गिरीश परदेशी
आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर भेट झाली, तरीही मैत्रीची भावना त्यानंतर कायम राहणं गरजेचं. हे नातंच इतकं व्यापक आहे की, त्यामध्ये एकमेकांना साथ देणं, सुखदु:ख सांगणं, गमतीजमती करणं, वेळ देणं, प्रोत्साहन देणं हे जितकं गरजेचं आहे, तितकंच भांडणंही आवश्यक असतं, कारण यातूनच मैत्रीतलं व्यक्तअव्यक्त नातं सखोल होत जातं.
पुण्यातील रास्ता पेठेत इयत्ता चौथीपर्यंत वाढलेला मी एकदम सिंहगड रस्त्यावरील ‘गणेश मळा’ या नवीनच झालेल्या भागात राहायला आलो. सदाशिव पेठेचाच हा वाढवलेला भाग असं मनात आलं, कारण बऱ्यापैकी सदाशिव पेठी मंडळी आमच्या सोसायटीत होती. वाडा संस्कृती आणि वाड्यात राहिलेला मी या उच्च मध्यमवर्गीय सोसायटीत स्वत:ला शोधू लागलो.
त्यापूर्वी मुलींशी बोलायचो पण इकडे आल्यावर मुलींशी बोलणं याला एक वेगळी पुरुषसुलभ झालर यायला लागली. मुला-मुलींचा एक ग्रुप बनणं, तुटणं हे सुरू झालं. त्यात असं एक समजलं की, ‘हुजूरपागा’ नावाची एक शाळा आहे आणि त्यातील मुली खूप सुंदर, हुशार आणि शिष्ट असतात. याचा प्रत्यय आमच्या सोसायटीतदेखील मला आला. त्यामुळे उगाचंच मला कुठंतरी त्यांच्यासमोर न्यूनगंड किंवा तत्सम काहीतरी वाटायचं. मुलं-मुलं एकत्र आली की, मग ‘त्या’ मुलींविषयी वेडवाकडं बोलायचो. असो.
त्यात एक मुलगी होती, स्मिता ओरपे. तिच्या केसांच्या स्टाइलला ‘ब्लंट’ म्हणतात, असं समजलं. मुला-मुलींचा पाचवीत झालेला ग्रुप वरच्या इयत्तेत गेल्यावर तुटला. बोलणंही थांबलं. ‘हाय’ वगैरे असं बोलणं आमच्या विश्वातही नव्हतं, माहीतच नव्हतं. दहावी आली. अभ्यास करा, अभ्यास करायला पाहिजे अशी ओरड घरी सुरू झाली. त्यानंतर एक दिवस सोसायटीतील गणपती मंदिरात गेलो होतो तिथे स्मिताच्या आई अचानक भेटल्या. त्यांच्याशी तर मी कधीच बोललोच नव्हतो, पण त्यांनी मला स्वत:हून जवळ बोलावलं. मला म्हणाल्या ‘‘अरे, तू पण दहावीतच आहेस ना? स्मिताचीही दहावी आहे. तू आणि ती एकत्र करा की अभ्यास. आमच्या घरी ये आणि दोघांनी मिळून अभ्यास करा. तुमचा क्लासपण एकच आहे फक्त बॅच वेगळी आहे. मग येत जा संध्याकाळी. एकमेकांच्या संगतीत चांगला अभ्यास होईल. तू ये.’’
मला खरं तर प्रश्न पडला. स्मिता ‘हुजूरपागा’ शाळेतली हुशार मुलगी आणि मी मात्र अभ्यासात ठीकठाक असलेला मुलगा, कसा आमचा अभ्यास होणार? पण माझ्या आईशी बोलून मी संध्याकाळी स्मिताच्या घरी गेलो. अभ्यास सुरू झाला. तिची आई शिक्षिका असल्यानं अभ्यास कसा करावा, वेळापत्रक, उजळणी, पेपर सोडवणं, आदी अभ्यास- विषयक गोष्टी मी त्यांच्याकडून आणि स्मिताकडून शिकलो. तिच्यासोबत अभ्यास करणं मला आवडू लागलं. अभ्यासाची गोडी लागली. आत्मविश्वास वाढला. अभ्यास करताना आम्ही अजिबात गप्पा मारायचो नाही. यामुळेच तिला आणि मला दहावीत खूप चांगले गुण मिळाले. मला तर याआधी इतके चांगले गुण कधी मिळालेच नव्हते. पण यामुळे मला माझ्यातच अनेक चांगल्या गोष्टी दिसू लागल्या. आयुष्यात आपण काहीतरी करू शकतो हे समजलं. त्यामुळे माझ्या पुढील आयुष्याचा आलेख उंचावला.
