भूतकाळातील अप्रिय घटना जेव्हा भविष्यकाळातला आनंद थोपवू पाहतात, तेव्हा उरतो फक्त स्वत:चा स्वार्थी विचार. पण त्या आत्ममग्न स्वार्थामधून बाहेर पडलं की आनंद-समाधानाचे अनेक क्षण समोर ठाकतात. स्वार्थ विस्तारत जातो तसतसा तो आपोआप निरपेक्ष होत जातो. आणि मग तीच व्यक्ती मायाममतेने लगडलेली वात्सल्यमूर्ती होते… हा प्रवास मनाचा… त्या स्वार्थाचे अर्थ शोधणारा…

अनेक अडचणींच्या भेंडोळ्याला सतत सहा वर्षं तोंड दिल्यानंतर ‘निभावलो बाबा यातून’ हा सूर लय पकडायला लागतो तोच जगण्याचा पुढचा पट समोर येतोच. त्यातही दिसणाऱ्या आणि लपलेल्या संधी आणि सापळे दोन्ही असतात. कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक आणि शरीरप्रकृती अशा अनेक आघाड्यांवर झगडताना माझ्यावर ही सिंहावलोकनाची वेळ आली तेव्हा माझ्या वयाची चाळिशी आली होती.

आजूबाजूचे अनेक समवयस्क आपापल्या घरट्यांमध्ये ऊब घेत कर्तृत्वाच्या भराऱ्या मारणारे आणि माझी तर सुरुवात नव्याने संसार सुरू करण्यापासून. चांगली गोष्ट अशी की, मी आणि माझी (त्या वेळची होणारी) पत्नी सविता या कसोटीपर्वातून जातानाच एकत्र आलो होतो. पैशाची तंगी होती. म्हणून ‘क्रॉफर्ड मार्केट’च्या तांबाकाटा भागात जाऊन किलोच्या भावाने भांडी विकत घेतली होती. परवडणारं पण छान दिसणारं बांबूचं फर्निचर नव्या घरात लावलं होतं. परिस्थिती आशादायक होऊ लागली होती. आम्ही दोघांनी लग्न करायचं हे पक्कं केलं होतंच पण माझ्या काही अटी होत्या.

‘‘पुढचं आयुष्य आपण दोघंच एकत्र घालवू शांतपणे… मला वाटतं की बाळ नको आपल्याला.’’ मी अगदी खात्रीनं म्हणायचो.

‘‘जे घडून गेलं आहे त्याचा परिणाम अगदी खोलवर झालाय तुझ्यावर.’’ ती शांतपणे सांगायची. ते खरंच होतं. आपला इवलासा मुलगा आपल्याला ‘परक्या माणसाचा’ ‘लुक’ देतो ही गोष्ट बाप नावाच्या प्राण्यासाठी खूप अवघड असते. तुमच्या नात्यातली काही वर्षं तुम्ही खूप धमालीने एकत्र घालवलेली असतात. अगदी कर्तेसवरते असूनही त्या नात्याला लागलेलं ग्रहण तुम्ही परतवू शकलेले नसता. भावनिक ताटातूट झाल्यावर फक्त संपर्कहट्टावर भर द्यायचा म्हणजे स्वत:लाच फसवणं. त्या मुलाच्या आयुष्यामध्ये ‘आपलं नसणं’ त्याचा प्रवास काहीसा सुलभ करेल हे लक्षात आल्यावर विवेकी मन फैसला करतं की नाही… आता बस्स! दूर होऊया त्याच्या आयुष्यातून. पण आठवणींना थोडंच धरण बांधून अडवता येतं. अशा विफलक्षणी त्या विकल बापप्राण्याला वाटायचं, नकोच ते नातं पुन्हा. दु:खाला उगाळता उगाळता निर्धाराला धार आली होती.

आमचं लग्न झालं. संसारही उत्तम सुरू झाला. मित्रकुटुंबीयांनी घर गजबजू लागलं. हे सगळे बदल माझ्यासाठी खूप शांतवणारे होते… ते असंच अनुभवायचं. पुन्हा नकोत त्या जागवणाऱ्या रात्री, बदलायचे डायपर्स आणि एका जीवाला वाढवण्याची जबाबदारी. असा काळ जात होता. आम्ही आमच्या नात्यामध्ये छान रमलो होतो.

