१९९०च्या मध्यात राजाबाई टॉवरच्या स्टेण्ड ग्लास खिडक्या पुन्हा बसवण्याची आणि वाचनालयाच्या इमारतीचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट विकास दिलावरी यांच्यावर सोपवण्यात आली. राजाबाई टॉवरच्या घडय़ाळाची दुरुस्तीही सुरू झाली. दिलावरी यांच्या प्राथमिक संशोधनातून अनेक ऐतिहासिक घटना पुढे आल्या. आज आधुनिक मुंबईच्या पटलावरही राजाबाई टॉवरची जादू कायम आहे. मुंबईच्या ऐतिहासिक वास्तूंवरचा हा उर्वरित भाग..

गेल्या शंभर वर्षांहून अधिक काळ राजाबाई टॉवर आणि वाचनालयाची इमारत स्थितप्रज्ञ रक्षकासारखी उभी आहे. त्या काळच्या बॉम्बेचा आताच्या आधुनिक मुंबईपर्यंतचा प्रवास बघत, प्रचंड वेगाने झालेला विकास बघत, एकविसाव्या शतकातली स्वतंत्र भारताची कायम धडधडत राहणारी आर्थिक राजधानी म्हणून मुंबईत झालेला बदल बघत. नव्यानेच उदयाला आलेल्या या राष्ट्राचे प्राधान्यक्रम इतके निराळे होते की, फ्रेअर यांच्या मौल्यवान वास्तूंचं जतन झालं पाहिजे, याचं भानही कोणाला राहिलं नाही. ते भान आलं भारताचा विकास आणि प्रगतीच्या मार्गावरून स्वत:चा असा स्वतंत्र प्रवास सुरू झाल्यानंतर.

Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
Raj Thackerey teaser
VIDEO : राज ठाकरे- अमित शाह यांच्या बैठकीत काय ठरलं? शिवतीर्थवरून मिळणार उत्तर, पाहा पाडवा मेळाव्याचा टीझर!
chandrapur s 19 Month Old Survi Salve Enters India Book of Records
दीड वर्षाची सुरवी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये, जाणून घ्या वैशिष्ट्य…
dr jane goodall, dr jane goodall marathi article,
संशोधकाची नव्वदी!

एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या उदारीकरणाची फळं दिसायला लागली आणि वारसास्थळांच्या जतनाची आवश्यकता आहे याबद्दल मुंबईतले वास्तुविद्याविशारद (आर्किटेक्ट्स), खासगी संस्था, हेरिटेज ट्रस्ट, सरकार जागरूक होऊ लागले. मुंबईतल्या गोथिक शैलीतल्या वास्तूंचं पुनरुज्जीवन करण्यासाठी बरेच आराखडे तयार केले गेले. या वास्तूंमध्ये राजाबाई टॉवर आणि वाचनालयाचा समावेश ठळकपणे करण्यात आला होता. १९९०च्या मध्यात स्टेण्ड ग्लास खिडक्या पुन्हा बसवण्याची आणि वाचनालयाच्या इमारतीचं पुनरुज्जीवन करण्याची जबाबदारी कॉन्झर्वेशन आर्किटेक्ट विकास दिलावरी यांच्यावर सोपवण्यात आली. राजाबाई टॉवरच्या घडय़ाळाची दुरुस्तीही सुरू झाली.

दिलावरी यांच्या प्राथमिक संशोधनातून अनेक ऐतिहासिक घटना पुढे आल्या. ते सांगतात, ‘‘मुंबईतल्या फोर्ट परिसरात बांधण्यात आलेल्या गॉथिक इमारती म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यातल्या ब्रिटिशांच्या जीवनमूल्यांचं प्रतीक होत्या. औद्योगिक क्रांतीमुळे कालबद्ध कार्यसंस्कृतीवर भर दिला जाऊ लागला होता. कामगारांपैकी बहुतेकांकडे स्वत:ची मनगटी घडय़ाळं नसायची. मग त्यांना वेळ कळावी म्हणून विद्यापीठ, क्रॉफर्ड मार्केट, व्हिक्टोरिया टर्मिनस आणि सचिवालयासारख्या सार्वजनिक इमारतींवर मोठाली घडय़ाळं लावण्यात आली होती. राजाबाई टॉवर ही पहिली वर्तुळाकार इमारत होती. या इमारतीत ७६२ मीटर लांबीचे स्टेण्ड ग्लास लावण्यात आले आणि त्यापैकी कशावरही धार्मिक चित्र नव्हतं. सगळ्या खिडक्यांसाठी आणि जिन्यांसाठी महागडं रोझवूड वापरण्यात आल्याचं आमच्या लक्षात आलं. या इमारतीचा प्रत्येक तपशील हा रिव्हायवल गॉथिक स्थापत्यशैलीला अनुसरून निश्चित करण्यात आला आहे.’’

