डॉ. शुभांगी पारकर

आजार माणसाला शारीरिक आणि मानसिकदृष्टय़ाही थकवत असतो. मात्र काही लोकांच्या आयुष्यात अनेक आजार वर्षांनुवर्ष ठाण मांडून बसतात. आणि त्यांच्या जगण्याला मर्यादा आणतात. आपल्याला, आपल्या कुटुंबीयांना होणारा त्रास अनेकांना सोसवत नाही आणि त्यांचा प्रवास आत्महत्येच्या विचारांकडे जाऊ लागतो. काय करता येईल त्यांना या विचारांपासून रोखण्यासाठी?

The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
nestle controversy
Nestle Controversy : नेस्लेच्या बेबी फूडमध्ये साखरेचे प्रमाण जास्त; साखर आरोग्यासाठी घातक का?
shukra and rahu planet will make vipreet rajyog these zodiac could be lucky
राहू- शुक्राच्या संयोगाने ५० वर्षांनंतर तयार होणार विपरीत राजयोग; या तीन राशींच्या लोकांचे नशीब फळफळणार?
mercury retrograde in aries negative impact on these zodiac sing budh vakri
एप्रिलमध्ये बुध करणार वक्री चाल; ‘या’ राशींच्या लोकांच्या जीवनात येणार संकट? आर्थिक हानीची शक्यता

लाखो करोडो लोकांसाठी, दीर्घकालीन किंवा जुनाट आजार आणि नैराश्य ही जीवनात अनुभवाला येणारी सर्वसामान्य वस्तुस्थिती आहे. जरी काही आजार जीवनशैली (आहार आणि व्यायाम) आणि विशिष्ट औषधांद्वारे नियंत्रित किंवा बरे केले जाऊ शकतात, तरी जुनाट आजार चिवट असतात आणि सामान्यत: पूर्णपणे बरे होऊ शकण्याची संभावना नसते.

दीर्घकालीन आजारांच्या उदाहरणांमध्ये मधुमेह, हृदयरोग, संधिवात, किडनी रोग आणि मल्टिपल स्क्लेरोसिस यांचा समावेश होतो. गंभीर वैद्यकीय स्थिती असलेल्या एक तृतीयांश लोकांमध्ये मनोधैर्य  खच्ची झाल्याची लक्षणं आढळतात. ‘कॅनडियन जर्नल ऑॅफ सायकियाट्री’मध्ये अलीकडेच प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं आहे, की ज्यांना बराच जुनाट आजार आहे त्यांच्यात आत्महत्येचे विचार उद्भवण्याची शक्यता सामान्य लोकांपेक्षा २८ टक्के जास्त आहे. त्यांच्यामध्ये आत्महत्येची योजना तयार करण्याची शक्यता दुप्पट आणि आत्महत्येचा प्रयत्न करण्याची शक्यता ४.६ पट अधिक दिसून येते. जुनाट आजारांबरोबर नैराश्याचा मनोविकार असलेल्या व्यक्तींमध्ये आत्महत्येच्या विचारांची शक्यता जवळ वळ ८९ टक्के इतकी जास्त  दिसून येते.

जुनाट आजार आणि नैराश्य यांच्यातील कारण आणि परिणामाचा संबंध समजून घेणं कठीण नाही. हे जीर्ण आजार जीवनात प्रचंड उलथापालथ करू शकतात. त्यामुळे तुमची शारीरिक गतिशीलता आणि मानसिक स्वातंत्र्य मर्यादित होऊ शकते. जुनाट आजारामुळे, तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टी करणं व आवडते छंद जोपासणं अशक्य होतं. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास आणि भविष्यातली आशा नष्ट होऊ शकते. तेव्हा, दीर्घकालीन आजार असलेल्या लोकांना अनेकदा जीव नकोसा वाटतो यात आश्चर्य नाही. काही प्रकरणांमध्ये, या आजारांचे शारीरिक दुष्परिणाम किंवा औषधांच्या दुष्परिणामांमुळेदेखील नैराश्य येतं.

