दक्षिण आशियातील मंदिराच्या वास्तूंबाबत प्रख्यात कला इतिहासकार डॉ. देवांगना देसाई यांचा शब्द अखेरचा मानला जातो. प्राचीन भारतीय कलेच्या विविध अंगांवर त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत आणि नव्वदहून जास्त निबंध सादर केले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, एनसायक्लोपिडिया ब्रिटानिकामधला खजुराहोवरील लेख त्यांनीच लिहिलेला आहे. त्यांच्या संशोधनावर आधारित ‘बियॉण्ड द इरॉटिक अ‍ॅट  खजुराहो’ या चित्रपटाने जगभरातील विद्वानांची पावती मिळवलेली आहे. त्यांनी खूप प्रवास करून भारतातील मंदिर स्थापत्याबद्दल अनेक ठिकाणी व्याख्यानं दिली आहेत. यामध्ये ब्रिटन, अमेरिका आणि अन्य देशांतील प्रतिष्ठित संस्थांचा समावेश आहे. मंदिर स्थापत्य आणि ज्या काळात भारतातील ही उत्कृष्ट मंदिरं बांधली गेली त्या गेल्या शतकांमधील राजवटींचा इतिहास याबाबत त्यांना गेल्या काही दशकांत अधिकारी व्यक्तिमत्त्व म्हणून मान्यता मिळाली आहे. भारतातील मंदिर बांधणीची अनेक अंगं डॉ. देसाई यांनी उलगडली आहेत आणि इतिहासाच्या विविध कालखंडांतील स्थापत्यकलेच्या अनेक शैलींवरही प्रकाश टाकला आहे.

भारतातील ऐतिहासिक आश्चर्यापकी एक असलेली खुजराहो मंदिरं एकेकाळी, चंडेल राजवटीच्या काळात अत्यंत गजबजलेल्या आणि सुसंस्कृत अशा राजधानीत दिमाखाने उभी होती. या राजवटीच्या काळात बुंदेलखंड भागात मंदिरांमागून मंदिरं बांधली गेली. इतिहास सांगतो की या मंदिरांचा आश्रयदाता होता राजा यशोवर्मन. याच राजाने आजही विस्मयकारी वाटणारं आणि परिपूर्ण असं लक्ष्मणमंदिर बांधून घेतलं. त्यानंतर याच राजवटीच्या धंग नामक राजाने विश्वनाथ मंदिर बांधून घेतलं. अर्थात, या सर्व मंदिरांपकी सर्वोत्तम आणि सर्वाधिक दर्शन घेतलं जाणारं मंदिर आहे ते शिवाचं- कंदरीय महादेव मंदिर. हे मंदिर घेतलं गंद राजाने सहस्रकाच्या सुरुवातीला- १०१७ च्या आसपास. या मंदिरातील शीलालेखांवरून असं लक्षात येतं की यातली बहुतेक मंदिरं इसवी सन ९७०-१०३० या कालखंडात बांधण्यात आली आहेत, तर पुढील काही दशकांमध्ये अन्य मंदिरं बांधली गेली आहेत. एकेकाळी चंडेल राजांची राजधानी असलेल्या महोबा या प्राचीन शहरापासून ही मंदिरं केवळ ३५ किलोमीटर अंतरावर आहेत.

replica of Ram temple, Ram campaign,
ठाण्यात ठाकरे गटाकडून रामाचा प्रचार, राजन विचारेंच्या चैत्र नवरात्रोत्सवात राम मंदिराची प्रतिकृती
Know about This Seven Indian royal families heritage source of income and how they live a luxurious life
आलिशान राजवाडे, गडगंज संपत्ती; ‘ही’ आहेत भारतातील सात श्रीमंत राजघराणी; पण त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत काय?
Martand Sun Temple
काश्मीरमधल्या मार्तंड सूर्य मंदिराचा होणार जिर्णोद्धार, अयोध्येतील राम मंदिराशी आहे थेट कनेक्शन
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!

