‘निवृत्त तर झाले… पण…’ आणि ‘निवृत्ती एक प्रवृत्ती’ हे लेख १७ मेच्या ‘चतुरंग’ मध्ये प्रसिद्ध झाले. त्या वेळी केलेल्या आवाहनाला नोकरीतून निवृत्त झालेल्या वाचकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातील ही निवडक आणि संपादित पत्रे. यातल्या प्रत्येकानेच आपल्या आयुष्याला एक दिशा दिलेली जाणवते. काहींना नोकरीत असतानाच पुढे काय करायचे ते माहीत होते, काही जणांना नंतर मार्ग सुचत गेले, तर काहींनी स्वत:साठी वेळ काढला. पण निवृत्त झालो, आता मी वेळ कसा घालवू, असा प्रश्न निदान या आमच्या वाचकांसमोर नाही. त्यांचे कार्यरत असणे हे आमच्यासाठी जास्त आनंदाचे…

निवृत्तीनंतर मी बंगाली भाषा शिकायची असं ठरवलं. ‘बंग भाषा प्रचार समिती’तर्फे प्रति वर्षी एक याप्रमाणे तीनही परीक्षा प्रथम क्रमांक मिळवून पास झाले, तेव्हा मी साठ वर्षांची होते. योगायोगाने ‘देश’ या पाक्षिकाचा अंक हाती आला, त्यातली एक कथा अनुवादित केली. ती वाचकांना अतिशय आवडली. मग तोच नाद लागला. गेल्या पंधरा वर्षांत कथा-कादंबऱ्या मिळून माझी पंधरा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. रवीन्द्रनाथ टागोर यांच्या ‘गोरा’ आणि ‘शेषेर कविता’ या अनुवादित कादंबऱ्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.-सुमती जोशी

निवृत्तीनंतर काय करायचे हा प्रश्न मला पडला नाही. पुण्यातील साहित्यप्रेमी भगिनी मंडळाने मराठी ‘स्त्री साहित्याचा मागोवा: १८५०-२०००’ असा प्रकल्प सुरू केला होता. दीडशे वर्षातील लेखिका त्यांचे साहित्य सूची करण्यासाठी भरपूर ग्रंथालयं पालथी घातली व सूची तयार झाली. त्यानंतर मुद्रित शोधनाचे काम. त्यानंतर मंडळाने भारतीय भाषांतील स्त्री साहित्याची ओळख करून देणारा दोन खंडांचा प्रकल्प हाती घेतला. तो नंतर इंग्रजीतही सिद्ध झाला. घरी पती डॉ. प्रभाकर आपटे यांचे पीएच.डी. साठी ‘पौष्करसंहिता’ आणि त्यापाठोपाठ अनेक संस्कृत संहितांच्या भाषांतराचे टायपिंगचे काम अनेक दिवस चालले. सर्वात मोठा प्रकल्प राजा भोजाच्या ‘समरांगण सूत्रधार’ या संस्कृत ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाचा. समग्र संस्कृत ग्रंथाचे तीन हजार श्लोक टिप्पण्यांसह लिहिणे, इंग्रजी भाषांतर टाइप करण्यापासून इतर सर्व कामात दोघे बुडून गेलो होतो. निवृत्तीनंतर बुद्धीला सतत खाद्या पुरवणाऱ्या नवनवीन ज्ञान भांडारांची ओळख करून देणाऱ्या कामात खूप आनंद मिळाला.- संजीवनी प्रभाकर आपटे

निवृत्तीनंतर पुढे काय करायचे ते ठरवले नव्हते पण मूळ पिंड वाचकाचा असल्याने वेळ कसा घालवावा याची काळजी करण्याचे कारण नव्हते. शिवाय त्यासाठी आता नव्याने इंटरनेट आर्काइव्ह, ई-पुस्तकालय हे पर्याय उपलब्ध झाले आहेत. मागच्या वर्षी सहज शार्लट ब्रांटी यांच्या ‘जेन आयर’ या कादंबरीच्या दोन-तीन प्रकरणांचा मराठीमध्ये अनुवाद करून एक-दोन ठिकाणी ई-बुक्ससाठी विचारणा केली आणि सहा महिन्यांत पुस्तक प्रकाशित झाले. नंतर लगेच ल्युसी माँड माँटगोमरी यांच्या, ‘अॅनी ऑफ ग्रीन गेबल्स’चा अनुवाद केला. ई-बुक, ई-साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केले. ज्येष्ठ नागरिकांना ई-बुक वाचन थोडे अवघड वाटते, म्हणून ‘ग्रीन गेबल्सची अॅनी’ या पुस्तकाचे ऑडिओ-व्हिडीओ बुक बनवण्याचे काम जवळपास पूर्ण होण्याच्या तयारीत आहे. काही कादंबऱ्यांच्या अनुवादाचे काम सुरू आहे, काहींचे ऑडिओ-व्हिडीओ बनवणे सुरू आहे. एकंदरीत मला निवृत्तीनंतर मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करण्याची चांगली संधी मिळाली.- गायत्री साळवणकर

बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर, मी स्वत:ला सामाजिक कार्यात समर्पित केले. मी वसतिगृहातील मुलींना शिकवण्यास सुरुवात केली. नंतर आदिवासी मुलींना सॅनिटरी नॅपकिन्स वाटण्यावर लक्ष केंद्रित केले. मी आत्तापर्यंत आश्रमशाळेमध्ये ५०,००० पॅड वाटले आहेत, ज्यामुळे त्यांच्या जीवनात फरक पडला. ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोन प्रशिक्षण देणं, सैनिकांसाठी देहू रोड येथे मिलिटरी युनिटमध्ये रक्षाबंधन सण साजरा करणं, ग्रीटिंग कार्ड, फिंगर पपेटसह, क्विलिंगच्या कार्यशाळा आयोजित करणं, नवरात्रीत कष्टकरी स्त्रियांचे औक्षण करणं, शेजारच्या बंगाली मुलांचा संस्कार वर्ग घेणं, एका गरजू मुलीची इंजिनीअरिंगची एका सेमिस्टरची फी भरणं अशी कामं करताना मला निर्मळ आनंद मिळतो.- नयना बागूल

