scorecardresearch

पडसाद : विचारी अभिनेता..

पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत निखळ सुंदर आणि प्रामाणिक लेखन.

गिरीश कु लकर्णी यांच्या ‘गद्धेपंचविशी’ लेखातली काही वाक्ये कोरून ठेवावीत इतकी खरी आणि चमकदार आहेत- ‘स्वत:च्या न्यूनत्वाचा किती आधार असतो माणसाला, त्याकडे करुणेनं पाहता यायला हवं.’ आपला आवडता अभिनेता इतका विचारी, भरपूर उत्तम वाचन असणारा, सखोल चिंतन करणारा असावा, याचा आनंद झाला. पहिल्या शब्दापासून शेवटच्या शब्दापर्यंत निखळ सुंदर आणि प्रामाणिक लेखन.

– जुई कुलकर्णी गिरीश कुलकर्णींचे लेखन

हा निखळ वाचनानंद!

४ सप्टेंबरच्या अंकातील ‘गद्धेपंचविशी’मध्ये गिरीश कु लकर्णी यांची फोटोतील नेहमीप्रमाणे रोखलेली नजर आणि चेहऱ्यावरचे मिश्कील भाव पाहून वाचायला सुरुवात केली. या लेखासारखा शब्दन्शब्द काळजीपूर्वक वाचलेला यापूर्वीचा लेख मला आठवत नाही. लेखाला अपेक्षित असलेलं ‘मी’पणाचं बोट धरून चालत असताना शेजारून चालणाऱ्या ‘अहंपणा’कडे त्यांचं जराही लक्ष न जाणं, इतकं यश आणि नावलौकिक मिळवूनसुद्धा त्यामागचे घडण्याचे-घडवण्याचे बादरायण प्रसंग आपल्या पंचविशीत न शोधणं आणि त्या वयात मनानं  डाव्या-उजव्या विचारांत हेलकावे घेत असताना आपला मध्यम मार्ग घट्ट धरून राहणं.. लेख वाचून झाल्यावर अनाहूतपणे हातातला पेपर घडी घालून खाली ठेवला गेला. छान जमलाय लेख, असं म्हणण्याचं औद्धत्य मी करणार नाही. कारण कितीही भिडले, तरी दासबोधातले चार श्लोक वाचल्यावर स्वामींना ‘छान लिहिलेत हो’ असं म्हणता येईल का? समोर आलेलं आहे तसं वाचत जाण्याचा वाचनानंद माझ्याहून समृद्ध माणसाच्या सावलीत बसून मला घेता आला, तो पुन:पुन्हा घेता यावा.

– सुहास सोहोनी, खेड (रत्नागिरी)

‘पुरुष हृदय’चा अर्थ अधोरेखित झाला

डॉ. थत्ते यांनी आपल्या लेखाने ‘पुरुष हृदय बाई’ या सदराचा नेमका अर्थ अधोरेखित केला आहे. त्यांनी ‘आयक्यू’ व ‘ईक्यू’ असे दोन्ही नेमके मांडले आहेत. ‘लोकरंग’ पुरवणीत अंजली चिपलकट्टी यांचे अभ्यासपूर्ण सदर प्रसिद्ध होते. त्यातील एका लेखात त्यांनी हॅम्लेट मासा ही प्रजाती आलटून-पालटून स्त्री व पुरुष बनत असते, असे नमूद के लेले आठवले. त्यामुळे कोणाचीच सत्ता नसते. डॉ. थत्ते हे उतम सर्जन असल्याने ‘शब्दसर्जन’ देखील आहेत!

– रंजन र. इं. जोशी, ठाणे

मागे राहणाऱ्यांचा विचार व्हावा..

सरिता आवाड यांच्या ‘ज्येष्ठांचे लिव्ह इन’ सदरातील लेख वाचताना एक जुनी घटना मला आठवली. मी शाळेत असताना आमच्या गल्लीतील एका आजोबांनी पुनर्विवाह केला होता. त्यांच्या पत्नीचा प्रथम विवाह असल्याने विवाह धार्मिक पद्धतीने के ला होता. आजोबांच्या नातवंडांना विवाहाला नेले नव्हते. परंतु एका (भोचक) आजींनी त्यांना विचारले, ‘तुमच्या आजोबांचे आज लग्न आहे ना?’

वाढलेले आयुर्मान आणि विभक्त कुटुंब पद्धतीमुळे ज्येष्ठांचे पुनर्विवाह किंवा ‘लिव्ह इन रीलेशनशिप’ ही काळाची गरज झाली आहे. समाज फारसा विरोध करीत नसला, तरी घरात मुलांचा विरोध असू शकतो. प्रौढ वयात परस्परांशी जमवून घेणे सोपे नसते. कालांतराने दोघांपैकी एकाचे निधन झाल्यावर आर्थिक समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे ‘लिव्ह इन’ किंवा विवाहाचा निर्णय घेताना पश्चात राहिलेल्यांच्या डोक्यावरचे छत जाणार नाही किंवा आर्थिक समस्या निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. हल्ली सख्खी मुले विचारतील याची शाश्वती नसताना मूलबाळ नसलेल्यांनी अधिकच जागरूक राहावे.

