अहिंसेच्या मार्गाने प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या अनेक उदाहरणांमध्ये स्त्रीवादी चळवळ हे महत्त्वाचे नाव आहे. पण पुढील काळातील स्त्रीवादाचा संघर्ष कदाचित भविष्यातील अल्गोरिदम डेटा आणि तंत्रज्ञानाच्या विरोधात असू शकेल. म्हणूनच डिजिटल माध्यमांना समतावादी बनविण्याची जबाबदारी स्त्रीवादी चळवळीवर आहे. स्त्री-पुरुषांमध्ये जोपर्यंत असमानता राहील तोपर्यंत भारतात एकतेचा प्रश्न कठीण असेल. त्यासाठीच स्त्री चळवळींचा प्रवास चालू राहणं गरजेचं आहे. कारण तो मानवमुक्तीसाठीचा प्रवास असेल.

आपल्या पुढे हवामान बदल, एआय तंत्रज्ञान, संसाधन निर्मिती इत्यादी समस्या आहेत. काही लोकांना हिंसा हाच प्रश्न सोडवण्याचा मार्ग वाटतो. हे चूक आहे. इतिहासाचा मागोवा घेतला तर अहिंसेच्या मार्गाने प्रश्नांची उत्तरे शोधणारी अनेक उदाहरणे सापडतात. स्त्रीवादी चळवळ हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. हजारो वर्षांपासून अन्याय सहन करत असूनही स्त्रिया अहिंसेच्या मार्गाने संघर्ष करत आहेत. या संघर्षामुळे समाजाची रचना बदलली. हे जग बदलण्यात स्त्रीवादाचा मोठा वाटा आहे.’’ हे उद्गार आहेत या शतकातील इतिहासकार आणि लेखक युवाल नोवा हरारी यांचे.

हरारींचे म्हणणे खरे आहे. तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा गांधींनी दुनियेला दिलेल्या सत्य,अहिंसेचा मार्ग हा आपला इतिहास आहे. स्त्रीवादाच्या पहिल्या लाटेपासून शांततेच्या मार्गाने राजसत्ता, समाज आणि पितृसत्तेशी स्त्रियांचा संघर्ष सुरू आहे. अनेक जखमा झाल्या तरीही संयम आणि संवाद कायम ठेवत, अडचणींचा डोंगर पार करत, नकार पचवत स्त्रीवादाची, स्त्रीमुक्तीची चळवळ उभी राहिली. या चळवळींमुळे पितृसत्तेचे बुरूज ढासळले. स्त्रियांचे आयुष्य बदलले. मानवी नातेसंबंध अधिक परिपक्व होत गेले. स्त्रीवादाची ही आपल्याला मिळालेली देणगी आहे. स्त्रियांचा संघर्ष मानवी हक्कांचा संघर्ष आहे. याचं भान स्त्रीवादी चळवळीने निर्माण केलं. गेल्या पन्नास वर्षांतील चळवळींचा आढावा घेताना भविष्यकाळ नजरेसमोर आहे. आधुनिक जगामध्ये निर्माण झालेल्या तंत्रज्ञानामुळे प्रगती झाली असं आपल्याला वाटतं. भौतिक प्रगती झालेली दिसतेही, स्त्री-पुरुष संबंधांच्या बाबतीत आपला समाज एकाच वेळी सातव्या आणि एकविसाव्या शतकातील मूल्य घेऊन जगतो आहे. परिणामी, समाजात अनेक असमतोल निर्माण झाले आहेत. स्त्री-पुरुष समतेशिवाय हा असमतोल दूर होणार नाही. अन्यायी इतिहासाला प्रश्न विचारत असतानाच ये

