| Mage rahilelyanchya katha vyatha author dr shubhangi parkar Extramarital relartions Betrayal ysh 95 | Loksatta

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : वैवाहिक नात्यातला विश्वास

लग्नाच्या जोडीदारापासून विवाहबाह्य संबंध लपवत जगणारे अनेक जण असतात. हे संबंध कधी तरी उघडकीस येतातच.

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : वैवाहिक नात्यातला विश्वास
वैवाहिक नात्यातला विश्वास

डॉ. शुभांगी पारकर

लग्नाच्या जोडीदारापासून विवाहबाह्य संबंध लपवत जगणारे अनेक जण असतात. हे संबंध कधी तरी उघडकीस येतातच. अशी नाती प्रचंड कटुता घेऊन तुटतात, काही जण तसेच फरफटत संसार करत राहातात, तर काही विश्वासघात सहन न झाल्यामुळे आत्महत्येचं टोकाचं पाऊलही उचलतात.  मात्र मानवी स्वभाव स्खलनशील आहे हे लक्षात घेऊन दोघांनी प्रगल्भतेनं वेळीच सावरायचं ठरवलं, तर यातली काही नाती आणि काही जणांचे जीवही वाचू शकतील. 

वैवाहिक नात्यांचा पाया असलेल्या विश्वासाला तडा गेल्यानंतर त्याचे दुखावल्या गेलेल्या जोडीदारावर कसे परिणाम होतील, हे सांगणं कठीण असतं.  मागच्या लेखात (४ जून) गौरी आणि अनिल यांच्या संसारात अनिलच्या एका तरुणीशी असलेल्या अति जवळिकीनं मिठाचा खडा पडलेला आपण वाचला. ‘त्या स्त्रीशी असलेलं नातं संपव, आपण आपला संसार पुन्हा नव्यानं सुरू करू,’ अशी भूमिका गौरीनं घेतली आणि अनिलनंही वरवर का होईना, त्यास संमती दाखवली. तरीही आपली फसवणूक झाल्याच्या भावनेनं गौरीच्या मनाला झालेली जखम भरून आली नाही. त्याचा परिणाम गौरीनं आत्महत्या करण्यात झाला.

या विचित्र घटनेनं त्या कुटुंबाचे प्रियजन, मित्रमंडळी, ओळखीचे, अनोळखी, सगळेच हेलावले. या सर्व गोष्टींसाठी अनिलला दोष देणं ही साधी सरळ नैसर्गिक प्रतिक्रिया होती. त्यांचा हा विवाह अयशस्वी झाला आणि तिनं आत्महत्या केली, अशा वेळी त्या नवरा-बायकोंत नक्की काय झालं ते कुणाला माहीत नसतं. त्यानं दुसऱ्या स्त्रीमध्ये गुंतवून घेण्याचं कारण काय, ते कुणाला माहीत नसतं. यात त्याला दोष द्यायचा, की तिला दोष द्यायचा हेही कुणाला कळत नाही. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची’ अशी ही परिस्थिती असते; परंतु असं काही घडलं, की लोक लगेच आपल्या सामाजिक प्रतिक्रिया आणि आडाखे मांडून मोकळे होतात. हे सगळे प्रश्न, प्रतिसाद आणि अंदाज हे व्यक्तीच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पार्श्वभूमीतून निर्माण होत राहतात. बऱ्याच जणांच्या मते, अशा स्थितीत जिची फसवणूक झाली अशा स्त्रीला समाजात जगणं अवघड होत असतं. तिची काही चूक नसताना संशयाच्या पिंजऱ्यात तीही अडकली जाते किंवा तिच्यात काही तरी कमतरता वा दोष असण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकांच्या छद्मी नजरा तिच्याकडे रोखलेल्या असतात. त्यात कळवळय़ापेक्षा हेटाळणी अधिक असते. कित्येकांना असं वाटतं, की त्या स्त्रीनं कितीही सावरायचा प्रयत्न केला, तरी तिचा संसार तर उध्वस्त झालाच ना? गौरीसारख्या स्त्रिया अशा असहाय्य स्थितीतून जाताना कधी स्वत:ची समजूत काढतात, कधी जाणूनबुजून दुर्लक्ष करतात आणि संसार रेटतात. काही जणी जन्मभर आपल्या नवऱ्याशी भांडत भांडत संसाराचं कुरुक्षेत्र करतात. कित्येक जणी व्यावहारिकदृष्टय़ा या फसवणुकीची नुकसानभरपाई नवऱ्याकडून मागून घेतात. काही जणी निराशाग्रस्त होऊन मानसिक आरोग्याच्या समस्या सहन करतात. काही जवळजवळ असा नवरा आपल्यासाठी अस्तित्वातच नाही असं मानून विधवेचं जीवन जगतात वा बंड पुकारत आक्रमक जीवन जगतात. यात योग्य-अयोग्य सांगता येणं कठीण आहे. गौरीसारख्या स्त्रिया मात्र अतिशय टोकाचं, आत्महत्येचं पाऊल उचलतात.