एकदा आम्ही दोघंच बोलत बसलो होतो तेव्हा सविता म्हणाली, ‘‘संसाराकडून माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या अगदी सामान्य आहेत. हट्ट कसलाच नाही पण मला मूल व्हावं आणि त्याला आपण वाढवावं असं खूप वाटतं.’’

‘मी तुला लग्नाआधीच सगळं स्पष्टपणे सांगितलेलं असताना तू हा विषय काढतेच का आहेस? कशाला?’ असा करकरीत प्रश्न पडजीभ ते जीभ या प्रवासात असतानाच मी स्वत:ला थांबवू शकलो. ‘‘हं’’ म्हणत मान डोलावल्यासारखं केलं. एक नवं वादळ जन्माला येताना मला स्पष्टपणे दिसलं. पण तोपर्यंत स्थिर झालेल्या सहजीवनातली तिची मिळून जुळवून घेण्याची वृत्ती माझ्यापर्यंत पोहोचत होती. माझा जरी हा दुसरा विवाह होता तरी तिचा पहिलाच होता. तिने जाणीवपूर्वक हा निर्णय घेतलेला होता. तो तिच्या आई-वडिलांना पटवून देताना लागलेलं धैर्य मी जवळून पाहिलं होतं. त्यामुळेच बहुतेक आमच्या भूमिका दोन टोकांच्या असल्या तरी आमचं भांडण वाजलं नाही. नाहीतर असे मुद्दे नात्यालाच तोडू शकतात. तिने मला ‘निर्णय’ घेण्यासाठी काळाची मर्यादा उघडपणे घातली नाही. ती माझ्या मनात तरीही होतीच.

मला नेमकं काय खटकतंय? माझा स्वत:चा शोध सुरू झाला. ‘‘समवयस्कांची मुलं जेव्हा स्वत:च्या पायावर उभी असतील तेव्हाही आपल्या जबाबदाऱ्या संपलेल्या नसतील असं, पण ‘जबाबदारी’ या शब्दाची व्याख्या तू ठरवू शकतोच की…पण असं कसं, आपलं मूल म्हणजे पाठिंबा द्यावा लागणारच ना? का कुठला कायदा आहे? तुला जबाबदारी नको वाटते पण तुझं मूल म्हणजे काय निर्जीव ओंडका असणार का?… तो तुझ्या जगण्याला समृद्ध करेल त्याचं काय? तुला ना भीती वाटतेय की जीव लावलेलं प्रत्येक नातं तुझ्यापासून लांब जातं. अगदी जवळची दोन नाती सुकून हरवली पण हा काही सर्व नात्यांसाठीचा नियम नाही. तुझ्या पडत्या काळात जे तुझ्या बाजूने उभे राहिले त्यांची संख्या मोज. या टप्प्यावर काही जण लांब गेले पण काही जवळसुद्धा आले की. आणि एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून सविताचा विचार कर. तिच्या अपेक्षांना तू काहीच स्थान देणार नाहीस, तुम्हा दोघांच्या सामाईक आयुष्यात? किती स्वकेंद्रित विचार करशील? तुझा हा नकार म्हणजे निसर्गाचा प्रवाह अडवणारी भिंत आहे. तेवढी काढ. पुढचे निसर्गाला आणि विज्ञानाला ठरवू दे. मूल व्हावं यासाठीचा भावनिक दबाव स्त्रीवर नेहमीच जास्त असतो. ‘आता मूल कधी?’ असे प्रश्न लिहिले

‘‘….कोणत्या जीवावर कोणाचा हक्क? तुझ्यातून निर्माण झालेला जीव उदरात वाढवणाऱ्या मातेचा हक्क जास्त नाही का! एक दैवी देणगी निसर्गानं कुशीत खेळवली तर त्याला उत्सव मानायचा हक्क नाही? ज्या जीवाला फुलवण्यासाठी, त्यांच्या विकासासाठी आपला वाटा उचलायचा. त्यातली मजा लुटायची. आणि त्या जागवणाऱ्या रात्री, डायपर्सचे ढीग, शीशूचा वास…ओ! ओक्के, एवढी काही अडचण नाही आहे ती. आणि कायम दुपट्ट्यावर थोडाच राहणार आहे तो. ‘तो’?…हे कुणी आधीच सांगितलं? तुझं प्राधान्य असू शकतं मुलगा की मुलगी ते. पण तेवढंच… नाही, नाही, मला दोन्ही आवडतात. अच्छा? तर मग लक्षपूर्वक ऐक, एकदा निर्णय घेतल्यावर परत कुंपणावर नाही बसायचं… सगळ्या शंकाकुशंकांना झटकून तुम्हा दोघांच्या पालकत्वाच्या प्रवासात सहभागी व्हायचं.’’

