रावबा गजमल

महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी मी माझं खेडेगाव सोडून तालुक्याला आलो. शिक्षण घेत असताना, आमच्याकडची तेव्हाची ‘लफडं करायचं नाही,’ आणि ‘कोणत्याही मुलीत गुंतायचं नाही’ ही वाक्यं गावातील लोकांच्या तोंडून सतत ऐकायला मिळायची. तीच कायम डोक्यात रेंगाळत असायची. एखाद्या मुलीशी निखळ मैत्री असू शकते, हे लोकांना फारसं पटत नव्हतं.

आमच्या वर्गात अगदी एका बोटावर मोजण्याइतक्याच मुली होत्या. त्यातच एक होती, ‘स्वामिनी’. अतिशय हुशार. तिचं सुंदर नाव, शांत स्वभाव मला आवडायचा. आम्ही बीएस्सी कॉम्प्युटरचे विद्यार्थी, बीएस्सीच्या पहिल्या वर्षी एकाच वर्गात असलो, तरी एकमेकांना फक्त तोंडदेखलंच ओळखत होतो. तिच्याशी संवाद साधायला हवा, वाढवायला हवा, असा विचार मनात यायचा. माझं अडनाव इंग्रजी ‘G ’ या अक्षरापासून सुरू होतं आणि स्वामिनीचं अडनाव ‘J’ अक्षरापासून सुरू होत असल्याने परीक्षेच्या वेळी आम्हा दोघांचीही आसन व्यवस्था बहुदा एकाच वर्गात असायची. तोंडदेखली ओळख असूनही ती मला परीक्षेच्या वेळी मदत करायची. तिने एका प्रश्नाचं उत्तर लिहिलं की, ते मला दाखवायची. सेमिस्टर पद्धतीमुळे परीक्षा वर्षातून दोन वेळा व्हायची. इतर मुलं परीक्षेला घाबरत पण मला परीक्षा आवडायची ते कदाचित स्वामिनीमुळे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…आजच्या पुरुषाचे ‘कर्तेपण’

मी तिचा मित्र नसतानाही ती मला परीक्षेत इतकी मदत का करते? हा प्रश्न मला नेहमी पडायचा, पण ती माझ्याशी बोलली की मला छान वाटायचं. हळूहळू शांत स्वभावाच्या स्वामिनीची ओळख माझ्याकडे बघून छान हसण्यापर्यंत झाली. तिच्याविषयी लिहिताना काही प्रसंग प्रकर्षाने आठवतात. आठवड्यातून २ ते ३ वेळा आमची प्रात्याक्षिके असायची. प्राध्यापकांनी दिलेला प्रोजेक्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी वर्गातल्या मुलींची चढाओढ जास्त असायची. माझ्या प्रोजेक्टसाठी माझा मित्र यशवंत आवर्जून मदत करायचाच, पण स्वामिनीही न मागता मला प्रोजेक्ट पूर्ण करायला मदत करायची. बऱ्याचदा रफ वहीत उत्तरं लिहून द्यायची आणि ‘जसंच्या तसं तुझ्या अक्षरात लिही आणि सरांना दाखव, ते मार्क देतील’, असं सांगून आणि चेहऱ्यावर गोड हसू आणून निघून जायची.

