मलिका अमरशेख

भयाच्या कितीतरी मिती आहेत. प्रत्येकालाच वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ही भीती नक्की भेटते, अनंत रूपांत. कधी आपली सत्त्वपरीक्षा पाहणारी, तर कधी अंतर्जाणिवांचा कस पाहणारी. पण बाईच्या बाबतीत सर्वांत मोठी भीती अतिप्रसंगाची. अनेकींच्या बाबतीत ती भीती कायम काल्पनिकच राहते, पण अनेक स्त्रियांच्या बाबतीत मात्र त्या प्रसंगातूनही जावं लागतं. त्या वेळी, प्रत्यक्ष तो प्रसंग घडत असताना त्यावर मात करता येते का?

आहार, निद्रा, भय आणि मैथुन, या सजीवाच्या मूलभूत सनातन जाणिवा! यातली भय ही संकल्पना तर जन्मापासूनच मृत्यूपर्यंत व्यापलेली… भयाच्या कितीतरी मिती… काल्पनिक ते फोबिया(गंड) पर्यंत पसरलेली दहशती सावली…

माझं लहानपण खूप सुरक्षित, सुखासीन गेल्यानं भयापासून मी तशी दूरच होते. लहानपणी मी सतत आजारी पडत असल्यानं सर्वच जण मला खूप जपत. त्यामुळे सुरक्षित आयुष्य होतं माझं. इंजेक्शनला मात्र मी प्रचंड भ्यायचे. अजूनसुद्धा घाबरते! लहान वयात भयापासून सगळे माझ्यासारखेच मुक्त असतील असा माझा समज… (की गैरसमज?)

शाळेत असताना बाईंच्या- सुलभा देशपांडे या असामान्य व्यक्तिमत्त्वानं माझ्या आयुष्यात प्रवेश केला. ‘चंद्रशाला’मध्ये (नंतरचं ‘अविष्कार’) असताना अनेक नाटुकली, एकांकिका, एकपात्री, गाणी, नाच करताना मी समृद्ध, श्रीमंत होत गेले ते बाईंमुळे. पण एक प्रसंग आठवतोय, माझ्यात भीती पेरणारा. विजय तेंडुलकर काकांच्या ‘बाबा हरवले आहेत’ नाटकात मी विजेचा खांब झाले होते. यात मला स्टेजवर दोन पायऱ्यांच्या लांबरुंद प्लॅटफॉर्मवर एका लोखंडी पिंपावर, म्हणजे उंचावर अर्धा तास काहीही हालचाल न करता उभं राहायचं होतं. त्यानंतर कावळा, पोस्टाची पेटी, नाचणारी बाई यांची भूमिका करणारे मला खाली बसवतात, असा प्रसंग होता. त्यात माझ्या डोक्यावर लाइटची सुंदर लॅम्पशेड, आत बॅटरी जोडलेली… त्यामुळे डोक्यावरचा प्रकाश छानच दिसत असावा! बरेच प्रयोग झाल्यावर एक प्रयोग किंग जॉर्ज शाळेमध्ये होता. त्या दिवशी मला गाढ झोप लागली. इतकी, की थेट सकाळी १० वाजता जाग आली. उठल्यावर लक्षात आलं, आपल्याला नाटकाला जायचंय. एकच तास हातात होता. मग काय फक्त फ्रेश होऊन कपडे करून घाईघाईनं निघाले. चहाही न घेता… धावतपळत पोहोचले खरी. मेकअप-ड्रेस केला. लॅम्पशेड डोक्यावर घातली गेली. पडदा उघडला… नाटक सुरू झालं… बराच वेळ गेला आणि मला चक्कर येऊ लागली… मळमळायला लागलं… पोटात काहीच नव्हतं ना माझ्या! मी अस्वस्थ झाले. पण शो मस्ट गो ऑन…! मी खाली उतरू शकत नव्हते. विजेच्या खांबाचं निश्चल, अचलपणाचं बेअरिंग संभाळणं महत्त्वाचं होतं आणि चेहऱ्यावर अस्वस्थपणा न दर्शवता संवाद बोलणं ही त्या वेळेची परीक्षा होती. कसोटीचेच क्षण ते. तो अर्धा तास भयानक होता. आणि संपलं एकदाचं. पोस्टाच्या पेटीचं काम करणाऱ्या उमा साखरदांडे, कावळ्याचं काम करणारा निनाद देशपांडे आणि नाचणारी मुलगी करणाऱ्या आशा प्रधान (की ललिता केंकरे?) यांनी मला खाली उतरवलं. मी कुजबुजले, ‘मला चक्कर येतेय,’ सगळेच गोंधळले. पण आमचे संवाद आणि अॅक्शन्स सुरूच राहिल्या! अखेर पडदा पडला न् मी कॅन्टीनकडे धावले! पण त्यानंतर मात्र मला उंच जागेची भीतीच वाटू लागली. खाली बघणं नको वाटायला लागलं, इतकं की मी खिडकीतून, गच्चीतूनही खाली पाहणं टाळायला लागले. उंच जागेची भीती कायम राहिली बरोबर.

