गणेशाची मंदिरं अगदी मध्ययुगीन काळापासून दक्षिण व मध्य अमेरिका, मेक्सिको, कंबोडिया, श्रीलंका, थायलंड, इंडोनेशिया, चीन, जपान आणि इराण या दूरवरच्या देशांमध्ये आहेत. गणेशावर समृद्धीचं, भाग्याचं आणि मांगल्याचं दैवत म्हणून प्रेम करणाऱ्या भक्तांनी त्याला विविध देशांत आणि संस्कृतीत वेगवेगळी असंख्य नावं दिली आहे. हवाईमध्ये तो लोनो आहे, दक्षिण आफ्रिका व श्रीलंकेत तो पिलाईहार (उदात्त बालक) आहे. तिबेटी लोकांसाठी तो त्सोग्सबदाग आहे. म्यानमारमध्ये महा-पिएन आहे. मंगोलियात गणेशाला तोतखरोर खंगन म्हटलं जातं. कंबोडियन लोक त्याला प्राब केनेस म्हणतात आणि जपानमध्ये तो विनायक्स किंवा शॉटेन आहे. काही संशोधकांच्या सिद्धांतानुसार रोमन्स गणेशाला जानुस, शुभारंभाचे दैवत असं म्हणत असत.

गणेश, त्याच्या अगदी मूळ ओंकारस्वरूपात स्वयंभू समजला जातो. असा कोणी तरी जो केवळ ‘आहे’. असा कोणीतरी जो स्वत:ला निर्माण करतो आणि मग सगळं काही व्यापून टाकतो- त्याच्या लक्षावधी भक्तांचा यावर विश्वास आहे. भारतातील अनेक गणेश मंदिरं- विशेषत: अष्टविनायक मालिकेतली- गुहांमध्ये, पर्वतांवर किंवा नदीकाठी उभी आहेत. त्यांतल्या मूर्ती नैसर्गिकपणे खडकातून निर्माण झाल्या आहेत, मानवी हातांनी घडवलेल्या नाहीत. या लंबोदर, सुंदर, शुभ प्रतिमेला प्रसिद्धी आणि लोकप्रियताच इतकी लाभली आहे की जगभरातल्या मानवाच्या कित्येक पिढय़ा त्याच्या कांतिमान रूपामुळे, मंगल औदार्यामुळे आणि शोभिवंत आकारामुळे भारून गेल्या आहेत.

बहुतेक भारतीयांसाठी गणेश हे हिंदू किंवा भारतीय दैवत आहे. भारताच्या नकाशावर एखाद्या छोटय़ा बिंदूप्रमाणे भासणाऱ्या छोटय़ा पाडय़ापासून ते वेगाने विस्तारणाऱ्या महानगरापर्यंत प्रत्येक ठिकाणी गणेशाची मंदिरं आहेत- मग ती नैसर्गिक असोत किंवा मानवनिर्मित. चिदंबरम, कांचीपूरम, मदुराई, मयूरापुरम, नागपट्टणम, त्रिची, खजुराहो, प्रयाग, वाराणसी, तिरुअनंतपूरम आणि मोजता न येण्याजोग्या असंख्य ठिकाणी गणेशाची मंदिरं आहेत. बहुतेक भारतीय शहरांत, खेडय़ात प्रत्येक रस्त्याच्या टोकाला गणपतीचं मंदिर आहे. अमेरिकी संशोधक अ‍ॅलिस जेटी यांनी ‘गणेश- एलिफंट फेस्ड गॉड’ नावाचा मोनोग्राफ (एखाद्या विषयाचे तपशीलवार दस्तावेजीकरण) लिहिला आहे. त्यात म्हटलंय की, काश्मीर खोऱ्यात गणेशाच्या स्वयंभू प्रतिमा मोठय़ा संख्येने आहेत. यातली तीन ठिकाणं तर मोठी तीर्थक्षेत्रं आहेत. पहिलं लिडर नदीजवळचं गणेशबाळ, दुसरं श्रीनगरजवळच्या हरिप्रभात टेकडीच्या तळाचं भीमस्वामीन आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे किशनगंगा नदीलगतच्या कडय़ावरचं गणेशघाटी.

