डॉ. शुभांगी पारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणसाचं मूळचं व्यक्तिमत्त्व आणि त्यातले टोकाचे दोष किंवा आजार या गोष्टी आत्महत्येच्या कारणांमध्ये निश्चितपणे भर घालतात. व्यक्तिमत्त्वाच्या विशिष्ट अशा घडणीमुळे मनात बिकट परिस्थितीत प्रपातासारख्या कोसळणाऱ्या विचारांचं व्यवस्थापन करणं कठीण होऊन बसतं आणि आत्महत्येचा धोक्याचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता वाढते. व्यक्तिमत्त्वाशी जोडलेल्या अशा विविध गोष्टी आणि त्यांचा आत्महत्येच्या प्रवृत्तीशी असलेला संबंध सांगणारा लेख.

आत्महत्येची प्रवृत्ती आणि कृती कधीच एका कारणानं होत नाही. अनेक मनोसामाजिक जोखीम घटकांच्या समन्वयानं आत्महत्या होत असते. याव्यतिरिक्त, अनेक संशोधनांत आत्महत्या करणाऱ्या बहुतेक व्यक्तींमध्ये नैराश्यासारखे मानसिक विकार, व्यसनाधीनता, विशेषत: अल्कोहोलसंबंधित विकार आणि व्यक्तिमत्त्व विकार दिसून आले आहेत.

मानसशास्त्रातल्या तणाव-असुरक्षितता मॉडेलच्या (स्ट्रेस-डायथेसिस मॉडेल) सिद्धांताप्रमाणे एखाद्या व्यक्तीला जेव्हा तणावाचा सामना करावा लागतो, तेव्हा जर त्या व्यक्तीत आधीपासूनच एक प्रकारची नैसर्गिक असुरक्षितता (डायथेसिस) असेल तर ती आत्महत्येसाठी प्रवृत्त होऊ शकते. एखादा मानसिक विकार किंवा अचानक ओढवलेलं तीव्र संकट हे आत्महत्येच्या केंद्रिबदूपाशी असलेले जवळचे परिस्थितीजन्य घटक आहेत, तर व्यक्तिमत्त्वातली काही खास वैशिष्टयं, म्हणजे लहरी स्वभाव आणि चिडखोरपणा हे या केंद्रिबदूपासून थोडे दूरवर असलेले स्वभावजन्य घटक आहेत. सामान्यत: आत्मघाती वर्तनाशी आवेग आणि अत्यंत हळुवार संवेदनशील व्यक्तिमत्त्व (न्यूरोटिसिझम) हे गुणधर्म संबंधित असतात. या व्यक्तिमत्त्वात कुठल्याही जबरदस्त तणावाच्या प्रतिसादात मानसिक समतोल बिघडण्याची प्रवृत्ती अधिक दिसून येते. ज्या व्यक्ती न्यूरोटिसिझमच्या स्केलवर मूल्यमापन करताना अधिक गुण मिळवतात, त्यांना चिंता, भीती, राग, निराशा, मत्सर, अपराधीपणा, नैराश्य आणि एकाकीपणा येण्याची शक्यता इतरांपेक्षा अधिक असते. बऱ्याच अभ्यासाअंती असं दिसून आलं आहे, की आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या मानसिक विकारांनी ग्रस्त लोकांमध्येसुद्धा न्यूरोटिसिझमची पातळी लक्षणीय असते. व्यक्तिमत्त्वाचा घटक आत्महत्येचा धोका दोन प्रकारांनी वाढवू शकतो. हळवेपणासारख्या काही वैशिष्टय़ांमुळे लोक नैराश्यासारख्या आत्महत्येशी संलग्न मनोविकारांना बळी पडू शकतात. लोक जीवनातल्या सामान्य घटनांवर ज्या प्रकारे उत्स्फूर्त प्रतिक्रिया देतात, त्याबाबत व्यक्तीची भावविवश व्यक्तिमत्त्व वैशिष्टय़ं परिणाम करू शकतात. व्यक्तिमत्त्वाच्या काही अभ्यासकांनी ‘दु:खी त्रिकोण’ किंवा ‘मिझरी ट्रायड’ (misery triad) अशी एक संकल्पना मांडली आहे.  म्हणजे उच्च संवेदनशीलता, कमी विवेकनिष्ठता आणि कमी समाजशीलता अशा व्यक्तिवैशिष्टय़ांचं तिहेरी मिश्रण आत्महत्येचं संकट वाढवतं. ‘दु:खी त्रिकोण’ सिद्धांत व्यक्तीची भावनिक वेदनांबद्दल अधिक संवेदनशीलता, समस्यांचं निराकरण करण्याची असमर्थता, भावुक आवेगांचा प्रतिकार करण्याचा अभाव आणि सामाजिक आधाराची कमतरता सूचित करतो. सामाजिक पाठिंब्याचा अभाव आत्महत्येचा धोका अधिक वाढवतो. सहकार्यानं वावरणाऱ्या आणि दयाभाव असणाऱ्या लोकांपेक्षा जे लोक माणूसघाणे स्वभावाचे आणि अविश्वासू प्रवृत्तीचे असतात, त्यांच्याकडे कठीणसमयी उपयुक्त ठरणारं सकारात्मक लोकांचं सामाजिक जाळं कमी असतं.

