डॉ. अनघा लवळेकर

‘ज्ञानप्रबोधिनी’ या संस्थेतील स्वयंसेवी स्त्रियांचा गट म्हणजे ज्ञानप्रबोधिनी स्त्रीशक्तीप्रबोधन ‘संवादिनी’! दोनशेहून अधिक पदवीधर, पदव्युत्तर, विविध क्षेत्रांतील व्यावसायिक स्त्रिया समाजात प्रेरणाजागरणाचे काम करत आहेत. ‘संवादिनी’चे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने या अनोख्या प्रवासाचा आढावा.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

 ‘आम्ही सूर्यकन्या… नव्हे फक्त छाया… स्वये सर्व सामर्थ्य हे मिळवूया!’ ज्ञानप्रबोधिनीतील गीताचा अनुभव वास्तवात घेणारा स्वयंसेवी स्त्रियांचा गट म्हणजे ‘ज्ञानप्रबोधिनी स्त्री-शक्ती-प्रबोधन संवादिनी’! यंदा पंचविशी पूर्ण करणारा, नित्य वर्धिष्णू राहिलेला गट ही याची खरी ओळख! या अनोख्या प्रवासाची ठळक पदचिन्हे आपल्याला स्त्रियांच्या सुप्त सामर्थ्याचा एक आगळा प्रत्यय देतात.

एक मध्यमवर्गीय पदवीधर गृहिणी, पारंपरिकता जपणाऱ्या समाजातील कुटुंबाचा भाग असलेली, सांसारिक जबाबदाऱ्या मनापासून नित्यनेमाने निभावणारी. पस्तिशीमध्ये तिला त्या जबाबदाऱ्या आणि पालकत्वा- पलीकडच्या क्षितिजांनी हाक मारली. ‘संवादिनी’त पहिल्या दिवसापासून सहभागी झालेल्या या गृहिणीचे आज ‘प्रेरक सखी- विषय तज्ज्ञ- प्रशिक्षक-संघटक’ अशा प्रगल्भ नेतृत्वामध्ये रूपांतर झालं आहे.

एक वैद्याकीय व्यावसायिक. रुग्णसेवेतून सामाजिक योगदान देणारी संवेदनशील नागरिक. व्यवसायानंतरचा वेळ किशोरवयीन मुलांच्या मनाला हात घालत त्यांच्याशी संवाद साधण्यात घालवत आहे.

एक शिक्षणाने इंजिनीयर… दीर्घकाळ तंत्रज्ञ म्हणून केलेलं काम. आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर वयाच्या एका टप्प्यानंतर सामाजिक क्षेत्रात उतरून किशोरवयीन मुलांसाठी काम करता करता मोठा आवाका असणारे संशोधन-उपयोजन प्रकल्प पूर्ण करणारी हरहुन्नरी धडाकेबाज मैत्रीण! या सर्वांना एकत्र आणणारी – त्यांच्यातल्या क्षमता फुलवणारी ‘संवादिनी’!

‘संवादिनी’ म्हणजे स्त्रियांच्या स्व-विकासाला सामाजिक बांधिलकीची दिशा देणारी, सुप्त मनुष्य शक्तीला जागं करणारी एक धडपड! कोणत्याही लाभाशिवाय समाजावर प्रीती करायला प्रेरित करणारा एक संघटन प्रयोग! ‘उदात्त उद्दिष्ट आणि निरपेक्ष सेवाभाव असेल तर समविचारी आणि स्वयंप्रेरित लोक चटकन एकत्र येऊन अतिशय परिणामकारक काम करू शकतात’ हे सूत्र ‘संवादिनी’ या गटाच्या रौप्य महोत्सवी वाटचालीतून ठळकपणे लक्षात येते.

