नुसतं विमानच नाही तर सैन्यात लढाऊ विमान चालवण्यापर्यंत मजल मारलेल्या आजच्या स्त्रियांमध्ये अशाही अनेक जणी आहेत ज्यांना स्कूटी वा स्कूटर आदी दुचाकी चालवणं हे सुद्धा आत्मविश्वासाचं पहिलं पाऊल वाटतं. त्यात जे आत्तापर्यंत करायला नाकारलं गेलं ते करण्याचं समाधान त्यांना मिळालेलं आहे, त्यात बंडखोरी आहेच, परंतु त्याच्या जिवावर आयुष्याला आलेली गती इतरांना त्यांच्या अस्तित्वाची दखल घ्यायला लावते. कुणी त्यातून आपला व्यवसाय वाढवला, तर कुणी पारंपरिक रूढीलाच प्रश्न केला, तर कुणी पुरुषांच्याही नजरेत कौतुक उमटवलं… हे चाक स्त्रियांसाठी गती आणि बदलाचं रिंगण ठरत असाही चमत्कार करू शकतं… आजच्या (२१ जून) जागतिक टूव्हीलर वा दुचाकी दिनानिमित्ताने…
परवा दुचाकी चालवणाऱ्या मैत्रिणींबरोबर रसरशीत गप्पा रंगल्या. विरोध, भीती, गमतीजमती, बंडखोरीवर मात केल्याचा उत्सव, आव्हाने, आत्मविश्वास, मस्त बेपर्वा वृत्तीची झलक, आत्मसन्मान आणि एक मुक्त वाऱ्याची झुळूक त्यात होती. श्रद्धा सांगत होती, ‘‘गाडीवर केस मस्त मोकळे उडतात. मी मोबाइल फोनवर गाणी लावते आणि लागलेलं गाणं गुणगुणत नाही, मोठ्या आवाजात गात राहते. कुणाची, कशाची पर्वा नाही, एकदम मस्त. मोकळं वाटतं…’’ महानंदा म्हणाली, ‘‘मी मस्त गॉगल लावून, हेल्मेट घालून गाडीवरून निघते तेव्हा सगळे वळूनवळून बघतात.’’ ५-६ वर्षांपूर्वी ‘नवऱ्याने टाकलेली’ किंवा ‘नवरा नसलेली’ अशी अवहेलना सहन केलेल्या मैत्रिणींच्या या मुक्तपणाला वेगळीच झळाळी आणि धार आहे.
दुचाकी त्यांच्या समर्थपणाचे एक प्रतीक आहे. दुचाकी चालवायला सुरुवात केल्यानंतर हा तर ‘गड्याचा माठ’ (पुरुषी) आहे, अशा कुचाळक्या, चेष्टा, नियंत्रणाच्या क्लृप्त्या, आणि छेडछाड ओलांडून आलेली श्रद्धा सांगते, ‘‘गाडीसारखं, मी माझं आयुष्यच हातात घेतलं आहे. माझ्या आयुष्याचे सर्व निर्णय आता मीच घेते. गाडी चालवताना मला लहानपण जगल्यासारखं वाटतं.’’ नवऱ्याच्या निधनानंतर स्वत:च्या पैशांनी, स्वत:च्या नावावर घेतलेली गाडी रुक्मिणीच्या आयुष्याचा मापदंड बनली नसती तरच नवल.