आपल्यापुढे अल्गोरिदम आणि एआय तंत्रज्ञाने अनेक समस्या उभ्या केल्या आहेत. सगळ्या समस्यांचे आकलन आपल्याला होतेच असे नाही. एक मात्र नक्की, आज समाजामध्ये असलेली पितृसत्ता आणि स्त्री-पुरुष विषमता अशीच राहिली तर अल्गोरिदमदेखील भेदभावपूर्वक डेटा पुढच्या पिढ्यांना देईल. त्यातून भविष्यात नवीन प्रकारची पितृसत्ता निर्माण होईल. पुढील काळातील स्त्रीवादाचा संघर्ष केवळ पूर्वापार चालत आलेल्या परंपरा, रीतीरिवाज आणि पूर्वग्रहांशी नाही तर भविष्यातील अल्गोरिदम डेटा आणि काही तंत्रज्ञानाच्या विरोधातही असणार आहे. डिजिटल माध्यमांना समतावादी बनविण्याची जबाबदारी स्त्रीवादी चळवळीवरही आहे. सध्या जगभर उजव्या विचारसरणीची चलती आहे. धार्मिक कट्टरतेबरोबरच आर्थिक विषमता वाढली आहे. काही प्रमाणात गाडली गेलेली पितृसत्ता पुन्हा डोके वर काढते आहे. स्त्रियांच्या चळवळीने मिळवलेले अधिकार नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारतातही बहुसंख्याकवादाच्या नावाने आक्रमक बनलेल्या हिंदुत्ववादी राजकारणाने स्त्रियांच्या प्रश्नांची काहिशी कोंडी होताना दिसतेय. सामाजिक सलोखा नष्ट होतो आहे. बाह्य जगातील हिंसाचार आणि विद्वेष कुटुंबात पोहोचला आहे. समाजवादी नेते आणि चिंतक डॉक्टर राममनोहर लोहिया यांनी १९५० मध्ये ‘हिंदू बनाम हिंदू’ ही पुस्तिका लिहिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘भारतीय इतिहासातील सर्वात मोठा संघर्ष हिंदू धर्मातील उदारमतवाद आणि कट्टरता यांच्यातील आहे. गेली ५००० वर्षे हा संघर्ष सुरू आहे. या संघर्षात वर्ण, स्त्री संपत्ती आणि सहिष्णुतेच्या मुद्द्यांबद्दल हिंदू धर्माने कधी कट्टर तर कधी उदार रूप धारण केले. स्त्री-पुरुषांमध्ये विवाह आणि संपत्तीबाबत जोपर्यंत भेद राहील तोपर्यंत ही कट्टरता संपणार नाही. कट्टरपंथीय हिंदू धर्माने भारतात एकता आणि समाधान निर्माण केल्याचा इतिहासातील एकही काळ मला माहीत नाही. जेव्हा कधी भारतात स्त्री, वर्ण, संपत्ती आणि सहिष्णुतेसंदर्भात उदारमतवाद्यांचा प्रभाव होता तेव्हाच भारतात सुख, समाधान आणि एकता नांदत होती. जोपर्यंत हिंदूमधील वर्णभेद, जातिभेद पूर्ण नष्ट होत नाही आणि स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीचे स्थान दिले

डॉक्टर लोहियांनी केलेले कथन वास्तवात आले आहे. सध्या हा उदारमतवादी हिंदू आणि कट्टरतावादी हिंदूमधील संघर्ष टिपेला पोहोचला जाणवतो. अल्पसंख्याकांना लक्ष्य करून हिंदू समाजातील उदार परंपरा, सहिष्णुता संपवण्याचा प्रयत्न होतो आहे. यातून स्त्रियांना घरात डांबण्याचे पितृसत्ताक षड्यंत्र सुरू आहे. त्यात नवभांडवली बाजारवादाने निर्माण केलेली पितृसत्ता मिसळली आहे. मुलींना मिळालेले स्वातंत्र्य कट्टरपंथीयांना सलते आहे. हिंदू स्त्रियांनी दहा मुले जन्माला घालावी, महिला कामावर जाता येता त्यांच्यावर पाळत ठेवावी, हिंदू स्त्रियांनी परधर्मात लग्न करू नये, स्त्रियांनी चूल आणि मूल यात रमावे, आंदोलनात भाग घेऊ नये इत्यादी वक्तव्य केली जात आहेत. स्त्रीवादी चळवळीला सर्व धर्मातील कट्टरपंथीय विचारांचा सामना केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही.

