दरवर्षी ८ मार्चला ‘महिला दिन’ येतो आणि समाजमाध्यमावर शुभेच्छांचा, स्त्रियांच्या कर्तृत्वाचा गौरव करणाऱ्या कविता अन् लेखांचा पाऊस पडतो. रेस्टॉरंटपासून मॉलपर्यंत सगळेच या संधीत आपले हात आणि बिचाऱ्या पुरुषांचे खिसे धुऊन घेतात. (लोकांना ‘महिला दिना’चं इतकं कौतुक की, गेल्या वर्षी कल्याणच्या एका ज्वेलर्सने त्याच्या दुकानाचं नाव बदलून ‘वूमन हरी पेठे’ असं ठेवलं होतं म्हणे, खरं-खोटं तो पेडण्याचा जगन्नाथ जाणे!) मात्र १९ नोव्हेंबरला ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’- निमित्त एखाद्याने व्हॉट्सअॅपवर ‘हॅपी मेन्स डे’ असं लिहिल्यास एक तर त्यावर टपाटप हसण्याच्या ‘इमोजी’ पडतात किंवा ‘हे काय नवीन फॅड?’ अशी विचारणा केली जाते.
आपण ‘महिला दिन’, ‘मदर्स डे’, ‘वूमेन्स वीक’ वगैरे दणक्यात साजरे करतो. पण जेव्हा ‘पुरुष दिन’ येतो, तेव्हा तो इतका दीनवाणेपणानं येतो, की वाटतं, पुरुषांप्रमाणे तो दिवसही स्वत:चं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी ‘ईएमआय’ भरतोय की काय! केवळ पुरुषांच्या कौतुकाचे शाब्दिक बुडबुडे काढण्यासाठी नव्हे, तर स्त्रियांसाठी जसा ‘महिला दिन’आहे, तसंच पुरुषांनाही त्यांच्या समस्यांवर बोलण्यासाठी एक व्यासपीठ मिळावं. त्या निमित्ताने समाजातील पुरुषांच्या भूमिका, जबाबदाऱ्या आणि त्यांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर लक्ष वेधता यावं, असा या ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’चा उद्देश आहे म्हणे.
सगळ्यांनी त्यांना गृहीत धरणं, त्यांच्या भाबडेपणाचा फायदा घेतला जाणं आणि त्यांच्या बाबतीत सर्वंकष उदासीनता असणं या पुरुषांच्या मुख्य समस्या आहेत असं मला वाटतं. भाबडेपणामुळे पुरुषांची फसवणूक होणं ही काही आताची बाब नाहीये. असं म्हणतात की, जेव्हा देवाने ‘ईव्ह’ या पहिल्या स्त्रीची निर्मिती केली तेव्हा त्याने ‘अॅडम’ला वचन दिलं की, पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात चांगल्या स्त्रिया असतील आणि मग त्याने पृथ्वीचा आकार गोल केला.
स्त्रियांकडून केल्या जाणाऱ्या निवडीवर सौंदर्य, फॅशन, स्टेटस् अशा अनेक घटकांचा प्रभाव असतो. पुरुष मात्र निवड करताना अर्थमंत्र्यांच्या तावडीतून सुटून आपल्या खात्यात उरलेले पैसे हा एकच निकष वापरतो. मध्यंतरी मी नवीन मोबाइल घेतला. ऑनलाइन, ऑफलाइन सगळं मार्केट पालथं घालून शेवटी ‘अँड्रॉइड’च घेतला. बायको आग्रह करीत होती की, ‘अॅपल आयफोन घे’ म्हणून. तुम्हाला सांगतो, बायकोच्या आग्रहावरून आयफोन घेणं म्हणजे अॅडमच्या प्रकरणातून आपण काहीच धडा न घेतल्यासारखं आहे. त्यामुळे, पुरुष दिन हा खरं तर, स्वत: ‘अँड्रॉइड’वर भागवून बायकोला आयफोन घेऊन देणाऱ्या आजच्या अॅडमला, आपली आई, बायको, बहीण, मुलगी यांच्या हौसेमौजेसाठी नोकरी-धंदा नावाच्या सुवर्णमृगामागे धावणाऱ्या आजच्या लक्ष्मणाला, आणि ‘फॅशन शो’ नामक मयसभेत ‘रॅम्प वॉक’ करणाऱ्या स्त्रीला प्रेक्षकांत बसून ‘चीअरअप’ करणाऱ्या आजच्या पांडवांना समजून घेण्याचा दिवस आहे.