प्रत्येक व्यक्तीचे निवृत्तीनंतरचे एक स्वप्न असते, पण नियती नेहमी आपल्या सोबत नसते. आमची निवृत्ती झाली, पण २०१९ वर्ष उजाडले तेच करोनाचे एक भयानक वादळ घेऊन. घर बंदिशाळा झाले. आम्ही दोघे उच्चशिक्षित, समाजासाठी काही करावे ही इच्छा असताना जुन्या मित्राचा स्वयंसेवी संस्थेकडून फोन आला की, मुलांची ऑनलाइन शिकवणी घेणार का? त्यासाठी मुलांना टॅब किंवा मोबाइल ़फोनची व्यवस्था करणे गरजेचे होते. अनेक दानशूर लोकांनी मदतीचा हात पुढे केला आणि बघता बघता २५/३० मुलांच्या पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी तयारी दर्शवली. दहावीच्या वर्गातील गरीब मुलांचे शाळा बंद असल्यामुळे शिक्षण बंद पडले होते. ही मुले खासगी वर्ग लावू शकत नव्हती. आम्ही त्यांना शिकवण्याची जबाबदारी घेतली. मुलांनी उत्तम गुण मिळवले याचे समाधान आहे.- श्रद्धा केसकर

एकाच संस्थेतून आम्ही पती-पत्नींनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीच्या आदल्या दिवशी ‘नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड्स’ या संस्थेची ऑडिशन टेस्ट दिली आणि अंध व्यक्तींसाठी पुस्तक वाचन करावं ही अनेक वर्षांची इच्छा सफल झाली. अनेक पुस्तकांचं वाचनही त्यानिमित्ताने झालं. ‘कोकण मराठी साहित्य परिषद’ आणि काही इतर साहित्यिक, सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत राहण्याचा मार्ग खुला झाला. मुलांसाठी पंचतंत्र कविता रूपात, तसंच एक नाटिका लिहिली. मासिकं, विशेषांक यासाठी लेखन केलं. वक्तृत्व, अभिनय, लेखन स्पर्धांतून भाग घेत बक्षिसं मिळवण्याचं अप्रूप अनुभवलं. लेखन, मराठी मुद्रितशोधन आणि भाषांतर यामुळे ‘सेकंड इनिंग’ खेळताना वेळ कसा घालवावा हा प्रश्न कधीच पडला नाही. नातीचं बालपण पुरेपूर उपभोगण्यात मग्न झाले. अनेक शाळांमध्ये मुलांसाठी कथा, कोडी, खेळ कार्यक्रम करीत असता, मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्याची पर्वणी लाभली. देश-विदेशात फिरण्याची आवड जोपासताना पुस्तकातल्या भूगोलापेक्षा प्रत्यक्षातला भूगोल किती इंटरेस्टिंग असतो हे जाणवलं. निवृत्ती थोडी आधीच घ्यायला हवी होती असं प्रकर्षाने वाटून गेलं.- मधुमंजिरी गटणे

बॅँकेतून निवृत्ती घेतल्यानंतर एकटेपणाने आयुष्य वेचणाऱ्या वृद्धांना शक्य होईल तेवढी सोबत द्यायला सुरुवात केली. माझ्या बँकेतील एका स्त्री सहकाऱ्याची आई निवर्तल्यानंतर वृद्ध आजारी वडील घरात एकटे राहत होते. त्या सहकारी दिवसभर नोकरीवर असायच्या. त्यामुळे घरी त्यांची काळजी कोण वाहणार, ही चिंता त्यांनी माझ्यापाशी व्यक्त केली. तेव्हा मी स्वत:हून दररोज त्यांच्या घरी जाऊन दिवसभर त्यांच्यापाशी बसण्याची तयारी दर्शवली. रोज सकाळी मुलुंड ते सांताक्रूझ असा प्रवास करून त्यांना वर्षभर सोबत दिली. आपले आयुष्य हे केवळ स्वत:साठी नसून इतरांसाठी असते याची प्रचीती आली. कसं कुणास ठाऊक, मला एकापाठोपाठ अनेक एकाकी रुग्णांना सोबत देण्याची संधी मिळत गेली. माझ्या शेजारी राहणाऱ्या कर्करोगग्रस्त स्त्रीला, तिचा पती त्याच्या धंद्यामध्ये व्यग्र असल्यामुळे मी चार वर्षे केमो उपचार, एक्सरे, सीटी स्कॅन, औषधे खरेदी याकामी माझा वेळ दिला. तिने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी मी तिला विचारले, ‘‘तुम्हाला काय हवे?’’ तेव्हा तिने दिलेले उत्तर मी माझ्या हृदयात जपून ठेवले आहे. ती म्हणाली, ‘‘तुम्ही मला तुमचे आयुष्य दिले आहे, यापेक्षा मला आणखी काय हवे आहे?’’ आजवर अनेक रुग्णांना जमेल ती सेवा मी देत आहे. ही सेवा म्हणजे आयुष्याच्या शेवटची यात्रा चालू असतानाची माझी शिदोरी आहे.- सूर्यकांत भोसले

