मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : तुम बिन जाऊ कहाँ!

प्रेमी युगुलांच्या हृदयात फुलणारं प्रेम ही सर्वसामान्यांना समजणारी प्रमाणित वा आदर्श संकल्पना असेल असं नाही.

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : तुम बिन जाऊ कहाँ!

डॉ. शुभांगी पारकर
प्रेमभंगानंतर मनाचं काय होतं, ते स्वत: अनुभवल्याशिवाय कळत नाही म्हणतात! क्षणात उफाळणाऱ्या संतापाची धग, तर क्षणात सगळं संपल्याची भावना, अंधारात रानावनात वाट चुकलेल्याची व्हावी तशी सैरभैर अवस्था.. अशा वेळी सावरायला बळ देणारं कुणी असलं तर बरं.. काहीच आधार दिसला नाही, तर मात्र या मन:स्थितीची वेदना सहन न होऊन अनेक जणांनी आत्महत्येचा प्रयत्न किंवा प्रत्यक्ष आत्महत्या केल्याच्या घटना ठायीठायी दिसतात. ‘तुम बिन जाऊ कहाँ’ म्हणणाऱ्या मनाच्या या अवस्थेविषयी..

प्रेमी युगुलांच्या हृदयात फुलणारं प्रेम ही सर्वसामान्यांना समजणारी प्रमाणित वा आदर्श संकल्पना असेल असं नाही. ते कधी स्थिर असेल असंही नाही. कधी प्रेमाची प्रेरणा वेगळी, कधी परिणती वेगळी. प्रेमात कधी आसक्ती, आपुलकी आणि गरज या भावना जितक्या प्रबळ असतात, तितकीच त्यात नाटकीयता, आकर्षण आणि गुंगवणारी धुंद भावनाही असते. प्रेमात जशी काळजी, आपुलकी, आदर दिसतो, तसा द्वेष, संताप, दु:ख प्रसंगानुरूप दिसून येतात. तथापि प्रेम शारीरिक आणि मानसिक दृष्टिकोनातून एक महत्त्वाची कल्याणकारी भूमिका बजावतं.

मानसिक आरोग्यामध्ये प्रेमाची भूमिका दूरगामी आहे. जे लोक इतरांवर भरभरून प्रेम करतात आणि स्वत:ही दुसऱ्यांनी केलेल्या निस्सीम प्रेमाची अनुभूती घेतात, ते अधिक प्रसन्न असतात आणि त्यांचं मानसिक आरोग्य सुदृढ असतं. तथापि ज्यांना आपण प्रेमापासून वंचित राहिलो वा तिरस्कारित राहिलो असं वाटतं, त्यांना आत्मसन्मान कमी जाणवतो आणि ते नैराश्याच्या भावनांमध्ये सहज गुंतून जातात. सुंदर सुरक्षित प्रेमाच्या अनुभूतीपासून दूर जाऊन जेव्हा अनेकांना प्रेमभंगातून जावं लागतं तेव्हा व्यक्तीच्या भावना आणि मानसिक स्थितीत प्रचंड उलथापालथ होते. कुणाच्या प्रेमात असताना सुरूवातीच्या नातेसंबंधात आपण आनंद, उत्साह आणि उत्थान करणारे विचार अनुभवतो. ‘झोपाळ्यावाचून झुलायचे’हा तो अनुभव असतो. आपल्याला स्वत:बद्दल आल्हाददायक आणि सकारात्मक वाटत असतं. तथापि हे अवीट प्रीतीचे बंध जेव्हा संपुष्टात येतात, तेव्हा उंच झुल्यावरून आपण झरझर खाली यायला लागतो. या विरहाचं कारण आपण स्वत:विषयीच्या नकारात्मक विचारांमध्ये शोधायला लागतो. या वियोगाच्या कमानीखालून जायचं, तर असहाय्यता, निराशा, हवालदिलपणा या भावनांचा अनुभव येतोच, जो अनेकांना आत्महत्येच्या मार्गानं घेऊन जाऊ शकतो. यातील काहींचे अनुभव पाहाता या विषयासंबंधी बरंच काही आकलन करण्यासारखं आहे, असं आढळतं.

