डॉ. गिरीश रांगणेकर


‘ ‘ती’ माझ्यापेक्षा ५ ते ७ वर्षांनी लहान. उत्साहानं खळाळणारी… माझ्या प्रत्येक ‘क्रिएटिव्ह’ उपद्व्यापात भक्कम साथ देणारी. पुढे व्यवसायातले ‘प्रतिस्पर्धी’ झाल्यावरही माझ्या वेळेला हक्कानं माझ्याच टीमचा भाग झालेली… जेव्हा तिला माझ्या मैत्रीची सर्वाधिक गरज होती, तेव्हा मात्र मी तिचं सांत्वन करण्याचं बळ माझ्यात आणू शकलो नाही. तरी माझ्यावर न रागावता प्रगल्भ मैत्रीचं दर्शन तिनंच मला दाखवलं. अशी ती… ‘Y’ची मैत्रीण ‘X’! या ‘Y’ ला समृद्ध करणारी.’

why after marriage while living in family many things in nature of partner start to change
इतिश्री: लग्नानंतर घडतंय बिघडतंय कशामुळे?
chaturang article, children first bike, children desire for bike in age of 16, Valuable Lesson in Gratitude, electric scooter, new generation, Changing Dynamics of Childhood Desires,
सांदीत सापडलेले.. ! वाढदिवस
Loksatta chaturang Vijay Tendulkar mitrachi goshta Writer poet Alok Menon lesbian
‘ती’च्या भोवती..!: ‘ठरलेल्या’ जगण्याला आव्हान देणारी ‘मित्रा’!
loksatta chaturang International Widows Day Elderly Women Support Divorcees
एकमेकींच्या आधाराचा पूल
सांधा बदलताना: वैष्णव जन…
how to deal with loneliness and how to help yourself
‘एका’ मनात होती..!: माझीच मदत मला!
Win and Live, Pursue Dreams,
जिंकावे नि जगावेही : पाठपुरावा स्वप्नांचा!
father and daughter connection shown in indian films
उंगली पकड के तूने चलना सिखाया था ना…