तनया अत्यंत हुशार आणि महत्त्वाकांक्षी तरुणी होती. अगदी लहानपणापासून एपिलेप्सी (अपस्मार वा फिट येणं) असल्यामुळे तिला नियमित उपचार घ्यावे लागले होते. इतर मुलांना जे खेळ सहज खेळता येत असत त्यापासून तिला वंचित राहावं लागलं होतं. तिची अभ्यासातली प्रगती मात्र कौतुकास्पद होती. जरी मैदानी खेळ तिला खेळू दिले गेले नसले, तरी वक्तृत्व, निबंधलेखन याबरोबर बुद्धिबळात तिचं वर्चस्व कुणी नाकारू शकत नव्हतं. मधून मधून ‘आई गं, औषध घ्यायचा कंटाळा आला आता.. कधी बरी होणार आहे मी?’ असे प्रश्न ती आईला विचारायची आणि पुन्हा आहे त्या परिस्थितीत रमून जायची. तिनं या गंभीर आणि दीर्घ आजाराच्या परिस्थितीवर मात करत ‘एम.बी.ए.’पर्यंत शिक्षण पूर्ण केलं, उत्तम नोकरी मिळवली. आतापर्यंत आयुष्याच्या पायऱ्या मोठया जोमानं चढली. पण गेले काही महिने तिचा धीर सुटत चालला होता. बरोबरच्या  मित्रमैत्रिणी आपापल्या संसारात स्थिरावल्या होत्या. कामाव्यतिरिक्त उरलेल्या वेळात आता तशी गजबज-गडबड नव्हती. एकटेपणाचा विळखा जाणवायला लागला होता. आतापर्यंतच्या धावपळीत महत्त्वाकांक्षांचा पाठपुरावा करताना जीवनात जी गतिशीलता जोम द्यायची ती आता हळूहळू मंद व्हायला लागली होती. घशात आवंढा अडकत होता. एके दिवशी तनयानं आपल्या उपचाराच्याच गोळया अति प्रमाणात खाऊन या जगाचा निरोप घेतला. आतापर्यंत डोळ्यांत तेल घालून तिला जपणाऱ्या तिच्या आईवडिलांना हा अकल्पित  धक्का होता. तसं पाहता वरकरणी तनयाचं काहीच बिनसलेलं दिसलं नव्हतं. आत्महत्या आणि जीर्ण स्वरूपाची एपिलेप्सी यांच्यातला संबंध जटिल आणि     द्वि-दिशात्मक आहे. विशेषत: प्रौढांमध्ये हा धोका किशोरवयीन मुलांच्या तुलनेत अधिक असतो, कारण त्यांनी व्याधीच्या विकलांगतेसमोर हार मानलेली असते. एका अभ्यासात तीस टक्के किशोरांनी एपिलेप्सीच्या नकारात्मक सामाजिक परिणामांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि जवळजवळ दोन तृतीयांशांनी ‘एक प्रकारची अज्ञात भीती वाटते,’अशी भावना व्यक्त केली. यामध्ये मानसिक आजार आणि एपिलेप्सीच्या गोळ्यांची भूमिकासुद्धा महत्त्वाची ठरते.

सुदृढ माणसाच्या आयुष्यात निसर्गत:, एक जैविक समतोल, सामंजस्य आणि लवचीकता दिसून येते, ती जीर्ण आजार असणाऱ्या बऱ्याच व्यक्तींमध्ये दिसून येत नाही. मनोजैविक दृष्टिकोनातून मेंदू आपलं कार्य आणि ऊर्जेत होणाऱ्या बारीकसारीक बदलांबद्दल संवेदनशील असतो. जेव्हा दीर्घ आजारांमुळे शरीरात बदल घडत जातात तेव्हा नैराश्य, अस्वस्थता, झोप न येणं, चिंता आणि चिडचिडेपणा यांसारख्या इतर गोष्टी मेंदूतल्या बदलांमुळे प्रभावी झालेल्या दिसतात. शारीरिक परिस्थिती आणि उपचारांच्या  रुग्णाच्या मानसिक आरोग्यावर होणाऱ्या विविध परिणामांबद्दल त्यांचे चिकित्सक, रुग्ण आणि कुटुंबातील सदस्य यांनी जागरूक असणं आवश्यक आहे.

रुग्णांच्या आजारांवर संपूर्ण अद्ययावत उपचार केल्यानं अनेक रोगांचा अंत होतोच असं नाही. जीवनशैलीशी निगडित असे अनेक आजार अनाहूत पाहुण्यासारखे आपली इच्छा नसतानाही आपल्या शरीरात ठाण मांडून राहतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाब या दीर्घकालीन आजारांमुळे रुग्णांवर खूप दडपण येतं. यामुळे काही लोकांना प्राण खूप लवकर गमवावे लागतात. घरचा कर्ता पुरुष म्हणून श्रीधरपंत आयुष्यभर मोठय़ा थाटात जगले. पण आता मधुमेहानं त्यांना हरवलं. ‘बाबा, तुम्हाला आता जमणार नाही, सोसणार नाही, पचणार नाही. घरी बसा, विश्रांती घ्या,’ अशा शाब्दिक भडिमारानं ते खूप कंटाळले. त्यांच्या अभिमानाला सुरुंग लागला होता. त्यांना आता हे सहन होईना आणि असहाय्यतेनं जगताही येईना. त्यांनी मग या जगताचा फास घेऊन निरोप घेतला.

