डॉ. शुभांगी पारकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नैराश्य, चिंता, व्यसनाधीनता आणि स्किझोफ्रेनिया आदी मानसिक आजार असणाऱ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार  आवश्यक ठरतो आणि त्या आजाराचा आक्रमक उपचार करणे हेही महत्त्वाचे ठरते. कित्येक रुग्णांचे नातेवाईक उपचार काही काळाने सुरू करूया, असा आग्रह धरतात. एकंदरीत मानसिक उपचारांच्या बाबतीत जनमानसात असणारी थोडी अढी आणि प्रचंड प्रमाणातले गैरसमज रुग्णांच्या जिवावर बेतू शकतात. मानसिक विकारात आत्महत्येसारखा प्रसंग केव्हा येईल याचे भाकीत कुणालाही  करता येणे अशक्य आहे.

 वीणाच्या कुटुंबाची कथा-व्यथा अशीच खूप काही सांगून जाणारी..

मानसिक आरोग्याच्या वर्तुळात आज आपण अनेक विशिष्ट आजार ओळखतो. इतर वैद्यकीय आजारांबरोबर आपण त्यावर विशिष्ट उपचारही करतो. आत्महत्या जरी मानसिक आजाराच्या मितीमध्ये सामावलेली असली तरी ते आत्महत्येचे निदान होत नाही. जसा ताप हा टायफॉइड, हिवताप, डेंग्यू, करोना आदींचे एक लक्षण आहे, तसेच आत्महत्या हे लक्षण आहे अनेक मानसिक विकारांचे.

नैराश्य, चिंता, व्यसनाधीनता आणि स्किझोफ्रेनिया आदी मानसिक आजार असणाऱ्यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करणे आवश्यक ठरते आणि त्या आजाराचा आक्रमक उपचार करणे हेही. कित्येक रुग्णांचे नातेवाईक उपचार काही काळाने सुरू करूया, असा आग्रह धरतात. चुलत भावाचे गावात लग्न आहे ते आटपून येतो. आता घर बदलायचे चालले आहे. एक-दोन महिन्यांत स्थिरावू मग उपचार चालू करूया. यासारख्या कारणांनी उपचार पुढे ढकलत राहतात. एकंदरीत मानसिक उपचारांच्या बाबतीत जनमानसात थोडी अढी आणि प्रचंड प्रमाणात गैरसमज आहेत जे रुग्णाच्या जिवावर बेतू शकतात. मानसिक विकारात चालढकलपणा आणि वेळकाढूपणा म्हणजे विनाशाला आव्हान दिल्यासारखे आहे. प्रमुख प्रकारच्या मानसिक विकारात आत्महत्येसारखा प्रसंग केव्हा येईल याचे भाकीत दस्तुरखुद्द यमदेवालासुध्दा करता येणे अशक्य आहे. या संकटासाठी सदैव तत्पर राहणे आवश्यक आहे. उपयुक्त आहे. या अनुषंगाने वीणा या माझ्या रुग्णाची कथा-व्यथा सांगावीशी वाटते. वीणा माझ्याकडे दहावी पास होऊन आली होती. किंबहुना तिचे पालक तिला घेऊन येत असत. पालक अत्यंत सुशिक्षित होते. आई शिक्षिका होती. विणा तेव्हा १६-१७ वर्षांची असेल. दहावीत ९६ टक्के गुण मिळवून मुंबईच्या नामांकित कॉलेजमध्ये तिला सायन्समध्ये प्रवेश मिळाला होता. तिची आणि कुटुंबाची तिने डॉक्टर व्हावे, अशी अपेक्षा होती. तिची अभ्यासातील एकंदरीत प्रगती पाहता तशी अपेक्षा करणेही रास्त होते. पण त्याच दरम्यान वीणामध्ये काही भावनिक आणि वागणुकीत बदल दिसायला लागले होते.

