संगीतात मन नि:शब्द, नि:स्तब्ध, निर्मळ आणि निर्विचार बनविण्याचं सामर्थ्य असतं. म्हणून आपलं संपूर्ण जीवन हे शब्दांनी व्यापलेलं असलं तरीही मन भरण्यासाठी मात्र सूरच लागतात, यासाठी आपण काय, किती आणि कसं ऐकतोय याकडे लक्ष दिलं तर मेंदू-स्वास्थ्य, मन:शांती मिळून अंतरंग उजळवणाऱ्या ध्वनिसौंदर्याचा आनंद अनुभवता येईल.

‘ध्वनिसौंदर्य’ या सदरात आजवर आपण ओंकार साधना, मूलध्वनी, प्राणायाम, नादयोग, वाद्यासंगीत, निसर्ग संगीत, ध्वनिवाद्यो, ध्रुपद, ख्याल, शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय, सुगम व लोकसंगीत अशा विविध माध्यमांतून ध्वनिसौंदर्याचा आस्वाद कसा घेता येतो हे पाहिलं. माध्यम कोणतंही असो, मी ‘कानांनी काय, किती आणि कसं ऐकतोय’ (Quality of listening) याकडे लक्ष दिलं तर त्यातून मेंदू-स्वास्थ्य, मन:शांती मिळते आणि आनंद अनुभवता येतो.

तो अनुभवण्यासाठी कान आणि मनाच्या ‘ट्यूनिंग’चा फार जवळचा संबंध आहे. त्यासाठी कानच तयार नसतील तर मन कसे तयार होणार? मन ‘ट्यून’ करण्याचा एक सोपा उपाय म्हणून, ‘काय बोलावं आणि काय बोलू नये’ याचा जसा आपण ‘वाणी विवेक’ करीत असतो अगदी तसाच ऐकण्याच्याही बाबतीत ‘काय ऐकावं आणि काय ऐकू नये’ याचाही ‘श्रवण विवेक’ करता येईल.

भाषा सुंदर आणि समृद्ध व्हावी म्हणून आपण स्वत:ची शब्दसंपदा तयार करतोच ना, अगदी त्याचप्रमाणे ऐकणं समृद्ध करणारा स्वत:चा असा ‘लिसनिंग झोन’ नक्कीच तयार करता येऊ शकतो. गणपती अथर्वशीर्षाची सुरुवात ‘‘ॐ भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा:’’ या शांतीमंत्राने केली जाते. यातून सर्वसाधारणपणे असा अर्थ निघतो की ‘आमचे कान भद्र, अर्थात सुखकर (किंवा कल्याणकारी) असेल तेच ऐको’… आता याच चालीवर ‘माझ्यासाठी जे ‘भद्र’ आहे तेच मी ऐकीन’ असं म्हणून स्वत:चं ‘श्रवणविश्व’ आपल्याला नक्कीच समृद्ध करता येऊ शकतं. हे केल्यास ‘श्रवण विवेकाच्या’ पहिल्या पायरीवर माझं ऐकणं ‘सुखकर’ आणि ‘हितकर’ आहे का? हे ‘आपलं आपल्याला’ तरी नक्कीच ठरवता येईल. (आणि जे भद्र नाही ते टाळताही येईल.)

आपल्या दिवसाची सुरुवात आपण काय ‘ऐकून’ करतो यावर त्या दिवसभराची प्रसन्नता अवलंबून असते. हल्ली अनेक ‘दृश्य’ माध्यमांमधून कोणत्याही प्रकारचं संगीत हे झगमगीत स्वरूपात ‘बघायला’ मिळतं तेव्हा संगीत ही नेमकी ‘दाखवण्याची’ कला आहे की ‘ऐकवण्याची’? असा प्रश्न पडतो. परंतु ही माध्यमं सहजच हाताशी असल्यामुळे आपलं मन नकळत त्यांच्या आहारी जातं आणि ‘ट्रेण्ड’ म्हणून त्याला प्रतिसादही देऊ लागतं. पण हा प्रतिसाद नेमका मनोरंजनाला आहे, माध्यमाला आहे, कानांना आहे, की डोळ्यांना? याचं उत्तर शोधलं पाहिजे. कोण, कसं, कुठे गातंय? ऐकू येणारं ‘दृश्य’संगीत हे मनाशी एकरूपता साधतंय की नाही? आणि आपल्या कानांनी मेहनतीनं कमावलेल्या आंतरिक शांततेशी ते किती सुसंगत आहे? असे प्रश्नही आपल्याला पडले पाहिजेत. ज्यांना आपले कान फक्त सवंग करमणुकीसाठी वापरायचे आहेत त्यांचा प्रश्न नाही, पण मनाच्या शांततेचं महत्त्व समजणाऱ्यांनी मात्र सांगीतिक गुणवत्तेची कास सोडून चालणार नाही, अन्यथा नको त्या गोष्टी कान, मन आणि मेंदूतही शिरू शकतात.

