रेवती भागवत
पालकांकडे त्यांच्या मुलांनी शाळेतल्या मित्रमैत्रिणींविषयी एखादी तक्रार सांगितली तर किती पालक ही तक्रार गांभीर्याने ऐकतात? पण अनेकदा आपलं पाल्य त्यांच्याच वयाच्या मुलांच्या दादागिरीला (Bullying) बळी पडलेलं असू शकतं, हे आपल्या ध्यानातही येत नाही. या सर्वाचा खोल परिणाम त्यांच्या भावनिक आरोग्यावरच नाही तर दीर्घकालीन मानसिक आरोग्यावरही होत असतो. लहान मुलांच्या विश्वातही हे घडत असतं, जे आपण ऐकायला हवं आणि त्यांना तुमच्या प्रेमाचा आधार द्यायला हवा… हे सांगणारा लेख…
इरा, एक दिवस रडत रडत घरी आली आणि आईला सांगू लागली, ‘‘आज शाळेत मधल्या सुट्टीत ती मैत्रिणींबरोबर खेळत असताना मिया तिला बाजूला नेऊन म्हणाली, ‘‘चल, आज मी तुझं ट्रेनिंग घेणार आहे…’’ इराला काही कळेना. नाजूकशी इरा मियासारख्या धिप्पाड मैत्रिणीला काही बोलू शकली नाही आणि मैत्रीणच तर आहे काही तरी गंमतच करत असेल असं समजून तिच्याबरोबर गेली. नंतर मियाने तिला जरा धमकावणीच्या स्वरातच सांगितलं, ‘‘चल इरा, मला पाच उठाबशा काढून दाखव…’’ इराने गुपचूप काढल्या. त्यावर परत धमकावून तिनं सांगितलं, ‘‘आता उड्या मार…’’ आणि त्यालाही इरा बळी पडली. तिने उड्या मारून दाखविल्या. तेवढ्यात बेल वाजल्याने मियाने तिला सोडून दिलं. इरा सांगत होती खरी; परंतु तिच्या आईला हे जरा चमत्कारिक वाटलं. तिने इराला सांगितलं, ‘‘उद्या पुन्हा तिने असं काही सांगितलं तर तू तिच्याकडे दुर्लक्ष कर…’’ परंतु इरा पुन्हा दुसर्या दिवशी तशीच तक्रार घेऊन घरी आली आणि म्हणाली, ‘‘आज पण मिया तिला कोपर्यात घेऊन गेली आणि म्हणाली, ‘‘मी तुझा चेहरा बघितला की तुला जखमी करावंसं वाटतं…’’ तिच्या या बोलण्यावर मात्र इराची आई पुरेपूर घाबरली. त्यातलं गांभीर्य लक्षात घेऊन तिच्या आई-बाबांनी शाळेत येऊन मुख्याध्यापकांकडे लेखी तक्रार नोंदवली.
इराच्या या घटनेनंतर लगेचच रवीची घटना कळली. रवी, तेरा वर्षांचा विद्यार्थी. शाळेच्या व्हरांड्यात चालताना काही मुलांकडून त्याला नियमित त्रास दिला जायचा. रवीची चण थोडी नाजूक असल्याने आणि त्याचा आवाज अद्याप फुटलेला नसल्याने वर्गातील मुलं त्याच्या आवाजाची नक्कल करत. शाळेच्या व्हरांड्यात चालताना त्याला मुद्दाम ढकलत आणि पडल्यावर हसत. या सगळ्याचा त्याच्या मनावर इतका परिणाम झाला की तो घरी आल्यावरही कोपर्यात शांत बसून राही. आईवडिलांशीही बोलत नसे. मित्रांबरोबर खेळणंही त्याने सोडून दिलं होतं.