स्त्रियांच्या चळवळीने प्रथमपासून नागरिकत्वाच्या हक्कांसाठी संघर्ष केला. भारतातही स्वातंत्र्य आंदोलनापासून स्त्रियांना नागरिक म्हणून मान्यता मिळाली. गेल्या दोन वर्षांत ‘लाडकी बहीण’सारख्या योजनेत निवडणुकीपूर्वीच स्त्रियांच्या खात्यात पैसे जमा झाले. स्वाभिमानी नागरिक स्त्रिया लाभार्थी बनल्या. अशा पद्धतीने स्त्रियांना आई, बहीण अशा चौकटीत बसवणे पितृसत्तेला बळ देणारे आहे. स्त्रियांची राजकीय निर्णय क्षमता हिरावून घेण्याचा हा डाव काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. लोकशाही आणि स्त्रियांच्या चळवळीच्या दृष्टीने हे चिंताजनक आहे.

दुसऱ्या महायुद्धातील संहारामुळे युद्धाच्या दुष्परिणामांची जाणीव दुनियेला झाली. काही प्रमाणात युद्धखोर विचारांना पायबंद बसला. उजव्या विचारसरणीच्या प्रभावामुळे पुन्हा युद्धखोरीला जोर आला आहे. रशिया आणि युक्रेन युद्ध, इस्रायलने गाझा पट्टीत केलेला युद्धसंहार आपल्या नजरेसमोर आहे. युद्धाचे स्त्रिया आणि मुलांच्या जीवनावर गंभीर परिणाम होतात. ‘युद्ध नको शांती हवी’ ही घोषणा स्त्रियांच्या चळवळीने जगभर पोहोचवली. स्त्रीवादी चळवळीने युद्धाला विरोध करत गाझा पट्टीतील हिंसाचाराविरुद्ध मोर्चे काढले. ग्रेटा थनबर्ग या तरुणीच्या नेतृत्वात निघालेल्या जहाजाला इस्रायलने अडवले. तिच्या बाजूने जगभर स्त्री-पुरुष उभे राहिले.

अमेरिकेचे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पारलिंगी समुदाय, स्थलांतरित समूह व आश्रयाला आलेल्या लोकांना या देशात राहण्याचा अधिकार नाही, असे जाहीर केले. शपथ घेतल्यानंतर प्रथेप्रमाणे ‘नॅशनल प्रेयर सर्व्हिस’साठी ट्रम्प वॉशिंग्टनला गेले. तेव्हा तेथील महिला बिशप मरियन बडी राष्ट्राध्यक्षांना शुभेच्छा देताना म्हणाल्या, ‘‘मला तुम्हाला एक शेवटची विनंती करायची आहे मिस्टर प्रेसिडेंट, लाखो लोकांनी तुमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि काल जसं तुम्ही सांगितलं तसं त्या प्रेमळ परमेश्वराचा शक्तिमान हात तुमच्या हातात आहे. त्या आपल्या परमेश्वराची आठवण ठेवून मी आपल्याला सांगू इच्छिते की, आपल्या देशातील लोक खूप घाबरलेले आहेत. तुम्हाला त्यांच्याशी दयार्द्र बुद्धीने वागावे लागेल. गे, लेस्बियन आणि ट्रान्सजेंडर मुलं अनेक कुटुंबांत आहेत. मग ती कुटुंबं डेमोक्रेटिक असो वा रिपब्लिकन किंवा स्वतंत्र विचारांची. सगळीच कुटुंबं जिवाच्या भीतीने घाबरलेली आहेत. आपल्या देशात शेतातील पिकं काढणारे, कार्यालयांची स्वच्छता करणारे, पोल्ट्री फार्म, मिटपॅकिंग प्लॉट्समध्ये काम करणारे, जेवल्यानंतर हॉटेलमध्ये आपली ताटं विसळणारे, रुग्णालया