बडोद्याला राहाणाऱ्या तरुण मेहरुन्निसाचं रईस अहमदवर काही महिन्यांपासून प्रेम जडलं होतं. त्यानं तिला लग्न करायचं वचनही दिलं होतं. दोघांच्याही कुटुंबांना त्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल माहीत होतं; पण अलीकडे तो तिला टाळू लागला होता. त्याला भेटायचा तिनं अतोनात प्रयत्न केला, पण तो भेटत नव्हता. निराश होऊन तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला. बडोद्यात यापूर्वी आयेशा या मुलीनं साबरमती नदीत उडी मारून केलेली आत्महत्या गाजत असतानाच मेहरुन्निसानंही तशीच आत्महत्या करायचं ठरवलं, पण गर्दीमुळे ते तिला जमलं नाही. मात्र अधीर झालेल्या मेहरुन्निसानं यादरम्यान एक व्हिडीओ रेकॉर्ड करून रईससाठी आपला संदेश ठेवला होता, ‘मी तुझ्यावर प्रेम केलं, पण तू मला फसवलंस. मला वाटलं होतं, की तू इतरांपेक्षा वेगळा असशील; पण तू तसाच फसवा निघालास. सगळय़ा जगाला आपली ‘प्यार की कहानी’ माहीत होती, तरीही तू मला स्वीकारलं नाहीस. तू अत्यंत वाईट आहेस.’ त्यावेळी नदीत उडी मारून आत्महत्या करणं तिला जमलं नाही, तरी नंतर तिनं कीटकनाशक घेऊन आत्महत्या केलीच.

या वर्षी एप्रिलमध्ये ओडिशाला राहाणाऱ्या जगन्नाथ आणि प्रियांकाबद्दल वर्तमानपत्रात बातमी आली होती. त्यांचा खूप दिवसांपासून प्रेमसंबंध होता. त्या दोघांनी आपापल्या व्यवसायाची छोटीशी सुरूवात केली आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्या होत्या. जातीमुळे या दोघांच्या कुटुंबांनी लग्नासाठी आक्षेप घेतला. यामुळे रागानं चिडून जगन्नाथनं प्रियांकाला व्हिडीओ कॉल केला आणि तिच्यासमोर विष प्यायला. प्रियांका जेव्हा तिथे पोहोचली तेव्हा त्याचा मृत्यू झालेला होता. हे दु:ख सहन न झाल्यानं प्रियांकानं घरी कुणी नसताना गळफास लावून घेतला. त्यात तिचाही मृत्यू झाला. हा एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखा प्रसंग त्या शहरात घराघरांतून चर्चिला गेला.

हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ‘कयामत से कयामत तक’, ‘एक दुजे के लिए’ अशा कित्येक चित्रपटांमधून आपण हळव्या प्रेमाची दृश्यं पाहिली आहेत. असे प्रेमभंग किंवा ‘ब्रेकअप’ वेदनादायी असतात. ते होतात अनेकदा, पण त्या ब्रेकअपमागचं कारण दोघांनाही माहीत असणं महत्त्वाचं असतं. ब्रेकअपनंतरही एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात असू शकते, तिला तिच्याशी समेट करायची इच्छाही असू शकते, परंतु ती रागावलेली आणि गोंधळलेली असल्यास तिला निर्णय घेता येत नसतो. जेव्हा या प्रेमी युगुलातली दुसरी व्यक्ती ब्रेकअप करण्यासाठी तयार नसते, तेव्हा पहिल्या व्यक्तीच्या मनात दु:ख, अपराधीपणा, चिंता तर वाटतेच, शिवाय हृदयात कळ आणि बोचरी रुखरुख साचून राहते. कधी ब्रेकअप परस्पर सामंजस्यानं केलेलं असलं, तरीही दु:ख आणि नैराश्यासारख्या कठीण भावनांशी काही काळ का होईना, यातल्या एकाला किंवा दोघांनाही संघर्ष करावा लागतो.

आत्महत्येचे विचार करणाऱ्या या व्यक्तींना त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रेमभंगाच्या वस्तुस्थितीस स्वीकारता येत नाही. कारण त्यांनी आयुष्यात केवळ प्रेम वा जोडीदारच गमावलेला नाही, तर त्यांनी गमावलेली असते आशा, विश्वास, स्वप्नं, वचनबद्धता, वेळ, अशा अनेक गोष्टी, ज्या एकमेकांच्या अस्तित्वाशी निगडित असतात. जेव्हा अचानक असं लक्षात येतं, की कितीही प्रयत्न केले वा मनाला वाटलं, तरी या गोष्टी आता आपल्या आयुष्यात पुन्हा होणार नाहीत, तेव्हा त्या वास्तवाशी जुळवून घेणं प्रेमिकांना खूप कठीण जातं.