– वासंती सिधये,  पुणे

‘वस्त्रवलय’ तरुणांनी नक्की वाचावा!

अपर्णा देशपांडे यांच्या ‘जगणं बदलतंय’ या सदरातील ‘वस्त्रवलय’ हा लेख (४ सप्टेंबर) तरुण पिढीने नक्की वाचला पाहिजे. भारंभार कपडेखरेदीच्या ‘सगळ्यांनी बघितलंय’ संस्कृतीबाबत अपर्णाताईंनी त्यांच्या नेहमीच्या विनोदी शैलीत चांगलेच चिमटे काढले आहेत. ‘घरी सोन्याच्या घागरी, तरी लक्ष शेजारी’ अशी गत आहे. आदर्शवादी वर्तन जरी शक्य नसलं तरी अनेक बाबतीत थोडासा जाणीवपूर्वक आळा घालण्याची अत्यंत आवश्यकता आहे.

– अनुजा पाटील, पुणे

‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’चा विपर्यास?

‘पुरुष हृदय बाई’ सदरातील डॉ. रवीन थत्ते यांचा ‘माणूस नावाचा प्राणी’ हा लेख

(४ सप्टेंबर) वाचला. या लेखात डार्विनच्या ‘सव्‍‌र्हायव्हल ऑफ द फिटेस्ट’ या विधानाचा अर्थ ‘तगडे असते तेच तगते’ असा लावला आहे. हा अर्थ विपर्यास आहे. ‘फिटेस्ट’ हा शब्द ‘सामर्थ्यवान’ या अर्थाने वापरला नसून निर्माण झालेल्या बाह्य़ परिस्थितीत स्वत:ला सामावून घेणाराच फक्त जगतो, असा आहे. तसे नसते, तर डायनोसॉर तगडे, सामर्थ्यवान होते, ते टिकले नाहीत; पण अमिबासारखा एकपेशीय प्राणी- ज्याला स्वत:चा काही आकार नाही, तो जगतो, कारण परिस्थितीनुसार आकार बदलण्याची लवचीकता त्यात असते. ही लेखमाला अतिशय सुंदर आहे. लेखकाच्या संवेदनशील विवेचनाशी कुठलाही बुद्धिवादी, संवेदनशील माणूस सहमत होईलच. फक्त ही एक सार्वत्रिक चूक अनेक जण करतात, हे लक्षात आणून देण्यासाठी हे पत्र!

– प्रा. प्रकाश जकातदार 

(जकातदार यांच्या पत्रावर डॉ. रवीन थत्ते यांनी पत्रलेखकास पाठवलेले हे उत्तर-)

लवचीक हा शब्द संयुक्तिक

‘तगडे’ याचा अर्थ कसा करावा हा प्रश्न आहेच, परंतु मला वाटते शब्दांची गंमत वाढावी, म्हणून मी तो विपर्यास केला असणार (तगडे-तगते). खरेतर ‘फिट’ हा शब्ददेखील तेवढा बरोबर नाही. लवचीक हा शब्द जास्त संयुक्तिक वाटतो. व्युत्पत्ती कोशात मला ‘तगणे’ हा शब्द सापडला. त्याचा अर्थ ‘जिवंत राहणे’ असा दिला आहे. मग मी आपटे यांच्या संस्कृत-इंग्रजी शब्दकोशाकडे वळलो. त्यात ‘तग’ असा धातू नाही हे लक्षात आले, पण जवळच ‘तक’ आणि ‘तंक’ हे शब्द सापडले. त्यांचा अर्थ ‘टू एन्डय़ूअर, टू बेअर, लिव्हिंग इन डिस्ट्रेस ऑर मिझरी’ असे दिले आहेत. बोली भाषेतले अपभ्रंश शेजारच्या व्यंजनात रूपांतर करतात ही गोष्ट सर्वमान्य आहे, म्हणून ‘तक’चा ‘तग’ होणे शक्य दिसते. त्या दृष्टीने बघता मराठीतल्या त्या शब्दाने कात  टाकली असून नव्या अर्थाने तो प्रचलित झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रतिकूल परिस्थितील जिणे आणि तरीही जगणे असा गोळाबेरीज अर्थ यातून ध्वनित होत आहे. अशा तऱ्हेने या शब्दाची सहल जकातदार यांच्यामुळे घडली आणि ती मोठी गमतीदार ठरली. त्यांनी माझ्या लेखाची दखल घेतली याबद्दल त्यांचे आभार. ‘श्रोत्यांविना वक्ता नोहे’ असे ज्ञानेश्वर म्हणतात त्याची आठवण झाली.

– डॉ. रवीन थत्ते

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta readers reaction chaturang articles zws