प्रगत डिजिटल युगात जिथे कित्येक मैलांवरून लोक एकमेकांशी सहज संवाद साधत आहेत, तिथे दुर्दैवानं आज ज्यांची सामाजिक नाती कमकुवत असतात आणि इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता कमी असते, अशा लोकांमध्ये आत्महत्येचा धोका अधिक दिसून येतो. प्रसिद्ध आत्महत्याविषयक संशोधक थॉमस जॉइनरनं म्हटल्याप्रमाणे, आत्महत्या रोखण्यासाठीच्या सार्वजनिक सेवा मोहिमेसाठी त्याला जर कुणी मोठी रक्कम दिली, तरी तो एकच संदेश जनतेला देईल की, ‘तुमचे जुने मित्र सांभाळून ठेवा. काही नवीन मित्र बनवा. एकूणच एकमेकांपासून दुरावलेल्या समाजात आज मजबूत कौटुंबिक नातेसंबंध निर्माण करण्यासाठी, मैत्री वाढवण्यासाठी आणि समाजाप्रति मौलिक योगदान देण्यासाठी खूप मोठे प्रयत्न करणं आवश्यक आहे.’

स्वरूपा ही १८ वर्षांची मुलगी फारच हळवी होती. अगदी तिनं केलेली चपाती आज चांगली फुगली नाही, यांसारख्या सहज वाक्यांवरूनही तिचा फ्यूज उडत असे. मग ती न खातापिता झोपी जाई, रागारागानं हातांवर, पायांवर ब्लेड मारून घेई. अत्यंत मूडी स्वभावाची. तिचं कधी, कशावरून बिघडेल हे कुणाला सांगता यायचं नाही. मित्रमैत्रिणी मिळवण्यासाठी तिला खूप कष्ट घ्यायला लागायचे. ते टिकतही नसत. ती केव्हा, कशी बिथरेल याचा काही नेम नसल्यामुळे इतर लोक तिच्याशी मैत्री करण्यासाठी उत्सुक नसायचे. तिचा मूड सदैव रडका असायचा. सुरुवातीला जरी तिला नैराश्याचा विकार असावा असं वाटलं, तरी नंतर तिच्या या बऱ्याच काळ स्थिरावलेल्या लक्षणांनी लक्षात आलं, की तिला ‘बॉर्डरलाइन डिसऑर्डर’ (बीपीडी) ही व्यक्तिमत्त्व विकृती होती. या विशिष्ट व्यक्तिमत्त्व विकारात आत्महत्येचा धोका नेहमीच जास्त असतो हे फार पूर्वीपासून ज्ञात आहे. ‘बीपीडी’चं मुख्य लक्षण म्हणजे या व्यक्तीला भावनांचं नियमन करण्यात अडचण येत असते आणि त्या सतत संभ्रमात राहातात. त्या व्यक्तीला तीव्र रागाची भावना नियंत्रित करण्यात अडचण येऊ शकते. हा राग बऱ्याचदा कुणी दुर्लक्ष केलं म्हणून किंवा कुणी आपल्याला सोडून देईल या भीतीपोटीची प्रतिक्रिया असते. इतरांच्या टीकेला प्रतिसाद म्हणून हिंसाचार किंवा धमकावणारं वर्तन या लोकांमध्ये दिसून येतं. ‘बीपीडी’ असलेले लोक त्यांच्या भावनांचं नियमन करण्यासाठी, स्वत:ला शिक्षा करण्यासाठी किंवा त्यांच्या आंतरिक वेदना व्यक्त करण्यासाठी आत्महत्येचे प्रयत्न व आत्महानी हे साधन, लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून वापरू शकतात. यापैकी अनेकांच्या हातावर आपल्याला अशा प्रकारच्या चाकूनं वा ब्लेडनं झालेल्या जखमांचं जाळंही दिसतं.