अनिलचं ते विवाहबाह्य नातं पुढे तगलं नाही. पश्चात्तापानं दग्ध झालेला अनिल शेवटी आपलं आयुष्य संसाराच्या राखेत जगत राहिला. अपराधीपणाची भावना त्याला आयुष्यभर खात राहिली. आयुष्याचा निखळ आनंद घ्यायची संधी पुन्हा कधी मिळेल याची खात्री त्याला उरली नव्हती. गौरीवरचं त्याचं प्रेम त्या वेळीही कमी नव्हतं आणि आजही ती त्याच्या हृदयात जिवंत होती; पण आता ती त्याची प्रिय सखी नव्हती, तर डोळय़ावर काळी पट्टी बांधून, न्यायाचा तराजू हातात घेतलेली देवता होती.  अनिलला रोजचा दिवस कठीण जायचा. आपल्या दोन्ही मुलांसाठी तो तळमळत काम करायचा. त्यांना आईचं प्रेम कमी पडता कामा नये, त्यांचे आईविना हाल होऊ नयेत, गौरीचं त्यांच्याबद्दलचं स्वप्न अपुरं राहू नये, यासाठी तो दिवसरात्र झटत होता. स्वत:लाच गुन्हेगार समजून जगणाऱ्या व्यक्तीचं जीवन भयानक असतं. आपण आपल्या आयुष्यात मिळणाऱ्या यातना ही आपल्या पापाची शिक्षा म्हणूनच भोगत आहोत आणि भोगणार आहोत, ही भावना मृत्यूच्या यातनेपेक्षा मरणप्राय असते. या भरल्या जगात असूनही हे जग आपल्यासाठी केवळ भ्रम आहे, याची हृदयद्रावक जाणीव मनात ठेवून अनिल यंत्रवत जगत होता. त्याच्या आत्म्यावर येणारं ओझं कमी होण्यापेक्षा दिवसागणिक वाढत होतं. गौरीनं आपला इहलोकीचा प्रवास ज्या एका दुर्दैवी घटनेसाठी संपवला होता, त्याच इहलोकात अनिल गौरीचा गुन्हेगार म्हणून जिवात जीव असेपर्यंत जगणार होता.

 अनिलच्या या विवाहबाह्य संबंधामुळे वर्षांनुवर्ष मैत्री जोपासणाऱ्या दोन व्याह्यांच्या कुटुंबांचं नातंसुद्धा गुंतागुंतीचं झालं. दोन मित्रांत भावुक सख्य होतं म्हणून त्यांच्यात तेढ निर्माण झाली नाही एवढंच; पण मैत्रीच्या मोठय़ा आधारानं एकत्रित जीवन जगू पाहाणाऱ्या त्या कुटुंबांना एकमेकांच्या नजरेला नजर देता येत नव्हती. सगळे धागे तटातट तुटले होते.

   मध्यंतरी एक बातमी वाचली होती- आंध्र प्रदेशात दोन तरुण, विवाहित कुटुंबं शेजारी शेजारी राहात होती. त्यात एका कुटुंबातला पुरुष, त्याला नितीन म्हणू या. दुसऱ्या कुटुंबातल्या स्त्रीच्या, तिला नीता म्हणू या, प्रेमात पडला. हे लक्षात येताच नितीनच्या पत्नीनं आपल्या पतीला समज द्यायला सुरुवात केली. तो बधत नाही हे पाहून तिनं गावाहून आपल्या भावांना बोलावलं. त्यांनी नितीनला चांगलीच तंबी दिली, खूप मारहाणही केली. मग संतापाच्या भरात नीताला शिवीगाळ करून नितीननं तिच्या नवऱ्याचा सगळय़ांसमोर घोर अपमान केला. त्याला नपुंसक म्हणून ‘तुझ्या बायकोला तुला सांभाळता येत नसेल तर तोंडाला काळं फासून जीव दे,’ अशा शब्दांत त्यानं त्याची निर्भर्त्सना केली. या सर्व अपशब्दांच्या भडिमारानं अपमानित होऊन त्या नीता आणि तिच्या नवऱ्यानं घरात फाशी घेऊन आत्महत्या केली, तर नितीननं भावनेच्या भरात आपल्यामुळे त्या दोघांचा नाहक जीव गेल्याचं पाहून स्वत: विष घेतलं. बघता बघता दोन कुटुंबांतले तीन जण हकनाक बळी गेले. त्या दोघांनाही दोन-दोन मुलं होती. अनैतिक संबंधांच्या परिणामांची ही भयानक परिणती पाहता विवाह हा केवळ दोन व्यक्तींमध्ये नसतो, तर तो दोन कुटुंबांमध्ये असतो, याची प्रचीती येते. विवाह टिकतात ते विशेषकरून कौटुंबिक बंधनामुळे, संयमामुळे आणि नि:स्वार्थ त्यागामुळे. एका शुभमुहूर्तावर विवाह लागला, की लगेच आयुष्यभरासाठी प्रेम तयार होत नाही. माणसाचं प्रेम सतत नव्यानं घडवावं लागतं, तेव्हाच ते हळूहळू खुलत जातं. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते. अलीकडे आपण विवाहबाह्य संबंधात गुंतलेले अनेक पुरुष आणि स्त्रिया त्यांच्या नोकरी वा कामाच्या ठिकाणी पाहात असतो. आपल्या विवाहापासून हे संबंध लपवत ते गुप्त आयुष्य जगत असतात. ते घटस्फोटाच्या त्रासातून जातात. आपल्या जोडीदाराला आणि मुलांना वेदना देतात किंवा आपल्या विश्वासघातानं तुटलेल्या संसाराच्या दोरीला पुन्हा जोडण्यासाठी हताश, अश्रूपूर्ण, जीव तोडून प्रयत्न करतात. बऱ्याच जणांना ‘ते कसं घडलं’ हेच समजत नाही. यात आपण खरंच जाणूनबुजून विश्वासघात केला आहे का, याची जाणीवही त्यांना नसते. लग्नाला आपल्या देशात शाश्वत मानलं आहे, पण शाश्वत संकल्पना जोपासत कित्येक जण दु:खी संसारात आजीवन आपलं आयुष्य जगत आहेत. अशा काही दारुण विवाहांतूनही विवाहबाह्य संबंध निर्माण होतात. शेवटी तो मानवी भावनांचा आविष्कार आहे, हे आपल्याला नाकारून चालत नाही. हल्ली एक वेगळाच लैंगिक मोकळेपणा किंवा स्वातंत्र्य अनुभवायचा ‘ट्रेंड’ युवकांपासून प्रौढांपर्यंत समाजात पसरलेला दिसतो. तो एक सामाजिक अस्तित्वाचा सामान्य भाग झाला आहे. समाजमाध्यमांमुळे आणि मोबाइलमुळे जास्तच फोफावला आहे. लांबून अशा संबंधाकडे पाहिलं, की तो चक्क वेडेपणा वाटतो. एका भावुक क्षणी माणसं आपल्या आयुष्यात स्थिरावलेलं सगळं अस्थिर कसं करू शकतात हा प्रश्नच आहे; पण विवाहबाह्य संबंध नैतिकतेच्या दृष्टिकोनातून चूकच आहे. तुमच्या जोडीदाराच्या अपरोक्ष छुपाछुपी करून चाललेला हा प्रसंग योग्य आहे का, असा प्रश्न तुम्ही विचाराल तर त्याचं उत्तर ‘नाही’च आहे. अर्थात या भावनांत कधी कधी गंभीरता असते, सचोटी असते, प्रामाणिकपणाही असतो. यात गुंतलेली माणसं वाईट नसतात किंवा दुष्ट नसतात; पण शेवटी त्याची किंमत त्यांना काय मोजावी लागणार आहे, याचा हिशेब ठेवणंही आवश्यक आहे. माणुसकीच्या प्रगल्भ नात्यांमध्ये असे काही संबंध आयुष्यभर टिकून राहिलेलीसुद्धा उदाहरणं आहेत, पण ती दुर्मीळच आहेत.

  गौरीनं अनिलचे अनैतिक संबंध जेव्हा ओळखले, तेव्हा तिनं त्याच्याशी मोकळेपणानं बोलणं बंद केलं. त्याला तिनं पहिल्या दिवसापासून आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं. त्याला पाहिलं, की तिला सतत एकच गोष्ट जाणवायची, की हा असा अप्रामाणिक का झाला. अशा पद्धतीनं चिडून नातं संपवण्यात खरंतर काहीच अर्थ नसतो. विवाहबाह्य संबंधात फक्त पुरुष आघाडीवर आहेत असंही नाही. अनेक स्त्रियांनाही यातून जाताना आपण पाहातो. ‘पती-पत्नी और वो’ यात स्त्रिया आणि पुरुष दोघंही समसमान जबाबदार असतात. अशा वेळी प्रत्येकानं स्वत:ला वेळ दिला पाहिजे, गंभीरपणे यावर विचार करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी. कारण विवाहबाह्य संबंध यशस्वी होऊनही ते दैनंदिन जीवनात नंतर सुखी होतील याची ग्वाही देता येत नाही. आधीच्या संसाराच्या खुणा सहज पुसल्या जात नाहीत. त्या मनात धगधगत राहतात. बॉलीवूडमध्ये या विवाहबाह्य संबंधांचं पेवच फुटलेलं आहे.

अगदी थोरामोठय़ांपासून त्यातल्या सुप्रसिद्ध चेहऱ्यांना आपण सगळे ओळखतो. त्यातल्या काहींचे घटस्फोटही होतात, पण ते सगळे आजीमाजी आश्चर्यकारकरीत्या एक मोठंच्या मोठं कुटुंब म्हणून नंतर वावरतात. हे त्यांना कसं जमतं कळत नाही, पण जमतं खरं. त्यात सोयीस्करपणा असतो आणि प्रतिष्ठा सांभाळली जाते. याबरोबर करोडो रुपयांची आर्थिक गणितं जुळलेली दिसतात. विस्कटलेल्या कौटुंबिक घडीचा ‘डॅमेज कंट्रोल’ जितका व्यवस्थित करता येईल तितका केला जातो.

   सामान्य घरात वा मध्यमवर्गीय कुटुंबात वैवाहिक जीवनाची मर्यादा आणि पवित्रता आजही पाळली जाते. म्हणून ती टिकवण्याचा प्रयत्न आत्महत्येच्या टोकाच्या निर्णयापेक्षा अधिक हिताचा ठरतो. पुरुषांचे असोत वा स्त्रियांचे असोत, विवाहबाह्य संबंध जर व्यवस्थित हाताळले गेले, वेळीच थांबवले गेले, तर वैवाहिक जीवन पुन्हा जोडता येतं, टिकवता येतं. काही रागाच्या, अपमानाच्या वा दु:खाच्या भरात वैवाहिक संबंध तोडतात आणि नंतर भावनिक वेदना सहन करत आयुष्य घालवतात, आत्महत्येसारखं पाऊल उचलतात; पण कशासाठी? भावनिक प्रगल्भता, क्षमा आणि मनाच्या अंतरंगात फुलून राहिलेलं प्रेम योग्य वेळी जीवनात गुंफता आलं, तर त्या सर्वासाठीच चांगभलं नाही का? शेवटी ‘श्रद्धा व सबुरी’ या घडीला मदतीला येतेच. मात्र अशा प्रकारचा भावनिक गुंता जेव्हा मानसिक आरोग्याचाच बळी घेतो, तेव्हा न घुटमळता व्यावसायिक मदत घेणं अधिक हिताचं ठरेल. 

pshubhangi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-06-2022 at 00:02 IST
Next Story
बदलाच्या दिशेने..