‘कॉमेडी’ या कलामाध्यमाने मला दिखाऊ आणि कंटाळवाणा कलाकार (आणि व्यक्ती) होण्यापासून वाचवलं, असं रत्ना पाठक शाह नेहमीच सांगतात. ‘टेलिव्हिजन’ने त्यांना फक्त त्यांच्यातलं विनोदाचं कौशल्य विकसित करण्याची संधी दिली नाही तर पहिल्यांदा पैसे मिळवून देणाऱ्या भूमिकाही दिल्या. ‘इधर उधर’, ‘फिल्मी चक्कर’, ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ आदी मालिकांमुळे सादरीकरणाच्या कलेला त्यांना नव्याने समजून घेता आलं, अभिनयाची नवी परिभाषा समजली.
आम्ही नवीन घरात राहायला गेलो १९८४ मध्ये. घर लावणं सुरू होतं, तेव्हाच कामाची एक नवी संधी माझ्यासमोर आली आणि त्यानं माझं व्यावसायिक आयुष्य बदलून गेलं. निर्माते-दिग्दर्शक आनंद महेंद्रू यांनी मला एका मालिकेसाठी विचारलं. भारतातलं दूरचित्रवाणी क्षेत्र विस्तारू लागलं होतं, त्याचे हे सुरुवातीचे दिवस होते. १९८२मध्ये ‘दूरदर्शन’ राष्ट्रीय झालं (डीडी नॅशनल). त्याच वर्षी देशात रंगीत टीव्ही आला. ‘हमलोग’ आणि ‘ये जो हैं जिंदगी’ या पहिल्या प्रायोजित मालिका. त्यातली पात्रं अगदी घराघरांत पोहोचली.
यावेळी आनंद महेंद्रूंना एक विनोदी मालिका करायची होती. दोन नोकरदार तरुणी आणि त्यांचा तरुण ‘पेइंग गेस्ट’, असा साधारण विषय. या दोघींतली एक जाहिरात कंपनीत काम करणारी, हुशार आणि प्रामाणिक, तर दुसरी- हवाईसुंदरी; ‘डंब ब्लाँड’ म्हणावी अशी, फॅशनचं वेड असलेली, जराशी बावळट आणि पुरुषांशी मोकळंढाकळं वागणारी. आनंद महेंद्रूंनी या दोन भूमिकांसाठी मला आणि माझ्या लहान बहिणीला- सुप्रियाला (सुप्रिया पाठक) विचारलं होतं, तर ‘पेइंग गेस्ट’ची भूमिका रवी बासवानी करणार होता. प्रथम हे सगळं छानच वाटत होतं, पण त्यांनी जसजसे मला एकेक प्रसंग रंगवून सांगायला सुरुवात केली, तसतसा माझा उत्साह मावळू लागला. कारण मला खात्री झाली की, त्यांना मी हुशार-प्रामाणिक-गंभीर मुलीच्याच भूमिकेसाठी हवी असेन, त्या विचारानं मी खट्टू झाले. पण अर्थातच काहीही करून हे काम हातचं जाऊ देणं परवडणारं नव्हतं, कारण अनेक वर्षांनंतर प्रथमच पैसे मिळवून देणारी भूमिका माझ्याकडे आली होती. पण तेवढ्यात आनंदनी एक ‘गूगली’ टाकली. त्यांनी सांगितलं, मी बावळट एअरहोस्टेसची- ‘सुनीता’ची भूमिका करायची आहे! खरं तर मी आनंदानं उडीच मारायला हवी होती; पण झालं उलटंच. मला भीतीच वाटायला लागली. तोपर्यंत मी विनोदी भूमिका केलीच नव्हती आणि टीव्हीच्या नव्या माध्यमात आम्ही सगळे तसे नवखे होतो. उत्साह दांडगा, पण अनुभव त्यामानानं शून्य. माझा ‘टीव्ही’मधला प्रवास हा असा सुरू झाला. पण अभिनेत्री म्हणून एक मोठा टप्पा पुढच्या वाटेवर होता…
