‘लग्नाची पंचविशी’ हा महत्त्वाचा विषय घेतल्याबद्दल ‘चतुरंग-लोकसत्ता’चे अभिनंदन.‘चतुरंग’ची विषयांची आणि लेखकांची निवड दाद देण्यासारखी असते.

‘चतुरंग’च्या जुन्या वाचकांना वंदना कुलकर्णींचे लेखन परिचयाचे आहे. माझ्या आठवणीप्रमाणे त्यांचं सदर २००२ मध्ये प्रसिद्ध होत होतं आणि त्यांचे तेच लेख ‘सूर जुळताना’ मध्ये पुस्तकरूपात प्रकाशित झाले. त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवावर आधारित विवाहसंस्थेचा मागच्या २५ वर्षांचा आढावा घेणारं ‘लग्नाची पंचविशी’ सदर वाचताना विशेष आनंद होत आहे. या वर्षीचे तीनही लेख वाचले. लेखमाला चांगली सुरू झाली आहे. सततच्या बदलांच्या लाटेत आपली कुटुंब-विवाहसंस्था कोणते रूप घेणार हा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत राहीलच.

‘लग्नाचं उद्दिष्ट’ या (२४ जानेवारी) च्या लेखात मांडलेला ‘लग्न करणारे लोक खरंच किती आणि काय विचार करतात,’ हा मुख्य प्रश्न कायम राहील, असं वाटतं. याचं कारण भारतीय समाजात लग्न हा ठरावीक वयातला एक आवश्यक टप्पा समजला जातो आणि बहुतांशी लोक सामाजिक अपेक्षेनुसार तो पार करतात. ‘गुंतुनी गुंत्यात सार्या’ (७ फेब्रुवारी) च्या लेखातला वानप्रस्थाश्रमाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. कुटुंबात नातेसंबंध चांगले ठेवण्यासाठी ज्येष्ठांनी काही पावलं मागे राहणं जरुरीचं आहे. ते करणं त्यांना अवघड जात आहे, असं पाहायला मिळतं. त्याचा परिणाम एकत्र कुटुंब पद्धती ठिसूळ होण्यात होतो. मागच्या २५ वर्षांत झालेल्या सर्व बदलांचा आवाका आणि परिणाम यांचं अजून पूर्ण आकलन झालेलं नाही.

महत्त्वाच्या बदलांमधील – सोशल मीडियाचा प्रसार, प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आणि व्यसन म्हणता येईल एवढा फोनचा वापर, यांचे नक्कीच नातेसंबंधांवर वाईट परिणाम होत आहेत. वाढतं शहरीकरण, वाढणारी समृद्धी, लहान होणारी कुटुंबं, ज्येष्ठांचं वाढणारं आयुष्यमान, शिक्षितांच्या परदेशातल्या संधी, लग्नाचं वाढलेलं वय, अशा अनेक बदलांचा कुटुंबावर परिणाम होत आहे.

१०-२० वर्षांपूर्वीची गृहितके आज लागू होत नाहीत. उदा. भरपूर उत्पन्न असलेल्या तरुण पिढीला काटकसरीचं महत्त्व सांगून काही उपयोगी ठरत नाही. या सर्व आणि वंदना कुलकर्णींच्या अनुभवातल्या अनेक बदलांवरचे विश्लेषण त्यांच्या सुंदर शैलीमध्ये वाचायला मिळेल. त्यामुळे दर पंधरवड्याला लेखासाठी उत्सुकता असेल. आम्ही ‘चतुरंग’ व ‘लोकरंग’ पुरवणी काढून जपून ठेवतो आणि त्यासाठी वेगळी जागा केली आहे.

आहारावर महत्त्वपूर्ण भाष्य

‘शरीराचं ऐकायला हवं’! (२१ फेब्रुवारी) अमिता गद्रे यांच्या लेखात मधुमेह झाल्यावर आहार-विहार संदर्भात खूप महत्त्वाचे मुद्दे सांगितले आहेत. माझे वय ८४ असून मला अनेक वर्षांपासून मधुमेह आहे. अधूनमधून साखर वाढत असते. लेखात याबाबत अगदी नेमकेपणाने योग्य प्रकारे माहिती दिली आहे. तसेच आहारासंदर्भात जे अनेक गैरसमज आहेत तेही दूर झाले. चतुरंग पुरवणी नेहमी वाचनात असते. त्यामुळे आधुनिक काळात कोणते नवनवीन बदल होत आहेत, त्यांची माहिती मिळते. धन्यवाद.

  • सीमंतिनी काळे, नाशिक

माहितीपर लेख

‘सर्वे संतु निरामय:’ (१४ फेब्रुवारी) या सुलभा आरोसकर यांच्या लेखात विज्ञान आणि तंत्रज्ञान रोजच्या जीवनात सर्वांना कसे उपयोगी पडत आहे, याची रंजकपणे माहिती दिली आहे. वैद्यकीय क्षेत्रात तर या गोष्टी जीवनरक्षक ठरत असून त्यासाठी संशोधकांना धन्यवाद देणे आवश्यक आहे. नवनवीन प्रकारचे संशोधन जीवन सुखकर करीत असताना या गोष्टींचा उपयोग मानवी जीवनात चांगल्यासाठी व्हावा. पण प्रत्यक्षात काय होत आहे?

  • अर्चना काळे, नाशिक