आत्महत्येचा धोका असलेल्या रुग्णांमध्ये आजकाल सर्रास व्यक्तिमत्त्व विकाराचं (‘पीडी’) वारंवार निदान केलं जातं. असामाजिक व्यक्तिमत्त्व विकार (अ‍ॅन्टिसोशल) असलेले ५ टक्के लोक शेवटी आत्महत्येनं मृत्यू पावतात, ही वस्तुस्थिती फार कमी लोकांना माहीत आहे. ४० वर्षांचा ‘सीरियल किलर’ आणि बलात्कारी एम. शंकर ऊर्फ जयशंकर (ज्याला ‘सायको शंकर’ म्हणूनही ओळखलं जात असे), यानं बंगळूरु मध्यवर्ती कारागृहात गळा चिरून आत्महत्या केल्याचं आढळून आलं. २००९ पासून सुरू झालेल्या गुन्ह्यात त्यानं बलात्कार आणि हत्येचे सुमारे १५ भयानक गुन्हे केले होते, ते एखाद्या ‘थ्रिलर’ कादंबरीत शोभणारे होते. अशा हिंसक, विकृत व्यक्तींमध्ये त्यांच्या आक्रमकतेनं इतरांइतकंच स्वत:ला लक्ष्य करण्याचा धोका असतो. धोकादायक ड्रायिव्हग किंवा धोकादायक परिस्थितीत सहभागी होण्याच्या परिणामस्वरूप त्यांना त्यांच्या स्वत:च्या वागणुकीमुळे हिंसक मृत्यू येऊ शकतो. एकदा का निर्घृण गुन्ह्याची धुंदी उतरली, की त्यांच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असतं, की त्यांचं संपूर्ण जीवन निरुपयोगी आहे.

जी. डेव्हिड बॅटी आणि सहकाऱ्यांनी २०१८ मध्ये एक महत्त्वाचा शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यात त्यांनी सुमारे आठ वर्षांच्या कालावधीत अनेक देशांमधल्या ४,६४,२५१ प्रौढांचं परीक्षण केलं. त्यादरम्यान त्यातले २७० सदस्य व्यक्तिमत्त्व विकृतीमुळे आत्महत्येनं मरण पावलेले आढळले. व्यक्तिमत्त्व विकृतीचं निदान भविष्यात होऊ शकणाऱ्या आत्महत्या आणि आत्महत्यांच्या प्रयत्नांचा अंदाज करण्यासाठी,  नातेवाईकांना जागरूक करता येण्यासाठी महत्त्वाचं ठरतं.