काही महिन्यांनी वर्सोव्याच्या एका फ्लॅटमध्ये ‘इधर उधर’ मालिकेचं चित्रीकरण आम्ही सुरू केलं. पहिल्याच दिवशी एक धक्का बसला, तो म्हणजे मला त्यात मिनी स्कर्ट घालायचा होता आणि मी पूर्वी कधीही केला नसेल एवढा मेकअप करायचा होता. मी आणि आमचा ‘कॉश्च्युम डिझायनर’ सुनीता कशी दिसायला हवी, यावर काम करत होतो. तेव्हा त्यानं मला सांगितलं की, त्यानं मालिकेच्या एका निर्मात्याला आनंदशी वाद घालताना ऐकलं. सुनीताच्या भूमिकेसाठी रत्ना योग्य नाही. तिला बदलण्याचा विचार करावा म्हणे. आधीच ते कपडे नि मेकअप यामुळे विचित्र वाटत होतं आणि त्यात ही माहिती! पण मग मी ठरवलं, की याचा आपल्यावर परिणाम होऊ देऊन चालणार नाहीए… मुहूर्ताच्या पहिल्यावहिल्या शॉटचं चित्रीकरण सुरू झालं आणि काय… माझ्याबद्दल खात्री नसलेले- तेच निर्माते कॅमेऱ्याच्या मागे बसले होते. त्यांचं माझ्याकडे लक्ष गेलं आणि पुढच्या काही गोष्टी जणू ‘स्लो मोशन’मध्ये घडताना मला दिसल्या… त्यांच्या समोर कुणी वेगळीच मुलगी उभी होती. निळा मिनी स्कर्ट घातलेली, कानात मोठ्ठे डूल, कपाळावर कुरळ्या केसांची झुलपं आणि हा सगळा सरंजाम ऐटीत मिरवण्याचा भाव चेहऱ्यावर! त्यांचा ‘आ’ तसाच वासलेला राहिला. अर्थातच मला ते बघून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आधी डळमळीत झालेला माझा आत्मविश्वास त्या काही क्षणांत परत मिळालाच, पण खूप समाधानही वाटलं. ‘कॉमेडी’ या प्रकाराबद्दल प्रेम वाटायला तिथूनच सुरुवात झाली…
मी अनेकदा म्हणते की, ‘कॉमेडी’नंच मला तारलंय. हा प्रकार हाताळताना मला जाणवलं की, माणसाच्या अंगी असलेलं कसब आणि केवळ अभिनयाबद्दलचाच नव्हे तर एकंदरीतच आयुष्याबद्दलचा दृष्टिकोन, या दोन्हींविषयी खूप माहिती करून घेण्यासारखं आहे. ‘कॉमेडी’नं मला मोकळं केलं. धोके पत्करण्याचं धाडस मी करू लागले. स्वत:कडे वेगळ्या नजरेतून पाहायला आणि प्रेक्षकांशी नाळ जोडली जायला याच माध्यमाची मदत झाली. लहान असताना मी जो अभिनय पाहात होते, त्या व्यक्तिरेखा छळ होणाऱ्या, दु:खी, दडपशाही सहन करणाऱ्या किंवा मग आक्रमक, ‘सटकू’ माणसांच्या असत. हाच काय तो अभिनय! असं मला वाटायचं. मात्र विनोदी व्यक्तिरेखा साकारताना संपूर्णत: नवी परिभाषा सापडली.