आता शहरांमध्ये चारचाकी, दुचाकी चालवणाऱ्या तरुणी, स्त्रिया सर्रास दिसतात. मात्र निमशहरात, खेड्यात तुलनेने कमी मुली किंवा स्त्रिया स्कूटर/स्कूटीवर दिसतात. पडण्याचीच नव्हे, तर एकूण गतीचीही स्त्रियांना भीती (बसवलेली) असते. रामकुवर आणि अनिता नवले यांना फक्त सायकल चालवायला येत होती. पण नंतर स्वत: विकत घेतलेली नवी दुचाकी, शोरूममधूनच स्वत: चालवत घरी नेली तेव्हाचा त्यांचा आनंद वेगळाच होता. अनिता नवले यांच्या स्कूटीच्या प्रवासाला आणखी एक अंग आहे, उद्याोग जगतेचं. ५,००० रुपये भांडवल घालून लहान मुलांचे आणि स्त्रियांचे कपडे घरोघरी जाऊन विकणाऱ्या अनिता यांनी पहिल्यांदा स्कूटी घेतली. स्त्रियांबरोबरच्या कामातून त्यांच्या ओळखी, नेटवर्क वाढलं, आणि स्कूटीने उद्याोगाला गती दिली. आज त्यांचा वार्षिक टर्नओव्हर १५-२० लाख रुपयांच्या दरम्यान आहे. तालुक्याच्या ठिकाणी दुकान आहे आणि नुकताच त्यांनी ‘टाटा कंपनी’चा ‘छोटा हाथी’ घेऊन व्यवसाय आणखीन मजबूत केला आहे. कुणालाही आश्चर्य आणि कौतुक वाटावं असं हे कर्तृत्व, पडण्याची, मोडण्याची, तुटण्याची (स्वत: आणि गाडी) यांची त्यांची भीती कशी, केव्हा गायब झाली असेल? पूर्वीपासूनच अनितांना वारंवार ती हेल्मेट घालून, भर रस्त्यात गाडी चालवत असल्याचं स्वप्न पडायचं. हव्याशा वाटणाऱ्या, पण अप्राप्य गोष्टी स्वप्नात येतच राहतात. अनितांना आपलं स्वप्न खरं केल्याचं समाधान मिळालं.
रोजच्या जगण्यातही पारंपरिक समजांना छेद कसा देता येऊ शकतो यासाठी राजस्थानच्या सुनीताची गोष्ट गमतीची आणि बोलकी आहे.(याच पुरवणीतील ‘ग्रासरूट फेमिनिझम’या सदरात तिच्याबद्दल लिहिलं होतं.) स्त्रियांनी कोणत्याही परिस्थितीत (वृद्धत्व, आजार, गर्भारपणातही) गावातल्या हाताई (आपल्याकडील चावडी किंवा पार) समोरून चालतंच जायचं हा नियम, कोणत्याही वाहनात बसायचं नाही. गावातल्या सुनांना वाहन चालवायची सक्त मनाई. कामाला जाण्यासाठी नवऱ्याजवळ रदबदली करून सुनीताने कशीबशी स्कूटर घेतली. गाडी फक्त गावाबाहेरच चालवायची ही अट. सुनीताने शिताफीने सुरुवातीला नवऱ्याला रोज घरापासून वेशीपर्यंत आणि वेशीपासून घरापर्यंत स्कूटर आणायला लावून जेरीस आणलं. नवरा वैतागल्यावर घरातल्या इतर पुरुषांनाही या कामाला लावलं, तसे तेही वैतागले. (अट घालता ना, भोगा आता फळं असं म्हणत मनाशी हसत सुनीताने) मग हाताईवर बसणाऱ्या पुरुषांना विनंती करत त्यांना स्कूटरची ने-आण करायला लावली. वैतागलेल्या तमाम पुरुष मंडळींनी शेवटी ‘तुझी तू चालव स्कूटर, आम्ही तुझे नोकर नाही,’असं म्हणताच पडत्या फळाची आज्ञा घेऊन सुनीता हाताईच्या समोरूनसुद्धा आता स्कूटर चालवत यायला-जायला लागली. सुनीताने नियम मोडूनही गावात कोपसदृश काही झालं नाही हे बघून इतर स्त्रियाही तिच्यामागे स्कूटरवर बसायला लागल्या. आता सुनीता आणि अनेक मैत्रिणी हाताईसमोरूनही बिनदिक्कत स्कूटरवरून ये-जा करतात… रूढीला आव्हान देणं हेच आयुध बनलं.
एसटीसाठी कितीही वेळ थांबायची सवय असलेल्या, ३-४ किलोमीटर सहज, रोज चालत जाऊन पाहिजे त्या ठिकाणी पोहोचणाऱ्या या मैत्रिणींना गाडी घ्यावी, असं का वाटलं? प्रत्येकाची गोष्ट वेगळी होती. अनिता दुर्वे म्हणाली, ‘‘स्त्रियांच्या मालमत्ता अधिकारावर काम करताना ‘आपलं’ आणि ‘आमचं’ यात ‘माझं’ काय? असा प्रश्न निघाला आणि माझ्या लक्षात आलं, ‘माझं’ असं काहीच नव्हतं. आता गाडी घेतल्यावर ‘माझं’ काही तरी आहे असं वाटतं.