हा असा आतला संवाद अनेक दिवस चालला. आणि एक क्षण असा आला जेव्हा संदेह निमाला.

मोह मेला चि तो देवा, कृपेने स्मृति लाभली।

झालो नि:शंक मी आता, करीन म्हणसी तसे।।

गीताई : १८ : ७३)

भगवद्गीतेमध्ये अर्जुनाच्या तोंडी असलेला हा शेवटचा श्लोक आहे. त्याच्या आशयाने मला ‘आपलं’ म्हणण्याचा अनुभव मी घेतला. मोह म्हणजे स्वकेंद्रित विचारांचं मोहोळ. विवेकाची वाट म्हणजेच ईश्वरतत्त्व. त्याच्या कृपेने ‘स्मृती’ म्हणजे नवा, स्थिर दृष्टिकोन लाभला. त्याचा परिणाम असा झाला की, असुरक्षितता संपली. आता विज्ञानाच्या वाटेनं जायचं. विज्ञान हेसुद्धा ईश्वरतत्त्वच.

आंदोलन मिटल्यावर पुढची वाट समाधानाची होती. मी माझा ‘निर्णय’ सविताला ऐकवला. माफक भावनिक अभिव्यक्ती असणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची ती प्रतिनिधी आहे. पण तिच्या अंतरातलं सुखावणं मला जाणवत होतं. सुदैवाने आमची वैद्याकीय तपासणी उत्तम निघाली आणि यथावकाश, बाळ पोटात असल्याची बातमीसुद्धा पक्की झाली. आता आम्ही पूर्णपणे त्या प्रवासामध्ये गुंतलो होतो. आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव ‘कबीर’ ठेवायचं आणि मुलगी झाली तर ‘समा’ असं आम्ही ठरवून टाकलं होतं. मंगेश पाडगावकरांनी केलेले कबीरांच्या दोह्यांचे मराठी रूपांतर आम्ही वाचत होतो. त्यांच्या काव्य कारकीर्दीला ५० वर्षं झाली म्हणून आमच्या ‘स्वच्छंद’ या डॉक्टर मित्रांच्या वाद्यावृंदाने त्यांच्यासमोर त्यांच्या कवितांचा कार्यक्रम सादर केला. तेव्हा या नावासाठी त्यांचे आशीर्वाद थेट घेतले.

प्रत्यक्षात कबीर अवतरला तो सविताला तीव्र प्रसूती वेदना देऊन. कारण प्रसूतीच्या टप्प्यावर बेट्याने आपलं पोटातलं आसनच बदललं. पण सुखरूपपणे आला. त्यानंतर आजपर्यंतचा आमचा एकही दिवस असमाधानाचा झाला नाही. त्याच्या विकासामध्ये अडचणी आल्या. त्या जास्त प्रमाणात सविताने विनातक्रार सोडवल्या. औपचारिक शिक्षणाकडे तिने पाहायचं आणि जगातल्या शिक्षणावर मी भर द्यायचा हे त्या वेळी ठरलं ते आजवर तसंच आहे. पण त्याच्या निमित्ताने जागृत झालेला वात्सल्याचा झरा आता थांबणार नव्हता. तो सात-आठ वर्षांचा झाला तेव्हा आमच्या आयुष्यात आमची मुलगी आली. ती थेट एम.बी.बी.एस. होऊनच अवतरली होती. तिच्या वैयक्तिक आयुष्यात आणि डॉक्टर होण्याच्या प्रवासात कठोर संघर्ष सुरू होता. तिच्या त्यापुढच्या मनोविकारतज्ज्ञ होण्याच्या मार्गावर ती आमची होऊन गेली. गंमत म्हणजे या दोघांचं गूळपीठ जणू जीवशास्त्राची एक भट्टी असल्यासारखं जमलं.