‘इधर उधर’च्या आम्ही तालमी करायचो, आयत्या वेळी पदरचे संवाद म्हणायचो, आमचे लेखक लिलिपुट (एम. एम. फारुखी- ते ‘इधर उधर’मध्ये कामही करत.) यांच्याशी मालिकेतल्या प्रसंगांवर चर्चा करायचो. रवीकडे थोडी आगळ्या प्रकारची विनोदबुद्धी होती आणि विनोदी व्यक्तिरेखा साकारण्याचा उत्तम अनुभव होता. सुप्रियाकडे बहुतेक गोष्टींत विनोद शोधण्याची कला आहे. आमचा सगळ्यांचा एकमेकांवर विश्वास होता. एक वेगळी मालिका करायचीय ही महत्त्वाकांक्षा होती. रोज भरपूर वेळ देऊन आम्ही पहिल्या १३ भागांचं चित्रीकरण केलं. सेटवर नुसता गोंधळ सुरू असे. वादविवादही झडायचे. निर्मात्यांच्या संयमाचा कस लागायचा. पण त्यातून जे घडलं, त्याचा मला आजही अभिमान वाटतो. गंमत बघा- मुली आणि मुलं मित्र-मित्र म्हणून एकत्र राहताहेत, असं दाखवणारी ‘इधर उधर’ १९८५ मध्ये आली आणि जगप्रसिद्ध ‘फ्रेंड्स’ ही मालिका आली १९९४ मध्ये!
रोज मी काहीतरी नवीन शिकत होते. विशेषत: अभिनयातल्या देहबोलीविषयी. संवाद म्हणताना ‘टायमिंग’ किती महत्त्वाचं आहे, हे लगेच अंगवळणी पडलं. पण देहबोली कशी असावी, याविषयीचं माझं ज्ञान तोकडं होतं. एका प्रसंगात मी ओल्या फरशीवरून घसरून पडते असं दाखवायचं होतं. अभिनेते टॉमऑल्टर माझ्याबरोबर होते. चित्रीकरण सुरू झालं. मी घसरून पडलेय असं दाखवलं आणि टॉम ऑल्टर त्या शॉटच्या मध्येच मोठ्यानं हसले! नंतर मी तो शॉट बघितला तेव्हा मला ते का हसले हे समजलं. ओल्या फरशीवरून घसरल्यावर मी तसंच वेडंवाकडं जमिनीवर पडणं अपेक्षित होतं. मी मात्र घसरण्याचं काम झाल्यावर जमिनीवर उठून बसले होते आणि नंतर शिस्तीत पाय पसरून पडून राहण्याचं नाटक केलं होतं! तो शॉट अजूनही माझ्या स्वप्नात येतो आणि धडकी भरवतो! आपण अभिनयात किती कमी होतो, या विचारानं लाजही वाटते. पण अभिनयाचं कसब अजून किती शिकणं बाकी आहे, याची जाणीव मला त्या शॉटमध्ये झाली. दुर्दैवानं पुढे ज्या विनोदी भूमिका मी केल्या, त्यात देहबोली वापरायला फारसा वावच नव्हता. आपल्या विनोदी मालिकांमध्येही संवादच जास्त असतात. काही वेळा उत्तम भाषिक विनोद असतो, पण प्रामुख्यानं भर असतो सुमार विनोदांवर. पण त्यामुळे देहबोलीचं महत्त्व मला जास्तच पटलं आणि चांगल्या प्रकारे देहबोली कशी वापरता येईल, हे मी शिकू लागले. आपल्या भूमिकेत अचूकता आणण्याचं कौशल्य मी आत्मसात केलं. विनोदी व्यक्तिरेखांत त्याचा खूप वाटा असतो. मी ते शिकण्याचं मोठं श्रेय अभिनेता सतीश शहा याला आहे. १९९६ मध्ये आम्ही ‘फिल्मी चक्कर’मध्ये एकत्र काम केलं. लाजरेपणा बाजूला ठेवून आपल्यात असलेला बावळटपणा स्वीकारणं आणि अभिनय करताना साध्या साध्या गोष्टींमध्येही मजा करणं, हे या मालिकेनं मला शिकवलं. संवाद कसेही असले तरी सतीश त्यात विनोद करू शकायचा! त्याच्याबरोबर काम करताना गमती-गमतीत शिकायला मिळायचं आणि मी ते माझे संवाद म्हणताना अमलात आणायचे.