निवृत्ती हा शब्दच पटलेला नाही. ५८व्या वर्षी लक्षात आलं की, बाकी कारकीर्दीच्या व्यापात, मी माझी विविध भाषा शिकायची ऊर्मी बाजूला ठेवत आलो. अखेर मी उच्च पदाचा राजीनामा देऊन चिनी (मॅन्ड्ररीन)व पर्शियन भाषा शिकलो. आंतरराष्ट्रीय प्रावीण्य-परीक्षा दिल्या. २०२२ मध्ये, ७३व्या वर्षी ‘चीनचा अभ्यास’ विषयात एम.ए. झालो. याचा उपयोग अध्यापनाची द्वितीय कारकीर्द, चीनशी आयात-निर्यात-सल्लागार व आता चीन-भारताचे हिन्दी महासागरातील संबंध या नवीन विषयातही होत आहे.- इन्द्रनील भोळे

यंदाच्या जानेवारीत निवृत्त जीवनाची चौदा वर्षे पूर्ण केली. माझ्यासाठी ती ठरली जीवनाच्या नव्या पर्वाची सुरुवात. आत्मशोधाची, सर्जनशीलतेची आणि आनंदयात्रेची! योग, ध्यान, नियमित व्यायाम आणि निसर्गात रमण्याने शरीर आणि मनात नवी ऊर्जा संचारली. एका मासिकाच्या संपादकीय कामाने लेखनाला नवी दिशा दिली. ‘ज्येष्ठ नागरिक संघा’चा सचिव म्हणून ‘स्मृती वेध मेमरी क्लब’, ‘नवरंग कलामंच’ ‘एव्हरग्रीन क्लब’, वृक्षारोपण, संगीत मैफील यांद्वारे बौद्धिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम राबविले, करोनाकाळात ज्येष्ठ मंडळींच्या सकारात्मक कार्यांचे ७२ प्रेरणादायी व्हिडीओ यूट्यूबवर अपलोड केले. नातवंडांशी खेळताना हरवलेलं बालपण पुन्हा अनुभवता आलं.- सुभाष धारणकर

नोकरीत असतानाच सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने, चळवळीतील विविध घटकांसोबत जोडलो गेलो होतो. असं लक्षात आलं की, भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत आहोत. परंतु भारतीय संविधानाबद्दल लोकांमध्ये अज्ञान आहे. त्यामुळे संविधानाचे विचार घराघरांत पोहोचणे आवश्यक वाटले. संविधानाचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर पालघरमधील संविधानप्रेमींना सोबत घेऊन ‘माझं संविधान माझा अभिमान’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत अधिकार, सोप्या भाषेत समजावून सांगत निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात केली.- छबिलदास गायकवाड

सेवा जीवनातून निवृत्त झाल्यानंतर, ‘आता मी काय घडवू शकतो?’ या ऊर्जेने पुढील प्रवास सुरू झाला. या काळात ‘हॅपिनेस लिटरेचर’चा अभ्यास केला, करोनाकाळात मार्टिन सेलिगमन यांच्या ‘ऑथेंटिक हॅपीनेस’ या पुस्तकाचे भाषांतर केले. मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. गीता, अष्टावक्र, महावीर वाणी, ओशो व जैन तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. ध्यान आणि गेल्या ५० वर्षांपासूनचे डायरी लेखन, स्व-अवलोकन याद्वारे अंतर्मुख होण्याचा प्रयत्न सुरू आहे. सेवानिवृत्तीनंतर विदेश प्रवास, तिथल्या निसर्गाच्या सान्निध्यात, नव्या मित्रमंडळींची संगत, डिजिटल कौशल्य आत्मसात करून विचारविश्व अधिक समृद्ध केलं. या प्रवासाला आलेलं एक अनपेक्षित वळण म्हणजे स्वत: शेती करण्याचा अनुभव फार समृद्ध करणारा ठरतो आहे.- अरुण मानोरकर

मी इलेक्ट्रिकल इंजिनीयर असून नोकरीतून एक्झिक्युटिव्ह पोस्टवरून सेवानिवृत्त झाल्यावर उर्वरित आयुष्यात स्वत:ला आणि इतरांनाही आनंद देणारी चांगली कामे करावीत असे मनापासून वाटत होते. स्वानंदासाठी मी कॅलिग्राफी शिकलो. तसेच हार्मोनियम शिकायला सुरुवात केली. मला शिकवण्याची आवड होती म्हणून ‘पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पेशल एज्युकेशन’ या कोर्ससाठी माझे वय, पूर्वीचे शिक्षण, हुद्दा सर्व काही विसरून कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन तो अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केला. त्यानंतर अध्ययन अक्षमता (लर्निंग डिसेबिलिटी) असलेल्या मुलांना इंग्रजी वाचन, लेखन व गणित यासाठी उपचारात्मक शिक्षण पद्धतीने (रेमेडियल एज्युकेशन) शिकवणे सुरू केले. त्यामुळे मुलांना विषय समजू लागले, अभ्यासाची गोडी निर्माण झाली, आत्मविश्वास वाढू लागला आणि त्याचा परिणाम परीक्षेतील गुणांवर दिसून आला. माझ्याकडे आलेली सर्व मुले दहावी- बारावीच्या परीक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली. निकालानंतर भेटायला येणाऱ्या मुलांना होणारा आनंद आणि पालकांना वाटणारी कृतज्ञता हीच माझ्या कामाची खरी पावती.- प्रकाश शिलेदार