ग्रामीण स्त्रियांना जसे शिक्षण-आर्थिक स्वावलंबन- स्वतंत्र ओळख- कुटुंबात सन्मान या गोष्टींची नितांत गरज असते तशीच शहरात राहणाऱ्या- तुलनेने आर्थिकदृष्ट्या स्थिर असलेल्या सुशिक्षित स्त्रियाही अनेक भावनिक, बौद्धिक गरजा असतात. स्त्रीवादी विचारवंत बेटी फ्रीडन म्हणतात, ‘अनेक स्त्रियांना एक अपूर्णतेची जाणीव असते. सांसारिक चौकटीत जबाबदाऱ्या सांभाळताना आपल्या कितीतरी क्षमता अजून फुललेल्याच नाहीत याची टोचणी असते’. ‘संवादिनी’मुळे अशा शेकडो स्त्रियांच्या स्व-विकासाला आणि सामाजिक जाणिवेला एक ठोस दिशा मिळाली आहे.

विचारांची स्पष्टता आणि अभिव्यक्तीसाठी अतिशय विधायक असा मार्ग मिळाल्याचे अनेक ‘संवादिनी’नमूद करतात. स्वत:च्या कौटुंबिक मेळाव्यातसुद्धा तोंड उघडून स्वत:चे मत व्यक्त न करणारी ‘संवादिनी’ जेव्हा शैक्षणिक उपक्रमाविषयी पालक-मुख्याध्यापक – मुलं-संस्थांचे प्रतिनिधी यांच्यासमोर अस्खलितपणे आपले विचार मांडते, तेव्हा तिचे ‘कृतीतून मिळणारे शिक्षण’ प्रतिबिंबित होते. आज ‘संवादिनी’च्या आठ कृती-उपक्रमांमधून सुमारे दोनशेहून अधिक सदस्या समाजात असे वृत्ती घडणीचे आणि प्रेरणा-जागरणाचे काम करत आहेत.

हजारो मुलांपर्यंत ‘जबाबदार लैंगिक वर्तन म्हणजे काय?’ हे पोहोचवताना त्या मुलांच्या भविष्यावर प्रगल्भतेची एक मोहोर नकळतपणे उमटत जाते. ग्रामीण-निमशहरी-आदिवासी भागातील मुलांसाठी विद्याव्रत संस्काराच्या उपक्रमातून ‘चांगले जीवन म्हणजे काय? स्वत:चा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, सामाजिक विकास घडवून आणायचा तर काय करायला हवे?’ याबद्दल जेव्हा ‘संवादिनी’ बोलतात, त्या मुलांचे भावनिक संगोपन करण्याची जबाबदारीही समर्थपणे पेलतात, तेव्हा मुला-मुलींच्या संकल्पांना निश्चयाचा पाया सहज मिळतोच.

‘लैंगिक शोषणा’सारख्या संवेदनाशील विषयावर नाजूकपणे पण संवादी पद्धतीने, कोवळी मनं न दुखवता, न घाबरवता, स्वत:ची काळजी घेण्याबद्दल-‘ओळख स्पर्शाची’ उपक्रमामधून मुलांबरोबर संवाद होतो तेव्हा मुले आश्वस्त होतातच, शिवाय अशा प्रसंगांना तोंड देण्याचा आत्मविश्वासही त्यांच्यामध्ये जागा होतो. किशोरवयीन मुलांना-निर्णय क्षमता, भावनिक प्रगल्भता, संवाद कौशल्य-अशांचा परिचय करून देताना ‘आपल्या शैक्षणिक यशाइतकेच या कौशल्यांनाही जपले पाहिजे’ हे मूल्य त्या शेकडो मुलांमध्ये रुजवतात. जिथे पालकांच्याच शिक्षणाचा पत्ता नाही अशा कुटुंबातील मुलांनी शिक्षणात टिकून राहावे म्हणून अध्ययनाची मूलभूत कौशल्ये शिकवत, उत्तमोत्तम-हटके विषयांवर अभिरुचीपूर्ण, विचारप्रवृत्त करणारे साहित्य प्रकाशित करण्यात ‘संवादिनी’ सदस्य झोकून देऊन काम करतात. ‘समतोल’ला अनेक पारितोषिके मिळवून देतात.