तिला आपले वडील आपल्यावर वाईट नजर ठेवून आहेत असे वाटू लागले होते. ती तसा उघड उघड संशय व्यक्त करीत असे. घरातले वातावरण अस्वस्थ होऊ लागले होते. तिची मासिक पाळी अनियमित असायची, पण आजकाल ती आईला आपल्याला गर्भधारणा झाली असेल म्हणून डॉक्टरकडे तरी घेऊन चल किंवा चाचणी करून घे म्हणून त्रागा करीत असे. त्या ‘टेस्ट किट्स’ तिने आईकडून मागवून घेतल्या होत्या. रागाच्या भरात ती आईला मारतही असे. वडिलांना तर ती नजरेसमोर येऊ देत नसे. समोर दिसले तर फारच घाणेरडय़ा शिव्यांनी ती त्यांना घरातून बाहेर जाण्यास भाग पाडत असे. काही दिवस तर ते घर सोडून भावाकडे राह्यला गेले.  तिला आता अभ्यासही जमत नव्हता. परिस्थितीही अशी होती, की तिचे कॉलेजात जाणे आणि तिथे रुळणे शक्य दिसत नव्हते.  तिची एकंदरीत लक्षणे पाहता आणि त्यातले गांभीर्य लक्षात घेऊन तिच्या काही चाचण्या आम्ही केल्या. त्यांच्या कुटुंबात या आजाराची जबरदस्त खानदानी आनुवंशिक माहितीही आढळली. तिच्या एकूण मानसिक अवस्थेचे निदान आम्ही स्किझोफ्रेनिया असे केले. अशा प्रकारच्या पौगंडावस्थेत सुरू झालेल्या स्किोझोफ्रेनियाची एकंदरीत पुढे होणारी वाढ वेगवान असते. उपचाराचा एकंदरीत प्रभाव या रुग्णावर कमी जाणवतो. वीणासुद्धा उपचारासाठी अजिबात सहकार्य करत नव्हती. तिला काबूत ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. अशी तरुण मुलं आमच्यासाठीही आव्हानात्मकच ठरतात. शिवाय पालकांची तारांबळ उडते ती गोष्ट वेगळीच. वीणाला अखेर आम्ही रुग्णालयात दाखल केले. ती वडिलांना तेथेसुद्धा येऊ देत नव्हती. त्यामुळे आईचे खरे तर हाल होत होते. ती हवालदिल झाली होती. असहाय्य झाली होती. अत्यंत बुध्दिमान असणाऱ्या आपल्या लेकीचे भविष्यात काय होणार या चिंतेने तिचे पालक निराश झाले होते.

औषधोपचारानंतर काही दिवसांत काही प्रमाणात वीणा स्थिरावली आणि तिला आम्ही रुग्णालयातून घरी पाठवले, पण यापुढे ती पूर्वीसारखी होईल, याची खात्री आम्हालाही नव्हती. तिच्या आईच्या तिच्याविषयीच्या सततच्या प्रश्नाने आम्ही सगळेच हैराण झालो होतो. आमच्या समुपदेशनात आता विणाकडून अशा अपेक्षा का ठेवायच्या नाहीत, तिच्यावर अभ्यासाचा आणि अशा अपेक्षांचा दबाव का ठेवता कामा नये याचे मार्गदर्शन आम्ही सतत तिच्या पालकांना करतच होतो. हा मानसिक आजार कसा गंभीर आहे, आयुष्यभर भेडसावणारा आहे हे सतत सांगत होतोच. आपल्या उमलणाऱ्या मुलांच्या भविष्याच्या गगनास गवसणी घालणारी स्वप्ने पाहणाऱ्या पालकांच्या स्वप्नांना अशा तऱ्हेने विझवताना पाहताना आम्हालाही त्रास होतोच. पण अशा गंभीर मानसिक विकारात बौध्दिक आणि वैचारिक क्षमता कमी होत जाते. पण पालकांना ते कळतेच असे नाही. ‘ बुद्धी उत्तम आहे आणि आजपर्यंत दृष्ट लागण्यासारखा विकास आहे. मग का नाही जमणार अभ्यास? या नातेवाईकांच्या प्रश्नाला उत्तर एकच आहे, की असा आजार झाल्यानंतर बौध्दिक उत्पादनक्षमता कमी होते. उच्च पातळीवरची पठणक्षमता कमी होते. एकाग्रता कमी होते. त्यामुळे आपल्याला या मुलांना पुढे घेऊन जायचेच आहे, पण कुठलाही तणाव न देता. रुग्णाला डॉक्टर होता येणार नाही, पण तिला बीएस्सी करता येईल. सगळेच आलबेल असेल. आजार काबूत राहिला असेल आणि मुख्य म्हणजे सहज झेपत असेल तर एमएस्सी करता येईल. या सूचना पालकाच्या पचनी सहजी पडत नाहीत.