हेही वाचा…सांधा बदलताना : जग हे आनंदशाळा

माझ्या महाविद्यालयीन काळात अडीअडचणीच्या अनेक प्रसंगांत तिने मला अनेकदा मदत केली. पण तरीही तिच्याशी मोकळेपणाने बोलणं होत नव्हतं. चारचौघांसमोर तिच्याशी बोललो तर लोकं ‘लफडं’ म्हणतील, ही भीती मनात होतीच. एक दिवस तिने स्वत:हून ‘घरी कोण कोण आहे तुझ्या?’ मला विचारलं. मग तिनेही स्वत:हून तिच्या घरच्यांविषयी सांगितलं. तिच्या मदत करण्याच्या वृत्तीमुळे मला तिच्याविषयी जवळीक वाटू लागली होती. सेमिस्टरच्या आधी जेव्हा प्रॅक्टिकलच्या वह्या जमा कराव्या लागायच्या तेव्हा स्वत:हून तिची वही ती मला लिहायला द्यायची. इतकी मदत माझ्या कोणत्याही मित्र-मैत्रिणीने आजवर मला केली नव्हती. वर्गातल्या हुश्शार मुलांप्रमाणे, मला स्वत:पुरतं तरी ‘हिरो’ झाल्यासारखं वाटायचं.
एक दिवस माझ्याकडून एक चूक झाली. दोन दिवसांनी वही परत कर, असं सांगून तिने मला तिची वही दिली होती. ती वही मी चुकून गावी-घरी घेऊन आलो. नेमकं त्याच वेळी आमच्या गावी शेतीसाठी केलेली पाइपलाइन फुटली. या पाइपलाइनचे काम पूर्ण करायला एरवी ३ दिवस लागायचे, पण त्यावेळी या कामाला ५ दिवस लागले. महाविद्यालयात गेल्यावर मी तिची वही तिला द्यायला गेलो तेव्हा ती माझ्यावर खूपच रागावली होती, पण मी तिला कसलंच स्पष्टीकरण न देता फक्त तिचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. मग दुसऱ्याच क्षणी ती मला म्हणाली, ‘‘सरांनी गणिताचा गृहपाठ कालच जमा करायला सांगितला होता, पण तुला देण्यासाठी थांबले.’’ तेव्हा मला पुन्हा प्रश्न पडला, हिच्या जागी मी असतो, तर नक्की रागावलो असतो आणि यापुढे अजिबात मदतदेखील केली नसती, पण माझ्या काळजीपोटी तिने केलेली ही मदत माझं तिच्याबद्दलचं मत पूर्ण बदलून गेली. माझ्या डोक्यातून ‘लफडं’ ही संकल्पना पूर्णपणे निघून गेली आणि आमच्यात ‘मैत्री’चं निखळ नातं निर्माण झालंय याची मला जाणीव झाली.

बीएस्सीची तीन वर्षं पूर्ण झाली. शेवटच्या दोन वर्षांत माझ्याकडून खूप चुका झाल्या होत्या, पण त्या चुकांकडे दुर्लक्ष करून स्वामिनी मला मदत करत होती. एकदा महाविद्यालयाची परीक्षा फी भरायची होती. म्हणून मी तिला सांगितलं की, ‘‘घरच्यांनी फी भरण्यासाठी पैसे दिले होते, पण माझ्याकडून ते खर्च झाले. आता माझ्याकडे परीक्षेसाठीची फी भरायला पैसे नाहीत. तिच्याकडे फी भरण्यासाठी पैसे मागावेत, असा विचारही माझ्या मनात नव्हता. पण तिने मला लगेच ५०० रुपये काढून दिले. मी पैसे घ्यायला नकार दिला तेव्हा मला म्हणाली, ‘‘हे पैसे तुला उसने दिले आहेत. आठवणीने परत दे. तू विसरलास तर मी तुला या पैशांची आठवण करून देईन.’’ त्यानंतर तिने मला थेट शेवटच्या वर्षी त्याची आठवण करून दिली. तिचे उधार घेतलेले पैसे द्यायचे आहेत, हे मी खरोखरच विसरलो होतो. यावर मी तिची माफीही मागितली. माझा पडलेला चेहरा बघून ती गमतीनं म्हणाली, ‘‘माझे वडील बँकेत आहेत आणि तुझे वडील शेतकरी. पण मी यावर व्याज घेणार नाही. फक्त हे लक्षात ठेव…’’ तिच्या या आश्वासक बोलण्यानं खरंच मला खूप हायसं वाटलं.

माझी एक गोष्ट मला खूपदा खटकते. जितकी मदत मला स्वामिनीने केली, तितक्या मोकळेपणानं मी कधीही कृतज्ञता व्यक्त केली नाही. पुढे २०१५ मध्ये विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागात मानवी भावभावनांचा अभ्यास करताना या गोष्टींची मला तीव्रतेने जाणीव झाली. पण तोपर्यंत उशीर झाला होता.

पदवी मिळाली आणि नंतर आमच्या वाटा वेगळ्या झाल्या. २०११ पासून स्वामिनीची माझी पुन्हा कधीच भेट झाली नाही. त्यावेळी ‘फेसबुक’ सुरू झालं होतं. एक दिवस सहजच मी तिचं नाव फेसबुकवर सर्च केलं, तर वर्गात ती ज्या बेंचवर बसायची तोच फोटो तिच्या प्रोफाइलवर होता. वर्गातले तिचे इतरही काही फोटो होते. मी तिला लगेचच रिक्वेस्ट पाठवली आणि मेसेंजरवर मेसेज पाठवला, ‘ Hi.. Swamini …’ आणि दुसऱ्या दिवशी ‘इंटरनेट कॅफे’वर आलो. माझं फेसबुक उघडून बघितलं, तर स्वामिनीने माझी ‘रिक्वेस्ट अॅक्सेप्ट’ केली होती आणि मेसेंजरवर ‘‘हॅलो, कसा आहेस? माझे ५०० रुपये कधी देतोस? लवकर भेटू…’’ असा मेसेज होता. पण का कुणास ठाऊक तो संवाद तिथेच संपला.