नऊ-दहा वर्षांच्या मियासारख्या किंवा रवीच्या वर्गातील बारा-तेरा वर्षांच्या मुलांमध्ये अशा विकृत आणि हिंसक कल्पना कशा येऊ शकतात, हा प्रश्न खूप गंभीर. मी जेव्हा माझ्या बालपणीच्या स्मृतीत डोकावून पाहिलं तेव्हा असं लक्षात आलं, की आमच्यासारख्या मध्यमवर्गीय लोकवस्तीतीत अगदी इतक्या हिंसक घटना नाही, पण दुसर्यांना त्रास देणार्या घटना आजूबाजूला घडतच होत्या. आमच्याच वसाहतीत आर्थिकदृष्ट्या बेताचं एक कुटुंब राहत होतं. त्या वेळी आमच्यातील काही मोठ्या आणि धडधाकट मुली त्या घरातील मुलींना खाली अंगणात खेळ खेळताना त्रास द्यायच्या. उदाहरणार्थ, खेळताना मुद्दाम त्यांच्यावर राज्य देणं, किंवा त्यांच्या दिसण्यावर, कपड्यांवर कुजबुजत बोलणं असे प्रकार अनेकदा होत. आता तर काळ पूर्णपणेच बदललाय. माध्यमांमध्ये झालेल्या क्रांतीमुळे सायबर छळाचे प्रकारही अदृश्य स्वरूपात शाळा-महाविद्यालयांमध्ये घडत असतात. एखाद्याला सतत अपमानास्पद संदेश पाठवणं, समाजमाध्यमांवर खोट्या अफवा पसरवणं किंवा छायाचित्रांचे संपादन करून ते अनेकांना पाठविणं हे सर्व छळाचे प्रकार आहेत, पण हे बहुतेक वेळा मोबाइल किंवा संगणकाच्या पडद्यामागे घडत असल्यानं पालक, शिक्षक किंवा सहकारी यांना लगेच दिसत नाहीत. शिवाय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने खरं काय आणि खोटं काय हे समजणंही कठीण झालं आहे. अर्थातच या प्रकाराला Bullying म्हणजेच दादागिरी करणं, छळ करणं, दमदाटी करणं म्हणतात हे उघड आहे. अशा प्रकारचा छळ ही शाळांमधील गंभीर समस्या बनत चालली आहे.
छळ हा मानवी हक्कांचा भंग आहे, हे स्वीडनमधील मानसोपचार शिकविणारे प्राध्यापक ओल्वेस यांनी सर्वप्रथम निदर्शनास आणून दिलं. १९९४ मध्ये त्यांनी हे प्रथम निदर्शनास आणलं की, विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षित वाटणं, छळांमध्ये अंतर्भूत असलेल्या दडपशाही आणि वारंवार, जाणूनबुजून केलेल्या अपमानापासून वाचवलं जाणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. कोणत्याही विद्याथ्र्याला छळलं जाण्याच्या किंवा अपमानित होण्याच्या भीतीमुळे शाळेत जाण्याची भीती वाटू नये, आणि कोणत्याही पालकाला आपल्या मुलाच्या बाबतीत असं काही घडेल की काय याची काळजी वाटता कामा नये. अशा प्रकारची मुलांची वागणूक हे पालक, शिक्षक, शाळा आणि शाळेशी संबंधित सर्वांसाठी चिंतेचा विषय होऊ शकतो.
इथं प्रश्न आहे, मुलं इतर मुलांचा छळ का करत असावेत? सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की, अशा वागणुकीमागे त्यांच्यावर झालेला सामाजिक, भावनिक आणि आजूबाजूच्या घटकांचा एकत्रित परिणाम असतो. ही मुलं अनेकदा त्यांच्यामधील शक्ती किंवा वर्चस्वाचं प्रदर्शन किंवा स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न किंवा दुसर्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. तसेच स्वत:च्या असुरक्षिततेशी सामना करण्यासाठी घरात किंवा घराबाहेर शिकलेल्या वर्तनामुळे ते असं वागू शकतात. मुलं अशा प्रकारचा छळ का करतात याची प्रमुख कारणं समजून घ्यायला हवीत.