अनेक प्रयत्नांनी समुपदेशनाने आणि एकंदरीत वीणाची कठीण परिस्थिती लक्षात घेता पालकांना मात्र ते पटले. पण वीणाला ‘नीट’ची परीक्षा द्यायची होतीच. विणाही स्थिर वाटत होती. त्याच वेळी तिला दुसऱ्या कॉलेजात घालायचा निर्णय पालकांनी घेतला. दरम्यान, पूर्वीच्या कॉलेजमधून तिचे ‘लिव्हिंग सर्टिफिकेट’ मिळवण्यात समस्या निर्माण झाली. झालं, ती प्रचंड अस्वस्थ झाली. आपण आता ‘नीट’ देऊ शकणार नाही, या विचाराने ती सैरभैर झाली. एके दिवशी तिने आईला घरातून बाहेर घालवले. आई मग नाइलाजाने शाळेत गेली. वडील आधीच कामावर गेलेले होते. ते एकटेच वीणाबरोबर घरी थांबायचे धाडस कधी करत नसत. आपली आपली कामे संपवून तीन-चार तासांत मंडळी घरी आली. दार वाजवून थकली. वीणा ना दार उघडत होती, ना तिचा मोबाइल घेत होती. शेवटी त्यांनी शेजारांच्या मदतीने दरवाजा उघडला आणि विणाची आई कोसळली.. वीणाचे कलेवर फॅनला लटकलेले होते. वडिलांचा विश्वासच बसेना की आपल्यावर असे काही विपरीत पाहण्याची पाळी येईल.

शेवटी तो दुर्दैवी प्रसंग घडलाच. वीणाला सहन करावा लागणारा त्रास कमालीचा होता. तिच्यासाठी त्या नरकयातनाच होत्या. आपल्या मित्रमैत्रिणींपासून ती एकटी पडली होती. आपल्या स्वप्नापासून ती दूर झाली होती. आयुष्यातील सर्वसामान्य जगण्यापासून ती विकृतीच्या जगात जगत होती. तिच्यासाठी तिचं जगणं एक गूढ अज्ञातवासच होता. तिच्या आईच्या आर्त भाषेत सांगायचे तर, ‘डॉक्टर, तिने आपली स्वत:ची सुटका मोठय़ा चपळाईने करून घेतली. पण आम्हाला मात्र जन्मभरासाठी पश्चात्तापाच्या खाईत लोटून गेली. काही नॉर्मल उरलं नव्हतं तिच्या जगण्यात. पण आज आमचं जगणंही कायमसाठी बदलून गेलंय.’

आज आठवतात ते वीणाच्या पालकांचे असहाय्य निराश सूर. आमचे शब्द त्यांच्या कानात होते, पण मनात शिरले नव्हते. आम्ही अशा अवचित, क्षणिक आत्महत्येबद्दल त्यांना सूचित केले होते. तो आमच्या शास्त्रातली महत्त्वाची सूचना देण्याचा भाग असतो. ‘डॉक्टर, तुम्ही असं कसं सांगता?’, या थोडयाशा रागाने आणि निराशेने भरलेल्या प्रश्नाचे भावुक उत्तर आमच्याकडे नाही. वीणाच्या आईसाठीसुध्दा आमच्याकडे उत्तर नव्हते. ‘नीट’ला बसता येणार नाही या विचाराने खच्ची झालेल्या वीणाची निराशा विनाशी होती. त्यामुळे त्या विनाशाची जाणीव करून देणे आम्हाला भाग होते. टप्प्या टप्प्याने काही वेळा भावनांचे मंथन होत जाते.

