‘मनातलं कागदावर’ या सदरातील दीप्ती लेले यांची ‘दहा रुपयांची गोष्ट’ वाचली. (३१ मे) मलाही असाच परोपकाराचा दोनदा अनुभव आला. एकदा मी हरिद्वारला जाण्यासाठी ‘राजधानी एक्सप्रेस’चे आरक्षण करण्यासाठी मुंबई सेंट्रलला जाऊन तिकिटाच्या रांगेत उभा राहिलो. माझं जाणं अकस्मात ठरलं होतं. मी तिकीट खिडकीपाशी आलो. फॉर्म दिला, पण शंभर रुपये कमी पडले. त्यावर काय करायचं या विचारात मी बाजूला उभा राहिलो. माझ्या मागच्या व्यक्तीने त्याचे तिकीट काढून मला तिकीट न काढण्याचे कारण विचारले. मी माझी व्यथा सांगितली. त्या गृहस्थाने त्वरित शंभर रुपये मला दिल्यावर मी माझे तिकीट काढून मागे वळून बघितले तर ती व्यक्ती दिसेनाशी झाली होती. मी अचंबित झालो. सर्वत्र शोधले, पण ती दिसली नाहीच. मी निर्विघ्नपणे हरिद्वार दिल्लीमार्गे जाऊन आलो.
दुसऱ्या वेळी मंगळूरला हॉटेलात राहात असताना विश्रांती कक्षात एक व्यक्ती पुस्तक वाचण्यात मग्न दिसली. काही वेळाने मी कुतूहलाने पुस्तकाची चौकशी केली. त्यातून आमच्या गप्पा रंगल्या. दुसऱ्या दिवशी त्यांनी ते पुस्तक मला देऊनच टाकले, इतकंच नाही तर मला जेवायलाही घेऊन गेले. त्याचे बिलही नको नको म्हणत असताना त्यांनीच भरले. ते पुस्तक अजूनही माझ्या संग्रही आहे. या दोन्ही परोपकारी सद्गृहस्थांना मी कधीच विसरणार नाही.
– राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली
उत्तरांच्या अपेक्षेत आपण
‘ऊब आणि उमेद’ या सदरातील ‘प्रश्नोपनिषद’ या डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या लेखात (७ जून) शब्द आणि व्याकरणात अडकलेल्या उत्तरांची अपेक्षा न ठेवता संवेदनेवर लक्ष ठेवायचे हा विचार योग्यच आहे. बहुतेक वेळा जेव्हा प्रश्न सांसारिक असतात त्यांना त्या चौकटीत काही उत्तरे असतात पण अनेकांना ही उत्तरे पटणारी नसतात. वर्षानुवर्षे हे जग आपल्या पद्धतीने पुढे जात असून ठरावीक प्रश्न व त्यांना ठरावीक उत्तरे आहेत. त्यापलीकडे जायचे असेल तर मात्र वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल हेच वास्तव आहे. आता तर कोणत्याही प्रश्नांचे उत्तर ‘गूगल’वर शोधले जाते, पण अजूनही अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत ज्याचे उत्तर गूगलकडे नाही. त्यांच्या शोधात राहायला हवे.
– अर्चना काळे
अभ्यासपूर्ण लेख
‘ हुंडा विरोध- संसद से सडक तक’, हा अॅड. निशा शिवूरकर यांचा लेख (७ जून) वाचला. तो अत्यंत अभ्यासपूर्ण आहे. हुंडा ही समाजाला लागलेली कीड अथवा कलंक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. तिची नांगी ठेचून काढायला हवी. मुलाकडच्या लोकांनी मुलीच्या आईवडिलांकडे हुंड्यासाठी हात पसरणे, हे लाजिरवाणे आहेच, पण तो एक भयंकर गुन्हा आहे हे माहीत असून देखील, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्या विरोधात कडक कायदे असूनही, कायद्याचा धाक कोणालाच राहिलेला नाही. म्हणूनच हे प्रकार अद्यापही सुरू असल्यावरून सिद्ध होते. सासरच्या मंडळींची स्वत:कडे बंगला, गाडी, सोने-दागिने या सर्व गोष्टी असूनही हुंड्याची वखवख थांबू नये, याचेच वाईट वाटते. त्यांनी मुलीच्या आईवडिलांकडे पैसा, सोने, वस्तू यांची अवाच्या सवा मागणी केलेली पाहून संतापाची तिडीक मस्तकात जाते. हे लोक मुलींच्या आईवडिलांच्या आर्थिक स्थितीचा विचार करत नाहीत का? की त्यासाठी त्यांनी स्वत:ला विकावे असे वाटते? किंवा मुली म्हणजे बाजारातील विकाऊ गाई वाटतात? या संदर्भात नुकतेच वैष्णवी हगवणे हे प्रकरण पुढे आले आहे. मुलाकडच्या लोकांनी केलेल्या अवास्तव मागणीवर उपाय म्हणून पोलिसात तक्रार करून, त्यांना पोलिसी खाक्या दाखवायला हवा होता त्यामुळे वैष्णवीचे प्राण वाचले असते, असे वाटते. परंतु इथेच सारे चुकले. आज वैष्णवीच्या मृत्यूची डागणी जन्मभर तिच्या आईवडिलांना सलत राहील. यातील आरोपींना कठोरात कठोर शासन हे झालेच पाहिजे. ही झाली हुंड्याची कथा. परंतु आज समाजात अशा काही व्यक्ती आहेत ज्या मुलीच्या आईवडिलांना सांगतात की, आम्हाला तुमचा पैसाअडका, सोने दागिने नकोत केवळ तुमची मुलगी व नारळ द्या. हे कानाला आणि मनाला किती सुखावणारे शब्द आहेत. अशा प्रकारची शपथ सर्व मुलांकडच्या आईवडिलांनी घेतल्यास, हुंडाबळी ही प्रथा हद्दपार होण्यास वेळ लागणार नाही.