महोबा या मध्ययुगीन शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर खजुराहो मंदिरं बांधण्यात आली. महोबा ही चंडेलांची राजधानी. १२ व्या शतकापर्यंत बहुतेक मंदिरं बांधून पूर्ण होत होती. मात्र, त्यानंतर लगेचच दिल्लीचा सुलतान कुतुब-दिन ऐबकने स्वारी केली आणि मंदिरं उद्ध्वस्त केली. पुढची काही र्वष येथे येणारे प्रवासी या मंदिरांच्या वैभवाबद्दल लिहीत होते. १२ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही भव्य मंदिरं टिकून होती, पण मुस्लीम राजांनी त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. आधुनिक काळात ही मंदिरं पुन्हा उभी राहिली असली, तरी यातील काही भागांचं दुरुस्त न होण्याजोगं नुकसान झालेलं आहे हे  लक्षात येतं.

१८ व्या शतकापर्यंत ही मंदिरं वेगवेगळ्या शासकांच्या नियंत्रणाखाली होती आणि सिकंदर लोधीसारख्या राजांच्या काळात यातली अनेक दुर्लक्षित राहिली, उद्ध्वस्त करण्यात आली. नंतरच्या काळात या मंदिरांच्या दुर्गमपणाने त्यांचे रक्षण केले. शिवाय मंदिरांच्या अवतीभवती मोठाली झाडं होती. त्यामुळे विध्वंसकांच्या नजरेस ही मंदिरं पडली नाहीत.  १९ व्या शतकात ब्रिटिश सर्वेक्षक

टी. एस. बर्ट यांना कोणीतरी या मंदिरांकडे घेऊन गेलं आणि बर्ट व त्याकाळातील भारतामधील ब्रिटिश शासकांनी ही मंदिरं वाचवली. संपूर्ण जगाने ही मंदिरं बघावीत म्हणून ती पुन्हा उभी केली. ब्रिटिशांनी पुढील पिढय़ांसाठी या मंदिरांची रेखाचित्रंही काढून घेतली. आणखी एक सर्वेक्षक किनगहॅम यांनी १८५०-६० पासून या मंदिरांचे प्रथमच दस्तावेजीकरण केले आणि स्थानानुसार त्यांचं वर्गीकरण केलं. यानुसार पश्चिम समूह लक्ष्मण मंदिराच्या भोवताली होता, पूर्वेकडचा समूह जावेरी मंदिराच्या भोवताली होता, तर दक्षिण समूह दुलादेव मंदिराच्या भोवताली होता. खजुराहो आणि तिथली मंदिरं हा संपूर्ण जगासाठी विस्मयाचा विषय, तर जगभरातल्या कला इतिहासकारांसाठी संशोधन-अभ्यासाचा विषय झाला. शिवमंदिरांमुळे या शहराला पवित्र शहर म्हटलं जाऊ लागलं.

आज, येथील मंदिरांपकी सहा शिव-पार्वती किंवा देवीची, आठ विष्णूची, एक गणेशाचं तर एक सूर्यदेवाचं आहे. यात तीन जैन मंदिरंही आहेत. हिंदू धर्मातील शैव व वैष्णव या दोन्ही पंथांची मंदिरं इथे आहेत. सर्व मंदिरांमध्ये देवतांची सुंदर शिल्पं आहेत. अनेकांना वाटतं की कामुकता हा खजुराहोच्या शिल्पांमधला मुख्य विषय आहे. मात्र, विद्वानांच्या म्हणण्यानुसार, शिल्पांपकी जेमतेम दहा टक्के कामुक विषयांवरची आहेत. अन्य शिल्पं जन्माचं चक्र स्पष्ट करणारी, त्यावर प्रकाश टाकणारी आहेत. या सर्व मंदिरांपकी फार थोडय़ा मंदिरांमध्ये आज प्रार्थना केली जाते. आज या मंदिरांचा शोध लागल्यानंतर अनेक शतकांनी, खजुराहो हे भारतातले जागतिक दर्जाचे वारसास्थळ आहे आणि हजारो लोक दरवर्षी या ठिकाणाला भेट देतात. बहुतेक मंदिरांमध्ये हिंदू धर्मातील वैशिष्टय़पूर्ण स्थापत्यकलेचं दर्शन होतं- समरूपता, समकेंद्री स्तर आणि शेवटी गाभारा किंवा गर्भगृह. सर्व काही गणिताच्या नियमांवर आधारित. कंदरीय महादेव मंदिरात हे प्रकर्षांने दिसून येतं. इथली अनेक मंदिरं स्थापत्यकलेतलं आश्चर्य आहेत आणि गतकाळात मंदिरबांधणीचं ज्ञान किती प्रगत होतं याची साक्ष देतात.