असं म्हटलं जातं की, पूर्वीच्या काळी संगीतातील एकंदरच सुरेलपणाला महत्त्व असायचं… संगीतवर्ग तर सुरेल असायचेच पण याशिवाय तालासुरात संथा पद्धतीनं मंत्रपठण शिकवणारी गुरुकुलंदेखील होती. स्वर, उच्चार, चढ-उतार, छंद, कालावधी आणि लय यांचे ‘कायदे’ ठरलेले असत आणि ते काटेकोरपणे पाळलेही जात असत. अशा वातावरणातून समाजात उत्तम कानसेन घडत असत. याचाच अनुभव देण्यासाठी मध्यंतरी नाशिक येथील बालाजी मंदिरात ध्रुपद गायक सचिन चंद्रात्रे व त्यांच्या शिष्यांनी मिळून सादर केलेला ऋग्वेदोक्त श्रीसूक्त पठणाचा एक आगळावेगळा प्रयोग ऐकण्याचा योग आला. मंदिराच्या गाभाऱ्यातला तो मंत्रघोष आसमंतात निनादला. सगळ्या गायकांचा आवाज भारदस्त तर होताच, पण संस्कृत पठणावरील नितांत प्रेमामुळे त्यात एक सुखद आणि सौम्य संवादही ऐकू येत होता. तिथे असलेला प्रत्येक श्रोता भोवतालचं जग विसरून एका सुखद सहजतेत रममाण झाला होता. एकाच वेळी अनेक गायकांचे आवाज एकमेकांमध्ये असे काही मिसळले होते की जणू सगळ्यांचा मिळून तो एक वेगळाच आवाज आहे असं वाटावं. सुरेल समूह-स्वरातून साकारलेलं ते श्लोकबद्ध ध्वनिसौंदर्य ऐकताना ‘भद्र’ ही कान सुखावणारी भावना मला कळू लागली. यातील कलाकारांनी संस्कृत सुक्तातील शब्द, त्याखाली स्वरांचे चढ-उतार, त्यावर थांबण्याचा कालावधी आणि लय यांचा सूक्ष्म तपशील या सगळ्यांची मिळून एक ‘सॉर्टेड स्क्रिप्ट’ तयार केली होती. त्यातील नोटेशन वाचून, गायकवृंद सूक्ष्म श्रुतींसह वेदगायन करत होता. सारं वातावरण शब्दसुरांच्या संगमानं आणि ‘भद्र’तेनं भारावून गेलं होतं. तो प्रत्यक्ष श्रवणानुभव खरोखर मुग्ध करणारा होता. बराच वेळ आम्ही सगळे श्रोते नि:स्तब्ध होऊन एकाच जागी बसून राहिलो. कारण त्या मधुर मंत्रगायनाचे घोष थांबले होते पण तरीही त्यातील स्वरलहरी कानातून जात नव्हत्या. यातून माझा ‘लिसनिंग झोन’ असा काही तयार झाला की त्याचा परिणाम दिवसभर

आणि पुढील अनेक दिवस मनात निनादत होता. शब्दसुरांच्या संगमातून अवतरणारं ध्वनिमाधुर्य माणसाला विलक्षण अनाकलनीय तंद्रीत गुंगवू शकतं ते हे असं …

श्लोक, सुभाषितं, सुक्त, ही साधनं स्वत:मध्ये आणि समाजात सदाचार रुजवणारी एक चांगली सवय आहे. त्यात लपलेला अर्थ नवी पिढी घडवणारा आणि साऱ्यांच्याच जीवनासाठी दिशादर्शक ठरू शकतो. पण नुसता शाब्दिक नीती-उपदेश हा कोरडा असतो म्हणून कदाचित त्याला श्लोकांच्या निमित्ताने पूर्वीच्या लोकांनी चाली लावल्या असाव्यात… म्हणून हे सगळं म्हणताना छान वाटतं… मानवी कंठात ‘शब्द’ आणि ‘सूर’ या दोन्हींचा संगम व्हावा यासाठी परंपरेने असं बरंच काही देऊन ठेवलं आहे. ते पुन्हा-पुन्हा म्हणण्याची गोडी मात्र निर्माण व्हायला हवी. ही गोडी संगीत शिक्षणातून कशी निर्माण करता येईल यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.