‘संवादिनी’ने ज्ञानप्रबोधिनी संशोधन प्रभागाच्या मदतीने हजारो मुलांपर्यंत पोहोचण्याचे मार्ग प्रशस्त केले आहेत. ‘युवा’, युवा- साथी’, ‘संयम’, ‘ओळख स्पर्शाची ३६० अंश’ अशा प्रकल्पांमधून पुढच्या पिढीचे शेकडो प्रशिक्षक तयार केले आहेत. आता ‘स्त्रियांचे मानसिक आरोग्य’ आणि ‘स्त्री पुरुष संपूरकता’ या विषयांवर काम करण्यासाठीचे अभ्यास गट सुरू झाले आहेत. या अनुभव- समृद्धीमुळे देश-विदेशात विविध परिषदांमध्ये आपल्या कामावर आधारित अभ्यासपूर्ण निबंधांची मांडणी, छोट्या परिचय कार्यशाळापर्यंत कितीतरी गोष्टी सहज घडल्या आहेत. ‘संवादिनी’सोबत त्यांच्या जवळच्या व्यक्तींनीही त्यांच्यामधला बदल कसा अनुभवला- स्वीकारला याचेही दर्शन कुटुंब मेळाव्यांमध्ये झाले आहे.

कोणत्याही प्रकारच्या पदांसाठी/ बक्षिसांसाठी / पुरस्कारांसाठी/ किंवा व्यावहारिक फायद्यासाठी ‘संवादिनी’चे व्यासपीठ नाही, हे प्रत्येकीला चांगलेच समजले आहे. ‘समाज मित्र’ होऊन आपल्यातील क्षमता समस्या सुटण्यासाठी कारणी लागाव्यात हा जागरूक प्रयत्न असल्याने- मानापमान/ सुप्त स्पर्धा इथे नाही हे ओघाने आलेच!

पंचवीस वर्षांत ‘संवादिनी’ने समाजातील किती घटकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला हे पाहिले की कामातले वैविध्य लक्षात येते. ताम्हिणी घाटातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्याव्रताचा संस्कार सातत्याने अनेक वर्षे पुढाकार घेऊन घडवून आणण्यापासून ते मराठवाड्यातील शाळांसाठी अनेकदा लांबचे प्रवास करून दोन-तीन दिवस सातत्याने उभे राहून तेथील शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षणे घेण्यापर्यंत ही रेंज आहे.

‘संवादिनी’ पंचविशीत आलेली असली तरी वयाच्या पस्तिशीत ‘संवादिनी’ची मुले रुजविणाऱ्या अनेक सदस्या आता ‘आजीच्या’ भूमिकेत सहज प्रवेश करत्या झाल्या आहेत. त्यांचा उत्साह तितकाच सळसळता आहे. पण त्यांनी आखलेल्या आनंददायी रस्त्यावर चालण्यासाठी पुढच्या पिढीच्या नवे काही घडवू इच्छिणाऱ्या मैत्रिणीही मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत, ही समाधानाची गोष्ट आहे!

‘संवादिनी’ ने स्वीकारलेला ‘स्वयंविकासातून समाज परिवर्तना’चा हा वसा पुढच्या पिढीच्या हाती सुपूर्द करत, स्वत:चे योगदान चालूच ठेवणाऱ्या ज्येष्ठ ‘संवादिनी’ मैत्रिणी एका अर्थाने या टप्प्यावर कृतकृत्य भावना अनुभवत आहेत… ‘संवादिनी’चा दिवा कोणत्या अंगणात लावता येईल…याच ध्येयाने झपाटलेल्या आहेत. आपल्या अंगणात हा दिवा तेवावा म्हणून कोण कोण हा वसा घ्यायला तयार आहेत? तर मग ‘संवादिनी’च्या सुवर्णमहोत्सवी वाटचालीसाठी तुमचे स्वागत आहे…!

anagha.lavalekar@jnanaprabodhini.org

Story img Loader