अर्थात गणेश हे वैश्विक दैवत आहे हे मात्र फार थोडय़ा लोकांना माहीत आहे! या गजमुखी विद्येच्या आणि मांगल्याचं प्रतीक असलेल्या देवाचं पूजन अनेक खंडांमध्ये केलं जात होतं, हे प्राचीन वारसास्थळांवरून आणि ऐतिहासिक उत्खननांमधून लक्षात येतं. यावरून आणखी एक ऐतिहासिक सत्य समोर येतं- भारतीय धर्म आणि संस्कृतीचा प्रभाव केवळ आग्नेय आशियातल्या राष्ट्रांवरच नव्हे, तर मेक्सिको, दक्षिण अमेरिका, इराण, दक्षिण आफ्रिका आदी दूरवरच्या देशांवरही मध्ययुगीन काळात होता. अलीकडच्या काळात भारतीय नोकरी, व्यापार किंवा वैश्विक जीवनशैलीच्या ओढीमुळे जिथे जिथे स्थायिक झाले तिथे त्यांनी गणेशाची मंदिरं बांधली आहेत. अशा प्रकारची मंदिरं ऑस्ट्रेलिया, जर्मनी, फ्रान्स, ग्रेट ब्रिटन आणि आखाती देशांत तसंच अमेरिकेतही आहेत. लंडन, न्यू यॉर्क, पॅरिस, हॅम्बर्ग, मेलबर्न आणि एडमंटन या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शहरांमध्ये गणेशाची काही सर्वात मोठी आधुनिक मंदिरं आहेत.

अर्थात जगातील सर्वाधिक आस्थेने जतन करण्यात आलेल्या वारसास्थळांपैकी असलेल्या गणेशमंदिरांबाबतची नवीन माहिती इथे देणं जेवढं रसप्रद आहे तेवढंच महत्त्वाचंही. आपल्या शेजारी राष्ट्रांत श्रीलंकेत, जे आज पूर्णपणे बौद्ध राष्ट्र आहे, गणेशाची १४ प्राचीन मंदिरं आहेत. कोलंबोजवळच्या केलानिया गंगा नदीच्या काठावर असलेल्या केलानिया बौद्ध विहारात आणि तशा अनेक विहारांमध्ये गणेशाची मोठमोठी शिल्पं आहेत. श्रीलंकेतील लोक गणेशाची पूजा करतात आणि पवित्र वास्तूंच्या प्रवेशद्वाराशी गणेशाची स्थापना करून त्याची दानशूरता आपल्यातही येऊ दे, अशी प्रार्थना करतात. ही १४ प्राचीन मंदिरं जाफना, अलवेड्डी, बटीकालोवा, कोलंबो, कॅण्डी आणि कटारगामा येथे आहेत. या पाचूंच्या बेटावर भारतीय संस्कृती व धर्माचा किती प्रभाव होता हे यावरून स्पष्ट होतं.

उत्तरेकडे नेपाळ तर हिंदूबहुसंख्य राष्ट्र असल्याने या देशाच्या भूतकाळाचे अनेक धागे भारतासोबतच विणले गेले आहेत. मात्र, हिंदूधर्मातील तांत्रिक पंथाचा स्वीकार नेपाळने केला असून, बहुसंख्य नेपाळींचा धर्म हाच आहे. आजही नेपाळमधील हिंदूधर्मावर तांत्रिक पंथाचा प्रभाव जाणवतो. इथल्या गणेश मंदिरांतील प्रतिमा काहीशा कृश आहेत आणि डोळ्यांची ठेवण कललेली आहे. भक्तपूर, बुबगामती, चोबर, काठमांडू, गोरखा, जनकपूर आणि फुलहारा इथे गणेशाची मंदिरं आहेत.

पूर्वेकडे ब्रह्मदेश (म्यानमार), कंबोडिया, सियाम, इंडोनेशिया (बोराबुदुर आणि बाली) आणि मलाय द्वीपकल्प इथे प्राचीन संस्कृती आहेत. यापैकी म्यानमारमधील बागान वारसास्थळ आणि कंबोडियातले अंगकोर वाट शहर त्यांच्या पवित्र भौगोलिक स्थानासाठी आणि असंख्य प्रार्थनास्थळं आणि पवित्रस्थळांसाठी प्रसिद्ध आहेत. या जगातल्या सर्वात ऐतिहासिक मंदिररूपी वास्तू म्हणून ओळखल्या जातात. म्यानमारमधील बागान राजवटीचा काळ इसवी सन दुसऱ्या शतकातला आहे, पण या राजवटीचा सुवर्णकाळ सुरू झाला तो इसवी सन १०५७ मध्ये. कुबला खानाने १२८७ मध्ये हे शहर उद्ध्वस्त केलं. त्यापूर्वी इथे १३,००० मंदिरं बांधण्यात आली होती. मात्र इरावड्डी नदीला आलेले पूर तसेच भूकंपासारख्या नैसर्गिक आपत्ती आणि लूट व उद्ध्वस्तीकरणासारख्या मानवी कृत्यांमुळे आज केवळ २२०० अस्तित्वात आहेत. तरीही या ठिकाणी युरोपमधल्या मोठाल्या कॅथ्रेडल्सच्या तोडीच्या वास्तू आहेत. यातील बहुतेक मंदिराच्या प्रवेशद्वाराशी गणेशाच्या प्रतिमा आहेत. यापैकी श्वेसनदाव मंदिर हे राजा अनावर्ताने १०५७ मध्ये बांधलेलं मंदिर गणेश मंदिर म्हणून ओळखलं जातं. कारण, या देवळाच्या पाच धाब्यांपैकी प्रत्येकाच्या कोपऱ्याला गणेशाच्या प्रतिमा होत्या. मोन राजवटीचे पालक दैवत गणेश हेच होतं. आणखीही अनेक मंदिरांमध्ये भिंतींवर गणेशाच्या प्रतिमा आहेत. ब्राह्मी संस्कृतीवर दक्षिण भारतातल्या चोल राजवटीचा खूप प्रभाव होता याबद्दलही तज्ज्ञांमध्ये एकमत आहे.