खजुराहो मंदिरांचं वर्गीकरण तीन समूहांत केलं जातं- पश्चिम समूह, पूर्व समूह आणि दक्षिण समूह. पहिल्या समूहात वराह मंदिर आणि लक्ष्मण मंदिराचा समावेश होतो. यातील लक्ष्मण मंदिर सर्वात पूर्वीचं (इसवी सन ९५०) असून, हे शहरातलं सर्वात मोठं आणि उत्तम रीतीने जतन करण्यात आलेलं मंदिर आहे. पूर्व समूहात जैन मंदिरं आहेत.  या समूहातलं सर्वात मोठं मंदिर आहे पाश्र्वनाथ मंदिर. दक्षिण समूहात दुलादेव मंदिरासह अनेक मंदिरं आहेत. विष्णूची चतुर्भुज रूपातली तीन मीटर उंचीची मूर्ती असलेलं चतुर्भुज मंदिर याच समूहात आहे. भारतीय आर्य शैलीतल्या मंदिरांचं खजुराहो मंदिरं हे उत्तम उदाहरण आहे. बहुतेक मंदिरं वाळूच्या खडकापासून बांधलेली आहेत. देवदेवता, नर्तक आणि संगीतज्ज्ञ, योद्धे, पौराणिक तसंच प्राण्यांची अनन्यसाधारण शिल्पं निर्माण करणारे कलावंत, भाविक, राजे आणि कारागीर इथे हजार वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. खरं म्हणजे निर्मिक आणि भाविकांचं अवघं विश्वच होतं. या विश्वाने परिपूर्ण निर्मिती केली.

खजुराहो मंदिरांसंदर्भात काही रसप्रद माहिती आहे. या मंदिरांची भव्यता, नियोजन आणि निर्मिती समजून घेण्यासाठी हिस्ट्री वाहिनीची एक टीम, त्यांच्या लॉस्टर्वल्ड्स नावाच्या एका कार्यक्रमादरम्यान खजुराहोला गेली. चार फुटांहून कमी उंचीचं एक शिल्प कोरण्यासाठी किती कष्ट आणि कौशल्य लागतं हे स्पष्ट करताना त्यांनी सांगितलं की, हे शिल्प कोरण्यासाठी कारागिरांना जवळपास ६० दिवस लागले असावेत. मंदिर बांधण्यासाठी लागणारे दगड खाणीतून बाहेर काढण्यासाठी किती कष्ट लागतात हेही या कार्यक्रमात स्पष्ट करण्यात आलं. सुमारे ४०० टन दगड बाहेर काढण्यासाठी १२ खाणकामगार २२ दिवस काम करत होते! अशा पद्धतीने खजुराहो मंदिरं शेकडो प्रशिक्षित कारागीर आणि कलावंत, शिल्पकार आणि स्थापत्यकार तसेच खाणकामगारांच्या कष्टातून उभी राहिली आहेत हे त्यांनी सिद्ध केलं.

अशा प्रकारच्या खजुराहो मंदिरांना आज मानवी प्रयत्नांतून साकारलेलं आश्चर्य म्हणून मान्यता मिळाली, तर त्यात नवल ते काय!

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com