मरियन बडी यांच्या भाषणामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी या बाईंनी देशाची बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली. रिपब्लिकन पक्षाच्या एका खासदाराने या बाईंना देशाबाहेर घालवले पाहिजे, असेही म्हटलं. यावरुन मरियन बडी यांच्या धैर्याची कल्पना येते. त्यांचे भाषण केवळ अमेरिका आणि अध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी नाही तर सगळ्या दुनियेसाठी आहे. माणसावर प्रेम करणाऱ्या सर्व मानवतावाद्याचा, स्त्रीवाद्यांचा हा आवाज आहे. मरियन बडी यांच्या भाषणाने स्त्रीवादी चळवळीला दिशा दिली आहे. अंधारात प्रकाशाचा दीप लावला आहे. हा प्रकाशदीप सोबत घेऊनच स्त्रीवादी चळवळीला आपल्या आजूबाजूला असलेल्या सर्व प्रकारच्या असहिष्णुतेचा, सांप्रदायिक विद्वेषाचा आणि असमानतेेचा सामना करायला हवा. मानवमुक्तीचा हा प्रवास स्त्री-पुरुषांनी एकत्र येऊन करायला हवा.

महाराष्ट्र स्त्रियांच्या चळवळीत नेहमीच आघाडीवर राहिला आहे. स्त्री चळवळीच्या अर्धशतकाच्या निमित्ताने या वर्षी जानेवारी महिन्यातच स्त्री संघटना आणि स्त्रीवादी कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ‘महाराष्ट्र स्त्रीमुक्ती परिषद’ हा मंच स्थापन केला. सार्वजनिक वाहतुकीच्या सेवेतील स्त्रियांच्या सुरक्षिततेचे सेफ्टी ऑडिट करण्यात आले. मनुस्मृति नको संविधान हवे, महाविद्यालयीन युवकांशी संवाद अभियान, जिल्हा आणि विभागीय परिषदा इत्यादी कार्यक्रम वर्षभर राबवण्यात आले. या अभियानाचा समारोप आज, उद्या, परवा (२०,२१,२२ डिसेंबर) मुंबईत ‘यशवंतराव चव्हाण सेंटर’मध्ये आयोजित राज्यव्यापी परिषदेने होणार आहे. अर्धशतकाचा आढावा घेत असतानाच पुढील काळातील स्त्रियांच्या चळवळीच्या दिशेचा शोध घेण्याचा परिषदेचा प्रयत्न आहे.

गेले वर्षभर या सदराच्या निमित्ताने स्त्रीवादाची भूमिका, विविध चळवळी, झालेल्या परिवर्तनाचा आढावा घेण्याची संधी मला मिळाली. चळवळीतील सक्रिय कार्यकर्ती म्हणून माझ्यासाठी हा आनंदाचा ठेवा ठरला. ‘लोकसत्ता’ समूहाचे मनापासून आभार. वाचकांनी दिलेल्या प्रतिसादामुळे माझ्या लिखाणाला प्रोत्साहन मिळाले.

कवी दुष्यंतकुमार यांची एक गझल आहे,

सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही,

मेरी कोशिश है की ये सुरत बदलनी चाहिये।

स्त्रियांच्या चळवळीने केलेला व्यवस्था परिवर्तनाचा प्रयत्न काही प्रमाणात या लिखाणातून आपल्यापर्यंत मला पोहोचवता आला. स्त्रीवादाचा मानवमुक्तीसाठीचा हा निरंतर प्रवास सुरूच राहणार आहे. भेटत राहू. जय जगत.