सेवानिवृत्तीनंतर इंग्रजीचा क्लास सात वर्षे घेतला. त्यानंतर घराजवळच एक पार्क तयार झाला. त्याच्या देखरेखीच्या निमित्ताने ‘ज्येष्ठ नागरिक संघ’ स्थापन झाला. त्यानिमित्ताने विविध समाजोपयोगी उपक्रम हाती घेतले. स्वच्छता अभियान, बेटी बचाओ अभियानासाठी पथनाट्य, साक्षरता अभियान घेतले. गेली चौदा वर्षे प्लास्टिक पिशव्यांच्या वापराविरुद्ध जनजागृती करतो. सर्व करत असताना आम्ही प्रेमाने बांधले गेलो. आमचा संघ आमचा परिवार झाला, श्वास झाला, संजीवनी झाला. आमचे वय आम्ही विसरलो. प्रत्येकाची स्वतंत्र ओळख निर्माण झाली.- आसावरी फडणीस

मी समाजशास्त्र विभाग प्रमुख पदावरून निवृत्त झाले. स्वत:ला सदैव कोणत्या ना कोणत्या सत्कर्मात गुंतवणे, समर्पितभावाने ते सत्कर्म पूर्णत्वास नेणे हा पूर्वीचाच परिपाठ या काळात अधिक विस्तारला. योगप्रेमी असल्याने योगवर्ग घेणे, व्याधिग्रस्तांना योगमार्गदर्शन करणे, मनोरुग्णांचे ध्यानधारणाने मनोबल वृद्धिंगत करणे, स्पर्धात्मक परीक्षार्थीना विनामूल्य मार्गदर्शन करणे हे अव्याहत चालू आहे. वाचन कट्ट्यामार्फत विचारमंथन व नवविचारांची सकारात्मकतेची पेरणी होते. ‘जगणे म्हणजे उधळीत जाणे हृदयातील आनंद.’ याची अनुभूती या निवृत्तीकाळात येते.- प्रा. डॉ. ज्योती डोईफोडे

ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करणाऱ्या ‘विद्यादान सहायक मंडळ’ या संस्थेशी १२ वर्षं संस्थापक, विश्वस्त या नात्याने जोडून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम केले. ठाण्याच्या ‘आयपीएच’ संस्थेतून विवेकनिष्ठ आचारपद्धती व पुण्याच्या भांडारकर संस्थेमधून महाभारत १८ पर्वे, वेदांत, वेदांगांची ओळख असे अभ्यासक्रम पूर्ण केले. सुगम संगीताच्या सात परीक्षा दिल्या, भगवद्गीता मुखोद्गत करून पारितोषिक मिळवले व पूर्ण गीतेचे कुरुक्षेत्रावर जाऊन पठण केले. समविचारी मित्रमैत्रिणींसोबत महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील सेवाभावी संस्थांना भेटी देऊन त्यांना मदत करीत असतो.- रंजना कुळकर्णी

निवृत्तीनंतर आता करण्यासारखं काही उरलं नाही, असा निराशाजनक विचार मी कधीच केला नाही. फोनवर गोष्टी रेकॉर्ड करून ऑडिओ स्वरूपात पाठवायला सुरुवात केली. त्यातून करोनाकाळात घरात अडकलेल्या बालमित्रमंडळींसाठी व्हॉट्स अॅप गट बनवण्याची शक्कल निघाली. रोज एक नवीन गोष्ट रेकॉर्ड करून मी व्हॉट्सअॅप गटावर पोस्ट करू लागले. लहान मुलांसोबतच पालक आणि शिक्षकांतही या गोष्टी लोकप्रिय झाल्या. काही मुलं तर आवडलेल्या गोष्टी परत परत ऐकत असत. अनेक पालकांचे सकारात्मक अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचले. काही तरी भरीव आणि छान करू शकते असा आत्मविश्वास निर्माण झाला आणि जगणं खूप सुंदर होऊन गेलं.- अनुराधा गटणे

अमरावतीला मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापक पदावरून मी निवृत्त झालो. त्यानंतरच्या तगमगीनंतर अखेर एका पुष्प प्रदर्शनाच्या निमित्ताने सेवानिवृत्तीनंतर काय करावे याची दिशा मला मिळाली. झाडे लावणे आणि ते जगवणे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. असंख्य प्रकारची फुले आणि हँगिंग, मोस्टिक, इनडोअर, बोन्साय अशा प्रकारात मी माझे टेरेस गार्डन वाढवले. यात पुरस्कारही मिळाला. दरवर्षी एक जानेवारीला मी माझ्या मित्रमंडळींना फुलझाडे बघण्यास निमंत्रित करतो. सर्वांना एक फुलझाड सप्रेम भेट देतो. त्यामुळे त्यांच्याकडेसुद्धा फुलझाडांची बाग तयार झाली आहे.- दामोदर सबाने

वाचनाची आवड असल्याने नोकरीत असल्यापासून पाली भाषा शिकायला सुरुवात केली होतीच. नंतर त्यात एम. ए. केले. ‘बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल’ या शाळेची शाखा नाशिक रोड येथे सुरू केली. २०१४ मध्ये नाशिक रोड येथेच विद्यार्थ्यांसाठी एक वर्षाचा पाली भाषेचा पदविका अभ्यासक्रम सुरू केला.‘मातृभूमी प्रबोधन समिती’ या संस्थेमार्फत डिप्लोमा वर्ग सुरू केला. दरवर्षी २५ ते ३० विद्यार्थी पाली भाषा शिकण्यासाठी प्रवेश घेत असतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकण्याची इच्छा आहे, त्यांना ऑनलाइन शिकविले जाते. माझ्या पत्नीचा सहभाग असतो. याचमुळे निवृत्तीनंतर आमचे दोघांचेही आयुष्य खूप सुखकर झाले आहे.- संतोष जोपुळकर