अंगकोर वाटचं बांधकामही कंबोजवर मध्ययुगात (कंबोडिया किंवा काम्पुचियाचं प्राचीन नाव) राज्य करणाऱ्या हिंदू राजांच्या अनेक पिढय़ांनी मिळून पूर्ण केलं. साहजिकच विष्णू, शिव आणि गणेश या हिंदू दैवतांची स्थापना मंदिरात करण्यात आली. आता युनेस्कोचे जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता मिळालेल्या अंगकोर वाटचा शोध फ्रेंच पुरातत्त्वशास्त्रज्ञ हेन्री माओत यांनी लावला. या मंदिरं, सरोवरं आणि नद्यांच्या देशातही गणपती हे पूजनीय दैवत होतं हे यातून पुन्हा एकदा दिसून आलं.

पुढची गोष्ट आहे जावा, सुमात्रा आणि बाली या देशांवर आजही असलेल्या हिंदूधर्माच्या प्रभावाची. बाली आजही हिंदू आहे आणि या बेटावर गणेशाची अनेक मंदिरं आहेत. मात्र, इथे जावाचा हिंदूधर्म आणि बौद्धधर्म यांचा प्रभावही अनेक मंदिरांवर व स्मारकांवर आहे. यात बोराबुदुर या जगातील सात आश्चर्यामध्ये गणल्या जाणाऱ्या स्थळाचा समावेश होतो. मंदिरांच्या या सुंदर समूहामध्ये कॅण्डी सुकुह आणि कॅण्डी सेटो ही दोन हिंदू मंदिरं जावाच्या इतिहासातील मागापाहीत काळाच्या अखेरीस बांधण्यात आली आहेत. कॅण्डी लोरे जोंग्रांग प्रम्बानन हे मंदिर संजय नावाच्या हिंदू राजाने सातव्या-आठव्या शतकाच्या सुमारास बांधलं. यामध्ये शिव महागुरू, गणेश आणि दुर्गा महिषासुरमर्दिनी यांची अप्रतिम देवळे आहेत. पूर्व जावामधील तुलिस्काइयो गावातील बारा मंदिर इसवी सन १२३९ मध्ये बांधण्यात आलं असून त्यात गणेशाची तीन मीटर उंच मूर्ती आहे. नवव्या शतकात बांधलेल्या रातु बाका मंदिरात गणेशाची अपूर्णावस्थेतील मूर्ती आहे. अर्थात, इंडोनेशिया हे आता इस्लामी राष्ट्र आहे आणि बालीव्यतिरिक्त अन्य ठिकाणी गणेशाचं पूजन केलं जात नाही.

थायलंडमध्ये मात्र असं नाही. धकाधकीच्या आधुनिक जीवनशैलीतही थायी लोक, बहुसंख्येने बौद्ध असले तरीही, बँकॉकच्या गणेशमंदिरात प्रार्थना करतात आणि दर महाशिवरात्रीला शिवझुला (लोगीन वोर) सार्वजनिक चौकात सजवला जातो.