त्याच्याही आधी अगदी बालवाडीत असताना आम्हाला सांताक्रूझ विमानतळावर विमान पाहायला नेलेलं. वय ४ वर्षं! रांगेत उभं केलं गेलं. गरीब बिचारं विमान दूर गप्प उभं होतं. पण का कुणास ठाऊक, ते पाहताच मी जे भोकाड पसरलं, की ज्याचं नाव ते! त्या विमानाची खूप भीती वाटली. तरी आजवर मी चार वेळा विमान प्रवास केलाही. दिल्ली, नागपूर न् गोवा! पण कसाईखान्यात जात असलेल्या बकरीगत मी थरथरत होते! मला वाटायचं, अपघात झाला तर जमिनीवरच्या वाहनात किमान चान्स तरी असतो वाचायचा… इथे नो चान्स! २००१ मध्ये अमेरिकेतल्या ट्विन टॉवरला धडकलेलं विमान आणि तो एकूणच भयानक प्रसंग पाहिल्यावर तर मी विमानांकडे पाहणंही सोडून दिलं…

तसं पाहता वरील दोन्ही भयाचे प्रकार तसे निरुपद्रवी. सहज टाळता येण्यासारखे. तिसरा भयाचा प्रकार सुरू झाला, ते मला स्लिप डिस्क झाल्यावर. मणक्याच्या मज्जारज्जूंचा संबंध थेट मेंदूशी असतो. कदाचित त्यामुळे कुठल्या तरी केंद्रकाला बाधा झाली असावी की काय असं मला वाटू लागलं! कारण कोणत्याही वाहनात बसल्यावर मला वेगाची प्रचंड भीती वाटू लागलेली! समोरून येणारी मोठी बस मला बलाढ्य दैत्यासारखी वाटू लागली. बाजूनं जाणारा जर्जर म्हाताऱ्यासारखा ट्रक मला खेटून धक्का मारून जाणारा धटिंगण मवाली वाटू लागला! आणि मी बाहेर जाणंच टाळू लागले. जणू काही मी बाहेर पडताक्षणी सर्व गाड्या चला, ‘‘चला, मलिका बाहेर आली… चला सगळे तिला भेटायला,’’ असं ठरवल्यासारख्या रस्त्यावर उतरणारेत!

पण दरम्यानच्या काळात खऱ्या अर्थानं खडतर, कठीण, भयभीत करणारे प्रसंग आले, तेव्हा मात्र मी कमालीची शांत होते. आणि शांतपणेच त्या प्रसंगांना सामोरी गेले आणि शस्त्र टाकून माघार घेणाऱ्या शत्रूसारखे ते भयप्रसंग निघून गेले. याचं क्रेडिट मलाच! आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगेन, की स्वत:वरचा विश्वास आणि बुद्धीचा अहंकार हे कधी कधी आपलं चिलखत आणि शस्त्रसुद्धा होतं! माझ्या बाबतीत भयावर मात करणारे ते प्रसंग होते.

भयानं आपली बुद्धी बधिर होते हेही खरंच. पण माझा विश्वास आहे, की प्रत्येक संकटात, प्रत्येक भयात एक सुटकेचा मार्ग असतो. भय आणि संकटात मी प्रथम विचार करते, की जास्त वाईट काय होणार आहे? आणि मी असं केलं तर याचा परिणाम काय होईल? अशा पन्नास शक्यता शोधून काढायच्या. तरी खूप प्रयत्न करूनही जर संकट आणि भयभीत करणारी घटना टळणार नसेल, तर शरणागती न पत्करता काळावर ते सोडून द्यायचं. काळच तो प्रश्न सोडवतो. असंच जगत आले मी. पण दोन प्रसंग आले माझ्या आयुष्यात… माझ्या स्त्रीत्वाचाच अपमान करणारे, थोडक्यात अतिप्रसंगच! एक लहानपणीचा, एक तरुणपणीचा- पण दोन्ही वेळी मी अत्यंत शांत होते. आणि काहीही न करता दोन्ही पुरुषांनी शरणागती पत्करली.