कॉलेजमध्येही मी आणि स्मिता एकत्र होतो. पण आमचे ग्रुप्स वेगवेगळे होते. तरीही भेटणं, बोलणं होत असे. सुरुवातीला आम्ही कॉलेजला एकत्र आपापल्या सायकलवर जायचा प्रयत्न केला, पण मग नंतर जमलं नाही. तरीही बऱ्याचदा एकत्र असायचो. एक दिवस सायकलवरून एकत्र घरी येताना स्मिता म्हणाली, ‘‘अरे, ती रश्मी मला म्हणाली, ‘‘तुझं आणि गिरीशचं ‘आहे’ ना?’’
मी तिला सांगितलं, ‘‘नाही.’’ तर चकीत होऊन ती म्हणाली, ‘‘नाही? तुम्ही तर बऱ्याचदा एकत्र दिसता?’’
यावर आम्ही दोघेही खूप हसलो. पण हेही खरं होतं. आम्हाला बरेच जण हाच प्रश्न विचारायचे आणि आम्ही दोघे फक्त हसायचो.
आम्हा दोघांचीही घरच्यांबरोबर पारदर्शकता असल्यामुळे आमची मैत्री आणखीनच सबळ होत गेली. कारण एखादा आपला मित्र किंवा मैत्रीण असणं म्हणजे त्याचं अख्खं घर आपल्याला ओळखत असतं आणि आपलंही घर त्या मित्राला किंवा त्या मैत्रिणीला ओळखत असतं. इतकं ‘Give and take’, इतकी पारदर्शकता, इतकी अटॅचमेंट आमच्या मैत्रीमध्ये असायची आणि आजही ती टिकून आहे. त्यामुळे स्मिता जरी माझ्याबरोबर कधी युनिव्हर्सिटीमध्ये फॉर्म भरायला, कॉलेजला किंवा कुठल्या ट्युशनमध्ये आली की, ‘‘गिरीशबरोबर जातेयस ना मग ठीक?’’ अशी तिच्या आईवडिलांनाही एक निश्चिंतता असायची. विश्वास असायचा. कारण त्या काळात मोबाइल फोन नव्हते. त्याच्यामुळे विचारपूस होणं, माहिती असणं खूप गरजेचं असायचं. एक प्रसंग आठवतोय. आमच्या घरापासनं पुणे विद्यापीठ खूप लांब होतं. एकदा विद्यापीठात एका कोर्सचा फॉर्म भरायला मी आणि स्मिता गेलो होतो. विद्यापीठ दूर होतं शिवाय फॉर्म भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात बराच वेळ गेला. त्यामुळे अर्थातच घरी यायला खूप उशीर झाला, पण तरीही तिच्या आईवडिलांनी एका शब्दानंही आम्हाला ‘‘तुम्हाला उशीर का झाला ?’’ असं विचारलं नाही. कारण आमच्यातलं नातंच पूर्णपणे विश्वासाचं होतं.
नंतरच्या काळात माझं नाटक वगैरे उपक्रम वाढले. आणि तिचा अभ्यास, ट्रेकिंग, हौशी रंगमंच. पण तिच्याकडे बघून मी नेहमी प्रेरित व्हायचो की, ती कसा अभ्यास करते आणि इतर उपक्रमांतही भाग घेते. आपणही तसं करायला हवं. आमचे ग्रुप्स वेगवेगळे असले, तरी ती मला त्यांच्या ग्रुप्समधील गमतीजमती, तक्रारी, प्रॉब्लेम्स सांगायची. मला ते आवडायचं, कारण तिचा माझ्यावर असलेला विश्वास त्यावरून व्यक्त व्हायचा.
बारावीत, तर ती बोर्डातदेखील आली. त्याबद्दल आनंद तर होताच पण त्यामुळे मलाही प्रेरणा मिळाली. आणि नंतर खरंच मी, माझे इतर मित्र आणि विविध उपक्रमांमध्ये व्यग्र झालो.
