आईवडिलांच्या वृद्धापकाळात त्यांचा सांभाळ करताना सगळ्यात मोठा दिलासा ठरतो तो भावंडांत एकोपा असण्याचा. एकमेकांच्या सामंजस्यामुळे कष्टही कमी होतात आणि आधारही मिळतो, मात्र काही कुटुंबांत भावंडांची जुनी भांडणं वर्षानुवर्षं सुटत नाहीत. मनं मोकळी होत नाहीत. निदान पालकांचा वृद्धापकाळ सुखावह होण्यासाठी तरी जुन्या ‘जखमा’ विसरून मन मोठं करणं, हेच खरं जाणतेपण…
माझ्या वडिलांच्या आरोग्याबाबतचा सल्ला विचारण्यासाठी आम्ही ‘न्यूरोफिजिशियन’कडे गेलो होतो. ‘‘मेंदूत गाठ नाही, याची खात्री करून घेण्यासाठी ‘एमआयआर’ करू शकतो; मात्र गाठ असली तरी शस्त्रक्रिया करता येणार नाही,’’ असं डॉक्टर म्हणाले. नव्वदी ओलांडलेल्या वडिलांना तपासण्यांचाही त्रास नको, असं आम्हाला वाटत होतं. डॉक्टरांनीही ते मानलं. पण निर्णय पक्का आहे ना?, तुम्हा बहिणींचं एकमत आहे ना?, असं त्यांनी दोनदा विचारलं. हे विचारण्याचं कारणही सांगितलं. ते म्हणाले, ‘‘अनेकदा भावंडांत मतांतर असतं. रुग्ण आई-वडिलांना आमच्याकडे घेऊन येणारी त्यांची मुलगी वा मुलगा यांच्याशी चर्चा करून आम्ही उपचारांची एक दिशा ठरवतो आणि आठवडाभराने परदेशात किंवा दुसर्या शहरात राहणारी त्यांची दुसरी मुलगी / मुलगा येऊन उपचारांची दिशा बदलण्याचा आग्रह धरतात. याने डॉक्टर म्हणून आम्हीही गोंधळात पडतो. रुग्णाला त्रास होतो.’’
‘पालकांचं पालकत्व’ करताना भावंडांमध्ये एकवाक्यता असायलाच हवी, हे अगदीच गरजेचं आहे. केवळ उपचारांबाबत नाही, तर वृद्धत्वात आईवडिलांचा आधार होताना, त्यांना सांभाळताना भावंडांमध्ये एकोपा असणं, हा सगळ्यांसाठीच मोठा दिलासा असतो. आपल्या मुलांचं एकमेकांशी पटत नाही, याचं दु:ख करणारे आईवडील तुम्हीही आजूबाजूला पाहिले असतील. मुळात, भावंडं असणं हेच एक वरदान असतं. एकुलतं एक मूल पुरे, या पालकांच्या निर्णयामुळे ती एकएकटी मुलं भावंड-सौख्याला पारखी राहतात, मात्र. आपण बघतो की, अनेक कुटुंबांमध्ये वृद्ध आईवडिलांना भावंडं आळीपाळीने सांभाळतात. वर्षातून दोनतीन महिने एका अपत्याकडे. नंतर दुसर्या अपत्याकडे राहिल्याने त्यांना सगळ्या अपत्यांचा आणि सगळ्या भावंडांना आईवडिलांचा सहवास मिळतो. सलग एकाच ठिकाणी राहण्यापेक्षा वृद्धांना बदल अनुभवता येतो. आणि त्यांची जबाबदारी कुणा एकाच अपत्यावर सलगपणे न पडता ती विभागली जाते. दोघांचीही या योजनेला पसंती असेपर्यंत हे सुरळीत सुरू राहतं. काही ठिकाणी हा पर्याय फसतो. त्रासदायक ठरतो. कधी ठरवलेली मुदत पुढे-मागे झालेली एखाद्या भावंडाला खपत नाही. जणू कायदेशीर कराराचा भंग! कधी वृद्धांना विशिष्ट घरात, विशिष्ट मुला-मुलीकडेच राहायला आवडतं. वाढत्या वयाला बदल