मृदुला भाटकर
काही लोक हे कायम पडद्यामागे काम करत असतात. पण त्यांच्या हातभाराशिवाय मुख्य कार्यक्रम तडीस जाणार नाही इतकं त्यांचं महत्त्व असतं. असाच एक हायकोर्टातला आप्पा शिंत्रे! आपल्या नेमून दिलेल्या कामासह इतर अनेक कामांची जबाबदारी आपणहून लीलया हाती घेऊन पेलणारा आणि अडचणीच्या वेळी तितक्याच सहजतेनं ‘जुगाड’ करून तोडगा काढणारा असा एक आप्पा प्रत्येकाला भेटला असेल..
एक हजार रुपये जेव्हा आपण वापरतो, तेव्हा त्यातला एक पैसा हा अगदीच गृहीत धरतो. पण तो एक पैसा नसेल, तर ती हजाराची रक्कम नाही होत पूर्ण! ती असते नऊशे नव्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे. या अपूर्णाकामुळे एक पैशाची किंमत आणि ताकद तेव्हाच आपल्याला समजते.
कोर्ट म्हणजे फक्त पक्षकार, साक्षीदार, न्यायाधीश, वकील नव्हे; तर कोर्टात काम करणारी माणसं म्हणजेही ‘कोर्ट’ असतं. ही कोर्टातली माणसं फार महत्त्वाची आहेत. ती सफाई कामगारापासून ते चोपदार, हवालदार,

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोर्ट कारकून, ड्रायव्हर्स, ग्रंथपाल, शिरस्तेदार, रजिस्ट्रार इत्यादी इत्यादी सगळे म्हणजे ‘कोर्ट’! आणि या पदांची सगळी कामं करू शकणारी व्यक्ती म्हणजे हायकोर्टातला आप्पा! प्रत्येक संस्थेमध्ये कार्यालयात माणसं रजेवर जातात तेव्हा तात्पुरतं त्यांचं काम कोणी तरी करतं. पण काही व्यक्ती निवृत्त होतात किंवा निघून जातात कायमच्या, तेव्हा ती जागा तशीच राहते. रिकामी! जगात सगळय़ा गोष्टींना पर्याय असतो, पण माणसांना? नात्यांना? आप्पा शिंत्रे वारला १४ जूनला, वयाच्या ७० व्या वर्षी. तो हायकोर्टात ड्रायव्हर म्हणून लागला होता जवळजवळ पन्नासेक वर्षांपूर्वी..

आप्पा मला जेव्हा भेटला तेव्हा तो तत्कालीन रजिस्ट्रार असलेल्या न्यायमूर्ती दाभोळकर यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. १९९३ मध्ये मी शहर दिवाणी कोर्टात नुकतीच न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते. रजिस्ट्रार किंवा आताच्या रजिस्ट्रार जनरलच्या कार्यालयाचा दबदबा जिल्हा कोर्टात काम करत असलेल्या सर्व न्यायाधीशांना असतो. हे आप्पाला पूर्ण ठाऊक होतं. मी जेव्हा दाभोळकर साहेबांच्या कार्यालयात काही कामानिमित्त गेले, तेव्हा आप्पानं बाहेर बसायला सांगून, पाणी देऊन ‘आत बदल्यांचं काम चाललंय, वेळ लागेल’ असं सांगितलं. तेवढय़ात ‘बाबा (दाभोळकर साहेब) कसे रात्री-अपरात्रीपर्यंत काम करतात’ हेही कौतुकवजा तक्रारीनं सांगितलं. मग काम संपवून बाहेर जाताना ‘‘सर्व ठीक ना?’’ असं विचारून ‘‘ताई, परत कधी आली की सांग,’’ असा प्रेमळ निरोप देऊन हायकोर्टाच्या दरवाजापर्यंत सोडलं.