विद्या शाळांमधून मुली आणि मुलांबरोबर लिंगभाव समानतेचं काम करते. ती सांगत होती, ‘‘मुलांना समानता शिकवताना आमच्याकडे गाडी असण्याचं उदाहरण देण्यासाठी खूप फायदा व्हायचा आणि होतो. स्त्रियाही गाडी चालवू शकतात याचं आम्ही जिवंत उदाहरण होतो. फक्त मुलग्यांनाच नाही तर शिक्षकांनाही खूप बरं वाटतं, आमच्याबद्दल प्रेम, आदर वाटतो.
मेळघाटची गंगा तर बुलेट, ट्रॅक्टरवर स्वार झाली की कमाल दिसते. तिच्या तिसऱ्यांदा सरपंच होण्याइतकंच तिचं हे रूपही इतर स्त्रियांना प्रेरणा देणारं आहे असं मला वाटतं. आयुष्याची ३०-३४ वर्षं भीत भीत जगलेल्या लतालाही गाडीने वेगळं धैर्य दिलं, ओळख दिली आणि विश्वास दिला असं वाटतं.
सगळ्यात खतरनाक अनुभव सुषमाचा. ती चंद्रपूरमधल्या ब्रह्मपुरी तालुक्यातली. कामाला जायचा रस्ता जंगलातून जातो. त्यामुळे दुपारी साडेचारला कामावरून निघून जंगल पार करायलाच लागायचं. एकदा ती जंगलातून जात असताना वाघ दिसला. तिच्या जिवाचं पाणी झालं. गाडी बंद करून एका जागी स्तब्ध उभी राहिली. वाघ निघून गेल्यावर जीव मुठीत घेऊन धूम गाडी चालवत घरी गेली. रोजचा जंगल प्रवास या गाडीमुळे तासांऐवजी काही मिनिटांचा झाला आहे. कधी कुठलं जनावर समोर येईल हे माहीत नसल्याने गाडीची सोबत तिला कामाला जाण्यासाठी – स्वत:च्या पायावर उभं राहाण्यासाठी उपयोगी पडते.
बाईनं गाडी चालवणं आजही अनेक पुरुषांच्या नजरेला खटकतं. तिचं मानसिक खच्चीकरण कसं करता येईल ते पाहिलं जातं. स्वातीचा अनुभव त्याच जातकुळीतला. स्वाती खंबीर आहेच, परंतु तिलाही पुरुषी मानसिकतेतून जावं लागलंच. ती सांगते, गाडी घेतल्यावर घरच्यांचं ‘पोलिसिंग’ वाढलं. तिच्यावर लक्ष ठेवू जाऊ लागलं, टोमणे वाढले. सतत व्हिडीओ कॉल करून ती कुठे आहे ते तपासलं जायचं. गाडी फक्त कार्यालयाच्या कामासाठी वापरली जातेय की स्वैराचारासाठी यावर देखरेख केली जायची. ‘आता काय ही तर मोकळीच झाली आहे,’ असं म्हणत सहजपणे चारित्र्यहनन करण्याचे प्रयत्नही झाले. ती विचारते,‘‘पुरुष जेव्हा गाडी घेतात वा चालवतात तेव्हा असा प्रश्न कधी विचारले जातात का? ती त्यांच्यासाठी सतत प्रतिष्ठेचीच बाब असते. बायका, मात्र बाहेर पडतात तेव्हाच हा मुद्दा कसा येतो?’’ तिची गोष्ट ऐकताना लता सगर योग्य तेच म्हणाल्या, ‘‘आपल्याला अडवलं जातं ते काळजीपोटी की हिला जास्त उडू द्यायचं नाही यासाठी, हे कळायला लागलं की सोपं होतं सगळं’’.