शक्ती आणि नियंत्रणाची इच्छा : अनेक मुलं इतर मुलांवर वर्चस्व गाजवण्यासाठी, स्वत:ला महत्त्वाचं समजण्यासाठी किंवा आपल्या मित्र-मैत्रिणींच्या गटात वचक निर्माण होण्यासाठी इतरांचा छळ करतात. काही मुलांना घरी किंवा ते राहत असलेल्या वसाहतीत आपण दुबळे आहोत असं वाटतं. अशा वेळी नियंत्रण किंवा अधिकार मिळवण्यासाठी ते इतरांचा छळ करतात.
सामाजिक प्रतिष्ठा आणि मित्रांचा दबाव : सर्व गटामध्ये लोकप्रिय होण्याचा प्रयत्न करणं किंवा स्वत:च्या मित्रांच्या गटामध्ये नेतृत्वस्थान मिळविण्यासाठीसुद्धा मुलं विचित्र वागू शकतात. उदाहरणार्थ, दोन मित्रांमध्ये विनाकारण मारामारी लावून देणं आणि स्वत: मजा बघत बसणं.
कौटुंबिक वातावरण : एकूणच कौटुंबिक वातावरणाचा मुलांच्या वागणुकीवर परिणाम होऊ शकतो, हे उघडच आहे. काही घरांमधील वातावरण अस्थिर असू शकतं. पालकांचं मुलांकडे किंवा त्यांच्या वागणुकीकडे पूर्णपणे लक्ष असत नाही किंवा कौटुंबिक हिंसा हेही मुलांच्या अशा वागणुकीचं कारण असू शकतं. काही घरांमध्ये आई-वडिलांच्या विभक्त होण्याची चर्चा मुलांसमोर केली जाते. ज्यामुळे त्या मुलांना असुरक्षित वाटू शकतं.
असुरक्षितता आणि कमी आत्मविश्वासाशी जुळवून घेणं : काही मुलं स्वत:च्या अपूर्णतेच्या, त्यांच्या मनातील मत्सराच्या किंवा स्वत:तल्या उणिवा लपवण्यासाठी छळ करतात. इतरांना लक्ष्य केल्यानं त्यांचा आत्मविश्वास तात्पुरता वाढतो आणि त्यांना अधिक सुरक्षित वाटू शकतं.
शिकलेलं वर्तन आणि अनुकरण: ज्या मुलांना स्वत: छळ सहन करावा लागला आहे किंवा ज्यांनी घरात वा आजूबाजूला छळाचे, मारामारीचे प्रसंग पाहिले आहेत, ती मुलं अशा वर्तनाचं अनुकरण करू शकतात. छळ हा संघर्षाला दिलेला आणि त्यातून शिकला गेलेला एक प्रतिसाद असू शकतो.