अनेकदा अभिनेत्यांना सुमार दर्जाच्या संहिता आपणच सुधारून वेळ मारून न्यावी लागायची. ते करताना विनोद उत्तम वठावा म्हणून काय करायला हवं हे मला समजलं. अर्थात सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचा अभिनेते म्हणून एकमेकांवर असलेला विश्वास आणि एकत्र काम करताना जो आनंद मिळतो, तो! मी टीव्हीसाठी जे-जे काम केलं, त्या सगळ्या ठिकाणी मला हाच अनुभव आला. याबाबतीत मी भाग्यवानच, कारण इतर टीव्ही मालिकांच्या सेटवरची एकमेकांना पाण्यात पाहण्याची वृत्ती, एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न, भांडणं, याचे अत्यंत वाईट किस्से ऐकायला मिळतात.
२००४ मध्ये आलेली ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ ही मालिका माझ्यासाठी ‘सोने पे सुहागा’च होती. माझ्या इतर कोणत्याही कामापेक्षा ही मालिका अधिक लोकांनी पाहिलीय. त्यातली ‘माया’ची भूमिका माझी प्रतिमाच झाली.
‘साराभाई’ सर्वच अंगांनी स्वप्नवत होतं. आतिष कपाडियांनी लिहिलेल्या संहितांवर आयत्या वेळी काही काम करावं लागायचं नाही. दिग्दर्शक देवेन भोजाणी स्वत: अभिनेते असल्यामुळे अभिनेत्यांची बलस्थानं आणि दुर्बलस्थानं त्यांना माहीत होती. ही मालिका जशी हवी तशीच घडावी म्हणून निर्माते जे. डी. मजेठिया तयार होते. अभिनेत्यांचा एकमेकांवर विश्वास होता त्यामुळे सर्वांचा मिळून एक मऊसूत गोफ विणला गेला. ‘साराभाई’मधल्या व्यक्तिरेखा स्पष्ट समोर उभ्या राहतील अशाच प्रकारे लिहिलेल्या होत्या. सतीश शहाला तर मी ओळखत होतेच, पण सुमीत राघवन (साहिल साराभाई) हे मोठं े‘सरप्राईज’ होतं. त्याच्या भूमिकेत सतत नवीन काही शोधणारा आणि उत्तम गाणारा. त्याच्याबरोबर काम करताना मजा यायची, कारण त्याच्याकडे फेकलेला कोणताही चेंडू बरोबर टोलवण्याचा हजरजबाबीपणा त्याच्यात होता. राजेश कुमार आणि मी- रोसेश आणि मायाच्या नात्यात पटकन आणि चपखल बसलो. रुपाली (गांगुली) आणि मी मात्र स्वभावानं खूपच वेगळ्या होतो. या मालिकेतल्या मोनिषा आणि मायासारख्याच! पण मला आणि रुपालीला एकमेकींबद्दल आपलेपणा होता. त्यामुळेच माया आणि मोनिषाचे प्रसंग खुलायचे; ते कधी कटू वाटले नाहीत. याच मालिकेच्या ‘सीझन- २’मध्ये मात्र माया आणि जास्मिन या पात्रांच्या खडाजंगीची भट्टी जमली नाही. आमच्यात अभिनेत्री म्हणून तसं नातं तयार होऊ न शकल्यानं त्यांच्या नात्यातही तो जिवंतपणा येऊ शकला नाही.
एकूण ‘कॉमेडी’ या कला प्रकारात ‘सीझन- २’मध्ये पूर्वीची जान आणणं फार अवघड असतं, हेच मला ‘इधर उधर’ आणि ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मध्ये कळलं!
मालिका : साराभाई व्हर्सेस साराभाई