सार्वजनिक ठिकाणांपासून जाणिवपूर्वक लांब ठेवलेल्या स्त्रिया भररस्त्यात स्कूटर चालवायला लागतात तेव्हा काय प्रतिक्रिया येतात? हा अनुभव आमच्या मैत्रिणींपैकी बहुतेकींचाच होता. रस्त्यात पुरुषांच्या गाडीच्या पुढे आपण गेलो, तर पुरुष हमखास ओव्हरटेक करतात. त्यांच्या गाडीच्या चष्म्यातून, आरशातून आपल्याकडे बघतात… कधी कुत्सितपणे तर कधी चिडून.
पल्लवी गेली २५ वर्षं उत्तम गाडी चालवते. कडेकडेने, छोट्या जागेतून गाडी काढण्यात ती माहीर. ती सांगत होती, ‘‘मी सिग्नलला व्यवस्थित उभी असले तरी मागून गाडी चालवणारे पुरुष मुद्दाम हॉर्न वाजवतात. मग मी न बोलता हातानेच ‘उडून जायचे आहे का पुढे?’ अशा आविर्भावात विचारते तेव्हा दुसरीकडे बघतात.’’ गाडी चालवताना एक
आत्मविश्वासाची झिंग येणाऱ्या पल्लवीला गाडी सगळ्यात जवळची, मैत्रिणीसारखी वाटते. मोबाइल फोनमध्ये ‘बॅलेन्स’ आणि गाडीत ‘पेट्रोल’ या दोन गोष्टी तिला सर्वांत महत्त्वाच्या वाटतात.
आजही स्त्रियांचं समाजातलं स्थान दुय्यम आहे आणि स्त्रियांच्या कर्तृत्वावर, क्षमतेवर विश्वास ठेवायचाच नाही ही आपल्या समाजमानसाची पक्की खूणगाठ आहे, असंही आढळतं. अनिता सांगत होत्या, पुरुष त्यांच्या गाडीवर त्यांच्या मागे बसत नाहीत. कधी गरज वाटलीच तर गाडीची किल्ली द्या, मी चालवतो तुम्ही मागे बसा, असा पुरुषार्थ दाखवणारा आग्रह करतात. अनिता ऐकत नाही ती गोष्ट अलाहिदा. पण आपण वरचढ असल्याचा पुरुषांचा केवढा हा भ्रम.
राणी येडसकर सांगत होती, ‘पुरुषांचं बारकाईने लक्ष असतं. किती वेगाने जाते, कुठे जाते, काय कपडे घालते. आणि याची इत्थंभूत माहिती घरच्यांना सांगत राहण्याचा ठेकाच काही जण घेतात. हाताबाहेर जाण्याआधीच बंदोबस्त करण्याची ही रीतच आहे. पण घरच्यांना विश्वासात घेतलं तर चित्र बदलतं.’ हाही काही जणींचा अनुभव. अर्थात, अनेकींनी आपले पुरुष सहकारी विनासंकोच त्यांच्या मागे बसत असल्याचं आवर्जून नमूद केलं. संख्या कमी असली तरी हे महत्त्वाचं आहे.
पुरुषांच्याही जाणिवा विकसित होण्याचा मुद्दा आहेच. ग्रामीण आणि शहरी मैत्रिणींबरोबर काम करताना आपल्या अंतरंगात होणाऱ्या बदलाच्या अनेक छटा मी पाहिल्या आहेत. आपण बदलतो आहोत हे जगाला सांगण्याच्या विविध खुणा मैत्रिणी आत्मसात करतात. स्वत:त बदल करतात. नऊवारी साडी नेसणाऱ्या मैत्रिणी गोल साडी नेसायला लागतात, प्लास्टिक किंवा कापडी पिशवी घेऊन बाहेर पडणाऱ्या मैत्रिणींच्या पेहरावात पर्स अविभाज्य बनते, लहानपणापासून दाबून ठेवलेली पंजाबी ड्रेस घालण्याची अतृप्त इच्छा पूर्ण होताना दिसते, पोक काढून चालण्याची सवय लावून घेतलेल्या मैत्रिणी अचानक ताठ, मान वर करून चालायला, बघायला लागतात, भाषा बदलते, व्यवहार बदलतो, चेहऱ्यावर आणि कृतीत सतत आत्मविश्वास ओसंडतो… अशा अनेक बाह्यरूपी खुणा मनातल्या, विचारातल्या बदलांची चुणूक किंवा ग्वाही देत राहतात.