मी एक निवृत्त प्राध्यापिका. ‘स्वयंसिद्धा’ या संस्थेतील उद्याोजिक स्त्रियांच्या यशकथा ‘मी उद्याोजक’ या मासिकासाठी लिहिल्या. संस्थेच्या ‘वाणी मुक्ती’ कार्यक्रमात मी स्त्रियांना मार्गदर्शन करते, ‘विचारा सांगते’ या उपक्रमात समुपदेशाचं काम करते. गोविंदराव कोरगावकर ट्रस्ट संचालित ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्रात सहली, स्नेहसंमेलन, स्त्रियांचे माहेरपण, सभासदांचे वाढदिवस आम्ही संचालिका मिळून करतो. येथे सुचेता कोरगावकर यांच्याबरोबर मी काम करते. याशिवाय अनेक ठिकाणी व्याख्यानेही घेते.- हेमा गंगातीरकर

एस. टी. महामंडळातून अभियंता पदावरून निवृत्त झालो. आता विविधसंस्थेचा सभासद होऊन विविध समाजोपयोगी उपक्रमांत सहभागी होतो. ‘बालविकास फाउंडेशन’ या संस्थेमार्फत प्राथमिक व माध्यमिक शिष्यवृत्ती सरावाच्या परीक्षा घेतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो. परिणामी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. ‘जनजागृती ग्राहक मंच’ या संस्थेत माझी सचिवपदी निवड झाली आहे. सेवानिवृत्ती- नंतरचे आयुष्य विधायक कार्यात व्यतीत करून समाजऋणातून अंशत: मुक्त व्हावे, असे माझे मत आहे.- रा. शं. ताकमोगे

मी गणिताचा प्राध्यापक म्हणून २००७ मध्ये निवृत्त झालो. पुढे गृहसंकुलात राहण्यास गेलो. तिथे ज्येष्ठ नागरिक संघ स्थापन केला. योगाचे धडे घेत राहिलो. वयाच्या ६८ व्या वर्षी धावण्यास सुरुवात केली. आज ७८ व्या वर्षी २१ किलोमीटरच्या चाळीस स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांकडून काही रक्कम गोळा करत आत्तापर्यंत साडे तीन लाख रुपयांची देणगी समाजातील गरजवंतांना दिली आहे. २००८ पासून ज्येष्ठांसाठी विनामोबदला योग वर्ग सुरू आहे.- एस. आर. पाटील

मुलीला मी तिच्या लहानपणी वेळ देऊ शकले नव्हते. त्यामुळे निवृत्तीनंतर माझा नातू माझ्यासाठी दुहेरी आनंद होता. मी त्याच्यात माझ्या छोट्या मुलीला पाहायचे. त्याला सांभाळताना आजीपण, आईपण असा दुहेरी आनंद आणि समाधान मिळाले. समवयस्क, समविचारांचे एक सुंदर मैत्र बनले. राहून गेलेले छंद, आवडी, कला, नवनिर्मितीची क्षमता व त्यातून आनंद मिळवण्यासाठी ‘छंदानंद’ ग्रुप तयार झाला. आठवड्यातून आम्ही सगळे एकदा भेटतो. विचारांची, अनुभवांची, साहित्याची देवाणघेवाण होते. वाढदिवस, सहली, अधूनमधून खाऊगल्ली. एकमेकांच्या आनंदात सहभागी होण्यात समाधान मिळते, मग ते घर असो की आमचा छंदानंद ग्रुप.- आशा रानडे

निवृत्तीनंतर ‘मेडिकल प्रॅक्टिस’ बंद केल्यावर आता स्वत:साठी जगायचे ठरवले. गरीब मुलांना शिकवत होतेच. माझ्या गावच्या, चौकच्या ‘ज्येष्ठ नागरिक संघा’ची स्थापना केली, तिथले ग्रंथालय वाढवले. पनवेलच्या ज्येष्ठ नागरिक संघात आरोग्य समिती स्थापन केली. त्यामार्फत विविध आरोग्य शिबिरं घेतली, समाजप्रबोधन केले. महिला दिनानिमित अत्याचारसंबंधी जागृती केली. यात पंडिता रमाबाईचे चरित्र कथन असे विविध उपक्रम केले. साहित्य आणि समाजकार्य यात वेळ सत्कारणी लागतो आहे.- अपर्णा वाळिंबे

मुख्याध्यापिका या पदावरून निवृत्त झाले. सामाजिक उपक्रम करण्यासाठी ‘रोटरी समाज दल’, हरिपूर या संस्थेची सभासद झाले. श्रमिक वर्गातून आलेल्या जिल्हा परिषद शाळेतील मुलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवतो. ग्रामपंचायतीचे ग्रंथालय २०१४ पासून चालवायला घेतले. विद्यार्थ्यांना वाचन मार्गदर्शन, दिवाळी अंक योजना, प्रौढांसाठी उत्कृष्ट वाचक पुरस्कार, असे उपक्रम घेत आहोत. पर्यावरणीय उपक्रमांमध्ये घरोघरी जाऊन गार्बेज व्हॅनद्वारे प्लास्टिक संकलन केले जाते.- आरती अरविंद लिमये

प्राध्यापक होते. स्वेच्छानिवृत्ती घेतली, पण विद्यार्थ्यांना शिकवण्याची इच्छा व्याकूळ करीत असे. तेव्हा दादाने आणून दिलेली ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. ती माझ्यासाठी संजीवक ठरली. त्यातील विलक्षण काव्य सुंदरता, मानवतेची शिकवण, जगणं सोपं करणारं तत्त्वज्ञान याने मी हरखून गेले. त्या आनंदाच्या भरात अनेक टिपणं झाली. ज्ञानेश्वरी हा एक संपन्न करणारा अनुभव ठरला. त्याविषयी बोलावं या कल्पनेतून व्याख्यानाला सुरुवात झाली. ‘ज्ञानेश्वरी’ या विषयावर ठिकठिकाणी व्याख्यानं होत आहेत.- प्रा. मनीषा रत्नाकर रावराणे

