‘तो सुदिन समजावा…’ हा प्रा. सुषमा अंधारे यांचा लेख (२८ मार्च) वाचला. ‘राज्य महिला आयोगा’वर होणार्या नेमणुका पक्षविरहित, राजकीय सत्तासंतुलनाच्या खेळापासून अलिप्त असणारी, प्रशासकीय अनुभव गाठीशी असणारी व्यक्तीची नेमणूक होईल, तो सुदिन समजावा असे सुषमाताईंनी मत व्यक्त केले आहे. ही अपेक्षा पूर्ण होईल याची शक्यता नाही. कारण एक म्हणजे भारतात अशा नेमणुका या सत्ताधारी पक्षांच्या अखत्यारीत असतात, कारण हे आयोग व अशासारख्या यंत्रणा सरकारच्याच नियंत्रणात येतात. दुसरे म्हणजे आजची एकंदर परिस्थिती पाहिली असता प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्तीदेखील यास कितपत न्याय देतील याबाबत शंकाच आहे. यासाठी गरज आहे ती अशा पदावर नेमलेल्या व्यक्तीला काम करणे व निर्णय घेणे यासाठी संपूर्ण स्वातंत्र्य देणे. त्यासाठी त्या पदावर असलेल्या व्यक्तीला पूर्ण घटनात्मक संरक्षण देणे. या पदावर नेमताना या पदासाठी किमान अर्हता निश्चित करणे ही काळाची गरज आहे. जेणेकरून त्या क्षेत्रातील माहीतगार व्यक्ती नेमली जाईल. आणि हे अधिकार फक्त एका व्यक्तीकडे न ठेवता (उदा. मुख्यमंत्री) ते एखाद्या त्रयस्थ समितीकडे, ज्यावर राज्य सरकारचे अप्रत्यक्षपणेदेखील नियंत्रण नसेल, अशा समितीकडे सोपवावे. जेणेकरून नेमल्या गेलेल्या व्यक्तीला याची जाणीव राहील की, तिची नेमणूक ही गुणवत्तेवर झालेली आहे. असे होईल तेव्हाच ती व्यक्ती या पदाला न्याय देऊ शकेल.
– अशोक साळवे, मालाड, मुंबई</strong>
आजही आमची डोकी गहाण आहेत
चतुरंग (२८ मार्च) मधील प्रा. सुषमा अंधारे यांचा ‘तो सुदिन समजावा’ हा भोंदूगिरीविषयी सविस्तर लेख वाचला. अशिक्षित बहिणाबाईंनी म्हटलंय, नको नको ज्योतिषा, माझ्या दारी नको येऊ, माझे दैव मला कळे, माझा हात नको पाहू. धनरेषांच्या चर्यांनी, तळहात रे फाटला, देवा तुझ्याबी घरचा, झरा धनाचा आटला. म्हणे नशिबाचे नऊ ग्रह, तळहाताच्या रेघोट्या, बापा नको मारू थापा, अशा उगा खर्या खोट्या! अशिक्षित बहिणाबाईंनी दारी आलेल्या ज्योतिषाला ७०-८० वर्षांपूर्वी सुनावलं. तरी आजही आमची डोकी गहाण आहेत याचा खेद होतोय. महिला आयोग स्थापन होऊन सुमारे तीन दशके संपली तरी आयोगाची गाडी रुळावर न आल्याने महिलांचे शोषण थांबले नाही. हा आयोग म्हणजे राजकीय जुळवाजुळव झाल्याने मुख्य हेतूपासून दूर गेला आहे, यास राज्यकर्तेच जबाबदार आहेत. आता महिलांनीच आत्मनिर्भर होण्याची खरी गरज आहे. नाही तर असे भोंदूबाबा निर्माण होतच राहणार व महिलांचे शोषण होत राहणार यात शंका नाही.
– दत्ता म्हसकर, वाकड-पुणे
शिक्षित महिलाही देवधर्मात अडकल्या!
‘तो सुदिन समजावा’ हा प्रा. सुषमा अंधारे यांचा लेख वाचला. एकविसावे शतक हे गुन्हेगारीमुक्त किंवा महिला निर्भय होतील अशाच पद्धतीने चालेल असे वाटत होते, पण महिला सुशिक्षित होत असताना असंख्य स्त्रियांचे धार्मिक स्तोम मात्र तसूभरही घटलेले नाही. महिलांना जितके विद्वान बनवले जाईल तितक्या त्या डोक्यावर बसतील हा न्यूनगंड आजही कायम आहे. या महिलांनाही आज सावित्रीबाई फुले यांच्यापेक्षा देवाचे नाव घेणेच रास्त वाटत आहे. समावेशन, समुपदेशन किंवा सबलीकरण यावर कार्य करण्याऐवजी जेव्हा त्यांनाच अशा भोंदू महाराजांच्या चरणी लीन व्हावे लागत असेल तर ते दुर्दैवच आहे. आता अशा महत्त्वाच्या महिला आयोगाच्या पदावर नक्कीच अराजकीय की ज्यांनी पोलीस खात्यात, ज्यांनी न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून सेवा बजावली आहे त्यांचीच वर्णी लागली पाहिजे, कारण महिला आयोगाच्या पदावर सध्या राजकीय सुंदोपसुंदी सुरू आहे. त्यावर काही न बोललेलेच बरे. सध्या स्वत:स शिक्षित समजणार्या अनेक महिलादेखील (न)कळत असूनही अशा बुवांच्या आणि भोंदूंच्या जाळ्यात अडकत आहेत, हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराच्या विरुद्ध आहे असे म्हणावे लागेल.
– सुनील समडोळीकर, कोल्हापूर
तीन ‘स’ समजणे खरंच आवश्यक
प्रा. सुषमा अंधारे यांचा ‘तो सुदिन समजावा…’ हा लेख वाचला. महिलांना सुदिन येण्यासाठी समावेशन, समुपदेशन, सबलीकरण हे तीन ‘स’ समजणे खरेच खूप आवश्यक आहे. प्राध्यापक सुषमाताई यांच्या लेखामुळे महिलांमध्ये थोडीफार तरी जनजागृती होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वैचारिक व भावनिक विचारांमध्ये नक्कीच प्रगल्भता येईल. महिला आयोगाचे कार्य हे समाजातील सर्व स्तरांतील स्त्रियांपर्यंत पोहोचवणे खरेच गरजेचे आहे. आपला लेख वाचून निश्चितच सुदिन येईल ही सदिच्छा…
– अनुराधा लिंगे, सांगोला