शब्दांचे अर्थ समजले नाहीत तर गैरसमज निर्माण होऊ शकतात परंतु सुरात मात्र ती शक्यता नसते कारण त्यात ‘शब्द’ आणि ‘अर्थ’ यापलीकडचा आनंद असतो. म्हणून मनाचं आंतरिक रितेपण बुद्धिगम्य ‘शब्दां’नीच भरून काढण्यापेक्षा कधी तरी भावपूर्ण ‘सुरांनी’ भरून बघावं. असे भावपूर्ण सूर समजण्याची पहिली पायरी म्हणून श्लोक, सामूहिक पठण अशा सुखकारक श्रवण माध्यमांचा आधार घेतला तर कंटाळवाण्या रितेपणातही स्वत:ला सावरता येतं. विचार करून थकलेल्या मनाची विश्रांती ही शब्द, अर्थ आणि विचारांच्या पलीकडे, नि:स्तब्धतेत लपलेली असते. संगीतात मन नि:शब्द, नि:स्तब्ध, निर्मळ आणि निर्विचार बनविण्याचं सामर्थ्य असतं. शब्दाची स्वरयुक्त पुनरावृत्ती झाली की इकडे तिकडे सतत धावणारं मन कुठेतरी गुंतून राहतं. एखादा मंत्र पुन्हा पुन्हा म्हटल्याने त्यातील ध्वनी मेंदूत भिनू लागतो, अंगवळणी पडू लागतो. हेच त्यातील नादसौंदर्य असतं. यातूनच मन:शांतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होत जातं. तालासुरात गायलेली सामूहिक आरती, मंत्रपुष्पांजली किंवा पसायदानाच्या सुरात सूर मिसळण्याची मजाही काही औरच. ते गाता गाता तल्लीन व्हायला होतं कारण त्या वेळी विचार थांबलेले असतात. ही प्रासादिकता त्यातील शब्दगुणांची तर असतेच, परंतु ‘संगीत’गुणाचीदेखील असते. संगीतगुणाचा विकास करण्यासाठी गुरूसमोर बसून संगीत शिकणं उत्तम. पण त्याआधी निसर्गत: स्वत:ला गाता येणाऱ्या श्लोक सुभाषितांसारख्या कितीतरी गोष्टी असतात, ज्यावर आपण स्वत:वर ‘पॉलिशिंग’चं काम करू शकतो. संगीत वर्ग, शाळांमधूनही हे असं काम करता येऊ शकतं. साध्यासोप्या चाली म्हणून विद्यार्थ्याला संगीताच्या वाटेवर पहिलं पाऊल कसं टाकता येईल याचा विचार संगीत मार्गदर्शक नक्कीच करू शकतील. आवाजातील चढ-उताराचं तंत्र समजून उमजून अशा मार्गदर्शकांनी गायनाचा कौशल्य विकास करणारे प्राथमिक अभ्यासक्रम तयार केले तर समाजातील सुरेलपणा नक्कीच वाढीस लागू शकेल.

ध्वनिसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी संगीत म्हणजे एक नादावलेलं पाचूंचं बेट आहे. या बेटावर अनेक मौल्यवान हिरे आणि मौक्तिकं आहेत. विचारांच्या कोलाहलाला कावलेल्या कुणीही रसिकानं या बेटावर यावं, क्षणभर विसावावं… मनाचा हक्काचा कप्पा हळूच उघडेल… मंद संगीत ऐकू येईल… त्या प्रकाशात डोळे, कान, मन आणि अंतरंगही तृप्त होईल… आपलं संपूर्ण जीवन हे शब्दांनी व्यापलेलं असलं तरीही मन भरण्यासाठी मात्र सूरच लागतात कारण शब्द आणि अर्थाच्या विसंगतीत ‘वाद’ लपलेला असला तरी त्यांच्याच संगमात ‘संवाद’ ठरलेला असतो.

हा संवाद समजून घेण्यासाठी, रसिकांनी आपल्या दैनंदिन जीवनातील अपरिहार्य गदारोळातही आपलं अंतरंग ध्वनिसौंदर्यानं उजळवून पाहावं हे मनात धरून हे सदर लिहायला घेतलं होतं. महाराष्ट्रातील रसिक वाचकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. अनेक विचारवंतांच्या प्रतिक्रियांमधून मी शिकत गेले आणि समृद्ध होत गेले, त्याबद्दल सर्व रसिक वाचकांचे आणि माझ्या मार्गदर्शकांचे मन:पूर्वक आभार. माझे अनुभव शब्दात मांडण्यासाठी गुणग्राहक ‘चतुरंग’ने दिलेल्या या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त करते आणि निरोप घेते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

trupti.chaware@gmail.com