नातेवाईकांच्या मनात कधी स्वत:ला, कधी परिस्थितीला तर कधी आम्हा डॉक्टरांना दोष देत ही मंडळी स्वत:ला सावरायचा प्रयत्न करत असतात किंवा त्या लाटांमध्ये हिंदूकळत असतात. प्रत्येक लाटेत वेगळय़ा विचित्र भावना वाहत जाणारे विचार असतात. स्वत:च्या मुलीच्या अशा अकाली, अस्वाभाविक मृत्यूचे दु:ख पचविणे खूप कठीण असते. तिच्या जगण्यातसुध्दा त्यांना खूप कळ सोसावी लागली होती, पण आज नाही तरी उद्या नक्की शांत होईल वा स्थिरावेल या आशेवर त्यांना जगता येत होते. मार्टिन ल्यूथरनी म्हटलंच आहे, Everything that is done in the world is done by hope, मग ही आशा वास्तववादी नसली तरीही..

वीणाच्या आई-बाबांचे मनातले शब्द ओठावर येता येता थिजत होते. दोघे भकास चेहऱ्याने डोळय़ातील अश्रूंचा पूर परतावून लावत होते. त्यांच्याशी बोलताना आम्हाला जाणवलं, की अजूनही त्यांचे मन दुर्दैवाचा हा घणाघाती आघात स्वीकारायला तयार नव्हते. हा अस्वीकार खूप काळ माणसांना वेठीस धरतो. ‘‘ जे काही घडलंय त्यावर आमचा अद्याप विश्वास बसत नाहीए डॉक्टर. वीणा डोळय़ासमोर सतत दिसत राहते.’’ या अशा भयानक दारुण मृत्यूच्या तेही स्वत:च्या मुलीच्या मृत्यूनंतर हा व्यक्त होणारा अस्वीकार खूप काही व्यक्त करून जातो.

    आपण चुकलो, आपण तिला असं एकटं सोडून जायला नको होतं. तुम्ही सूचना दिल्यात, पण आमचं थोडं चुकलंच तसं. आईच्या मनातली ही पश्चात्तापदग्धता गहिरी आहे. अस्तित्वाला होरपळून टाकणारी आहे. मुलीला आपण मृत्यूच्या खाईत लोटलं. आपण जाणीव असून खबरदारी घेतली नाही, याचा सल मनात आयुष्यभर राहतो. इथेही, आयुष्यभर आपण सगळे प्रयत्न केले, पण ऐनवेळी असे कसे दक्ष राहिलो नाही, ही बोच त्या मायबापांना पोखरून काढत होती. त्यांच्या पूर्ण जीवनाला पुरून उरणार होती. आपले प्रेम तिला का जगवू शकले नाही. आपल्या प्रेमात काही कमी होती का? हे प्रश्न आयुष्यभर पाठीवर टांगलेले राहणार होते. आत्महत्या करण्यापूर्वी एकदा तरी आपल्यानंतर आईबाबांचे, जवळच्यांचे  काय होईल हा विचार मनात आणला तरी कदाचित आत्महत्येचा विचार टाळता येईल असे वाटते.

वीणाच्या आईबाबांचेही जग बदललं. पुढे दोघंही अध्यात्माच्या वाटेवर चालू लागलेत. परवाच मी त्यांना कळवलं, की आपण हा आर्त अनुभव लिहीत आहोत. त्या माऊलीच्या तोंडात हुंदका दाटून आला, ‘‘असं का हो झालं डॉक्टर, हे टाळता आलं नसतं का हो?’’

वीणाचं कुटुंब एक आटलेली विहीर झाली होती. सचेतना हरपलेली!   

pshubhangi@gmail.com  

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mage rahilelyanchya katha vyatha author shubhangi parkar depression anxiety addiction ysh
First published on: 15-01-2022 at 00:02 IST