गेल्या वर्षी आमच्या कलंक नावाच्या पाळीव बोक्याला मी म्हटलं, ‘‘बोकोबा, पुरुष दिन संपत आला, संध्याकाळ झाली. बसायची वेळ झाली. आज ‘मेन्स डे’ असूनही अजूनपर्यंत मला कुणी साधं ‘विश’देखील केलं नाहीये रे!’’ कलंक बोलला, ‘‘अरे भावड्या, ‘आंतरराष्ट्रीय पुरुष दिना’चा आणि तुझा काय संबंध? तू तद्दन गावठी पुरुष आहेस!’’ तेव्हा मला त्याला समजावून सांगावं लागलं की ‘‘बाबारे, हा पुरुषांचा आंतरराष्ट्रीय दिवस आहे. ‘आंतरराष्ट्रीय पुरुषां’चा दिवस नाहीये.’’ हा जर केवळ ‘आंतरराष्ट्रीय पुरुषां’चा दिवस असता, तर तो आपल्या देशात फक्त एकाच व्यक्तीला साजरा करता आला असता! असो.
पुरुषांच्या बाबतीत मार्केटदेखील किती उदासीन आहे बघा. आपण कपडे खरेदी करायला बाजारात किंवा मॉलमध्ये गेलो तर तिथे लहान मुलींपासून, तरुणी, प्रौढ स्त्रिया, वयस्कर स्त्रिया यांच्यासाठी कपड्यांचे, केशभूषणांचे, काना-गळ्यातील दागिन्यांचे इतके नवनवीन प्रकार रोजच्या रोज येत असतात की, आपण घासाघीस करून एक प्रकार घेईपर्यंत नवीन फॅशन बाजारात आलेली असते. मात्र लहान मुलांचे किंवा पुरुषांचे कपडे हवे असल्यास दुकानदाराकडे फारसा ‘चॉइस’च नसतो. दागिने या प्रकारातून, तर पुरुषांची जवळजवळ हकालपट्टीच झालेली आहे. कुणीतरी म्हटलं आहे की, माणूस हा सतत उत्क्रांत होणारा प्राणी आहे. पण माझं निरीक्षण असं आहे की, साधारण ५० वर्षांपूर्वी झालेल्या ‘बर्म्युडा’ चड्डीच्या उदयानंतर पुरुषांच्या कपड्यांच्या क्षेत्रात उत्क्रांती म्हणावी, असं काही घडलेलंच नाहीये.
कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमात, कौटुंबिक समारंभात बायका मारे नवनवीन फॅशनचे कपडे, पादत्राणे, साड्या, दागिने लेवून मिरवत असतात. बिचाऱ्या पुरुषांकडे बायकांच्या तुलनेत ‘शो-ऑफ’ करण्यासाठी काहीही नसल्याने हल्लीची तरुण पिढी सरसकट दाढी वाढवू लागली आहे. दाढी राखण्याच्या फॅशनमध्येही वेगळेपण राखण्याइतका ‘फॅशन सेन्स’ देवाने पुरुषांना दिलेला नसल्याने, शेकडा नव्वद टक्के तरुणांनी विराट कोहलीच्या दाढीची कॉपी केलेली दिसते.
तुम्हाला सांगतो, आपल्या सरकारने स्त्री सबलीकरणासाठी ‘बेटी पढाओ’ योजना आणली, पण ‘बेटा पढाओ’ अशी एखादी योजना आणावीशी त्यांना वाटलं नाही. मोठेपणी पुरुष होणाऱ्या मुलांनी मर्यादा पुरुषोत्तम व्हावं (निदान ‘अॅनिमल’ होऊ नये.) असं सरकारलाच वाटत नसेल तर आपण तरी काय करणार!
