‘लग्नाची पंचविशी’ सदरामधील (७ फेब्रुवारी) वंदना कुलकर्णी यांचा ‘गुंतुनी गुंत्यात सार्या’ लेख वाचला. हा लेख एका आस्थेने व तळमळीने लिहिला आहे. कुटुंब संस्था टिकून राहणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी विवाह करण्यापूर्वी तरुण-तरुणींनी परस्परांचे विचार, तडजोडीची तयारी, दोन्ही कुटुंबांची पार्श्वभूमी व अपेक्षा यांचा सर्वांगीण विचार करणे आवश्यक आहे. मात्र आधीच्या पिढीनेही समजूतदारपणा दाखवून थोडे थांबणे आवश्यक आहे. पुढच्या पिढीला मदत लागली तर जरूर करावी, पण त्यांनाही आयुष्याचा अनुभव घेऊ दे, परिस्थितीला सामोरे जाऊ दे. एकत्र राहताना समतोल राखला तर पुढची पिढीसुद्धा मोठ्यांना मान देईल. बदलत्या परिस्थितीला – काळाला उभय पक्षाने समंजसपणे संवादाने सामोरे जायला हवे, ही काळाची गरज आहे. – अनघा आगटे, कोथरूड, पुणे.
मानवी जीवन सुखी करावे!
‘पालकांचं पालकत्व’ या सदरात (१४ फेब्रुवारी) मेधा कुलकर्णी यांचा ‘हवा मायेचा स्पर्श’ हा लेख भावला, कुटुंबातील वृद्धांची काळजी कशी घ्यावयाची व त्यांची त्या वयातली भूक आनंदाने कशी भागवायची, याचा मूलमंत्र त्यांनी दिला आहे. हा मूलमंत्र वृद्धांना तसेच त्यांना मदत करणार्या तरुणांनाही मार्गदर्शक ठरणारा आहे. ‘सर्वे सन्तु निरामया:’ या लेखात सुलभा आरोसकर यांनी शास्त्रज्ञ व संशोधक यांनी मानवी जीवन कसे सुखी केले आहे, याची यथार्थ मांडणी केली आहे. वैद्यकीय क्षेत्रात तर आता मोठ्या शस्त्रक्रिया विनात्रासाच्या, अगदी शांतपणे यशस्वी केल्या जातात. या लेखात त्यांनी विज्ञान, अध्यात्म व जीवन यांची घातलेली सांगड अभूतपूर्व वाटली. मानवी जीवन सुखमय होण्यासाठीची या दोन्ही लेखांतील तळमळ महत्त्वाची वाटली. सुलभा आरोसकर यांच्या लेखातील विज्ञानाचा सदुपयोग करणे, हा मुख्य संदेश, आजच्या कलियुगातील युद्धग्रस्त भूमीवरील सामान्य जनांना दिलासा देणारा असा ठरला आहे. – प्रदीप करमरकर, ठाणे.
‘तरल’ लिखाण
‘प्रेमाच्या गावाला ‘का’ जावं?’ (१४ फेब्रुवारी) हा सॅबी परेरा यांचा लेख वाचला. त्यांचे लिखाण म्हणजे विषयाचा सखोल अभ्यास, वास्तवाचे अलंकारिक भाषेत केलेले रूपांतर आणि उत्तम संदर्भांचा मेळ होय. प्रेमाच्या भावविश्वाला अतिशय तरल आणि गमतीशीर पद्धतीने उलगडताना, त्यांनी त्यातील ‘गुलाबी दुनिया’ आणि त्यानंतर होणारी वास्तवाची जाणीव याचे जे वर्णन केले आहे, ते उत्तम! विशेषत: ‘प्रेमाच्या गावी वास्तवाच्या वीजपुरवठ्याचे लोडशेडिंग सुरू असते, तिथे कल्पनांचा जनरेटर दिवस-रात्र सुरू असतो’ हे वाक्य मला वैयक्तिकरित्या खूप आवडले! – अभिषेक गव्हाळे, अकोला.
विचारांना नवी दिशा
‘सर्वे सन्तु निरामया:’ (१४ फेब्रुवारी) हा सुलभा आरोसकर यांचा लेख अत्यंत महत्त्वाचा वाटला. आधुनिक तंत्रज्ञानामुळे दृष्टिहीन व्यक्तीला समोरील जग समजून घेता येते, ही माहिती प्रेरणादायी आहे. आज एआयआधारित साधनांमुळे वाचन-लेखनाची क्षमता सर्वसामान्यांपर्यंत पोहचत आहे. दृष्टिहीन व्यक्तीला वाचता-लिहिता येऊ शकते, तर निरक्षर व्यक्तीही तंत्रज्ञानाच्या मदतीने ज्ञानाशी जोडली जाऊ शकते, हा सामाजिक बदल मोठा आहे. शिक्षणाची पारंपरिक पद्धत बदलत आहे. शाळेचे महत्त्व कमी न होता तिची भूमिका मार्गदर्शक स्वरूपाची होईल. तंत्रज्ञानामुळे स्वअभ्यास आणि सर्वसमावेशक शिक्षण शक्य होईल. अशा विज्ञान आधारित लेखामुळे वाचकांना नवे विचार मिळतात आणि सकारात्मक दिशा मिळते. – महादेव ढोकळे, डोंबिवली.