पाच वर्षे आधीच स्वेच्छानिवृत्ती घेताना छंद जोपासण्यासाठीचा निवांतपणा मला मोलाचा वाटत होता. पण अचानक एक सुप्त आकांक्षा पूर्ण करण्याची संधी समोर आली. ‘मराठी नाटक समूह’ आयोजित स्पर्धेच्या निमित्ताने दोन अंकी नाटक लिहिले, त्या ‘गर्भाशयाची दंतकथा’ या माझ्या नाट्यसंहितेला दुसरे पारितोषिक मिळाले. एका महत्त्वाच्या विषयाची मान्यवर नाट्यकर्मींनी घेतलेली दखल ही माझ्यासाठी आत्मबळाची शिदोरी ठरली. आता इमारतीच्या पुनर्विकासाचे ध्येय समोर आहे. त्यासाठी निरपेक्ष कार्यकारी समितीला एकसंध ठेवणे हादेखील मानसिक व्यायामच आहे.- छाया सावंत

मी वयाच्या ३२व्या वर्षापासून ‘मराठी विज्ञान परिषदे’चे जमेल तसे काम करायला सुरुवात केली. वयाच्या ५४व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतली. निवृत्तीचे पैसे आयुष्यभर नीट वापरले तर पुरणारे होते त्यामुळे मी परिषदेचे काम पूर्ण वेळ करायचे ठरवले आणि आता ८२व्या वर्षीही करीत आहे. माझ्या मानद कार्यवाहपदाला ५० वर्षे पुरी होतील. या दरम्यान मोठीमोठी माणसे भेटली. त्यातच आनंद आहे.- अ. पां. देशपांडे

३७ वर्षं साहाय्यक शिक्षक म्हणून सेवाकार्य करून मी सेवानिवृत्त झालो. पण योगायोगाने इतर शाळेत आणि शिकवणी वर्गात काम करण्याची संधी मिळाली. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक समुपदेशन- मार्गदर्शन करणं, विशेषत: १० वीच्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना मार्गदर्शन आणि समस्या निराकरणासाठी मदत करणं, व्याख्याने आयोजित करणं यात माझी निवृत्तीनंतरची सतरा वर्षं केव्हा आणि कशी सरली कळलं नाही. शैक्षणिक विषयांची दोन पुस्तकं ‘ग्रंथाली’ने प्रकाशित केली. तसेच यूट्यूबवरून ‘सुजाण पालकत्व’ या विषयावर चोवीस एपिसोडची मालिका प्रदर्शित करू शकलो याचा आनंद आहे.- फ्रान्सिस डिमेलो

‘बीएसएनएल’मधून उपमंडल अधिकारी पदावरून मला अचानक मुदतपूर्व निवृत्ती घ्यावी लागली. त्या वेळी करोनाची लाट होती, म्हणून त्या काळात अनेक ऑनलाइन स्पर्धांत भाग घेतला. माझी ऑनलाइन अभिवाचन करण्याची सुरुवात यामुळेच झाली. आणि मी निरनिराळ्या कथांचे अभिवाचन करून यूट्यूबवर अपलोड करू लागले. प्रतिसादही उत्तम मिळाला. मला त्यातून खूप समाधान, आनंद मिळाला. सध्या मी ‘शिवाजी विद्यापीठा’तून नाट्यशास्त्र पदविका अभ्यासक्रम करते आहे. यामुळे मला नाटकाची सर्व अंगे अर्थात लेखन, दिग्दर्शन, अभिनय, नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना हे सर्व शिकता आले. काही नाटकांचे लेखन आणि दिग्दर्शन करून इतरांचे मनोरंजन करू शकले. सध्या येथील स्थानिक टीव्ही चॅनलवर कथा अभिवाचनही करत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे नोकरीत असताना होते, त्यापेक्षा व्यग्र आणि आनंदी असे माझे सध्याचे जीवन आहे.- विशाखा जोशी

२८ वर्षांच्या नोकरीनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतली. मी संगीतप्रेमी आहे, शिवाय संगीत विशारद असल्याने ठरवले होते की, संगीत आपल्याला तारून नेईलच. निवृत्ती घेतल्यानंतर लगेच तबल्याचा क्लास सुरू केला. तबलावादनाच्या परीक्षा दिल्या. त्यानंतर हार्मोनियमचा क्लास, रियाझ सुरू केला. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात मी सहभागी होते. निवृत्तीनंतर युरोप, बाली, कर्नाटक, अरुणाचल, मेघालय, आसाम फिरून आले. आजही मैत्रिणींसोबत मस्त धमाल करते. नोकरीच्या काळात करता येत नव्हते ते मी आता पुरेपूर करते आहे.- अनिता सुनील पाध्ये

निवृत्तीचा निर्णय घेतल्यापासून सुप्तावस्थेतील स्वप्नांना पंख फुटले आणि शिवण क्लास, फॅशन डिझायनिंग, दागिने बनवणे, गृह व्यवस्थापन, वनस्पतिशास्त्र, आयुर्वेद, मसाज, गणित, मानसशास्त्र, भगवद्गीता, संस्कृत आदी हौसेचे अनेक अभ्यासक्रम केले. वर्तमानपत्र वाचन, कोडी सोडवणे, अवांतर वाचन, लिहिण्याचा सराव ठेवला. श्लोक पाठांतराची कास धरली. योगसाधनेचा आश्रय घेतला. दु:ख न उगाळता आयुष्यात चुकलेल्या, चुका झालेल्या गोष्टींचा मागोवा घेऊन सुधारण्याचा प्रयत्न चालू आहे. मुख्य म्हणजे हौसेला मोल दिले.- स्नेहल अच्युत सातार्डेकर