मुंबईतल्या ब्रिटिश कौन्सिल डिव्हिजनने आणि ब्रिटिश व्यापार व उद्योग खात्याने पुनरुज्जीवनाच्या कामासाठी ८० लाख रुपयांचं योगदान दिलं; त्याचप्रमाणे पुनरुज्जीवनासाठी स्टेण्ड ग्लास तज्ज्ञ आणि साहित्य पाठवलं. मग दिलावरी यांचं काम सुरू झालं. बाकीचा निधी मुंबई विद्यापीठाने दिला. विद्यापीठाने अनेक लोकप्रिय उपक्रमांतून हा निधी उभा केला. दिलावरी यांच्यावर जबाबदारी होती ती बांधकामातल्या डागडुजींची आणि स्टेण्ड ग्लास खिडक्या पुन्हा बसवण्याची. तळमजल्यावरच्या किमती मिंटन फरशाही पुन्हा बसवण्यात आल्या. वाचनालयाची इमारत ही आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वीकृत अशी तत्त्वे आणि जतनतंत्रे वापरून पूर्णपणे पुनरुज्जीवित झालेल्या भारतातील काही थोडय़ा वास्तूंपैकी एक आहे.

‘‘पुनरुज्जीवनाच्या कामात सर्वात आव्हानात्मक होतं ते स्टेण्ड ग्लासच्या खिडक्या पुन्हा बसवण्याचं. ब्रिटिश डिझायनर्स अल्फ्रेड फिशर, सेप वॉ आणि मार्क बॅम्ब्रो हे त्यांना लागणाऱ्या सर्व साहित्यासह ब्रिटनमधून मुंबईला आले होते. भारतातील पथकांसोबत त्यांनी अनेक महिने मेहनत घेऊन सर्व खिडक्यांना त्यांचे गतवैभव परत मिळवून दिलं. स्टेण्ड ग्लासच्या डिझाइन्समुळे या इमारतीचा खरा दिमाख उठून दिसू लागला. रिव्हायवल गॉथिक स्थापत्यकलेचं हे उत्तम उदाहरण समजलं जातं. घडय़ाळाचं मेकॅनिक्सही शक्य तेवढं दुरुस्त करण्यात आलं. सोळापैकी आठ घंटा कार्यान्वित करण्यात आल्या. त्या दर १५ मिनिटाला वाजतात. सध्या घडय़ाळ काम करत राहावं म्हणून ठरावीक अंतराने त्याची किल्ली फिरवली जाते. आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कारांमध्ये आम्ही केलेल्या कामाचा आवर्जून उल्लेख करण्यात आला याचा अभिमान वाटतो.’’

प्रशस्त घुमटाकार छताची दालनं, गतस्मृती जाग्या करणारे सज्जे (गॅलरी), व्हेनिसच्या पलाझो डय़ुकलपासून प्रेरणा घेऊन बांधलेले जिने आणि अनोख्या स्टेण्ड ग्लास खिडक्या यांच्यासह ऐतिहासिक राजाबाई टॉवर आणि वाचनालयाच्या इमारतीचं मूळ वैभव जवळपास परत आलं आहे.

या वाचनालयात संस्कृत भाषेतल्या ७४१८ हस्तलिखित प्रती (मॅन्युस्क्रिप्ट्स), उर्दू, पर्शियन आणि अरेबिक भाषेतल्या ११९० हस्तलिखित प्रती, भूर्जपत्रावर लिहिलेले १८१ ग्रंथ आणि सोळाव्या शतकातले प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत यांची ११७४ हस्तलिखितं असा खजिना आहे. शिवाय वेगवेगळ्या काळातली सहा लाख पुस्तकं आणि नियतकालिकं इथे आहेत. सर्वात जुनं पुस्तक १४९० चं आहे. ब्रेडेनबाशने जर्मनी ते जेरुसलेम अशा केलेल्या प्रवासाचं ते वर्णन आहे. याशिवाय अनेक पुस्तकं, डायऱ्या, वर्तमानपत्र, क्लिपिंग्ज, रेकॉर्ड्स इथे आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कायदेतज्ज्ञ ए. ए. फैझी, समाजासाठी काम करणारे जमशेदजी जिजिभॉय आणि संस्कृतचे विद्वान भारतरत्न पी. व्ही. काणे यांच्यासंदर्भातली खूप पुस्तकं वाचनालयात आहेत.