मी दोन वर्षांनी ‘यशोधन’ सोसायटीमध्ये राहायला गेले. दाभोळकर साहेबही ‘यशोधन’मध्येच राहात असल्यामुळे आप्पा कायम पोर्चमध्ये भेटायचा. त्याची अर्थात तोपर्यंत रमेशशी (रमेश भाटकर) दोस्ती करून झाली होती. आप्पा हा फक्त ड्रायव्हर नव्हता, तो प्रचंड हरहुन्नरी होता. तो प्रसंगी कुक होता, प्लम्बर, सुतार, गवंडी, चोपदार होता. उत्तम इलेक्ट्रिशियन होता. पाच फूट सहा इंच उंचीची, आडव्या मजबूत अंगाची त्याची मूर्ती पांढरा बुशशर्ट घालून, तर कधी सफारी घालून हायकोर्टात सर्वत्र हिंडत असे. त्याला हायकोर्टाच्या कामाचीच नाही, तर त्या इमारतीचीही खडान् खडा माहिती होती. रजिस्ट्रारच्या कार्यालयात कोणता न्यायाधीश गेला त्यांचं आत जे काही भलंबुरं झालं असेल ते आप्पा अंदाजानं ओळखायचा. त्याप्रमाणे त्यांना अनाहूत सल्लेही द्यायचा. हायकोर्टाच्या वेगवेगळय़ा न्यायमूर्तीचे स्वभाव, तऱ्हा, त्यांच्या सवयी याची इत्थंभूत माहिती आप्पाला असायची. दाभोळकर साहेब जसे ‘वर्कोहोलिक’ होते, तसाच आप्पा होता. त्या दोघांची जोडी एकमेकाला अगदी योग्य. साहेब कामाला मागे हटायचे नाहीत, तसाच आप्पा. रात्री उशिरापर्यंत रजिस्ट्रारच्या कार्यालयाचा दिवा जळतोय, नि आप्पा तिथे बसून असायचा. हवं नको ते बघायचा. कोणाचे हुकूम, तक्रारी, तपासण्या, बदल्या, त्याला सगळय़ा फाइल्स माहिती असायच्या.

आप्पा काही फारसा शिकला नव्हता. पण डोळे उघडे ठेवून कितीही मेहनत घेण्याची तयारी अन् जात्याच असलेली हुशारी. आप्पा मध्येच कॅन्टीन-किचनमध्ये घुसून पोहे-उपमा करून खायला घाले किंवा वेळ पडली तर त्याला पोळय़ाही येत. धिरडय़ाचं थालीपीठ, थालीपिठाचा कुस्करा, चकल्यांची भाजी असले अभूतपूर्व पदार्थ त्याच्या डोक्यातून निघून त्यांचा कलाविष्कार होऊन त्या रजिस्ट्रार किंवा स्टाफच्या ताटलीत पडत. तात्पर्य, कितीही वेळ काम करा, आप्पा असताना काळजी नसायची. त्यानंतर असलेले रजिस्ट्रार न्यायमूर्ती श्रीकांत साठे, न्यायमूर्ती आर. सी. चव्हाण या सगळय़ांकडे त्यानं मनापासून काम केलं.

कालांतरानं मी जेव्हा मुंबई उच्च न्यायालयात रजिस्ट्रार जनरल म्हणून रुजू झाले, तेव्हा गाडीवर अर्थात् आप्पा. मग पुढचे दहा महिने- म्हणजे माझी न्यायमूर्ती म्हणून नेमणूक होईपर्यंत आप्पा सकाळपासून रात्रीपर्यंत माझ्यासोबत असे. त्याची कल्पनाशक्ती अफाट होती. पनवेलजवळ दोन गटांत मारामारी कशी झाली किंवा अमुक मंत्र्यांनी आझाद मैदानावर भेट देऊन काय आश्वासनं दिली, इत्यादींचं संजय यांनी धृतराष्ट्राला युद्धाचं वर्णन करून सांगावं, तसं चित्ररूप वर्णन आप्पा हायकोर्टातून बाहेर निघतानाच्या आमच्या प्रवासात करत असे. कधी ते मी लक्षपूर्वक ऐकत असे. कधी मनात वेगळा विचार असे, पण आप्पाची रसाळ वाणी उत्साहात प्रवाही असे. तो दुबईला जाऊन आला होता. तिथे त्यानं अठरा चाकांचा ट्रक चालवला ही गोष्ट किंवा अमेरिकेत जाऊन गाडी चालवायची हे त्याचं स्वप्न मला रंजक वाटे. त्यानं एकदा ओव्हल मैदानातल्या गवतापासून अत्तर काढता येईल का, यावर प्रयोगशील विचार सुरू केला होता. त्याच्या सगळय़ा गोष्टी चांदोबातल्यासारख्या सुरस-चमत्कारिक असत. वैचित्र्यपूर्ण अशा थापांचं कधी कधी स्वप्नरंजनही असे. पण त्यात लबाडी नसायची, तर विनोदी निरागसता होती.