मानवत नाही. काही कुटुंबांत पालकांचा मुक्काम एकाच घरी असतो. आणि नेहमी सांभाळणार्या भावंडाला काही अडचण आली, तर दुसरं भावंडं काही दिवसांपुरतं त्यांना घरी येऊन जबाबदारी घेतं. वगैरे. आणि भावंडच नसेल तर ही सोयही उरत नाही. सगळी जबाबदारी त्या एकुलत्या एकावर वा एकीवर पडते. मुळात भावंडांत सामंजस्य, मैत्र असण्याने सारं सोपं होऊन जातं. अमिताभ बच्चन -हेमामालिनी यांचा ‘बागबान’ चित्रपट आठवतोय? वृद्ध पालकांबाबत त्यांची मुलं काहीशी बेपर्वा असतात, हे कथासूत्र. या मुलांपैकी एक संजय, खलनायकाच्या रूपात रंगवलाय. ‘जेन झी’च्या नजरेतून ‘बागबान’ची चिकित्सा करणारं, त्यात नव्या पिढीचं चुकीचं चित्रण केलंय, अशी टीका करणारं एक ‘रील’ समाजमाध्यमावर लोकप्रिय झालं. ‘रील’मुळे वृद्ध पालक-पाल्य नात्यासंबंधी बरीच चर्चा झाली. ‘बागबान’मध्ये भावंडं आई-वडिलांची ताटातूट करतात, असं जरा बटबटबटीतपणे दाखवल्याने प्रेक्षकांची सहानुभूती पालकांना मिळते आणि टीका पाल्यांवर होते.
वास्तव काय आहे? आपल्या वाचकांनी पाठवलेले दोन अनुभव वाचा. शिला पाटील लिहितात, ‘‘माझ्या सासर्यांच्या निधनानंतर माझे पती घरातील ज्येष्ठ पुत्र असल्याने त्यांनी माझ्या सासूला कोकणातून मुंबईला आमच्याकडे आणलं. तेव्हापासून १७ वर्षे सासुबाईंना, आता वय ९२, आम्ही सांभाळतोय. आम्ही निवृत्त झालो असून निवृत्ती वेतनावर गुजराण करतोय. आमची दोन्ही मुलं परदेशात आहेत. सासूबाईंना स्मृतिभ्रंश आहे. घरात पडल्याने त्यांच्या पायांची हाडं मोडली होती. वेळीच शस्त्रक्रिया केल्याने त्या ‘वॉकर’ घेऊन चालू शकतात. परंतु सासूबाईकडे सतत लक्ष द्यावं लागतं. त्यामुळेच, इच्छा असूनही नाटक-चित्रपटांना, नात्यातील लग्न-समारंभांना आम्हा दोघांना एकत्र जाणं जमत नाही. जबाबदारीच्या श्रृंखलेमुळे आमचं सामाजिक स्वातंत्र्यच हिरावलं गेलं आहे. वर्षातील काही महिने तरी आईचा सांभाळ करण्यासाठी आम्ही माझ्या दीर/ नणंदांना विनवलं, परंतु दोन्ही दिरांनी, दोन्ही नणंदांनी नकार दिला. आता नातेसंबंधात कटुता निर्माण झाली आहे. यासाठी कायद्याचीही मदत मिळत नाही. आईवडिलांचा जबाबदारीने सांभाळ करणार्या आमच्यासारख्या प्रामाणिक, पापभीरू मराठी कुटुंबाचीसुद्धा कशी फरफट होत आहे, हेच लक्षात आणून देण्यासाठी आमची व्यथा मांडली आहे.’’ नीता शेरे लिहितात, ‘‘मी निवृत्त होण्याआधी वडील गेले. मात्र नव्वदीतल्या आजोबांच्या शेवटच्या आजारपणात आम्ही तिन्ही भावंडांनी, डॉक्टरी शिकणार्या मावस भावाच्या मदतीने कॅथेटर लावण्यापासून सर्व केलं आणि त्यांना सुखानं जाऊ दिलं. माझ्या निवृत्तीनंतर माझ्या ८५ वर्षांच्या आईला सांभाळायची वेळ माझ्यावर आली. तिला ‘व्हील चेअर’वर बसवून आम्ही फिरवायचो. ती आणि मी शेवटपर्यंत एकत्रच राहिलो. शेवटचे सहा महिने माझा मोठा भाऊ येऊन राहिला होता. आम्ही दोघांनी तिची मनापासून सेवा केली. दोघांनीही स्वत:च्या वयाचा विचार न करता, तिला केअरटेकरच्या हाती न देता तिचं अंघोळीसह सर्व काही केलं. आम्ही भावंडं एकाच विचाराची आहोत. ‘वृद्धावस्था’ हे दुसरं बालपण असतं आणि ‘लिंगभेदा’पलीकडचं असतं. आमच्या आईने आम्हाला गरिबीतसुद्धा खूप कष्टाने मोठं केलं. त्या ऋणातून थोडंसं उतराई होण्याची तीच वेळ होती.’’ आणखी काहींशी बोलणं झालं. हेमंत आणि वसंत हे दोन भाऊ त्यांच्या बहिणींच्या मदतीने आई-वडिलांना आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करतात. या भावंडांनी नियमित बचत करून आई-वडिलांच्या खर्चासाठी काही रक्कम साठवली आहे. एका भावाने त्यांचा आरोग्यविमाही घेतलाय. पल्लवी लोकेच्या ८० वर्षांच्या आईचं मेंदूतल्या गाठीचं आजारपण ती आणि तिचे दोन भाऊ यांनी एकदिलाने निभावलं. पल्लवीचा नवरा आणि दोन्ही भावांच्या पत्नी यांचीही भक्कम साथ होती. एकमेकांवर इतका विश्वास की, कष्ट आणि खर्च यांचा हिशेब कुणी केलाच नाही. पुण्यात राहाणार्या संध्या घोलप सत्तरीच्या. त्यांची आई ९३ वर्षाची. मुंबईतल्या आईच्या घरात तिच्यासोबत संध्याचे थोरले भाऊ-वहिनी असतात. हैद्राबादचे धाकटे भाऊ-वहिनी गरजेनुसार मदतीसाठी धावतात. थोरले भाऊ-वहिनी त्यांच्या मुलांकडे अमेरिकेला जातात, तेव्हा सहा महिने आईचा मुक्काम संध्याकडे. पुण्याजवळ राहणारा संध्याचा धाकटा मुलगा आई-आजीच्या संपर्कात असतो. संध्याची आई सांगते, ‘‘जरुरीपुरतीच माझी काळजी घ्या. नदीचं पुढे वाहणारं पाणी अडकवून का ठेवायचं? तुम्ही तुमच्या मुलांमध्ये जास्त गुंतलेले असणार, हे मी समजू शकते.’’ आईला कुणी सांभाळायचं, हा हेमंत-वसंत, पल्लवी या तीन भावंडांमध्ये विषयच नाही. संध्या यांच्याप्रमाणे अनेक भावंडं आपापल्या आई-वडिलांना सांभाळत आहेत. या सगळ्यांना त्यांचं हे करणं नैसर्गिक वाटतं. यात विशेष काहीच नाही, असं ते म्हणतात.
मुलांना हे नैसर्गिक वाटणं ठीकच पण, जावई आणि सुनासुद्धा मुलांइतकंच करणार्या असतात तेव्हा भावंडांची संख्या जणू वाढते. बळही वाढतं. या अनुभवांवरून भावंडांच्या एकीचं, ‘टीमवर्क’चं महत्त्व जाणवतं. वृद्धांची काळजी घेताना चिडचिड होते, उदासी येते, अडकून पडल्यासारखं वाटतं. पण भावंडांची साथ लाभली की, फार आश्वस्त वाटतं. ताण हलका होऊन जातो. भावंडांनी कायम संपर्कात राहणं, कष्ट आणि खर्च यांची जबाबदारी घेणं, एकमेकांचीही काळजी घेणं हे सुखद असतं. शीला पाटील यांच्या कुटुंबातल्या भावंडांकडेही अशीच समजूत असती तर?