मैत्री माणसांबरोबर जशी असते, तशी ती आपण वापरतो त्या वस्तूंबरोबर, आपल्या वाहनाबरोबर किंवा अगदी एखाद्या छंदाबरोबरदेखील असते. अशी मैत्री मित्रांबरोबरच्या गप्पांसारखी बोलघेवडी नसते मात्र. मित्रांबरोबर असलेले बंधच वेगळे असतात कामाला जराशी टांग मारून एखाद्या मित्राच्या बाइकवरच टांग मारा आणि एका कटिंग चहावर गप्पा टाकायला मोकळे व्हा! असं सैलसर आयुष्य कुठल्याही स्वार्थापलीकडचं असतं. असंच मैत्र एखाद्या मैत्रिणीबरोबरदेखील इतकं मोकळंढाकळं असेल का?… याचं उत्तर मला वाटतं माणसागणिक बदलेल. जिथे भिन्न लिंगं असतात, तिथे X आणि Y ही दोन गुणसूत्रं उपस्थित असतात. (स्त्रीकडे XX आणि पुरुषाकडे XY) आणि जिथे X आणि Y ही अल्फाबेट्स असतात, तेव्हा ती साधारणत: कुठल्या तरी एखाद्या किचकट गणिताचा भाग म्हणून आपल्याला छळत असतात, असं अगदी शालेय वयापासून आपल्या डोक्यात फिट्ट बसलेलं असतं. मोठं झाल्यावर बऱ्याच जणांना या शैक्षणिक गणितापासून म्हणजेच X आणि Y च्या ‘फॉर्म्युल्यां’पासून मुक्तता मिळते. मात्र पुढे आयुष्यभर हेच X आणि Y खरे सखेसोबती असणार असतात आणि या दोघांनी मिळूनच तर पुढल्या आयुष्याची गणितं सोडवायची असणारेत, याची त्या वेळी कणभर कल्पना नसते. लग्नाआधी समजा असे X आणि Y मित्र असतील, तर त्यांची स्टोरी काय असेल, हा या लेखाचा विषय आहे. माझ्याही आयुष्यात एक ‘X’ होती म्हणजे एक मैत्रीण होती आणि ती माझ्या म्हणजे या ‘Y’ च्या आयुष्यात अचानकच उगवली. अशा वेळी ‘Why’ हा प्रश्न बऱ्याचदा हतबलता निर्माण करतो. अपेक्षा आणि अपेक्षाभंग ही एक जोडगोळी आहेच म्हणा. ते असो. तर २५-३० वर्षांपूर्वीची ही ‘X’ मैत्रीण मला अचानकच एका कुठल्याशा हॉलमध्ये कुठली तरी तालीम सुरू असताना दिसली, असं आजही लख्ख आठवतं. त्या वेळी मी नाटकांतून काम करायचो. एका नाटकाच्या नवीन प्रोजेक्टविषयी कुणाशी तरी चर्चा करायला मी तिथे गेलो होतो. बाकी तपशील आता काही म्हणजे काहीच आठवत नाहीत. आठवते ती ही मैत्रीण, जिच्या गाण्यानं दुरूनच माझं लक्ष वेधून घेतलं. मोठ्या सभागृहातल्या दूरच्या एका कोपऱ्यात एका ग्रुपमध्ये बसून ती कुठलंसं गाणं म्हणत होती. सिनेमाच्या चित्रदर्शी भाषेत सांगायचं झाल्यास कॅमेऱ्याचा ट्रॉली शॉट माझ्यापासून सुरू होऊन थेट तिच्यापाशी गेला आणि हसता गाता गोड चेहरा कॅमेऱ्यात क्लोजअपमध्ये बंदिस्त झाला.
कट टू- ती माझ्या ऑफिसला आली. तिचा ग्राफिक डिझाइनिंगचा क्लास तिथून जवळच होता. मग जाता-येता वरचेवर X चं Y च्या ऑफिसला येणंजाणं सुरू झालं. नाटक, चित्रपट, संगीत, गाणी अशा बऱ्याच आवडीनिवडी सारख्या आहेत असं लक्षात आल्यावर या विषयांवरच्या गप्पांसाठी ऑफिस अगदीच बिनकामाचं वाटू लागलं. मग एके रविवारी मी माझी बाइक काढली आणि आम्ही लांब फिरायला गेलो. धरणाच्या बॅकवॉटरच्या काठांवरून गप्पा मारताना आम्ही कित्येक विषयांना कवेत घेतलं. कोणा एका अनामिकानं आमचा तिथे फोटोसुद्धा क्लिकल्याचं स्मरतं. माघारी येताना अगदी चित्रपटात शोभावा असा प्रसंग घडला. बाइक हायवेला लागली आणि प्रचंड वादळी पाऊस सुरू झाला. त्या मुसळधार पावसात गाडी चालवणंदेखील मुश्कील झाल्यावर एका घराच्या आडोशाला मी गाडी थांबवली. दोघंही नखशिखांत भिजलेलो. त्या घराच्या बाहेर कुडकुडत असताना त्या घरानं आम्हाला आपलंसं केलं आणि चक्क कॉफीदेखील ऑफर केली. असेच आणखी कुठे आम्ही गप्पा टाकायला म्हणून भटकलो. पण यातला महत्त्वाचा भाग असा, की आम्ही एकमेकांशी शारीरिक जवळीक कधीच साधली नाही. आमचं मित्र-मैत्रीण हेच नातं कायम राहिलं. दरम्यानच्या काळात मी माझ्या काही मित्रांबरोबर स्वत:चं मासिक सुरू केलं होतं. तिला पहिल्यापासूनच फोटोग्राफीचीदेखील मनापासून आवड. मग माझ्या मासिकाच्या प्रकल्पामध्येही ती स्वत:चा कॅमेरा गळ्यात अडकवून अगदी उत्साहानं सहभागी झाली. कित्येक मान्यवरांच्या मुलाखती घ्यायला आम्ही जायचो तेव्हा आमच्या चमूबरोबर ती आवर्जून हजर असायची. कॅमेरा रोल विकत वगैरे घेऊन अगदी मोजून मापून फोटो काढण्याचा तो काळ होता. पण आमची ही मैत्रीण कोडॅक कंपनी जणू स्वत:चीच असल्यासारखी तिच्याबरोबर असलेल्या कॅमेऱ्यानं आम्हा सर्वांचे यथेच्छ फोटो काढायची. यथावकाश ही माझी मैत्रीण माझ्या इतर काही मित्रांचीदेखील मैत्रीण झाली. आमचा एक छानसा ग्रुप तयार झाला. त्यादरम्यान एकमेकांच्या घरी वरचेवर जाणंयेणं होत असे. तिचे आई-वडील, लहान बहीण-भाऊ यांच्याशीही मनमोकळ्या गप्पा होत असत. पुढे लगोलग तिनं सिनेमॅटोग्राफीचं रीतसर व्यावसायिक शिक्षणच घेतलं आणि थोड्याच कालावधीत त्या क्षेत्रात स्वत:चा उत्तम जम बसवला. दरम्यान तिचं लग्न झालं आणि तिच्या नवऱ्याबरोबर तिनं फिल्म प्रॉडक्शन एजन्सी सुरू केली. पाहता पाहता त्यांचं मुंबईलाही एक युनिट उभं राहिलेलं मला कळलं. मी आणि माझी पत्नी मुंबईला काही कामानिमित्त गेलो असताना आवर्जून आम्ही वाकडी वाट केली आणि त्यांचा सेट अप पाहायला गेलो. त्यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांना जाम समाधान वाटलं.