थॉमस जॉइनर यांनी २००५ मध्ये आत्महत्येच्या वर्तनाचा आंतरवैयक्तिक-मानसशास्त्रीय सिद्धांत (The interpersonal-psychological theory of suicidal behaviour १) प्रसिद्ध केला. तो असं सुचवतो, की जोपर्यंत आत्महत्येनं मरण्याची इच्छा आणि तसं करण्याची क्षमता, या दोन्ही गोष्टी एकत्र नसतील तर एखादी व्यक्ती आत्महत्येनं मरणार नाही. जॉइनरच्या सिद्धांतानुसार एखाद्या व्यक्तीच्या मनात आपण कुणावर तरी भार होऊन राहिलो आहोत आणि आपल्याला समाजाकडून आपुलकी मिळत नाही, अशी सामाजिक परकेपणाची भावना निर्माण होते, तेव्हा त्यांच्या मनात मृत्यूचे विचार यायला लागतात. एखाद्या व्यक्तीची आत्महत्येची क्षमता त्यांच्या आयुष्यात मोठय़ा प्रमाणात वेदनादायक किंवा भयावह अनुभवांच्या वारंवार येणाऱ्या अनुभूतीमुळे वाढते. अशा व्यक्तींच्या मनात गंभीर वेदनेची किंवा मृत्यूची भीती उरत नाही. या सिद्धांताच्या निमित्तानं माझ्या एका रुग्णाची गोष्ट नमूद करावीशी वाटते. माझी ही रुग्ण आत्महत्येचे अनेक भयानक प्रयत्न करत असे. सांगून, समजावूनसुद्धा योग्य उपचार घ्यावेत असं तिला कधी वाटतच नसे. कधी जाळून घे, कधी हातावर सुरीनं खोल जखमा कर, कधी विष प्राशन कर, असे प्रकार चालू होते. खूप लहान असताना आई-बाबा, भाऊ अपघातात वाहून गेलेले तिनं पाहिले होते. नंतर काकीनं अनंत शारीरिक व मानसिक छळ करून तिला वाढवलं होतं. तिला वाटलं तर रडायलासुद्धा बंदी होती. ती वयात आली तसं तिचं एका अट्टल दारुडय़ा, जुगारी तरुणाशी लग्न लावून दिलं गेलं. तिच्या म्हणण्यानुसार तिला दु:ख-दर्द कधी जाणवतच नाही. आपण जिवंत आहोत की नाही, हे अजमावण्यासाठी ती असे जीवघेणे प्रयोग करते, असं तिचं म्हणणं होतं. ‘अगं, पण यात जीव जाईल ना तुझा..’ या माझ्या  म्हणण्यावर ‘तिथे तर आज ना उद्या जायचंच आहे,’ असं तिचं उत्तर असायचं; पण नेहमी कशीबशी ती हॉस्पिटलमध्ये तरी पोहोचायची. ही अशी गुदमरलेली व्यक्तिमत्त्वं मनोचिकित्सकालासुद्धा गोंधळात टाकतात. त्यांचं विश्लेषण कसं करायचं ते समजत नाही. त्यांना जगायचं असतं का मरायचं असतं तेच कळत नाही. कोणतीही जीवघेणी वेदना ही दैनंदिन जीवनात टोकाची प्रतिकूल परिस्थिती निर्माण करते, मग त्याचे स्रोत काहीही असोत. ही वेदना व्यक्तीला आत्महत्येच्या भोवऱ्यात ओढू शकते. काही बिकट घटनांमुळे जेव्हा जीवनाशी रममाण होण्याचे प्रयत्न भावनिक, मानसिक किंवा शारीरिक व्याधीत गटांगळी खातात, तेव्हा व्यक्तीला आपल्याच अस्तित्वात रमणं नकोनकोसं वाटतं. शिवाय अशी व्याधी भविष्यात कधीही सुधारणार नाही, या कल्पनेनं व्यक्ती जर नैराश्यानं ग्रासलेली असेल, तर ‘यापेक्षा मृत्यू बरा आणि जगणं नको’ म्हणून आत्महत्येची मानसिक वीण जुळायला लागते. तथापि जर अशी आशा असेल, की ‘हे दिवस निघून जातील आणि परिस्थिती उज्ज्वल होऊ शकेल,’ तर व्यक्ती जीवनात गुंतून राहील.

आत्महत्या ही शेवटी दु:ख आणि निराशेच्या कूटनीतीत फसलेली असते. त्यासाठी दु:खातही आशेचा सूर आळवण्याची कला प्रगल्भ व्यक्तीला छान जमलेली असते. क्षणात उचंबळणारा मानसिक क्षोभ हा आत्महत्येशी संबंधित मानला गेला आहे. मानसशास्त्रातली आवेगाची संकल्पना ही आवेगपूर्ण व्यक्तिमत्त्वापासून आवेगाची क्षणिक स्थिती असू शकते. आवेगाच्या विविध घटकांमध्ये कोणताही पूर्वविचार न करता निर्णय घेणं आणि तथाकथित सनसनाटी संवेदना शोधणं हे मुख्य घटक आहेत. शिवाय आवेगाची पुढील वैशिष्टय़ं म्हणजे व्यक्तीची आपल्या कृतीनं होणाऱ्या नकारात्मक परिणामांबद्दल वैचारिक जाणीव कमी झालेली दिसते आणि त्यांची आत्महत्या ही कुठल्याही माहितीचं सारासार विश्लेषण न करता घाईघाईनं दिलेली अविचारी प्रतिक्रिया असते. आत्महत्या करणारे अविचारी, अपरिपक्व अनेक जण आपण अवतीभवती पाहात असतो. व्यक्तिमत्त्व विकृती हे मनोचिकित्सकांसाठी खरे सांगायचं तर एक आव्हानच आहे; पण आधुनिक वैद्यकीय उपचार आज शक्य आहेत.

एखाद्याला सर्व प्रकारच्या समस्यांनी पुरेपूर भरलेल्या आयुष्यात सक्षम जीवन जगायचं असेल, तर सुदृढ व्यक्तिमत्त्व मिळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. जर ही व्यक्ती जीवनाशी, आपल्यावर जीव लावणाऱ्या प्रियजनांशी, आयुष्यातील एखाद्या मौल्यवान भूमिकेशी किंवा एखाद्या अर्थपूर्ण उद्देशाशी समर्पित असेल, तर कठोर वेदनेचा सागर पार करत असतानाही तिचे आत्महत्येचे विचार सीमित राहातील आणि ती आयुष्य पुरेपूर जगेल.

pshubhangi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mage rahilelyanchaya katha vyatha author dr shubhangi parkar suicidal tendencies chaturang news ysh
First published on: 03-12-2022 at 00:07 IST