सुजाता लेले

स्त्रियांचा भिशीचा गट म्हणजे गप्पाटप्पा, रिकामटेकडेपणा, वेळ वाया घालवण्याचं ठिकाण, असा टोला लगावला जातो, पण काही भिशीगट याला अपवादही असू शकतात. यातून राबवलेल्या काही समाजोपयोगी उपक्रमांचा स्त्रियांना त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होते. आपणही एखाद्या विषयाबाबत स्वत:चं मत मांडू शकतो, लिहू शकतो याची जाणीव होते. अशा अनेकींचे, त्यांच्या मैत्रिणींचे, इतरांचे, आपल्या मुलांचे लग्न ठरवतानाचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अनुभव… केवळ भिशी गटामुळे अनुभवास आलेले…

burden chaturang article
सांदीत सापडलेले…! ओझं
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
chaturang article on true wealth
जिंकावे नि जगावेही : खरी संपत्ती
Patience and respect are important in husband-wife relationship
तुझ्या माझ्या संसाराला…
Fear leads to sorrow
‘भय’भूती : भीतीला लगडलेलं दु:ख
It has been about 20 years of my friendship
माझी मैत्रीण : विसाव्याचे असू द्यावे एखादे ठिकाण…
Loksatt chaturang Abroad mother tongue language Experience
मनातलं कागदावर: बालपणीचा काळ सुखाचा…

गेल्या तीस वर्षांपासून आमचा भिशी गट आहे. त्यातल्या बऱ्याच जणी आता साठी ओलांडून गेलेल्या, तर काही जणी साठीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या आहेत. मुलं ‘ज्युनिअर केजी’ला होती तेव्हापासून आमचा हा भिशी गट सुरू झाला. त्यानंतर आमच्या मुलांची लग्नं झाली. त्यातील काही जण आता आई-वडिलांची भूमिका पार पाडत आहेत, त्यामुळे साहजिकच आमच्या काही सख्या आता आजीबाई झाल्या आहेत. हा सारा तीस वर्षांचा प्रवास नजरेसमोर स्पष्टपणे दिसतो आहे…

मुलं लहान असताना त्यांचा अभ्यास, परीक्षा किंवा आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, खेळ अशा गोष्टींसाठी आम्ही काही जणी एकत्र यायचो. आपोआपच ओळख वाढली, इतर गप्पा सुरू झाल्या. मग त्यातूनच भिशी गट सुरू करण्याची कल्पना सुचली. सुरुवातीची दोन वर्षं मुलांसह भिशी गट सुरू होता. मुलांची दंगामस्ती, कधीतरी भांडणं सोडवणं, आणि जेवण एवढंच करेपर्यंत वेळ संपून जायचा. पण नंतर मुलं पहिलीत गेल्यावर, म्हणजे त्यांची शाळा पूर्ण वेळ सुरू झाल्यानंतर मुलांशिवाय आमची भिशी सुरू झाली. त्यामुळे आम्हाला जरा गप्पा, मुलांचा अभ्यास, परीक्षा याव्यतिरिक्त दुसरं काही करता येईल का? यावर विचार करायला वेळ मिळू लागला. त्यानुसार, विविध लेखक-लेखिकांची पुस्तकं आणली. ती वाचून मग दर महिन्याच्या भिशीच्या वेळी एकमेकींनी वाचलेल्या पुस्तकांची अदलाबदल करायला सुरुवात केली. मग त्या महिन्याच्या शेवटच्या भिशीच्या वेळी प्रत्येक पुस्तकाबद्दल थोडक्यात लिहिलेलं वाचायचं आणि आवडलेल्या पुस्तकाबद्दल थोडं सविस्तर लिहिलेलं वाचून दाखवायचं असं सुरू झालं. यामुळे आमचा बोलण्याचा आत्मविश्वास वाढला आणि आपणही चांगलं-बरं लिहू शकतो याचीही जाणीव झाली.

याव्यतिरिक्त आम्ही ‘दासबोध’ वाचन केलं. ते जवळपास तीन वर्षं सुरू होतं. या वाचनातून आम्हाला काय कळलं, ते आम्ही आमच्या भाषेत लिहिलं आणि वाचलं. असे बरेच उपक्रम आम्ही करत असतो. आम्ही एकत्र सहलीलाही जातो. भिशीव्यतिरिक्त काही सख्या सामाजिक कार्य करत आहेत, काही जणी विविध कला शिकत आहेत, शिकवत आहेत. काही वर्षांपूर्वी असं सारं छान सुरू असतानाच आमचे भिशीच्या वेळी बोलण्याचे विषय बदलू लागले. याला कारण म्हणजे आमच्या मुला-मुलींचं लग्नाच्या बेडीत अडकण्याचं वय! आमचा भिशीचा गट म्हणजे जणू आमचं वधू-वर सूचक मंडळ असल्यासारखंच झालं होतं. काही आमचे, तर काही आमच्या मैत्रिणींचे तर काही इतरांचे अनुभव. काही गमतीशीर, काही आवाक करणारे तर काही शिकवून जाणारे. परंतु हा एकूणच सारा अनुभव त्या आधीच्या आमच्या शांत सरळ आयुष्याला छेद देणारा होता.