दरम्यान माध्यमांमधल्या १५-२० वर्षांच्या नोकरीनंतर मीही दृक-श्राव्य माध्यमांत काम करणारी माझी एजन्सी प्रभात रोडला सुरू केली होती. मला माझा स्वत:चा एडिटिंगचा सेट अप तयार करायचा होता आणि त्यासाठी अॅपल कंपनीचं मशीन विकत घ्यायचं होतं. एडिटिंग सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचं होतं. ते कोणतं घ्यावं, कुठून घ्यावं, मशीनचं कॉन्फिगरेशन काय असावं, या अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं आणि आवश्यक ती सर्व तांत्रिक माहिती तेव्हा मला या माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्यानं पुरवली. माझी पहिली शॉर्ट फिल्म जेव्हा मी करायचं ठरवलं, तेव्हा त्या दोघांशीही अनेकदा चर्चा केल्याचं मला स्मरतं. टीम ठरवत असताना कॅमेरा वर्क करण्यासाठी सिनेमॅटोग्राफर म्हणून माझी ही मैत्रीणच हक्कानं पुढे सरसावली. तिनं हे काम अगदी मनापासून, विनामोबदला केलं. त्याचा श्रमपरिहार म्हणून आम्ही तिला आणि तिच्या नवऱ्याला आनंदानं घरी जेवायला बोलावलं. पुढे पुढे आमचं भेटणं अगदी नाही म्हणावं इतकं कमी होत गेलं. माझी पहिली शॉर्ट फिल्म सोडली तर नंतर आम्ही बरोबर काम नाही केलं. तसं बघायला गेलं तर याचं मूळ कारण आमच्या दोघांच्या व्यवसायाशी निगडित होतं, मैत्रीशी नाही! म्हणजे तिचीदेखील माझ्यासारखीच प्रॉडक्शन कंपनी होती, ज्यामुळे आम्ही एकमेकांचे स्पर्धकच ठरत होतो ना. अगदी अलीकडे तिच्या आयुष्यात आभाळ कोसळावं असं संकट आलं. तिच्या नवऱ्याला रक्ताच्या कर्करोगाचं निदान झालं आणि काही महिन्यांतच तो गेला. माझ्यापर्यंत ही बातमी एखाद्-दोन दिवस उशिरानं पोहोचली. प्रचंड धक्का बसला. बातमी पचवायची ताकद माझ्यातच नव्हती. मग अशा वेळी तिला भेटण्याचा धीर मी कुठून आणणार? त्यामुळे मी तिला भेटायला जाऊ शकलो नाही. त्यानंतर वर्षा-दोन वर्षांनी माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला ती आली. मला मनापासून आनंद वाटला. तिच्या नवऱ्याच्या निधनानंतर किती तरी दिवस, महिने तिच्या घरी तिचं सांत्वन करायला जायला हवं, हा विचार अधूनमधून मनात पॉप अप होत असे. पण मी जाऊ शकलो नाही, कारण ते पुन्हा भळभळत्या जखमेवरची खपली काढण्यासारखं होईल असं मला आतून वाटायचं. जेव्हा ती माझ्या कार्यक्रमावेळी मला भेटली, तेव्हा हे माझ्या मनातले विचार मी तिला बोलून दाखवले. पण ‘‘अरे, असं काही नाही रे! हे असं काही अजिबात वाटून घ्यायचं नसतं. उलट आवर्जून भेटायला जायचं असतं. त्यानं समोरच्याला बरंच वाटत असतं.’’ असं बोलून ती मोकळी झाली. माझ्यापेक्षा चांगली ५-७ वर्षांनी लहान असूनदेखील ती आता माझ्यापेक्षा जास्त प्रगल्भ झाली असल्याचं मला वाटलं. आयुष्याकडे बघण्याबाबतही ती जास्तच ‘सोर्टेड’ झाली असावी.

आता ही ‘X’ कोण होती? तिचं नाव काय? हे फारच व्यक्तिसापेक्ष होईल. ते इथे गैरलागू आहे असं मला वाटतं. मूळ विषय एखादी मैत्रीण आयुष्यात आल्यानं अथवा लाभल्यानं समृद्ध झालेल्या जीवनाबद्दलचा आहे. मला वाटतं मैत्रीण हे असं नातं आहे, जे आपल्या व्यक्तिमत्त्वाला पूर्णत्व बहाल करतं. स्त्री-पुरुष नातेसंबंधांमधल्या एका आगळ्या मितीचं दर्शन घडवतं. ती आली, तिनं मला पाहिलं आणि मित्र म्हणून जिंकलं, याचं आयुष्याच्या या टप्प्यावर समाधान नक्कीच आहे. तसंच आयुष्याकडून मिळालेल्या या ‘एक्सपोजर’चं अप्रूपदेखील!

चला जाऊ द्या. जाता जाता मी तुमची अपेक्षापूर्ती करतो. माझ्या या ‘X’ मैत्रिणीचं नाव आहे ‘स्वप्ना’. आणि माझ्या बायकोचं नाव काय आहे माहित्ये?- ‘सपना’! आणि सपनासुद्धा माझी बायको कमी आणि मैत्रीणच जास्त आहे बरं का! लो करलो बात!
girishrangnekar@gmail.com