निवृत्तीनंतर शरीराचा साज, मनाचा माज आणि आर्थिक बाज यांचा मेळ घालण्याची कला अवगत असली पाहिजे. मी आता विचारपूर्वक वेळ घालवते. हल्ली मी फोनवर मैत्रिणीशी फार बोलत नाही, पुस्तके वाचते. गीता पाठांतराला जाते. पूर्वी शिकलेले आणि नंतर मागे पडलेले भरतकाम आता करते. सांगलीमध्ये मेघालयातून शिक्षणासाठी येणाऱ्या मुलांना मराठी शिकवते. वेगळी भाषा, संस्कार असणाऱ्या या मुलांमध्ये मिसळणं अशा व्यग्र दिनक्रमामुळे मी खूश असते.- उमा कानिटकर

मी बँकेतून ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतली आणि समाजासाठी काही करण्याचा निर्धार केला. मी माझा वेळ योग व ध्यानवर्गांच्या आयोजनामध्ये घालवतो. संतुलित आणि पौष्टिक आहाराचं महत्त्व पटवून देण्यासाठी लोकांमध्ये जागरूकता निर्माण करतो. चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारे आजार आणि त्यावरील उपाय या संदर्भात संवाद साधतो. तसेच वाढती ऑनलाइन फसवणूक लक्षात घेता, आर्थिक साक्षरतेचे धडे देत लोकांना सुरक्षित आर्थिक व्यवहारांची माहिती देतो. हीच माझी खरी समाधानी निवृत्ती आहे.- सुरेश येवतीकर

शाळेतून सेवानिवृत्त झाले. सहा मैत्रिणींनी मिळून ‘विनता कस्तुरी महिला उद्याोग’ सुरू केला व कापड उद्याोगात उडी मारली. आठ स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिला. ‘स्वच्छ निफाड, सुंदर निफाड’अंतर्गत जनजागृती उपक्रम सर्व गावाला बरोबर घेऊन निरंतर राबवत आहोत.- मालती वाघवकर

आठ वर्षांपूर्वी मी ग्रंथपाल पदावरून निवृत्ती घेतली. दररोज पहाटे नियमितपणे चालण्याचा व्यायाम एक तास करतो. भरपूर वाचतो. ‘योग शिक्षक’ व ‘निसर्गोपचारा’चे अभ्यासक्रमही पूर्ण केले. घरी मी मुलांसाठी एक छोटे ग्रंथालय सुरू केले आहे. विद्यार्थ्यांकरिता अभ्यासिका सुरू केली आहे. गावात मी ‘निसर्गायण शिबीर’ घेतले. युवकांसाठी ‘आकार जीवनाला’ ही कार्यशाळा घेतली. दिलीप कुलकर्णी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन मी स्वत:ला निसर्गस्नेही जीवनशैलीत परिवर्तित केले आहे.- राजेंद्र रामचंद्र घोडके

ऑगस्ट २०२१मध्ये मी माझ्या आवडत्या शिक्षकी पेशातून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर आवडीप्रमाणे बगिचा फुलवला. झाडांची काळजी घेण्यात, कंपोस्ट आणि इतर सेंद्रिय खते बनवण्यात आनंदात वेळ जातो. वाचनाचा छंद आहेच. ऑनलाइन ‘गीता कंठस्थीकरण’ शिकतेय. संपूर्ण अठरा अध्याय कंठस्थ करण्याचा मानस आहे. पूर्वीपासून मी जपानी भाषा शिकत होते, आता जपानी भाषेच्या परीक्षा देण्याचे ठरवले. त्यामुळे अभ्यास, क्लास, परीक्षेची तयारी यात छान वेळ जातो. ऑनलाइन ग्रुपस्टडीमुळे इतरांशी छान संवादही होतो. गायन, संगीताची आवड आहे. शेजारच्या मैत्रिणी हार्मोनियम शिकायला येतात, त्यांनाच गीतेचे अध्यायही शिकवते.- दीपा विवेक खेकाळे

निवृत्त झाल्यानंतर मी कॉलनीतल्या ‘पूर्णब्रह्म सेवा समिती’सोबत जोडले गेले. आम्ही दर तीन महिन्यांनी वृद्धाश्रम, अपंग बालकांचे गृह, मतिमंद मुलांची शाळा किंवा संस्थेला आम्ही भेट देतो आणि त्यांना हव्या असलेल्या वस्तू देणगी रूपात देतो. मी लहान मुलांच्या संस्कार वर्गात मार्गदर्शन करते. याशिवाय ‘पद्मागंधा साहित्य प्रतिष्ठाना’त लेखन, तबलावादन, गायन वर्ग यातही माझा वेळ छान घालवते. शासकीय नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर, ताणमुक्ती काय असते हे अनुभवते आहे. निवृत्तीनंतरचं जीवन खरंच सुंदर असतं.- डॉ. शुभांगी अविनाश रोडे

महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातून सेवानिवृत्त झालो. सेवानिवृत्तीनंतर ‘ब्ल्यू क्रॉस वेल्फेअर फाउंडेशन’ सांगली या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पशुपालकांसाठी वेबिनार आयोजित करायला सुरुवात केली. १३०पेक्षा जास्त कार्यक्रम घेतले. अनेक वृत्तपत्रांमध्ये पशुसंवर्धनविषयक वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणारे लेख आजही लिहिणे चालू आहे. मुलाकडे नेदरलँड, बंधूकडे अमेरिकेत जाण्याचा योग आला. समाजमाध्यमातून देखील वेगवेगळ्या ठिकाणी पर्यटनासाठी फिरताना सर्वसामान्य पशुपालकांच्या आवडीचे विषय मांडत असतो. निवृत्त होऊन सात वर्षे झाली वेळ कसा घालवायचा हा प्रश्न आजही समोर येत नाही हे विशेष.- डॉ. व्यंकटराव घोरपडे