कुठलं वधू-वर मंडळ चांगलं आहे? त्या मंडळाच्या मेळाव्यांना आपल्या मुलांना पाठवायचं का? एखादीच्या मुलीला स्थळ आलं आणि दोन्हीकडून पसंती आली असेल, आणि अशा स्थळासंबंधीची माहिती एखादीकडे असेल तर ती योग्य-अयोग्य असली, तरी मोकळेपणानं गटामध्ये सांगायचं ठरलं होतं. लग्नासंदर्भातील गेली कित्येक वर्षं मनात काही सत्यं साठलेली होती. त्यावर आमच्या भिशीच्या वेळी चर्चा होत असे.

गमतीशीर अनुभव म्हणजे, विवाह मंडळात आपलं नाव नोंदवताना काही विवाहेच्छुक तरुण-तरुणींनी कॉलेजच्या शेवटच्या वर्षातील ओळखपत्रावरचे फोटो लावले होते, प्रत्यक्षात मात्र चित्र वेगळंच होतं. तर काही जणांनी माहिती लिहिताना कोणत्याच वाईट सवयी नाहीत, असं लिहिलं होतं, पण मुलीला भेटायला गेल्यावर मात्र सांगितलं की, मी सिगारेट ओढतो आणि एखादा पेग घ्यायची सवय आहे. माहितीपत्रकात असं खोटं का लिहिलं? असं विचारल्यावर आईवडील आमच्या सोबत नावनोंदणीसाठी आले होते, असं प्रामाणिकपणे उत्तर दिलं जायचं. हेही नसे थोडके!

मला लग्न करायचंच नाही, असं काही तरुण-तरुणींनी आपल्या आईवडिलांना सांगितलेलं होतं, मात्र तरीही त्यांना आईवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी जबरदस्तीने लग्न करावं लागलं, असंही घडलेलं आहे. आणि याचं कारण काय तर समाज काय म्हणेल ही भीती. यापेक्षाही तऱ्हेवाईक अनुभव आले. एकाने लग्न झाल्यावर ऑफिसमध्ये कायमचीच रात्रपाळी मागून घेतली, त्यामुळे तो दिवसा झोपत असे. ‘हे असं का?’ असा प्रश्न त्याच्या पत्नीने अखेर एके दिवशी विचारलाच, तेव्हा मला ‘तशा’ भावना होत नाहीत, असं त्यानं सांगितलं. ते ऐकल्यावर त्या तरुणीची आणि तिच्या घरातल्यांची स्थिती काय झाली असेल? शिवाय मुलाच्या आईवडिलांची समाजात नाचक्की झाली ती वेगळीच. समाज काय म्हणेल त्यापेक्षा आपल्या मुलाला काय हवंय, हे जाणून घेणं महत्त्वाचं वाटलं नसेल का त्यांना? आजची पिढी शिकलेली आहे, आपल्या पायावर उभी आहे, आपल्या आयुष्याचा विचार ते करू शकतात, त्याच बरोबरीने समाजही पूर्वीचा राहिला नाही. समाजाचा विचार करण्याच्या पद्धतीत सुधारणा होत आहे. हे स्तुत्य आहे. असो…

आणखी एकीचा अनुभव म्हणजे, तिच्या मैत्रिणीच्या मुलीचं ओळखीतून लग्न ठरलं, पण लग्नानंतर कळलं की, मुलाला बरा न होणारा आजार आहे, तर दुसऱ्या प्रकरणात बायकोच्या मानसिक असंतुलनाच्या घटना लक्षात आल्यावर नवऱ्यानं शोध घेतला तेव्हा कळलं की, तिच्या वडिलांनाही असाच आजार होता. या दोन्ही उदाहरणांत आजार पिढीजात होते, असं कळलं, पण हे कळेपर्यंत यांना मुलंही झालेली होती. असा संसार फरफटत करत राहाण्यापेक्षा घटस्फोट घेतला गेला. हे बदलता आलं असतं, असं नक्की वाटतं.

आजकाल बऱ्याच तरुणींना आपल्याला स्वातंत्र्य मिळावं किंवा त्यांची स्वतंत्र संसाराची स्वप्नं असतात, त्यामुळे एकत्र कुटुंबांमध्ये राहाणं नको असतं. मी माझ्या आईवडिलांचं घर सोडून येते, मग तू पण तुझ्या आईवडिलांना सोडून यायचं. असं म्हणण्यात समानता आहे, पण हे लग्नाआधीच ठरलं आणि एकमेकांच्या कुटुंबाला मान्य असेल तर त्यांचा संसार अधिक आनंदाचा होऊ शकतो, हेही लक्षात घ्यायला हवं.