‘प्रेम हे माझे तुझे बोलायचे नाही कधी,
भेटलो आता परि भेटायचे नाही कधी’

या कवी राम मोरे यांनी उद्धृत केलेल्या विरहवेदनेला सामोरं जाणं कठीण असतं. ती किंवा तो आयुष्यातून निघून गेला; पण आठवणींचा गोतावळा पिच्छा सोडत नसतो. आपल्या स्मृतिकोशाला तिलांजली देता येणं कठीण असतं, कारण हृदयातून अनुभवलेल्या भावनांचा महापूर अस्तित्वालाच गिळून टाकत असतो. अशा वेळी या भावनांना आवर घालताना आत्महत्येचे विचार अलगद मनात डोकावतात. अस्वस्थ करणाऱ्या मनाला आवर घालण्यासाठी कधी कधी मनाचं अस्तित्वच संपवायचं, ही कल्पना मनात भरारी मारू लागते. माणसाला अशा वेळी सगळं कसं छान आहे, असं स्वत:शी खोटं बोलणं जमत नाही. पालक, मित्र, नातेवाईकांना असं छान असणं दाखवून आनंदी ठेवणं ठीक आहे, पण स्वत:ला कित्येक दिवस शांतचित्त झोप घेणं, अन्नपाणी घेणं, इतकंसुद्धा खरं तर या मंडळींना जमत नाही. आपल्याच घुसमटणाऱ्या अनुभवांशी झगडणं काही वेळात संपेल असंही नाही. हा एक खूप मोठा खडतर प्रवास आहे. त्यातील प्रत्येक क्षणाशी भावनिक लढत द्यावी लागते. हृदय विदीर्ण झालेल्या व्यक्तीला भावनांच्या पिंजऱ्यातून सुटका मिळत नाही. या कठीण अनुभवातून मुक्त व्हायचं म्हटलं, तर स्वत:लाच या सगळय़ापासून मुक्त करायचं, असे विचार मनात येतात. त्यामुळे हे विरही जन जगण्यापेक्षा आत्महत्या हा पर्याय निवडतात. माझ्या एका रुग्णानं मला सांगितलेलं आठवतं, ‘‘या प्रेमाच्या पाशातून सहज सुटका होतच नाही. भावना दडपता येत नाही. कारण त्या लाटा मनाच्या काठावर आदळत असतात. रात्र रात्र तळमळत काढावी लागते. अशा वेळी कायमचं झोपी जायचे विचार येतात. तो भयाण गुदमरवणाऱ्या रात्रीचा काळोखा अनुभवच नकोसा वाटतो.’’ काही प्रसंगांत प्रेम ही निवड असू शकते, तर इतर क्षणी ती अनियंत्रित असते. सामाजिक, कौटुंबिक पार्श्वभूमीवर ब्रेकअप अधिक प्रमाणात होतात. यामध्ये नातेवाईकांचा सक्रिय सहभाग महत्त्वाचा ठरतो. अनेकदा नातेवाईक समजून घेण्याच्या मन:स्थितीत नसतात. काहींचा दृष्टिकोन ‘तुम्ही केलंत ना प्रेम आमच्या संमतीशिवाय.. मग भोगा!’ किंवा ‘यात आम्ही काय करणार.. निर्णय तुमचाच होता,’ असा असतो; परंतु ब्रेकअपनंतरचा काळ अधीर प्रेमिकांसाठी खूप महत्त्वाचा असतो. या काळात प्रियजनांचा आधार मोलाचा ठरतो.