न्यायालयात प्रोटोकॉल हा महत्त्वाचा भाग असतो, उदा.- समोर पोलीसची गाडी जात असताना त्यामागून साहेबाची गाडी बरोबर अंतर ठेवून तितक्याच वेगात पळवायची हे ड्रायव्हरचं कसब! प्रोटोकॉलला आप्पा पक्का होता. मी जेव्हा उच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून पहिल्या दिवशी गेले, तेव्हा माझ्या गाडीवरती कर्तव्याची जाणीव करून देणारा तिरंगा लावल्यावर आप्पानं खूश होऊन मला गाडी दाखवली आणि ‘फ्लॅग अॅीक्ट’प्रमाणे प्रोटोकॉल सांगितला, की ‘‘सूर्यास्तानंतर आपण घरी आलो, तर गाडीवरती तिरंगा नसेल आणि सूर्यास्तापूर्वी आलो, तर गाडीवरती तिरंगा असेल.’’
तो कोणत्याही प्रश्नावर तोडगा काढत असे. तो तुम्ही स्वीकारा अथवा न स्वीकारा, पण तो उत्तर शोधत असे. ‘नाही’ हा शब्द त्याच्याकडे नव्हता. ‘नाही’नंच सुरुवात करणाऱ्या किती तरी कर्मचाऱ्यांपुढे तो आदर्श होता. एकदा मी सर्व स्टाफच्या छोटय़ा छोटय़ा खेळांच्या स्पर्धा घ्यायचं ठरवलं. आप्पाचा उत्साह उतू जात होता. आम्ही सगळय़ा खेळांचं सामान जमवलं अन् संध्याकाळी उशिरा लक्षात आलं, की आमचे उडय़ांच्या दोऱ्यांचे १० सेट्स ऑर्डर देऊनही त्या माणसांनी पाठवलेच नाहीत. मग त्यावर ‘तो खेळच रद्द करू या’ वगैरे बोलणं सुरू झालं. आप्पा म्हणाला, ‘‘ताई, अर्धा तास दे.’’ अध्र्या तासानं आप्पा दोरी घेऊन आला आणि मला दोन उडय़ा मारून दाखवल्या. म्हणाला, ‘‘ही चालेल?’’ पाहिलं, तर जाड पिवळट दोर आणि हाताला हँडल्स होती.

‘‘कुठून आणलंस?’’
‘‘आपल्याकडे झेंडय़ाचे जुने दोर आहेत. त्यातला एक जुना दोर घेऊन त्याचे पातळ दोर केले. हायकोर्टात पलीकडे पी.डब्ल्यू.डी.चे प्लॅस्टिकचे काळे पाइप्स पडलेले होतेच. ते कापून हॅण्डल्स केली आणि गाठी मारल्या. तुला दहा दोऱ्या एका तासात करून देतो.’’ आमचं काम भागलं. आप्पा पूर्वी आखाडय़ात कुस्ती खेळायचा. ‘‘सासऱ्याशी पैज लावून कुस्ती जिंकली आणि शोभाला (बायकोला) खांद्यावर घेऊन आणली.’’ हे सांगताना आप्पाचे डोळे चमकत आणि त्याच्या चेहऱ्यावर रोमँटिक हसू उमटे.