एका प्रथितयश साखर कारखान्यातून सेवानिवृत्त झालो. ‘निराधारांची उपासमार’ या विषयावर ‘मातृभूमी प्रतिष्ठान, बार्शी’ यांच्या सोबत ते काम करू लागलो. बार्शी व पंचक्रोशीत ज्यांना दोन वेळचे जेवण मिळू शकत नाही असे निराधार, वृद्ध, अपंग, दुर्बल घटकातील स्त्री-पुरुष यांना दोन वेळचे मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला.- अशोक भगवान इनामदार

‘‘निवृत्ती नव्हे ही, नवी आवृत्ती जीवनाची, भरभरून जगण्याची, नव्या उमेदीची, राहिलेल्या स्वप्नपूर्तीची.’’ निवृत्त झाले म्हणून मला नोकरीच्या बऱ्याच ऑफर्स होत्या, परंतु पुन्हा त्या साचेबंद व्यूहात अडकायचं नाही, असं ठरवलं होतं. त्याऐवजी एवढ्या वर्षांच्या अनुभवाचा सर्वसामान्य लोकांना काही लाभ झाला, तर बरंच होईल, या हेतूने दोन पुस्तकं ऑनलाइन प्रकाशित केली. प्रसंगानुरूप छोट्या कविता करण्याचा आणि वाढदिवस, लग्न, बारसं, वास्तू, अशा प्रसंगी शुभेच्छा रूपात पाठवायचा छंद जोपासला. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी निसर्गोपचार शिबिराला जाते. त्याप्रमाणे जीवनशैलीचा अवलंब करते.- प्रा. आरती पसारकर

निवृत्तीपश्चात मराठी वाचनाचा आनंद उपभोगला. त्या वाचनातूनच लिहिण्याची उर्मी उत्पन्न झाली. लिखाणाला दाद मिळाल्यावर विविध साहित्य क्षेत्रांत माझी लेखणी सरसावली. प्रकाशनाचा व पारितोषिक प्राप्तीचा आनंद प्रोत्साहित करीत होताच. त्याने माझ्या कलासक्त व्यक्तिमत्त्वाला आव्हान मिळाले.- प्रा. रेखा नाबर

निवृत्ती म्हणजे खरं तर आयुष्याची सोनेरी संध्याकाळ असते. आतापर्यंत १६ देश पाहून झाले. सोसायटीमधील जेष्ठ नागरिकांना हलकेफुलके व्यायाम शिकवते. महिन्यातून एकदा एखादा विषय घेऊन त्यांना बोलतं करण्याचा प्रयत्न करते. या छोट्या छोट्या गोष्टीतूनसुद्धा मैत्री वाढते. सहजीवन जगता येतं.- प्रा. बतुलबी पठाण

बँकेतून निवृत्त झाले आणि लगेचच मुलुंडमध्ये समर्थ भक्त मकरंदबुवा सुमंत रामदासी यांचं देवी भागवत ऐकण्याचा योग आला. त्यानंतर अनेक प्रवचने, अनेक कीर्तने यूट्यूबवर ऐकली. डिसेंबर २०२२मध्ये घरीच वीस-पंचवीस मैत्रिणींना बोलावून दीड तासाचा छोटासा कथा निरूपणाचा कार्यक्रम केला. मग असे कार्यक्रम करण्यामध्ये रस वाटू लागला. आतापर्यंत १६ कार्यक्रम केले. श्रोत्यांच्या विनंतीनुसार कथा निरूपणात धार्मिक कथानकांबरोबरच अनामिक स्वातंत्र्यसैनिक, महाराणा प्रताप, आर्य चाणक्य असे थोडे वेगळे विषय घेतले. ‘कथाकार बना’ हा डॉ. चारुदत्त आफळे यांच्या अकादमीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. असे कार्यक्रम मनाला खूप आनंद देतात.- अरुणा श्रीनिवास अग्निहोत्री

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यांचीही पत्रे मिळाली

साधना ताम्हणे, देवनाथ रामचंद्रजी खापरे, संजीव मधुमालती पद्माकर काळकर, तृप्ती विचारे, कौस्तुभ ताम्हनकर, सचिन कलस, माधुरी प्र. मुजुमदार, गोविंद काजरोळकर, संतोष पवार, शर्वरी अमित देशपांडे, वासंती जामठे, वर्षा राजहंस, ललिता इनामदार, प्रकाश चांदे, रवी जोशी, यशवंत चव्हाण, डॉ. सुषमा कुडाळकर, अंजली भातखंडे, राघवेंद्र मण्णूर, कांचन शेकोकर, यतीन कुलकर्णी, सुजाता आ.लेले, मंदा सुहास कुलकर्णी, शिरीषकुमार पाठक, ऋतुजा फडके, माधवी तिळवे, प्र. मु. काळे, प्रमोद कुंदाजी कडू, विनय सौदागर, सुषमा करदेकर, अनिल अयाचित, नीता शेरे, सुनील वागळे, प्र. श्री. गोखले, प्रा. प्रकाश माळी, दत्तकुमार धामणस्कर, शरद फडणवीस, एम. के.भामरे, विलास समेळ, अनील राव, ललिता इनामदार, डॉ. शुभा थत्ते, दीप्ती जोशी, शुभदा अघोर, सुनील वागळे, अरुण शांतीनाथ, अरुण देशपांडे, शर्वरी देशपांडे, प्रशांत काळकर, प्रभाकर कुलकर्र्णी, दीपाली कात्रे, वामन पंडित, स्नेहल चव्हाण, राजेंद्र पाटील, धनराज खरटमल, निश्चिंता गोखले, डॉ. श्याम वसुधा रघुनाथ जोशी, अॅड. सुभाष चौबळ