सरकारी पातळीवरून सुरू झालेली ही पुरुषांबद्दलची उदासीनता हळूहळू खाली खाली झिरपत जाते आणि बिचारे पुरुष या उदासीनतेचे बळी होतात. पुरुष दिनानिमित्त, सर्व पुरुषांनी माझ्यासारखं थोडंसं समजूतदार व्हायला हवं, असा नवरोकीचा सल्ला मी त्यांना देऊ इच्छितो. माझ्यासारखं म्हणजे कसं? तर, …माझी चूक झाली. मला माझी चूक समजली. मी त्याबद्दल तिची माफी मागितली. विषय संपला. तिची चूक झाली. मी तिला तिची चूक दाखवली. आणि मग मला माझी चूक समजली. मी त्याबद्दल तिची माफी मागितली. विषय संपला!
‘मऊ मेणाहूनि आह्मी मेन। कठिण वज्रास भेदूं ऐसे, मेले जित असों निजोनियां जागे। जो जो जो जें मागे तें तें देऊं’, अशा स्वभावाच्या पुरुषांना समजून घेण्यात स्त्रिया कमी पडल्या आहेत असा माझा तर्क आहे. ‘‘ह्यांच्या मनात नक्की काय चाललंय तेच कळत नाही’’ अशी समस्त बायकांची पुरुषांबद्दल तक्रार असते. त्यामुळे ‘‘तू कसला विचार करतो आहेस?’’ या प्रश्नाचं उत्तर देण्याचा ताण पुरुषांना नेहमी सहन करावा लागतो. त्यात गंमत अशी की, या प्रश्नाला जेव्हा पुरुष ‘‘काहीच नाही’’ असं उत्तर देतो तेव्हा ते एकाही स्त्रीला पटत नाही. कारण पुरुषांनी ‘‘ठीक आहे, काही नाही’’ म्हटलं तरी काहीतरी असतंच!
‘‘इतका कसा कोरडा तू, तुला जरा तरी भावभावना आहेत की नाहीत?’’ इथपासून ते ‘‘इतकं इमोशनल व्हायची गरज नाहीये’’ अशी दोन टोकांची वाक्यं एकाच व्यक्तीला, एकाच दिवशी ऐकावी लागण्याचं प्राक्तन ज्या पुरुष वर्गाच्या नशिबी आलंय त्यांना शुभेच्छा देण्याव्यतिरिक्त आजच्या दिवशी आपण आणखी काय करू शकतो?
‘‘ह्या ड्रेसमधे तू काय मस्त दिसतेस!’’ असं सांगून आपला प्रेमळपणा दाखवणाऱ्या, ‘‘तुला हवी ती साडी घे.’’ असं म्हणून उदारपणाचं सोंग आणणाऱ्या, ‘‘तू आज खूपच दमलेली दिसतेस, चल बाहेर जेवायला जाऊ’’ अशी समजूतदारपणाची झूल पांघरणाऱ्या, ‘‘तुझ्यासाठी मी मोगऱ्याचा गजरा आणलाय बघ’’ असं म्हणून आपली रसिकता ठसवू पाहणाऱ्या, ‘‘मित्र पार्टीला बोलवत होता, पण म्हटलं आधी तुला विचारावं आणि मगच त्याला कन्फर्म करावं’’, असा आज्ञाधारकपणाचा आव आणणाऱ्या, ‘‘अगं, ती माझी शाळेतली मैत्रीण ना स्वभावाने एकदम खडूस आहे, तुझ्यासारखी मनमिळावू नाही,’’ अशी आपल्या एकनिष्ठतेची पावती फाडणाऱ्या किंवा असंच काही वरवरचं बोलून आपला चांगुलपणा दाखवणाऱ्या नवरे मंडळींना, ‘‘तुझी आई आपल्या घरी आणखीन किती दिवस राहणार आहे?’’ हे बोलण्याचं किमान धाडस येवो, हीच सर्व पुरुषांना ‘पुरुष दिना’च्या निमित्ताने शुभेच्छा!
sabypereira@gmail.com