न्यायमूर्ती दाभोळकर त्याला ‘दिव्यातला जिनी’ म्हणत. रजिस्ट्रार जनरलसाठी आप्पा हनुमानासारखा सर्वत्र हजर असे. पाऊस खूप पडल्यावर कधी तरी अजिबात स्टाफ नसे, तेव्हा आप्पा शिपाई ते चोपदारापासून मॅटर पुकारासुद्धा करायला तयार असे. आपल्या नोकरीवर खूप प्रेम करणारा, आपण हायकोर्टात काम करतो याचा सार्थ अभिमान बाळगणारा आप्पा हा काम किती श्रद्धेनं करावं याचा आदर्श होता. किती तरी माणसं तरुणपणीच नोकरी करताना म्हातारी होतात. पण हा रिटायर्ड झाला, तरी म्हातारा नव्हता. कारण त्याचं काम सदैव तरुणच होतं. रिटायरमेंटनंतर तो रोज कोर्टात येऊन वकिलांच्या बार रूममध्ये तितक्याच उत्साहानं काम करत असे.

मी हायकोर्टात न्यायमूर्ती होते, तेव्हा ‘‘ताई, तू कशी आहेस?’’ अशी एकवचनी हाक मारणारा आप्पाच होता. २६ जुलैला पावसानं घातलेलं थैमान, त्या वेळेस अडकून पडलेला हायकोर्टाचा कर्मचारी वर्ग, यांच्यासाठी सर्वतोपरी मदतीला धावणारा आप्पा होता. तसंच २६/११च्या रात्रीच्या भयंकर गोळीबार आणि स्फोटानंतर २७ तारखेच्या सकाळी ८ वाजता हायकोर्टात जाण्यासाठी घरी आलेला आप्पा होता. या अशाच साऱ्या कर्मचाऱ्यांमुळे हायकोर्ट आजपर्यंत उभं आहे.

बारमधल्या कोर्टातल्या सगळय़ा समारंभांना आप्पाचीच माईक सिस्टीम असे. तो तिथे धावत असे. प्रत्येक काही वर्षांनी कोर्टात असा आप्पा असतोच. जेव्हा एका महत्त्वाच्या आणि तातडीच्या निकालपत्राच्या डिक्टेशनसाठी रात्री अडीच वाजेपर्यंत मला माझ्या तिसऱ्या मजल्यावरच्या चेंबरमध्ये बसावं लागलं होतं, तेव्हा आप्पा म्हणाला, ‘‘ताई, वरच्या साडेतीन माळय़ावर ब्युमॉन्ट साहेबाचं भूत फिरतं हां रात्री कोर्टात! पण तू बस. मी आहे!’’ आप्पा काम संपेपर्यंत स्टुलावर हाताची घडी घालून भुतावर नजर ठेवून होता. मी आप्पाला गमतीत म्हटलं, ‘‘आप्पा, तू मेल्यावर हायकोर्टात भूत होऊन फिरशील.’’ पंधरवडय़ापूर्वी आप्पा गेला. त्याआधी शेवटचा भेटला तो १६ मार्च २०२२ ला माझ्या पुस्तक प्रकाशनाच्या संध्याकाळी.

काही तरी मोठ्ठं या हायकोर्टातल्या वास्तूतलं हरवलं. पण मला उगाच वाटतं, की आप्पा खरंच इथं भूत होऊन या भल्यामोठय़ा कोर्टाच्या दगडी वास्तूत फिरेल. एक खूप कामं आणि मदत करणारं हायकोर्टातलं प्रेमळ भूत!

मात्र आता हायकोर्टाचे नऊशे नव्याण्णव रुपये नव्याण्णव पैसे एवढेच आहेत. अपूर्ण.. पूर्णाकासाठी तो एक पैसा शेवटी फार महत्त्वाचा. अपरिहार्य!
chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main event appa the jugaad responsibility work behind the scenes amy
First published on: 02-07-2022 at 01:17 IST