सारं ते मांडत आले आहेत. ८७ वर्षांचे एलकुंचवार जिवाभावाच्या गोतावळ्यात वृद्धापकाळ अनुभवत आहेत. त्यामुळे पालक-पाल्य नातेसंबंधांबद्दल त्यांचं भाष्य विशेष महत्त्वाचं. ते म्हणाले, ‘‘वडीलधारं माणूस घराची शोभा असतं, असं पूर्वी मानलं जायचं. तरीदेखील सगळ्याच घरांमध्ये म्हातारी-कोतारी सुखात राहायची, असं नसे. लोळागोळा झालेले म्हातारी-म्हातारे पोतेर्‍यासारखी पडूनदेखील असायचे. पण त्यांचं खाणं-पिणं, औषधोपचार बघितलं जायचं. मूल म्हणजे म्हातारपणाची काठी असंही मानलं जायचं. आता मुलं आई-बापांना विचारतात, की ‘आम्हाला जन्मालाच का घातलं? आम्ही त्यासाठी तुमच्याकडे अर्ज केला नव्हता…’ आता माणसं नकोशीच होण्याचा काळ आहे.

तरुण पिढीला फक्त स्वत:पुरतं जगायचं आहे. त्यांचं जगणं आमच्या पिढीच्या जगण्यापेक्षा खूपच वेगळं आहे, हे बरोबरच आहे. पण या पिढीला आतून जराही कृतज्ञता वाटत नाही. स्वसुखाला थोडीसुद्धा झळ लागलेली चालत नाही. नात्यातला ओलावा हे शब्द विसरा आता… घर सोडून वृद्धाश्रमात कुणाला जायला आवडेल? पण पैसे बाळगणार्‍यांना वाटतं, की घरात राहून मुलांच्या लाथा कशाला खायच्या? ते वृद्धाश्रम पत्करतात. गरिबांची मात्र परवड होते. नाती विस्कटण्याचं मुख्य कारण कुटुंबांत मोकळ्या चर्चेचा अभाव. मनात येईल ते बोलून टाकायचं, असं करत नाहीत माणसं. मनात साचवून ठेवतात. जे. कृष्णमूर्तींचे अनुयायी एकमेकांशी कडाक्याचं भांडताना आणि ते संपलं की एक होताना पाहिलंय मी. तसं असायला हवं. एखाद-दोन चांगल्या घटनाही मी पाहिल्यात. वृद्धाश्रमात नेऊन टाकलेल्या सासूला एका जावयाने प्रेमाने घरी आणलं. कुणी मोलकरणीला म्हातारपणी स्वत:च्या घरी आणून ठेवलं. ्त्रिरया ही आपली मालमत्ता असल्यासारखे पुरुष वागतात आणि हल्लीचे आई-बाप तर मुलांना आपली मालमत्ताच समजतात. छान माणसासारखं एकमेकांशी वागावं आणि सुंदर, स्थिर नाती पुढे संक्रमित व्हावीत, असा संवाद सुरू ठेवावा…’’

एलकुंचवार यांनी सांगितल्यानुसार, नात्यांमधल्या स्थैर्यासाठी आधी संवाद हवा. तो मनमोकळा हवा. वृद्धांना चार गोड शब्द, विचारपूस यांची अपेक्षा असते तशी मुलांनाही असते. मुलांच्या नोकर्‍या, कामं त्यातली त्यांची दमछाक याचीही जाणीव आई-बापांना हवी. वय वाढणं म्हणजे अधिकाधिक जीवनानुभव जमा होत जाणं. अनुभवाच्या पुंजीमुळे पालकांच्या वागण्या-बोलण्यात शांतपणा, संयम, माया यायला हवी. मुलांच्या अडचणीत मदतीला आपण आहोत, असा विश्वास मुलांना द्यायला हवा. ज्येष्ठत्व अशा वागणुकीतून दिसावं. कुठे मुलांमध्ये डावं-उजवं केलं जातं, कुठे मुलींना डावललं जातं, तर कुठे मुली वरचढ असतात. कुठे सुनेची मानहानी केली जाते, कुठे जावयाला कमी लेखलं जातं…

जिथं प्रेम आणि आदर आहे, तिथं नाती टिकून राहतात, हा सुविचार छानच; पण हे घडवून आणण्याच्या झटपट युक्त्या नसतात. कोणतीच नाती, माणसं आदर्शवत नसतात. आई-बापदेखील माणसंच असतात. त्यामुळे पालक-पाल्य नात्याच्या प्रवासात मनं कलुषित करणारं काही घडलं, तरी त्यावर बोलणं, चर्चा, अगदी वाददेखील करून ते मागे टाकणं, हाच एकमेव मार्ग असतो. या मार्गाने चालण्यासाठी आपल्यापाशी काय हवं? समजूतदारपणा, समजूतदारपणा आणि समजूतदारपणा…