दुचाकी चालवणाऱ्या स्त्रियांना अधिक मुक्त का वाटतं? अनिता नवलेंच्या भाषेत ‘आपण काहीतरी मोठा तीर मारलाय’ असं का वाटतं? यात आत्मविश्वास आहेच, पण गतीही आहे. अनेक वर्षं रुतलेला गाडा अचानक मोकळा झाल्याचं समाधान आहे. जे करायला मिळालं नाही, करायला घाबरवलं गेलं ते केल्याचं समाधान आहे. रूढी, भीती, रक्षण, नीतिनियम, चारित्र्य, संशय, लोकांचे बोल किंवा बोट दाखवणं याच्या गुंत्यात गुरफटून केवळ दडपणाखाली राहण्याचं बाळकडू मिळालेल्या आपल्याला आपल्या अस्तित्वाचे, सन्मानाचे प्रतिपादन (statement) करण्याचं हे अवकाश आहे. दृश्य आहे, गती आहे, मनाप्रमाणे शरीरालाही फुंकर घालते. दुचाकी चालवण्यात एक मस्ती आहे, आत्मभानाची नशा आहे, अॅटिट्यूड आहे. माणूसपणाचं, क्षमतेचं हे कथन आहे, प्रतिपादन आहे. नाकारलेल्या सार्वजनिक जागांवर, रस्त्यावर दमदार हक्क सांगण्याची प्रेरणा आहे. आशा-आकांक्षा, स्वप्न प्रत्यक्षात अवतरण्याचा निरोप आहे.
या सगळ्या मैत्रिणी रस्त्यावर दिमाखात गाडी चालवतात तेव्हा अनेक स्त्रिया, मुली यांच्याकडे कौतुकाने, आदराने किंवा अनिमिष नेत्राने बघत असणार. आकांक्षेचे किंवा स्वप्नाचे एखादे बीज तिथेही पडत असणार. दुचाकी चालवणाऱ्या स्त्रियांबाबत आतापर्यंत जोडलेले आगाऊ, अतिशहणी, पुरुषी ही बिरुदं त्यांच्या मनातून नकळत गळून पडत असणार. संधी मिळाली तर या बघणाऱ्या मैत्रिणीही मुक्तपणे, दिमाखात दुचाकी चालवतील… सामाजिक नीतिनियम असेच तर बदलतील. आणि आमच्या मैत्रिणींसारख्या स्त्रिया या प्रक्रियेची प्रेरणा ठरतील. हा सगळा प्रवासच स्वत:बद्दलच्या, स्वत:च्या कल्पनांचाच पुनर्विचार करण्याचा आणि त्यानुसार बदलण्याचा आहे. या बदलाला जातीपातीची, धर्माची, ग्रामीण शहराची बेगडी कुंपणं नाहीत. प्रश्न फक्त स्वप्न बघण्याचा आणि ती खरी करण्याच्या ‘जुनून’चा आहे.
सुमित्रा भावे आणि सुनील सुखठणकर यांच्या ‘चाकोरी’ या मराठी लघुपटाची आठवण होते. ‘नवऱ्याने टाकलेली’ म्हणून समाजाने अव्हेरलेली नायिका सायकल शिकते आणि शेवटच्या प्रसंगात आपल्याच मस्तीत गावभर दिमाखात सायकल चालवते, त्या वेळी तिच्या पायातलं रूढीदर्शक पैंजण गळून पडतं. प्रश्न गतीचाच आहे. आपल्या गतीला वेग देण्याचा आहे. आपणच आपल्या मर्जीने गतीचे नियमन करण्याचा आहे. श्रद्धा म्हणते तसं गाडीसारखंच आपलं आयुष्य ताब्यात घेण्याचा आहे. संघटित साथ मिळाली, तर हाच प्रवास व्यापक बदलाचे रिंगण बनेल…
(या लेखासाठी पल्लवी पालव यांनी सहकार्य केले आहे.)
sujata55@hotmail.com