आता माझ्या ‘लाड करणे’ या समुद्राला फक्त भरती येऊ लागली. माझं सारं विवेकनिष्ठ शहाणपण या दोघांच्यासमोर खुंटीवर लावण्यासाठीच असतं असा सविताचा पुराव्याने शाबीत होणारा दावा आहे. आताच्या क्षणाला पंचविशीतला तरणाबांड कबीर प्राण्यांच्या वर्तनाच्या विज्ञानाचा तज्ज्ञ आहे. तूर्तास आमच्या घरापासून अंतराने दूर आहे. पण त्याच्याशी बोलताना सविताचा सूर जराही कडक शिस्तीचा किंवा नापसंतीचा झाला की पोहोचलाच आमचा बंब नसलेली आग विझवायला.

‘‘तुझ्या मुलांमध्ये तुला एकही गोष्ट वाईट दिसतच नाही.’’ सविता म्हणते. खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये आमची सुखदा जरा वेगळी आहे. तिला तेचतेच नाही आवडत…यालाच सविता ‘नाठाळ’आणि ‘बेशिस्त’ म्हणते, की बाबा धावलाच बचावाला. आणि खरं सांगू, मला इथं स्वत:ला नाही तर्काच्या काट्यावर तोलायचंय. सुखदाचं लग्न लावताना तिचे आई-बाबा म्हणून आम्हीच होतो. हा आमच्या जगण्यातला अत्युच्च आनंदाचा क्षण आहे. आणि सध्या साडेपाच-सहा वर्षांच्या नातवाबरोबर खेळणं हे तर माझ्यासाठी निव्वळ दैवी असतं.

२७ वर्षांपूर्वी स्वत:बरोबर केलेल्या त्या कराराने मला आत्ममग्न स्वार्थामधून बाहेर काढलंच, पण आनंद-समाधानाचे अनेक क्षण दिले. जीवनाबरोबरचा सुखदाचा प्रवासही अनेक अडचणींनी भरलेला होता. पण आता वात्सल्याला वंशशास्त्राची मर्यादा उरलीच नव्हती. आता हे दोघेही त्यांच्या जीवनात मार्गस्थ झाल्यावर या जिव्हाळ्याने पुढच्या टप्प्याला जवळ केलं आहे. माझे तरुण सहकारी माझ्यासाठी मुलेमुलीच असतात. मी त्यांच्या बरोबर राहतो मनाने. हे त्यांनाही कळतं. आणि जग ज्यांना रुग्ण म्हणतं त्यांना मी उत्स्फूर्तपणे, ‘‘माझा एक मुलगा आहे, मुलगी आहे,’’असं म्हणतो. समोरच्याला कळतच नाही की याला नेमकी अपत्ये तरी किती?…कुणीतरी ‘बाबा’ म्हणून गळ्यात पडतं तर कुणी ‘आबा’ म्हणून.

स्वार्थ विस्तारतो तेव्हा आपोआप निरपेक्ष होत जातो. हा मजकूर लिहिताना माझ्या एका ‘मुलीचा’ निरोप आलाय की तिला माझ्याशी बोलायचं आहे…तिला वेळ कळवली आणि पुढे लिहायला बसलोय…गंभीर मानसिक आजाराच्या अगदी उंबरठ्यावर होती ती. व्यावसायिक मनोविकारतज्ज्ञाने तिला रुग्णालयात दाखल केली असती. पण पहिल्या भेटीत आमचं समीकरण जे जमलं ते आजपर्यंत. आता तिची प्रगती सुरू झाली आहे. अडचणी आहेतच…एकाएका संदर्भातून एक नातं अवतरतं. त्या नात्याचा अवकाश अवतरतो…फळा-फुलांनी लगडलेल्या झाडांसारखं वाटतं, मला अलीकडे.

वर्षभरामध्ये तुम्हा वाचकांबरोबर केलेल्या या लेखनाचा पुस्तकरूपी गुच्छ करायला घेतला आणि अर्पणपत्रिका आपोआप जुळून आली. माझ्या जगण्याला ‘ऊब आणि उमेद’ देणाऱ्या मियू आणि माऊ अर्थात कबीर आणि सुखदासाठी हे लेखन!

anandiph@gmail.com