एक दिवस मी कॅन्टीनमध्ये टेबलावर तबला बडवत असताना अचानक ती तिथे आली. ‘‘गिरीश, जरा एक मिनिट इथे ये,’’ असं म्हणत तिनं मला बाजूला नेलं आणि माझ्या हातात एक चिठ्ठी दिली. ‘‘वाच आणि जमलं तर उत्तर दे.’’ म्हणाली आणि तिथून निघूनही गेली. मला कळेचना अचानक काय घडलं? एका कोपऱ्यात जाऊन मी ते पत्र वाचलं. पत्र वाचल्यावर कळलं की, तिनं रागानं ते पत्र मला लिहिलं होतं. त्याचा साधारण आशय, ‘तू हल्ली माझ्याशी बोलत नाहीस. तुला मैत्रीची किंमत नाही. माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही. मैत्री ही कधीच एकतर्फी असू शकत नाही.’ असा होता. मी हादरलोच. पण तेव्हा खरं तर मला आमच्या मैत्रीतला सखोलपणा जाणवला. असं म्हणतात की, नात्याचं सच्चेपण कळण्यासाठी भांडणसुद्धा कधी कधी गरजेचं असतं. अर्थात हे भांडण नव्हतं. पण त्यानंतर मग मात्र मी तिचा एक ‘मैत्रीण’ म्हणून जास्त विचार करू लागलो, किंमत करू लागलो.
पुन्हा आयुष्यानं वेगळं वळणघेतलं. बी. कॉम. झाल्या झाल्या मी दिल्लीला गेलो. तरी तिची अधनं-मधनं पत्रं यायची. दिल्लीत राहून माझं शिक्षण पूर्ण करून मी मुंबईला आलो. तेव्हा एकदा आमची भेट झाली होती. त्या वेळी तिचं लग्न होऊन तिला एक मुलगाही झाला होता. त्यानंतर बराच काळ ती परदेशात होती आणि मी मुंबईत होतो. नंतर तिही मुंबईत परतली.
एकदा माझे वडील गेल्याची बातमी ऐकून ती मला भेटायला घरी आली. अनेक दशकांनी आमची भेट झाली. तेव्हा आम्ही आयुष्याच्या एका वेगळ्याच टप्प्यावर भेटलो. तिच्या नवऱ्यालासुद्धा आमची मैत्री माहिती होती आणि आम्ही अनेक वर्षांनंतर भेटत असल्यामुळे तिच्या नवऱ्यानंही ती स्पेस तिला दिली. निवांतपणे मला भेटून, माझ्याशी मोकळेपणाने बोलून तिच्या घरी गेली. आयुष्य यशस्वीरीत्या जगल्याची भावना दोघांनाही एकमेकांबद्दल होती. अजूनही आहे. ‘मैत्री’ या शब्दाचा ‘कॅनव्हास’ फार मोठा आहे. त्यामध्ये सुख-दु:ख शेअर करणं, गमतीजमती करणं, एकमेकांना साथ देणं हे तर आहेच, पण त्याशिवाय एकमेकांना प्रेरित करणं, प्रोत्साहित करणं हेदेखील आहे.
मैत्रीत दररोज भेटणं, मेसेजेस किंवा फोन करणं हेदेखील गरजेचं नाही, पण एक ‘कनेक्शन’ राहतंच. व्यक्त आणि अव्यक्त! आताच तिला व्हॉटस्अॅप करून काही गोष्टी विचारल्या, तर ती आतासुद्धा ‘ Valley of flowers’ वरून ट्रेकिंग करून परत येतेय, असा मेसेज आला.
मिळाली, पुन्हा एक प्रेरणा! …
पुरुष वाचकहो, तुम्ही मांडायचे आहेत तुमचे अनुभव! आहे का तुमची एखादी अशी निखळ मैत्रीण, जिच्याबरोबरचं नातं ना तुम्हाला कधी लपवावंसं वाटलं, ना तुम्हा दरम्यानचं अंतर तोडावंसं वाटलंय? अर्थात भिन्नलिंगी मैत्रीण म्हणून वाटलंच असेल ‘वेगळं’ आकर्षण, तर त्या भावनेची वासलात कशी लावलीत? काय आहे तुमच्या दोघांच्या घट्ट नात्याचं रहस्य? काय आहे तुमच्या नात्यातलं चुंबकत्व? आणि हो, होऊ शकते का अशी निखळ मैत्री? आम्हाला सांगा. महत्त्वाचं, या सदरात फक्त पुरुषांनीच आणि तेही आपल्या मैत्रिणीविषयी, त्यांच्यातल्या नात्याविषयी मनमोकळेपणानं लिहिणं अपेक्षित आहे. आम्हाला पाठवा ते अनुभव तुमच्या प्रत्यक्ष मैत्रीच्या उदाहरणांसह ५०० किंवा १००० शब्दांत. आमच्या ईमेलवर
usualstuff1@gmail.com
chaturang.loksatta@gmail.com