आमच्यातल्या काही जणींच्या मुलांचे प्रेमविवाह यशस्वी झाले, तर काही जण अपयशी ठरले. ज्यांना प्रेमविवाह करायला जमला नाही त्या मुला-मुलींनी घरातल्यांच्या मदतीनं लग्न जमवली खरी, पण इथेही काही कुटुंबांनी बनवाबनवी केलेली कळलं. म्हणजे मुलगा काही वर्षांकरताच परदेशी जाणार आहे, नंतर मात्र भारतातच येणार आहे. किंवा गावाकडे व्यवसाय असला, तरी ऑफिस शहरात आहे. त्यामुळे कधी तरीच, अगदी एक-दोन दिवसच गावाकडे जावं लागतं, असं सांगितलं गेलं, पण लग्नाच्या काही वर्षांनंतर असं चित्र आहे की, त्या तरुणाची परदेशातून परत येण्याची शक्यता नाहीच तर शहरातल्या त्या दुसऱ्या तरुणीला गावातच राहावं लागत आहे. पण दोन्ही ठिकाणी मुलींनी तडजोड केली हे कौतुकास्पद आहे. कदाचित त्यांना आवडलं असेल किंवा आईवडिलांच्या डोक्याला त्रास नको असाही विचार केला असण्याची शक्यता आहे.

काहींना परदेशीच राहायला आवडतं, कारण तिथे आईवडील आणि इतर नातेवाईकांची कटकट त्यांना नको असते. पण काही जणींनी तर थेट स्वयंपाकघरात ओटाच नको, असं सांगितलं तेव्हा अजब वाटलं. ‘आम्ही दोघंही नोकरीसाठी सकाळीच घराबाहेर पडणार आणि एकदम संध्याकाळी किंवा रात्री येणार, सुट्टीच्या दिवशी आराम करणार, त्यामुळे सकाळचा चहा-कॉफी बिल्डिंगच्या खाली असलेल्या हॉटेलमधून मागवणार. नाश्ता तिथूनच, दुपारचं जेवण कामाच्या ठिकाणी मिळतं, मग ओटा कशाला हवा? हा त्यांचा विचार. परंतु अडीअडचणीला काय, हा विचारच केला नसेल का? असा प्रश्न पडला. काही तरुण-तरुणींना तर मूलच नको आहे. अर्थात हे त्यांनी लग्नाच्या आधी सांगितलं तर ठीक नाही तर लग्नानंतर अनेक समस्यांना सामोरे जावे लागलेलंही घडलं आहे. आणखीन एक उदाहरण द्यावंसं वाटतं ते असं आहे, ज्या आईवडिलांना एकुलती एक किंवा दोन मुली असतील तर आईवडिलांच्या वृद्धपणी एकुलत्या एक मुलीला किंवा बहिणी-बहिणींनाच ही जबाबदारी घ्यावी लागते. पण अगदी एक मुलगा आणि एक मुलगी असली, तरी दोघांनी आपापल्या आईवडिलांचा सांभाळ केलाच पाहिजे. पण एका घटनेत, एकाने आपापल्या आईवडिलांना वेगवेगळी खोली असावी म्हणून नवीन फ्लॅट घेण्याचं ठरवलं. त्यावेळी मुलाच्या आईनं त्याला सांगितलं की, सुनेच्या आईवडिलांकडूनही फ्लॅटसाठी पैसे घे. हे ऐकताना काय वाटलं असेल त्या मुलीला? दुसरीकडे आपल्या मुलाच्या लग्नाला आठ-दहा वर्षं झाली असतानाही त्याच्या संसारात नाक खुपसणाऱ्या काही आई-सासू तर अनेकांना माहीत असतीलच.

असे खूप काही अनुभव केवळ आमच्या मुला-मुलींच्या लग्नाच्या निमित्ताने आम्हाला मिळाले. त्यामुळे मला तर आमचा भिशीचा गट म्हणजे टाइमपास, गॉसिपिंग, रिकामटेकडेपणा नक्कीच वाटत नाही. आम्ही सगळ्या एकत्र असल्याने असे काही अनुभव एकमेकींना सांगत होतो, त्यावर चर्चा करत होतो. विचारविनिमय करत, कधी सल्ला घेत बोलत राहातो. अत्यंत महत्त्वाच्या काळात इतक्या गोष्टींचा विचार करायला शिकवलं, ते याच भिशीमुळे. प्रत्येकाला वाईट अनुभव येतातच असे नाही. पण काही कुटुंब नक्कीच अशा अनुभवांतून गेलेली आहेत. माझ्या मैत्रिणींचे, त्यांच्या मैत्रिणींचे, त्याचप्रमाणे इतरांकडून आलेले हे ‘लग्नाळलेले’ अनुभव, इतकी वर्षं मनात साठले होते, ते कागदावर उतरवलं इतकंच!

sujataalhad@gmail.com