भारतीयांनी व्यापारउदिमासाठी सियामला जाण्यास सुरुवात केली तेव्हा दक्षिणेतील चोल राज्यातील अनेक हिंदू व बौद्धधर्मीय भारतातून सियामला गेले याची नोंद आहे. आजही प्राचीन तमीळ आणि थायी भाषेत थायलंडला सुखोथाई अर्थात प्रसन्न पहाटेची भूमी असं म्हटलं जातं. थायी भाषेत अनेक तमीळ शब्द आहेत. सियामची प्राचीन राजधानी अयुथियावरही भारतीय धर्म व संस्कृतीचा गहिरा प्रभाव आहे. मात्र, बँकॉकमध्ये गणेशपूजनाची पद्धत भारतातील पद्धतीपेक्षा निराळी आहे. इथे गणेशाला बौद्ध परंपरेनुसार अन्नाचा नैवेद्य दाखवला जातो. मलाय द्वीपकल्पावरही पूर्वी भारतीय संस्कृतीचा गाढा प्रभाव होता आणि त्यामुळे पेतालिंग जावा, क्लालालंपूर, जालनपडू आणि मेलाका येथे गणेश मंदिरं बांधलेली आहेत. याशिवाय मॉरिशस (रिव्हिएर दु रेम्पार्त) आणि सिंगापोर या दोन देशांतही गणेशाची मंदिरं आहेत.

थोडं विचित्र वाटेल पण पूर्वेकडच्या देशांप्रमाणेच मेक्सिको, गांटेमाला, पेरू, बोलिव्हिया आणि होण्डुरास या देशांमध्येही भारताप्रमाणेच समृद्ध मंदिरं आहेत. या देशांमध्ये गणेश, शिव, विष्णू, हनुमान आणि सूर्य या दैवतांची पूजा केली जाते. या प्रतिमा इंका पुराणातही आहेत. त्यामुळे त्यांचा प्रभाव या देशांमध्ये बराच दिसून येतो. मेक्सिको सिटीतल्या दिएगो रिव्हिएरा मंदिरातील गणेशमूर्तीपासून ते गांटेमाला वस्तुसंग्रहालयातल्या अनेक हिंदू प्रतिमांपर्यंत अनेक खुणा याची साक्ष देतात. मेक्सिकोत झालेल्या उत्खननांमध्ये असंख्य गणेशमूर्ती आढळल्या. या देशात सापडलेल्या हस्तलिखितांवर गजमुखाच्या आकृती आहेत. मध्य अमेरिकेतील मंदिरांच्या अवशेषांवरून हे सिद्ध होतं की अझटेक संस्कृतीतही गणेशपूजन होत असे. इतिहासकारांच्या मते, गणेशाच्या मूर्ती जहाजांद्वारे दूरवरच्या देशांत प्रवास करून गेल्या असाव्यात आणि समुद्राचं भय असलेल्या सर्व व्यापारी समुदायांनी या दैवताला आपला रक्षक म्हणून स्वीकारलं असावं!

गणेशाने प्रत्येक राष्ट्र आणि संस्कृतीनुसार आपल्या रूपात बदल केला आहे हे विलक्षण आहे. नेपाळ, थायलंड आणि अन्य पौर्वात्य देशांमध्ये त्याचं रूप तांत्रिकासारखं आहे आणि त्याच्या हातात काही  वनस्पतीही आहेत. त्याने टोपी घातलेली आहे आणि वैशिष्टय़पूर्ण पोशाख घातला आहे. इराणमधला गणपती झोराष्ट्रीअन शैलीचा पोशाख करतो. मेक्सिको आणि मध्य अमेरिकेत तो अझटेक संस्कृतीप्रमाणे सैल पोशाख करतो. गणेशावर समृद्धीचं, भाग्याचं आणि मांगल्याचं दैवत म्हणून प्रेम करणाऱ्या भक्तांनी त्याला विविध देशांत आणि संस्कृतीत वेगवेगळी असंख्य नावं दिली आहे. हवाईमध्ये तो लोनो आहे, दक्षिण आफ्रिका व श्रीलंकेत तो पिलाईहार (उदात्त बालक) आहे. तिबेटी लोकांसाठी तो त्सोग्सबदाग आहे. म्यानमारमध्ये महा-पिएन आहे. मंगोलियात गणेशाला तोतखरोर खंगन म्हटलं जातं. कंबोडियन लोक त्याला प्राब केनेस म्हणतात आणि जपानमध्ये तो विनायक्स किंवा शॉटेन आहे. काही संशोधकांच्या सिद्धांतानुसार रोमन्स गणेशाला जानुस, शुभारंभाचे दैवत असं म्हणत असत. त्याच्या नावावरूनच वर्षांच्या पहिल्या महिन्याचं नाव जानेवारी असं ठेवण्यात आलं. प्रत्येक संस्कृतीत गणेशाचं पूजन कोणत्या न कोणत्या स्वरूपात होतं. आज जगभरात पसरलेले लक्षावधी हिंदू, बौद्ध, जैन लोक गणेशाकडे यशाचं, समृद्धीचं, मांगल्याचं आणि प्रत्येक घरात व प्रत्येकाच्या हृदयात औदार्य निर्माण करणारा म्हणून आदराने बघतात!

विमला पाटील

chaturang@expressindia.com

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com