(मुंबई ११ राजाबाई टॉवर, अरबी समुद्र दिसत होता तेव्हा) आज आधुनिक मुंबईच्या पटलावरही राजाबाई टॉवरची जादू कायम आहे. शहराची गगनरेखा (स्कायलाइन) आता वेडीवाकडी झाली असली, तरी त्यात गतवैभव परत मिळालेला हा टॉवर लक्षवेधी ठरतोच. राजाबाई टॉवरचं सौंदर्य आणि त्यामागचा इतिहास प्रकाशात यावा म्हणून मुंबई विद्यापीठाने आपल्या सव्वाशे वर्षपूर्तीनिमित्त अनेक उपक्रम घेतले. यात इतिहासकारांची, कॉन्झव्‍‌र्हेशन आर्किटेक्ट्सची आणि साहित्यिकांची व्याख्यानं आयोजित करण्यात आली होती. मौल्यवान हस्तलिखितांचं कायमस्वरूपी प्रदर्शन तळमजल्यावरच्या दालनात भरवण्यात आलं होतं. त्या वर्षी या हस्तलिखितांचा संग्रह प्रकाशितही करण्यात आला. वाचनालयाचं डिजिटायझेशन करण्याचीही योजना आहे. राजाबाई टॉवर आणि वाचनालयाच्या इमारतीप्रमाणे मुंबईतल्या अनेक गाथिक वास्तूंचं गेल्या दशकभरात पुनरुज्जीवन करण्यात आलं. अशा प्रकारे, हे नुकतंच पुनरुज्जीवित करण्यात आलेलं मिनी-लंडन मुंबईतल्या वसाहतवादाच्या इतिहासाबद्दल बरंच काही सांगतं; तसंच या शहराच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वावरही प्रकाश टाकतं. अशा प्रकारचा इमारतींचा समूह जगात अन्यत्र कुठेही नाही, असं आघाडीचे वास्तुविद्याविशारद आणि इतिहासकारांचं मत आहे.

भारताचे महान सुपुत्र सर जमशेदजी जिजिभॉय यांच्या चित्राचं अत्यंत सुंदर पद्धतीने पुनरुज्जीवन अलीकडेच करण्यात आलं आहे. जिजिभॉय यांनीच बांधलेल्या जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये हे चित्र लावण्यात आलं आहे. शेमॉल्ड गॅलरीचे कलातज्ज्ञ केकू गांधी यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये हे पुनरुज्जीवनाचं काम पूर्ण केलं. हंगेरीचे चित्रकार लॅस्लो सेरेस यांनी असामान्य कौशल्य वापरून हे चित्र पुन्हा काढलं आहे. सर जमशेदजी टाटा यांनी ज्या प्रकारे त्यांचं जीवन लोकसेवेला अर्पण केलं, तसं अन्य कोणी क्वचितच केलं असेल. मुंबईच्या इतिहासात त्यांना अत्यंत मानाचं स्थान आहे.

सर जमशेदजी जिजिभॉय यांच्या आयुष्यातल्या काही रसप्रद गोष्टी : जिजिभॉय एका गरीब पारशी कुटुंबात जन्माला आले आणि खूप लहानपणीच अनाथ झाले. तरीही त्यांनी उद्योगांत मिळालेल्या यशानंतर मुंबईतल्या नागरिकांसाठी अनेक प्रकल्प उभारून अतीव करुणा आणि सेवाभावाचा वारसा मागे ठेवला. १५ जुलै १७८३ रोजी जमशेदजी जिजिभॉय यांचा जन्म मुंबईतल्या गर्दीच्या क्रॉफर्ड मार्केटजवळच्या एका वस्तीत झाला. शहरात अनेक शाळा, कॉलेजांच्या इमारती बांधण्यासाठी आर्थिक मदत देणाऱ्या जिजिभॉय यांना स्वत:च्या आयुष्यात औपचारिक शिक्षणाची संधीच मिळाली नाही. काकांसोबत तीन र्वष काम केल्यानंतर त्यांना चीनशी व्यापाराचा अनुभव आला. स्वत:च प्रयत्न करून त्यांनी लेखापालनाचं मूलभूत शिक्षण घेतलं आणि शेवटी मोठय़ा प्रमाणात वैभव प्राप्त केलं. आज फोर्ट भागातल्या अनेक इमारतींना त्यांचं नाव देण्यात आलं आहे. उदाहरणार्थ : जे.जे. स्कूल ऑफ आर्ट!

विमला पाटील

chaturang@expressindia.com

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com