हेही वाचा…स्वभाव-विभाव :परिपूर्णतेचा अट्टाहास

त्यावेळी मी हॉस्टेलला राहात होतो. हॉस्टेलचे मुख्य प्रवेशद्वार ‘भौतिकशास्त्र’ विभागाच्या समोर होते. मी एक दिवस नाटकाची तालीम करून थकलेल्या अवस्थेत हॉस्टेलकडे निघालो, तर समोर ती उभी. तिने माझ्याकडे बघितलं. तेव्हा जशी आधी हसायची अगदी तशीच शांतपणे हसली. तिला पाहिल्यावर मी जागेवरच थांबलो. मधली ३ वर्षं भुर्रकन् उडून गेल्यासारखी वाटली. तिच्यात बदल झाला होता. ती पूर्वीपेक्षा वेगळीच भासली. तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं. तिच्याजवळ पोहोचताच तिनं मला विचारलं, ‘‘अरे, तू इकडे कुठे?’’ ‘नाट्यशास्त्र’ शिकत असल्याचं मी तिला सांगितलं. यावर हसत म्हणाली, ‘‘म्हणजे माझे ५०० रुपये कामी आले. मला वाटलं शेतात वाया गेले की काय… अरे ‘फेसबुक’वर आपण बोललो खरं, पण लगेचच लग्नाचं स्थळ आलं आणि झालंही. सर्वच गडबडीत झालं.’’ असं म्हणून ती हसली. तिचं आताचं हसणं महाविद्यालयात असलेल्या हास्यापेक्षा मला छान आणि मोकळं वाटलं. आम्ही बोलत असताना एक मोठी पांढऱ्या रंगाची गाडी आली. गाडीतून एक तरुणउतरला. त्याच्याशी माझी ओळख करून देत तिनं सांगतिलं, ‘‘मी नेहमी सांगते ना, माझा एक मित्र होता तो हाच.’’ तिच्या नवऱ्याला तिने माझी ‘मित्र’ अशी ओळख करून दिली याचं मला खूपच आश्चर्य वाटलं. कारण तिने मला इतकी मदत केली, पण कधीही मला ‘तू माझा मित्र आहेस,’ असं म्हणाली नव्हती. तिने माझा मोबाइल नंबर मागितला. तिच्या नवऱ्यानेही मला घरी जेवायला येण्याचं आमंत्रण दिलं आणि दोघेही गाडीत बसून निघून गेले. काही क्षण हा सारा भास आहे की काय, असं वाटलं, पण प्रत्यक्षात हा सारा प्रसंग घडला होता…

त्यानंतर माझंही लग्न झालं. स्वामिनीने आम्हा उभयतांना तिच्या घरी जेवणाचं आमंत्रण दिलं होतं. एकदा मी स्वामिनीला गमतीनं विचारलं, ‘‘मी तुझा इतका चांगला मित्र होतो, हे तू मला तुझं लग्न झाल्यावर का सांगितलं?’’ त्यावर तिनं उत्तर दिलं, ‘‘जेव्हा आपण शिकत होतो तेव्हा मी तुला वह्या द्यायचे, त्यावेळी तू कधीच व्यक्त झाला नाहीस. तर मला कसं कळणार की, तू मला काय समजतोस? मला जे तुझ्याविषयी वाटत होतं ते मी तुला आपली भेट झाल्यावर संगितलं.’’

तिचं हे म्हणणं ऐकून योग्य वेळी व्यक्त होणं गरजेचं आहे, नाही तर चांगल्या मैत्रीला आपण मुकू शकतो, हे लक्षात आलं. आजही माझ्या कुटुंबातल्या प्रत्येक सुख-दु:खात स्वामिनी सामील असते. आपल्याला नि:स्वार्थपणे मदत करणाऱ्याला मनापासून धन्यवाद द्या. मन मोकळं करा, नाही तर आपल्याला अशी गोड मैत्रीण आहे हे समजण्यासाठी मला १० वर्षं जावी लागली, ते आज २०२४ ला जाणवतंय… rbgajmal511@gmail.com

Story img Loader