 पण याही पलीकडे जे कधी आत्महत्या करू शकण्याची सुतराम शक्यता आपल्याला वाटत नसते त्यांनीही आत्महत्या केल्याचं आपण ऐकतो. अत्यंत शानदार आयुष्य जगणारी ही मंडळी जगामध्ये सुखासमाधानानं रुळलेली दिसत असताना अचानक एके दिवशी ही कर्कश स्फोट झाल्यासारखी बातमी आपल्या कानावर आदळते, की जुनाट आजाराला हे लोक खूप कंटाळले होते, या जगण्याला  विटले होते आणि आत्महत्या करून जीवनाला रामराम करून मोकळे झाले.

दीर्घकालीन आजार आणि इतर घटक, जसं की संबंधित वेदना, निद्रानाश, आजारावरची औषधं, अनेक तपासण्या, वैचारिक सवयी, यामुळे या व्यक्तींमध्ये आत्महत्येचे विचार किंवा कृतींचा धोका जास्त असू शकतो. बऱ्याच वेळा संधिवात किंवा अर्थराइटिस व फाइब्रोमायाल्जिआ यांसारख्या जुनाट आजारांमध्ये पीडादायक वेदना आणि विकलांगता हे महत्त्वाचे क्लेशदायक घटक व्यक्तींमध्ये आत्महत्येचा धोका दुप्पट करतात. शिवाय उपचार न केलेल्या उच्च रक्तदाबात, तुमच्या रक्तात तणावाशी संबंधित रसायनांची पातळी वाढते. तणाव-संबंधित रसायनं रक्तदाब वाढवतात आणि परिस्थिती आणखी बिघडते. हे रक्तदाब किंवा मधुमेह आणि तणाव यांचं द्विमार्गी नातं शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी घातक ठरतं. तुमच्या उच्च रक्तदाबावर उपचार केल्यानं आणि तुमच्या तणावाची पातळी खाली आणल्यानं तुमचं मानसिक आरोग्य सुधारून उपचारांचा सकारात्मक परिणाम होतो.

सध्या जगभरात जीवनशैलीशी निगडित आजारांचा तरुण लोकसंख्येवर लक्षणीय परिणाम होत आहे. नैराश्य आणि आत्महत्येचं वर्तन या आजारी तरुण पिढीत अधिक दिसून येतं. दीर्घकालीन आजारामुळे भरीव काम किंवा विश्रांतीच्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्याच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे अनेक समारंभ, सहली व करमणुकीचे  कार्यक्रम यात भाग घेणं कमी होतं व शेवटी सामाजिक दुरावा आणि एकटेपणा वाढतो. अधिक काम करण्याची इच्छा व उमेद असूनही, शारीरिक साथ कमी होते, वारंवार थकवा जाणवू लागतो. कित्येकांना आयुष्यात आलेल्या सुवर्णसंधी गमवाव्या लागतात. या आव्हानांना एक सामान्य प्रतिसाद म्हणून आपला आजार स्वीकारण्यास आणि त्यासाठी काही गोष्टी बदलून आयुष्य जगण्यासाठी बरीच मंडळी नकार देतात. विशेषत: कुटुंबावर होणारे नकारात्मक परिणाम आणि इतरांवरील वाढत्या अवलंबित्वाची जाणीव कित्येक जणांच्या मनाला रुचत नाही. कुटुंबही किती काळ तुमच्या या दीर्घकालीन आजारांचा भार उचलणार? मग तेसुध्दा तुमच्याविना आपल्या जीवनात रमायला सुरुवात करतात. अशा वेळी पुन्हा आपल्याला अलगद खडयासारखे बाजूला सारलं जाण्याची भावना बळावयाला लागते, दुरावा वाढतो. याचा परिणाम व्यक्तीच्या आत्मसन्मानावर व्हायला लागतो. अशा जीर्ण आजारात, भविष्यात कधी काळी सर्व काही ठीक होईल ही आशा ठेवणं कठीण आहे. आजार बळावण्याच्या आणि पुढील गुंतागुंतीच्या अटकळीमुळे आत्मविश्वास कमी होतो. यात अनेक निष्क्रिय विचारांचा समावेश आहे, जसं की सकाळी झोपेतून न उठण्याची कल्पना करणं, उपचार वेळेवर न घेणं, पथ्यपाणी न पाळणं आदी. यामागे आत्महत्येचे सुप्त विचार मनात तरंगत असतात. काही रुग्ण खूप कंटाळून डायलिसिस चुकवून आत्महत्येचा गंभीर प्रयत्न केल्याचं सांगतात. या सर्वाना एका भयानक पिंजऱ्यात अडकल्यासारखं वाटू लागतं. त्यातून सुटण्याच्या केविलवाण्या धडपडीत आत्महत्येचे विचार मनात रुंजी घालायला लागतात.

आज वैद्यकीय प्रगतीमुळे जुनाट आजार असलेले लोक दीर्घकाळ जगत आहेत, अशा वेळी त्या रुग्णांमधली आत्महत्येची जोखीम ओळखून त्याचे उपचार करण्यासाठी आरोग्य सेवेनं सज्ज असणं महत्त्वाचं आहे.

pshubhangi@gmail.com