भारतात आलेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रवाशांपैकी एक समजल्या जाणाऱ्या मार्को पोलोने श्रीलंकेला या आकारमानाचे जगातील सर्वोत्तम बेट म्हटले आहे. आणि खरेच मलाही वाटते की श्रीलंका हा देश रमणीय प्रदेश आहे- पावसाने स्वच्छ धुतली जाणारी विषुववृत्तीय वने, ऐतिहासिक शहरे, प्राचीन वास्तू, चहाच्या मळ्यांतून येणारा सुगंध, पर्वतांमध्ये थंड हवेच्या ठिकाणी धुक्यात दडलेली रिसॉर्ट्स, मोत्यासारखे शुभ्र समुद्रकिनारे आणि येणाऱ्या प्रत्येकाला मोहून टाकणारे समुद्राखालचे जीवन दाखवणारे प्रवाळ.

भूतकाळाच्या स्मृती जागवणारी ही भूमी आहे असे मला वाटते. मी श्रीलंकेत अनेकदा गेले आहे. प्रत्येक वेळी मला असे वाटले की या बेटावर येऊन काळ शांत, मूक होऊन उभा आहे. शहरे औद्योगिक आणि आर्थिक हालचालींनी उसळत आहेत आणि लोकही आधुनिक घरांमध्ये राहून तंत्रज्ञानावर आधारित कामे करत आहेत; तरीही समृद्ध इतिहासाचा नॉस्टॅल्जिया वातावरणात सर्वत्र दरवळत आहे- प्राचीन गुंफांतील भित्तिचित्रांमध्ये, प्रार्थनेचे सूर निनादत असलेल्या बौद्धकालीन मंदिरांमध्ये, जादूई विहारांमध्ये आणि गेल्या काही शतकांमध्ये युरोपीय राज्यकर्त्यांनी पर्वतांवरील शहरांमध्ये बांधलेल्या वसाहती शैलीतील बंगल्यांमध्ये. मला तर असे वाटते की, श्रीलंका एकाच वेळी इतिहासातील अनेक कालखंडांचे प्रतिनिधित्व करते. हे कालखंड एकीकडे झपाटून टाकणारे आहेत, तर दुसरीकडे नाटय़मयही आहेत. म्हणूनच युनेस्कोने श्रीलंकेतील अनेक प्राचीन वास्तूंना जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान दिले आहे!

समुद्राच्या लाटांनी धुतली जाणारी आणि पावसाच्या धारांनी शांत होणारी ही भूमी आहे. मी श्रीलंकेचा अनुभव प्रत्येक ऋतूत घेतला आहे! दक्षिण टोकापर्यंत पसरलेल्या विशाल समुद्रातील एक बेट असल्याने श्रीलंकेतील हवामान गरम आणि आद्र्र आहे. या छोटय़ाशा बेटावरील प्रचंड जैववैविध्य तर अवाक करणारे आहे. प्रति चौरस किलोमीटर भागातील जैववैविध्यावरून संयुक्त राष्ट्रांनी तयार केलेल्या यादीत श्रीलंका बेट दहाव्या क्रमांकावर आहे. संपूर्ण वर्षभर पावसाच्या सरी या भूमीला हिरवीगार आणि सुपीक ठेवतात. गवताळ प्रदेश, वनातील पर्वत, पावसाळी राने, मोठाले समुद्रकिनारे, दलदली, टेकडय़ा आदी ठिकाणीही हवामान बदलत राहते. म्हणूनच श्रीलंकेमध्ये प्राणी आणि पक्ष्यांचे  वैविध्य आढळते. फळा-फुलांबद्दल जेवढे बोलावे तेवढे कमीच आहे. नद्यांमध्ये भरपूर सुपीक गाळ आहे. त्यामुळे त्या खजिना पिकवतात. मोठा वनप्रदेश लाभलेल्या या बेटावरील डोंगरदऱ्यांमध्ये भटकण्याचा आनंद लुटणाऱ्या निसर्गप्रेमींना स्वप्नवत भासेल अशी समृद्ध आणि वैविध्यपूर्ण परिसंस्था (इको-सिस्टम) येथे आहे.

पुराण आणि इतिहासाची जादूई मिसळण इथे पाहायला मिळते साहजिकच श्रीलंकेमुळे माझ्या मनात महाकाव्य रामायणाच्या स्मृती जाग्या होतात. अनेक दक्षिण आशियाई देशांप्रमाणेच श्रीलंकाही एकाच वेळी इतिहासाच्या विविध कालखंडांत जगणारा देश आहे. पुराण आणि इतिहासाच्या सरमिसळीतून या देशाचा भूतकाळ उलगडला जातो. हे बेट भारताच्या जवळ असल्याने येथील इतिहास आणि संस्कृतीमध्ये मला खूप रस वाटत आला आहे. अगदी पूर्वीच्या दस्तावेजांमध्ये श्रीलंकेचे वर्णन रावणाचे सुवर्णसाम्राज्य म्हणून करण्यात आले आहे. उत्तर भारतातील अयोध्येचा राजपुत्र राम आणि त्याच्या पत्नीचे- सीतेचे अपहरण करणारा लंकेचा राजा रावण यांच्यात दहा दिवस झालेल्या युद्धाची भूमी म्हणून रामायणात श्रीलंकेचे वर्णन आहे.