कोणतेही नातेसंबंध ‘आदर्शवत’ नसतात. आईवडील, भावंडांबरोबरच्या नात्यांसह सहसा, प्रत्येक नात्यात कडवट, बोचणारं काही छोटं-मोठं घडून गेलेलं असतं. पण वाढत्या वयानिशी ते मागे टाकत जबाबदार्या निभावणं, हेच खरं जाणतेपण. वार्धक्याने दुर्बल झालेल्यांशी वागताना मन जरा मोठं करता येणार नाही का?
चेशायर आडनावाच्या कुटुंबातली भावंडं आणि त्यांचे आईवडील यांच्या नात्यावरच्या ‘गुड बाय जून’ (२०२५) या हृदयस्पर्शी चित्रपटात भावंडं अशी मोठ्या मनाची होऊन जातात. नाताळच्या काही आठवडे आधी, वृद्ध ‘जून’ (चित्रपटाची नायिका) हीची प्रकृती अचानक खालावते. रुग्णालयात नेल्यावर कळतं की, तिचा कर्करोग वाढला आहे आणि ती काही दिवसांचीच सोबती आहे. तिचा मुलगा कॉनर आपल्या बहिणी ज्युलिया आणि मॉली यांना कळवतो. त्या लगेचच पोहचतात. जूनची मोठी मुलगी हेलन जर्मनीत राहणारी, तीही तातडीने इंग्लंडला येते. सगळेजण एकत्र येतात खरे; पण ते वरवरचं असतं. तीन बहिणींचे भावाशी, खुद्द आई-वडिलांशी आणि चारही भावंडांचे आपापसात ताणलेले संबंध, पूर्वीचे मतभेद, जुनी भांडणं त्यातून तयार झालेलं अंतर, तुटकपणा हे सगळं शिल्लक असतंच. सगळी मुलं एकत्र आल्याने मृत्युशय्येवरची आई सुखावते. मागचं विसरून समेट घडवा, मायेनं वागा, असं ती मुलींना सांगू बघते. आईचा मृत्यू निकट आलेला. मुलींच्या मनात साचलेलं उफाळून बाहेर येतं, त्या एकमेकींशी बोलतात, जुन्या गाठी सोडवतात. एका संध्याकाळी बाहेरची बर्फवृष्टी पाहत असताना जून ज्युलियाला विचारते, ‘‘आता मला मरण आलं तर चालेल ना?’’ ज्युलियाचे डोळे भरून आलेले. आईला आता अधिक यातना नकोत असं तिला वाटत असतंच. जून म्हणते, ‘‘मृत्यूनंतर मी भुरभुरणार्या बर्फाच्या रूपात परत येईन.’’ नाताळ अगदी जवळ आलाय. आणि सगळी भावंडंही अनेक वर्षांनंतर एकत्र आहेत. त्यांना नात्यांमधला अर्थ गवसलाय. जूनची खालावत जाणारी तब्येत. ती ख्रिसमसपर्यंत असेल-नसेल, हे लक्षात येताच सगळी भावंडं, त्यांची मुलं एकत्र येऊन तिच्यापुढे जल्लोष करत एक नाटिका सादर करतात. सुखा-समाधानात डुंबत असतानाच जूनचा श्वास थांबतो.
… आता, जूनच्या मृत्यूला एक वर्ष झालंय आणि सगळी भावंडं त्यांच्या कुटुंबीयांसह नाताळ साजरा करतायत. त्यांच्यातले प्रेमसंबंध घट्ट झाले आहेत. बाहेर बर्फवृष्टी होतेय. आणि प्रिय आईच्या आठवणीने सगळे व्याकूळ आहेत. हा चित्रपट संपतो, तेव्हा जाणवतं की पोटातली माया आणि मेंदूतली विवेकबुद्धी तुमचे आटलेले नातेसंबंध पुन्हा सांधून देते.
आईच्या अखेरच्या दिवसांत एकत्र आलेली ही भावंडं एकमेकांपासून पुन्हा कधीही दूर जाणार नसतात. आई-बापानंतर सख्खं म्हणावं, असं नातं भावंडांचंच तर असतं!
ukulmedha@gmail.com