लहानपणी घरचं मोकळं वातावरण- कला-साहित्य, नाच, गाणी, अभिनय, या सगळ्यात मी मुक्त, अनिर्बंध संचार करत होते. त्यात पुन्हा आई, वडील (शाहीर अमरशेख), बहीण प्रखर बुद्धीवादी. त्यामुळे देव, कर्मकांड, अशी काही ओझी मनावर नव्हती. भय नसलेल्या हरणीच्या पाडसागत मी बागडत होते. मुलांबरोबर खेळणं, भोवरा फिरवणं, पतंग पकडणं. चतुर पकडून त्याच्या शेपटाला दोरा बांधून उडवणं, असले अत्रंगी प्रकारही केलेले. आमच्या घरासमोर आणखी एक घर होतं… तिथे एक मुलगा राहात होता. खरंतर मी बोलतच नव्हते त्याच्याशी. पण एके दिवशी मी खेळण्यासाठी बाळू आणि सरोज यांची वाट बघत घरासमोरच्या गल्लीत उभी होते… अचानक तो मुलगा समोर आला आणि माझा हात धरून ओढायला लागला. त्याचं वय असेल १२ वर्षं आणि मी ७ वर्षांची. मी तब्येतीनं तोळामासा. हाडाचा सपाळाच जणू. आणि तो बऱ्यापैकी तगडा. त्यावेळी वडील आणि दीदी दोघंही दौऱ्यावर गेलेले. घरी फक्त आई होती. तो हातानं ओढत मला त्याच्या घरी घेऊन गेला. घर म्हणजे फक्त एकच खोली- अंधारी. मला आत खेचून त्यानं दाराची कडी लावली. पण कमाल म्हणजे मी न घाबरता खिडकीतून आईला जोरजोरात हाक मारण्याचा सपाटाच लावला. त्याच्या घराची खिडकी आमच्या घराच्या हॉलच्या खिडकीसमोर होती. लेकराची हाक आईला ऐकू जातेच म्हणतात. आई ताबडतोब आली. आणि जोरजोरात दार ठोकलं. त्या मुलानं कडी उघडली आणि मी आईबरोबर घरी परतले. आईनं पहिला प्रश्न केला, ‘‘त्यानं काही केलं नाही ना तुला?’’ मी म्हटलं, ‘‘छे, काहीच नाही.’’ आई समाधानानं स्वयंपाकघराकडे वळली. पण मनावर ओरखडा उठायचा तो उठलाच.

दुसरी घटना जरा जास्तच संकटाची होती. लग्न झाल्यानंतर विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेतो तसं चार घरं फिरून आम्ही पुन्हा आईच्या घरी राहायला आलेलो. आई जाऊनही पाच-सहा वर्षं झालेली. नामदेव (नामदेव ढसाळ) दौऱ्यावर गेलेला. मी घरी एकटीच होते. अशात एक अतिशय लब्धप्रतिष्ठित व्यक्ती घरी आली. समाजातलं बडं प्रस्थ. माझ्या वडिलांशीही ओळख असलेला हा माणूस. चहापाणी झालं, चर्चा-गप्पा झाल्या. मला म्हणाले -‘‘चला, तुम्हाला मी तयार केलेली नवीन निर्मिती दाखवतो.’’ मी म्हटलं, ‘‘ठीकाय… चला.’’ मी विश्वासानं त्यांच्या गाडीत बसले.

वेळ रात्रीची… साधारण साडेआठ-नऊ. त्यांच्या नव्या निर्मितीची चर्चा करत त्यांनी गाडी वरळी सी-फेसला थांबवली आणि ड्रायव्हरला बाहेर जायला सांगितलं. मला वाटलं, आम्हीही उतरुन समुद्राची गाज ऐकू… पण अचानकच त्यानं माझ्या कमरेभोवती हात टाकला. मी हात झटकून शांतपणेच म्हटलं, ‘‘फक्त नामदेवच मला पचवू शकतो… तुम्हाला मी पचणार नाही. परवडणारही नाही माझं अस्तित्व…’’ झालं. तो एकदम संतापला. मी खाली उतरण्यासाठी दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर माझ्या लक्षात आलं, की दरवाजाचं दार उघडायचं लॉकच गायब आहे! म्हणजे त्यानं प्रीप्लॅन घाटच घातलेला! पण कसं कुणास ठाऊक भीती शिवलीच नाही. मी अगदी शांत बसले होते. माझ्या या थंडपणाची कल्पना येऊन की काय, त्यानं ड्रायव्हरला बोलावून गाडी सुरू करायला सांगून गाडी माझ्या घराकडे वळवली.

नामदेवला या प्रसंगाची कल्पना नव्हती. मी सांगितलं नव्हतं, कारण परत तो माणूस घरी यायचं धाडस करेल असं मला वाटलं नव्हतं. पण पुन्हा तो घरी आला! मी आतल्या खोलीत होते… नामदेव मला बाहेर बोलवायला आत आला. मी भयानक भडकले. तडकून ओरडले, ‘‘परत आला तर मारच खाईल माझा.’’ त्यानंतर मात्र तो परत आला नाही!

हा प्रसंग अनुभवल्यानंतर पुरुषांच्या बनेल प्रवृत्तीचा तिटकाराच आला नि मी पुरुष जातीचाच तिरस्कार करू लागले… अर्थात आधी सांगितल्याप्रमाणे मी सुलभा देशपांडे बाईंची अट्टल विद्यार्थिनी व ‘अविष्कार’ नाट्य चळवळीतली अभिनेत्री असल्यानं आजही असा एखादा पुरुष समोर आला की इतका अप्रतिम अभिनय करते, की त्यांना कल्पनाही येत नाही की ही साधी भोळीभाबडी दिसणारी बाई आपल्याला मनातून शिव्या घालतेय! अर्थात माझे जे मित्र आहेत ते तसे नाहीत. त्यांच्या बाबतीत नाही होत हे. नियमाला अपवाद असतोच की!

malikaamarshaikh 1234@gmail.com