भिन्नत्वाचा स्वीकार न करणं :
काही जण इतर मुलांचं बाह्यरूप, वंश, जात, वर्ग,धर्म किंवा अपंगत्व यामध्ये आपल्यापेक्षा वेगळ्या असलेल्या मुलांचा छळ करू शकतात. कारण त्यांना भिन्नत्वाचा, विविधतेचा स्वीकार करणं, हे घरी शिकवलं गेलेलं नसतं. अशा छळांना बळी पडलेल्या मुलांवर त्याचे काय परिणाम होऊ शकतात हा विचार जास्त गांभीर्याने करायला हवा. जेव्हा मुलांना छळाचा सामना करावा लागतो, तेव्हा त्यांना गंभीर, भावनिक आणि सामाजिक परिणामांना सामोरं जावं लागतं. छळामुळे चिंता आणि नैराश्य निर्माण होऊ शकतं, ज्यामुळे ही मुलं गोंधळलेली, दु:खी आणि निराश होतात. आत्मसन्मानाचा अभाव हा आणखी एक गंभीर परिणाम आहे, ज्यामुळे त्यांना मित्र किंवा प्रौढांशी सकारात्मक नातेसंबंध निर्माण करणं कठीण जाऊ शकतं. अशा छळाला बळी ठरलेली मुलं एकाकी होऊ शकतात, नाकारलं जाण्याच्या किंवा उपहासाच्या भीतीमुळे इतरांशी जोडले जाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. या सर्वाचा परिणाम केवळ त्यांच्या तात्काळ भावनिक आरोग्यावरच नाही तर दीर्घकालीन मानसिक आरोग्यावरही होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
जी मुलं इतर मुलांना दुय्यम लेखतात याची कारणं पालकांच्या पालकत्वाच्या पद्धतीत रुजलेली असू शकतात. अभ्यासातून असं दिसून आलंय की, मुलांचं वागणं हे त्यांच्या घरात घडलेल्या प्रसंग किंवा घटनांचं प्रतिबिंब असण्याची शक्यता असते. उदाहरणच द्यायचं झालं तर एखाद्या मुलाला घरामध्ये सतत वादावादी आणि आई-वडिलांची भांडणं किंवा वडिलांनी त्यांचा पुरुषी अहंकार पोसण्यासाठी आईला कमी लेखणं, मुलांकडून अवास्तव अपेक्षा ठेवणं आणि त्या अपूर्ण राहिल्यानं त्यांना शिक्षा करणं, अशा प्रकारचं वातावरण असल्यास त्या घरातील मुलांसमोर चुकीचे आदर्श राहतात व त्याचा मानसिकतेवर वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे मुलांच्या आजूबाजूच्या वातावरणात जर त्यांनी हिंसा बघितली किंवा सातत्याने नकारात्मक घटना पाहिल्या तरीसुद्धा त्याचं अनुकरण ही मुलं करू शकतात. पालक या नात्याने आपण काय करायला हवं…? हा या सर्वांत कळीचा मुद्दा आहे. एखादं मूल अचानक शांत झालं, आजारी पडू लागलं किंवा घाबरू लागलं तर घरातले पालक, शिक्षक आणि इतर संबंधित मंडळींनी सावध व्हायला हवं. त्यांच्याशी शांतपणे बोलून या मुलांना कसा आधार देता येईल ते बघायला हवं. खुल्या संवादाला प्रोत्साहन मिळाल्यास मुलांमध्ये पालक आणि शिक्षकांसोबत बोलायचं बळ येऊ शकतं. सुरक्षित आणि सहायक वातावरण निर्माण करून आपण मुलांना छळावर मात करण्यासाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. प्रतिकूलतेच्या परिस्थितीत तग धरण्याची त्यांची क्षमता विकसित करायला हवी. शाळेत होणारा सौम्य किंवा तीव्र प्रकारचा छळ ही केवळ विद्यार्थ्यांची समस्या नसून संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे, असं आपण समजलो तर विद्यार्थी सुरक्षित, आदरयुक्त आणि आत्मविश्वासाने शिकू शकतील.
छळाविरुद्ध कृती न करता शांत राहणं म्हणजे छळाला बळ देणं ठरतं, तर आवाज उठवणं म्हणजे जी व्यक्ती त्याला बळी पडते त्याला आधार देणं होय. जर आज आपण मुलांना धैर्याने आवाज उठवायला शिकवलं, त्यांच्यात सहानुभूती आणि दयाळूपणा, प्रेमाची भावना रुजवली तर अशा मुला-मुलींसाठी शाळा आणि समाज आनंदाचं नंदनवन ठरेल.
rewatibhagwat@gmail.com
(लेखिका समाजसेविका असून भारत आणि कॅनडा येथील मुलांबरोबर, त्यांच्या प्रश्नांवर काम केले आहे.)