सुमननं तिच्या ब्रेकअपनंतर आत्महत्या केली. तिच्या आईवडिलांनी तिला भावनिक आणि व्यावहारिक आधार द्यायचं नाकारलं. ती विरहवेदना सहन करू शकली नाही. पण त्यानंतर आईवडिलांचं आयुष्य मात्र अपराधीपणाच्या भावनेत होरपळत राहिलं. बऱ्याच वेळा प्रेमी युगुल जातपात, गरिबी-श्रीमंती, सामाजिक प्रतिष्ठेचा विचार करत नाही. कारण प्रेम शेवटी भावुक असतं. ही अशी भावना आहे, जी दोन लोकांमध्ये जोपासली जाते आणि कालांतरानं वाढत जाते. यात वचनबद्धता, परस्पर विश्वास, स्वीकृती यांचा समावेश आहे. यासाठी व्यावहारिकदृष्टया परिवार जर समजूतदार असले तर उत्तमच आहे. नकारात्मक आणि विध्वंसक विचारांनी भारावलेल्या मनाला डोकं रुळावर येईपर्यंत प्रेमळ आधाराची गरज भासते. आपल्या देशाच्या नोंदणीनुसार तरुण पिढीत परीक्षेत नापास होण्याच्या पाठोपाठ प्रेमभंगामुळे होणाऱ्या आत्महत्यांची संख्या वाढत आहे.

एका सर्वेक्षणानुसार ओडिशामध्ये ही संख्या तुलनात्मकदृष्टय़ा अधिक आहे. अलीकडेच बिलासपूरमध्ये पिलभीत इथे अंकित या महाविद्यालयीन तरुणानं कीटकनाशक पदार्थ खाऊन आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यानं इन्स्टाग्रामवर टप्प्याटप्प्यानं सहा वेळा- गुरुवार रात्रीपासून दुसऱ्या दिवशी १२ वाजता वाजेपर्यंत, म्हणजे विष खाईपर्यंत काही गोष्टी ‘शेअर’ केल्या होत्या. पहिला संदेश त्यानं लिहिला होता, ‘मूड ऑफ हैं, बहुत ज्यादा परेशान हूँ.. जिंदगी से कल जा रहा हूँ भगवान के पास’. यात सरळसरळ त्यानं आत्महत्येचा संकेत दिला होता, भावनिक दुरवस्था व्यक्त केली होती. दुसऱ्यांदा त्यानं एक भावनिक गाणं शेअर केलं होतं. तिसऱ्या संदेशात त्यानं आपला अश्रुपूर्ण चेहरा टाकला होता. चौथ्यांदाही त्यानं एक दु:खी गाणं- ज्यात हिरोचा मृत्यू होतो आणि त्याची प्रेयसी त्याला उठवायचा प्रयत्न करत असते असं शेअर केलं. त्यानंतर त्यानं कीटकनाशकाचा फोटो शेअर करत त्याबरोबर एका संदेशात त्यानं लिहिलं होतं, ‘जिंदगी का लास्ट दिन’. सर्वात शेवटी त्यानं आईवडिलांसाठी लिहिलं, ‘सॉरी मम्मी, पापा.. जा रहा हूँ।’ यात त्यानं ज्या पद्धतीनं एकामागून एक आपले विचार आणि भावनिक आवेग प्रकट केला आहे, तो महत्त्वाचा आहे. त्याच्या रोमँटिक वियोगातील राग, निराशा, दु:खाचा ताण, आत्महत्येची पद्धत हे सगळंच त्यानं प्रकट केलं होतं. त्याच्या दुर्दैवानं एवढय़ा काळात कुणी त्याकडे गंभीरपणे लक्षच दिलं नाही. प्रेमभंगाची परिणती आत्महत्येत आपणहून किंवा प्रत्यक्ष होत नाही; पण बरेच लोक भावनिकदृष्टया खचत जातात, भावुक होतात, नैराश्यात जातात आणि सगळय़ात महत्त्वाचं- त्या झंझावातात ते एकटे पडतात. हा जो प्रेमभंगातून ‘तुम बिन जाऊ कहाँ’ असा भावनिक क्षोभ आहे तो खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. तो जर यशस्वीपणे हाताळता आला, तर आत्महत्येची समस्याच उरत नाही. ‘द विझार्ड ऑफ ओझ’मध्ये एक वाक्य येतंHearts will never be practical until they can be made unbreakablel. तरीही प्रेमभंगाच्या यातनांतून जाताना स्वत:च्या तुटलेल्या हृदयाच्या तारांचे सूर पुन्हा कसे जुळवायचे हे समजून घेऊ या पुढच्या (२७ ऑगस्ट ) लेखात.
pshubhangi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Love affair the story loving couplessuicide dramatic attraction humming amy

Next Story
गेले लिहायचे राहून.. : गजाआड..
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी