Mage rahilelyanchya katha vyatha author dr shubhangi parkar mental disorders addicts ysh 95 | Loksatta

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : व्यसनाची काळी रात्र

‘मूड’ आणि चिंतेचे मानसिक विकार हे आत्महत्येसंबंधीचे महत्त्वाचे जोखमीचे घटक व्यसनी व्यक्तींमध्ये अधिक दिसतात.

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : व्यसनाची काळी रात्र
मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : व्यसनाची काळी रात्र

डॉ. शुभांगी पारकर

‘मूड’ आणि चिंतेचे मानसिक विकार हे आत्महत्येसंबंधीचे महत्त्वाचे जोखमीचे घटक व्यसनी व्यक्तींमध्ये अधिक दिसतात. नैराश्य आणि बायपोलर मनोविकारातल्या पहिल्या टप्प्यात आणि बॉर्डरलाइन व्यक्तिमत्त्व विकृती असलेल्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये आत्महत्येचे विचार अधिक असतात. वारंवार ‘रीलॅप्स’ होऊन दवाखान्यात दाखल व्हाव्या लागलेल्या रुग्णांमध्ये आत्महत्येची जोखीम अधिक असते. याचं कारण या रुग्णांचं व्यसन पुनरुत्पादित होत राहातं आणि सामाजिक गुंतागुंत व मानसिक विकारांची तीव्रता वाढत जाते..  व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये आत्महत्येची ही शोकांतिका इतकी का आढळते?

लोक व्यसनाच्या आहारी का जातात, याविषयी समजलेल्या अनेक गोष्टींमध्ये लोक आपल्या मूलभूत समस्यांना तोंड देण्यासाठी, आपला तणाव वा चिंता कमी करण्यासाठी, नावीन्याचा अनुभव घेण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी व्यसनजन्य पदार्थ वापरतात असं लक्षात येतं. लोकांच्या व्यसनी दुनियेशी जोडलेल्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यविषयक अशा विविध प्रकारच्या समस्या आपण पाहात असतो. त्यांच्या आत्महत्या, त्यांच्या मानसिक आरोग्यासंबंधीच्या समस्या, त्यांनी स्वत:ला केलेली हानी, यामध्ये व्यसनाचा एक प्रकारचा दुवा आपल्याला दिसून येतो.  

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या घटनेला समाजमाध्यमांमध्ये खूप प्रसिद्धी मिळाली होती. त्याचा मृत्यू प्रथमदर्शनी वैयक्तिक आणि भावनिक कारणांमुळे आत्महत्या म्हणून घोषित करण्यात आला होता. प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांवर त्याबद्दल विविध सनसनाटी कथा रंगवल्या जात असताना त्याच्या मृत्यूबद्दल गूढ भीती व्यक्त केली जात होती. नंतर अमली पदार्थाचा घटक त्याच्या मृत्यूशी जोडला गेला. गेल्या दहा-पंधरा वर्षांत अमली पदार्थाच्या सेवनानं झालेल्या आत्महत्यांची संख्या आपल्या देशात दुप्पट झालेली दिसते. उपलब्ध माहितीप्रमाणे अलीकडच्या काळात महाराष्ट्रात, त्यापाठोपाठ कर्नाटकात अशा व्यसनाशी निगडित आत्महत्या सर्वात जास्त आढळल्या होत्या.

माझा एक रुग्ण- अरुण यानं २८ वर्षांचा असताना आत्महत्या केली. त्याला ब्राऊन शुगरचं (हेरॉइन) व्यसन जडलं होतं. वयाच्या अठराव्या वर्षी, म्हणजे बारावीत असताना त्याला प्रथम चरसचं व्यसन मित्रांच्या संगतीत लागलं. हळूहळू त्यानं मित्रांबरोबर ब्राऊन शुगर घ्यायला सुरुवात केली. सुरुवातीला त्याच्या पालकांच्या लक्षात काही आलं नाही. तो नियमित सकाळी बाहेर पडताना त्याला पॉकेटमनी दिलेला असेच. घरची परिस्थिती जरी बेताची असली तरी अरुणनं शिकावं, असा त्याच्या आईवडिलांचा आग्रह होता. तो खूप हुशार नव्हता, पण सहज उत्तीर्ण होत होत बारावीपर्यंत पोहोचला होता. ब्राऊन शुगरच्या विळख्यात तो कधी शिरला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. नंतर त्याचं सगळं वागणंच चित्रविचित्र झालं. त्याच्या डोळय़ांत नशेचा जाळ दिसू लागला होता. नियमित स्वच्छतेचा मागमूसही राहिला नाही. केस अस्ताव्यस्त, कपडे मळलेले. अभ्यासाचं नाव दूरच. जवळचे मित्र नव्हते. तो घरीच थांबत नसे. सदैव बेचैन राहाणारा अरुण स्वत:च्या नशिल्या दुनियेत हरवून गेला होता. सुरुवातीला रात्री उशिरा येणारा अरुण यंत्रवत खायचा-प्यायचा. नंतर नंतर मध्यरात्री, पहाटे केव्हाही घरी येऊ लागला. तो व्यसनाधीन झाला आहे हे आईवडिलांना आतापावेतो कळून चुकलं होतं. शेजारीपाजारीसुद्धा त्याच्या अशा वागण्यानं बिथरले होते. एकदा त्यांच्या चाळीत मोठी चोरी झाली आणि लोकांनी त्याचा आळ अरुणच्या नावावर घेतला. कारण तो घरातून अनेक गोष्टींची चोरी करून विकत असल्याचं त्यांनी ऐकलं होतं. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला आत टाकलं, पण तो चोर असल्याचं सिद्ध न झाल्यामुळे त्याला सोडण्यात आलं. याच काळात त्याला ‘कोल्ड टर्की’ – म्हणजे ‘विथड्रॉवल’ची लक्षणं आल्यामुळे दवाखान्यात आणण्यात आलं. तेव्हा ‘कोवळय़ा वयात भेटलेल्या तथाकथित मित्रांनी आपल्या आयुष्याचा विचका केला,’ असं त्यानं सांगितलं होतं. जसा तो विथड्रॉवलच्या लक्षणांतून बाहेर आला, तेव्हा आयुष्याची दिशा अशी विघातक बाजूस वळल्याची जाणीव होऊन खूप सुन्न झाल्याचं त्यानं सांगितलं. आपण र्मचट नेव्हीत जाऊन नोकरी करायची, आपल्या कुटुंबाला आर्थिक आणि ऐहिक पातळीवर उंचावायचं, असं त्याचं एके काळी स्वप्न होतं; पण आता सगळंच फसलं होतं. आता वागण्यावर, विचारांवर त्याचा ताबा राहिला नव्हता. व्यसन आपल्या जीवनासाठी घातक आहे, हे कळूनही त्याला त्यातून बाहेर येणं जमत नव्हतं.

 व्यसन म्हणजे खरंच काय असतं? जनसामान्यांसाठी ते एक लक्षण आहे, एक उद्विग्न संकेत आहे, एक मानसिक पीडा आहे. ही एक अशी भाषा आहे, जी माणसाला त्याच्या दुर्दैवी विनाशाबद्दल बरंच काही सांगते. ती गंभीरपणे समजावून घेतली पाहिजे. अरुण व्यसन आणि नैराश्याच्या गर्तेत गटांगळय़ा खात होता; पण त्याला कशी मदत करावी, ते त्याच्या आईवडिलांना कळत नव्हतं. वस्तीत त्याच्या वयाची इतर काही मुलंही व्यसनाच्या विळख्यात अडकली होती. आजच्या समाजात व्यसनात सामाजिकदृष्टय़ा सकारात्मक आधार मिळणं इतकं सोपं नाही. याचं मूळ कारण म्हणजे हे व्यसनाधीन तरुण अनेक गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देत असतात. मादक द्रव्यांचं गंभीर व्यसन असलेल्या लोकांमध्ये समाजविघातक लक्षणं    (Anti- social syndrome) दिसतात- उदा. इतरांच्या नैसर्गिक हक्कांबद्दल बेफिकीर असणं, वयानुसार असलेल्या सामाजिक नियमांचं उल्लंघन करत राहाणं त्यांच्यात सामान्य लोकांपेक्षा अधिक असतं. इतर महत्त्वाची वागणुकीची लक्षणं म्हणजे सहज खोटं बोलण्याची सवय, शारीरिक आक्रमकता आणि हिंसा, स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेबद्दलची बेपर्वाई, इतरांना दिलेल्या त्रासाबद्दल उदासीनता, विध्वंसक वागणूक आणि चोरी. अरुणमध्ये अशी काही लक्षणं दिसतच होतीच. त्या वेळी उपचारांनी तो बरा होऊन घरी गेला. यापुढे त्यानं स्वत: व्यसनापासून दूर राहाण्याचे अथक प्रयत्न करावेत आणि त्याच्या कुटुंबानं त्याला साथ द्यायला हवी, अशा सूचना त्याला देण्यात आल्या होत्या. घराच्या आजूबाजूचं वातावरण त्याला नशामुक्त करण्यास पोषक नव्हतं, त्यामुळे आईनं त्याला कोल्हापुरात मावशीच्या कुटुंबात ठेवलं. तिकडे मावसभाऊ त्याच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवून होते. मात्र काही वर्षांनी त्यानं पुन्हा नशा सुरू केली. तो पुन्हा आमच्या दवाखान्यात दाखल झाला. मात्र या वेळी तो स्वत:हून, आपल्या पालकांना घेऊन आला होता. उपचार घेऊन तो बरा झाला. पुन्हा एकदा आम्ही सल्ला दिला, की हृदयविकार आणि मधुमेह या दीर्घकालीन शारीरिक आजारांसारखा व्यसन हा मेंदूचा विकार आहे. या विकारामध्ये अधूनमधून पुनरावृत्ती (Relapse) होत असते. त्यामुळे प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून मनाला आवर घालणाऱ्या काही गोष्टी केल्या पाहिजेत. आपल्या मनावर, वागणुकीवर काही मर्यादा घालून व्यसनाची पुनरावृत्ती होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे. मनाचा काबू ढळतो आहे, चलबिचल वाढली आहे, ड्रग्जकडे सतत लक्ष वेधलं जात आहे, असं लक्षात येताच टाळाटाळ न करता आपल्या डॉक्टरकडे नियमित जायला पाहिजे. व्यसनमुक्त स्थितीतला अरुण सर्वसामान्यांसारखा प्रेमळ, मैत्रीपूर्ण आणि सहकार्याच्या मूडमध्ये असायचा. त्याला व्यसनाचा विकार असेल असा संशयही कोणाला न यावा असा. या वेळीही पुन्हा डिस्चार्ज घेऊन तो आनंदानं घरी गेला.

आता अरुण उत्तम ड्रायव्हिंग शिकला होता, पैसेही कमवायला लागला होता. तो काही महिने रुग्णालयात नियमित यायचा. सहा-आठ महिन्यांनी त्याची खात्री झाली, की आपण आता पूर्ण बरे झालो आहोत. मग त्याचा आत्मविश्वास वाढला. नंतर त्यानं येणं थांबवलं. काही काळानं पुन्हा एकदा त्याचे उपचार झाले, पण या वेळी गोष्ट थोडी वेगळी होती. त्याला एक छान मैत्रीण मिळाली होती आणि तिच्याशी लग्न करून त्याला आयुष्यात स्थिरावयाचं होतं; पण त्याच वेळी त्याला त्याचा तोल सुटतोय असं वाटलं आणि तो उपचारासाठी तत्परतेनं दाखल झाला. त्याचा उद्देश प्रामाणिक होता, पण त्याच्या या तिसऱ्या ‘रीलॅप्स’मुळे आम्ही त्याच्या पालकांना सावध केलं आणि अरुणनं एवढय़ा लवकर लग्न करू नये, असा सल्ला आम्ही दिला. व्यसनाधीनतेच्या उपचारांत आम्ही आमच्याकडून जोपर्यंत कृतिशील उपचार करत असतो, तोपर्यंत रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय सहकार्य करतात; पण जेव्हा काही गोष्टींविषयी आम्ही महत्त्वाचे सल्ले दिले आणि ते जर त्यांना सोयीस्कर वाटत नसले, तर त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. अरुण चांगला मुलगा आहे. संसारात एकदा स्थिरावला आणि जबाबदारीची जाणीव झाली, की तो व्यसनापासून दूर राहील, याची त्याच्या पालकांना मनोमन खात्री होती. नशेचा विळखा मुळात जैविक असतो, त्याची पुनरावृत्ती होत असते आणि त्याचे उपचार दीर्घकाळ घ्यावे लागतात, हे समजून घेणं त्यांना गैरसोयीचं आणि अवघड होत होतं. बऱ्याच पालकांची स्थिती अशीच असते. त्यांनी त्याचं थाटात लग्न करून दिलं. काही महिने अरुण व्यसनमुक्त राहिला, व्यवस्थित राहिला; पण नंतर पुन्हा त्यानं व्यसन चालू केलं. त्याचे बायकोशी खटके उडायला लागले. अरेरावी आणि आक्रमकतेनं वागणं सुरू झालं. त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला त्याच्या व्यसनविकाराबद्दल काहीच माहिती दिलेली नव्हती. त्यामुळे मुलीकडच्या मंडळींकडून त्याच्यावर त्यानं फसवल्याचा आरोप झाला. या सगळय़ात अरुणनं गळय़ाला फास लावून आत्महत्या केली.

अमली पदार्थाचं व्यसन आणि आत्महत्येचे विचार, प्रयत्न व आत्महत्येमुळे होणारे मृत्यू यांच्यातला दुवा संशोधनात नोंदवला गेला आहे. जागतिक स्तरावर अल्कोहोल (१३.३ टक्के), अ‍ॅम्फिटामाइन (२.४ टक्के), ओपिऑइड किंवा हेरॉइन (१.९ टक्के) आणि कोकेन (०.९ टक्के) हे व्यसनजन्य पदार्थ आत्महत्येशी जोडले गेले असल्याचं समोर आलं आहे. चरस, गांजा आणि भांग या व्यसनांशीसुद्धा आत्मघाती वर्तन आणि तशा विचारसरणीचा संबंध आहे. व्यसनविकारांबरोबर या रुग्णांमध्ये अनेक गंभीर मानसिक समस्या आणि वर्तणुकीच्या समस्या दिसून येतात. त्यांचा सहभाग आत्महत्येच्या विचारांमध्ये अधिक असतो. ‘मूड’ आणि चिंतेचे मानसिक विकार हे आत्महत्येसंबंधीचे महत्त्वाचे जोखमीचे घटक व्यसनी व्यक्तींमध्ये अधिक दिसतात. नैराश्य आणि बायपोलर मनोविकारातल्या पहिल्या टप्प्यात आणि बॉर्डरलाइन व्यक्तिमत्त्व विकृती असलेल्या व्यसनाधीन व्यक्तींमध्ये आत्महत्येचे विचार अधिक असतात. शिवाय अरुणसारख्या अनेक वेळा दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णांमध्ये आत्महत्येची जोखीम थोडी जास्त असते. याचं कारण या रुग्णांचं व्यसन पुनरुत्पादित होत राहातं आणि सामाजिक गुंतागुंत आणि मानसिक विकारांची तीव्रता वाढत जाते. व्यसनाधीन व्यक्ती जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा त्यांच्यामध्ये त्या वेळी भावनिक समस्या आणि वर्तणुकीशी संबंधित गंभीर गुंतागुंती असतात. उदाहरणार्थ ते अधिक आक्रमक असतात. त्यांच्या प्रतिक्रिया आवेगात्मक असतात आणि आपला आवेग त्यांना नियंत्रित करता येत नाही. यामुळे अत्यंत जवळच्या नात्यांमध्ये त्यांना आणि नातेवाईकांनाही प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. त्यांची बेजबाबदार वागणूक आणि नात्यांना झिडकारून टाकण्याच्या सवयीमुळे अनेकांचे विवाहसंबंध संपुष्टात येतात. हे त्यांच्या आत्महत्येचं एक महत्त्वाचं कारण ठरतं.

व्यसनांच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये आत्महत्येची ही शोकांतिका इतकी का आढळते? बऱ्याचदा ते असहाय्यता, निराशा, पराभव, अपमान, पश्चात्ताप अशा भारावलेल्या, अवजड भावनांतून जातात. त्यांचा भावनिक आधार जातो. अरुणसारख्या रुग्णांना मादक पदार्थाचा, व्यसनाचा सामना जेव्हा करावा लागतो, तेव्हा स्वत:ला आरशात पाहाणं त्यांना फार अवघड होतं. त्यांना ते जगण्यास लायक आहेत असं वाटत नाही आणि म्हणून ते जीवन संपवण्याचा निर्णय घेतात. अमली पदार्थाचं व्यसन असलेले माझे काही रुग्ण मनस्वी होते, विधायक होते; पण अर्थपूर्ण विधायक, भरीव आयुष्य त्यांना घडवता न आल्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचं दिसून आलं. उत्तम कलात्मकता आणि प्रतिभा असलेल्या या माणसांनी आयुष्याला एक सुंदर, तरल अर्थ का दिला नाही? आज अमली पदार्थासारख्या व्यसनांवरचे उपचार अत्यंत प्रभावी आहेत. माझ्या अनेक रुग्णांचे पुनर्वसनामुळे सुखाचे संसार झाले आहेत. एखाद्याला कर्करोग झाला, की त्या कुटुंबातल्या लोकांबद्दल समाजमन कणव आणि सहानुभूती दाखवतं. या कुटुंबांना तो भावनिक आधार मिळत नाही. यात अनेक कुटुंबं होरपळली आहेत. त्यांचं भावनिक नुकसान आणि नैतिक मुद्दय़ांवरून केलं जाणारं खच्चीकरण पराकोटीचं असतं. हे टाळणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यसनांवर वैद्यकीय उपचार करण्याशिवाय पर्याय नाही.

pshubhangi@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
आयुष्याचा अर्थ : आलेला क्षण जाणार, हाच सनातन अर्थ!

संबंधित बातम्या

विश्वास आणि प्रेम हाच बंध!
सहजपणातलं दत्तक नातं..
गेले लिहायचे राहून.. : कुरुक्षेत्र
पालकत्व : गरज जीवनकौशल्यांची
संशोधिका : मज्जासंस्थेचं चिकित्सक संशोधन!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
पुणे : रस्ते बांधणी कंपनीची नऊ कोटी रुपयांची फसवणूक; प्रकल्प अधिकाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल
मुंबई : पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी’: ५० हजार फेरीवाल्यांचे अर्ज मंजूर
‘मवाली’ चित्रपटातील ‘तो’ एक सीन अन् शक्ती कपूर यांनी बॉलिवूड सोडण्याचा घेतला होता निर्णय; आठवण सांगत म्हणाले…
“बेळगाव दौरा अद्याप तरी रद्द केलेला नाही”; मंत्री शंभूराज देसाईंचं विधान!
पुणे : सदनिकेत प्लंबिंग काम करताना विजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू ; वारजे भागातील घटना