– गुरुनाथ वसंत मराठे
झपाटलेल्या कार्यकर्त्या
‘कष्टकरी स्त्रियांचा उद्घोष’ हा ‘स्त्री चळवळीतील ‘स्त्री’ या सदरातील (३१ मे) छाया दातार यांचा प्रा. इलिना सेन यांच्या कार्याची ओळख करून देणारा लेख वाचला. प्रा. इलिना सेन या केवळ एक प्रखर स्त्रीवादी विचारवंत नव्हत्या, तर त्या एक झपाटलेल्या सामाजिक कार्यकर्त्या, अभ्यासू शिक्षिका, संवेदनशील लेखिका आणि मूलगामी संशोधक होत्या. सत्तर-ऐंशीच्या दशकात ‘जेएनयू’मध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी नारीवादाच्या विचारधारेशी नाते जडवले. त्याच काळात ‘मानुषी’ या स्त्रीवादी विचारांना वाहिलेल्या मासिकाच्या स्थापनेत त्यांचा सहभाग होता. पुढे बिनायक सेन यांच्यासोबत छत्तीसगडमध्ये स्थायिक होत त्यांनी आदिवासी स्त्रिया व खाण कामगारांच्या प्रश्नांसोबत प्रत्यक्ष भिडण्याचा मार्ग निवडला. छत्तीसगडमध्ये त्यांनी ‘शहीद हॉस्पिटल’सारख्या संस्थांमधून काम करताना, केवळ आरोग्यसेवा पुरवली नाही तर पारंपरिक धान्य बीजसंवर्धन, शाश्वत शेती आणि जैवविविधतेच्या संरक्षणासाठीही मोलाचे कार्य केले. या साऱ्या संघर्षांची सामाजिक आणि वैयक्तिक प्रतिबिंबे त्यांच्या पुस्तकांमध्ये प्रभावीपणे मांडलेली दिसतात. कर्करोगासारख्या व्याधीशी दोन हात करत असतानाही त्या शेवटपर्यंत सामाजिक चळवळीशी एकनिष्ठ राहिल्या. उर्दू कवी मजाजच्या ओळी त्यांच्या स्वरात आजही कानात घुमतात -तेरे माथे पे ये आँचल बहुत ही ़खूब है लेकिन, तू इस आँचल का एक परचम बना लेती तो अच्छा था। प्रा. इलिना सेन यांचं संपूर्ण जीवन हे केवळ विचारांनी नाही, तर कृतीने साकारलेलं स्त्रीवादाचं मूर्तस्वरूप होतं. त्यांनी सिद्ध केलं की नारीवाद हा केवळ भाष्याचा विषय नाही, तर हा संघर्षाचा,संवेदनशीलतेचा आणि वैचारिक सच्चाईचा धगधगत राहणारा जिवंत मंत्र आहे.
– तुषार निशा अशोक रहाटगावकर, डोंबिवली
भेसळविरुद्ध कडक कायदा हवा
चिन्मयी देऊळगांवकर यांचा ‘दाल में कुछ काला’ हा लेखवाचला. आपल्या देशात सततच्या वेगवेगळ्या पदार्थांबद्दलच्या भेसळसंदर्भातील तक्रारी वाचनात येत असतात. विशेषकरून दूध आणि पनीर या दोन पदार्थांबद्दल खूप असतात. खूप तक्रारी आल्यावर संबंधित विभाग धाडी घालतात, भेसळीचे पदार्थ जप्त करतात. थोडे दिवस बरे जातात नंतर पुन्हा परत तेच आणि तसेच चालू राहते. यासाठी निरीक्षण तपासनीस यांच्या धाडी जाहिरातबाजी न करता होणे गरजेचे आहे. आपल्या देशाचा भेसळ आणि फसवणुकीमध्ये दुसरा क्रमांक लागतो हे अतिशय खेदजनक आहे. आपल्या भाजी बाजारातसुद्धा वजनात वस्तू मारणे हे सर्रास चालते असे म्हटले जाते. वस्तू वापरण्याच्या मुदतीची तारीख बघण्याची आपल्याकडे सवय नाही. आपण बाजारात मिळणाऱ्या साजूक तुपांच्या दर्जाकडे पाहिले तर लक्षात येईल या तुपांचा दर्जा अनेकदा साध्या तुपापेक्षाही मेचकट असतो. गावठी वा साजूक तूप हे रवाळ असले पाहिजे. तूप कंपन्यांकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. आपल्याकडे कायदे आहेत, पण त्याची अंमलबजावणी केली जात नाही त्यातून पळवाटा काढल्या जातात. त्याचा परिणाम म्हणजे भेसळ करणाऱ्या टोळ्या मोकाट सुटतात. हे बंद व्हायला हवे.– नीता शेरे