श्रीलंकेच्या इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर मला अनेक गोष्टींची रसप्रद माहिती मिळाली. बौद्ध भिक्खूंनी लिहिलेल्या लेखांचा संग्रह असलेल्या ‘महावम्स’ (Mahavamsa)या ग्रंथात श्रीलंकेचा प्राचीन इतिहास दिलेला आहे, असे सर्वसाधारणपणे समजले जाते. यामध्ये श्रीलंकेचा इसवी सन पूर्व सहाव्या शतकापासूनचा ते इसवी सन १८१५ पर्यंतचा इतिहास आला आहे. या ग्रंथात दिलेल्या माहितीनुसार, विजय नावाचा एक हिंदू राजपुत्र इसवी सनपूर्व ५०४ मध्ये ईशान्य भारतातून हिंदुस्तानी आर्य समुदायाच्या ७०० लोकांना घेऊन श्रीलंकेत आला. वेदाह नावाच्या स्थानिक आदिवासी समाजाचा पराभव करून त्याने स्वत:ला या बेटाचा राजा म्हणून प्रस्थापित केले आणि या बेटावर राहण्यासाठी तो त्याच्या लोकांना घेऊन आला. नंतर त्याने स्थानिक भटक्या जमातीतील एका राजकन्येशी लग्न केले आणि थाम्मण्मा किंवा तांबापन्नी नावाच्या शहरातून राज्यकारभार बघितला. या लोकांना काही शतकांनी सिंहल म्हटले जाऊ  लागले. आजही या देशात सिंहली लोक बहुसंख्येने आहेत.

यानंतर अडीचशे वर्षांनी, इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकात पूर्व भारतातील मगध साम्राज्याचा सम्राट अशोक याचा मुलगा महिंद श्रीलंकेत बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी गेला, तेव्हा श्रीलंकेच्या इतिहासाने एक नाटय़मय वळण घेतले. बुद्धांना ज्या बोधीवृक्षाखाली बसले असता ज्ञानप्राप्ती झाली होती, त्या वृक्षाच्या काही फांद्या सोबत घेऊन महिंद आणि सम्राट अशोकाची कन्या संघमित्रा यांनी बेटावर प्रवेश केला. बौद्धधर्माच्या आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक म्हणून हे रोप अनुराधापूर येथे लावले गेले. या रोपाचे झालेले झाड आजही त्या जागी आहे आणि आता ते जगातील सर्वात जुने झाड आहे. माझ्यासाठी अनुराधापूर हे श्रीलंकेतील विस्मयकारी शहर आहे, जिथे आल्यावर काळ एका जागी थिजून उभा राहतो, असे मला वाटते! अनेक विहारांमध्ये भूतकाळात घेऊन जाणारी बुद्धाची पहुडलेल्या अवस्थेतील शिल्पे आहेत. या मंदिरांमध्ये म्हटल्या जाणाऱ्या बौद्धधर्मातील पवित्र मंत्रांचा आवाज मला आध्यात्मिक औषधासारखा भासतो, मला आणि या जादूई देशाला भेट देणाऱ्या कोणाही तणावाने ग्रासलेल्याला!

बौद्धधर्म श्रीलंकेतच फुलला. श्रीलंकेत बौद्धधर्माचा विकास होत असतानाच इसवी सनपूर्व २०० ते इसवी सन १००० या काळात एक वैभवशाली संस्कृती आकाराला आली आणि स्मारके व मंदिरांचे सुंदर शहर अनुराधापूर ही सिंहली राज्यकर्त्यांची राजधानी झाली. राजा पांडुकाभ्यय ते राजा अग्रबोधी (नववा) यांच्यापर्यंत अनेक शक्तिशाली राजांनी अनुराधापुरातून राज्याचा कारभार पाहिला. नंतर, पोलोन्नारुवा हे मोठे शहर झाले आणि राजा सेनापासून ते राजा कलिंग मागापर्यंत सर्वानी १२०० पर्यंत येथून राज्य केले. १९व्या शतकापर्यंत श्रीलंकेत अनेक राजांनी अनेकविध शहरांतून राज्य केले. इतिहासातील नोंदींनुसार १४व्या शतकात दक्षिण भारतातील चोल राजवट श्रीलंका बेटावर प्रबळ झाली होती आणि त्यांनी तमिळ राजवट स्थापन केली. जवळच्या हिंदुस्तानी प्रदेशातून- म्हणजे सध्याच्या तमिळनाडूतून अनेक तमिळ श्रीलंकेत राहावयास गेले. श्रीलंकेत आजही मोठय़ा प्रमाणात तमिळ लोक का आहेत, याचे उत्तर या घटनाक्रमातून मिळते.

१६व्या आणि १७व्या शतकात, पोर्तुगीज आणि डच लोकांनी या सुंदर बेटाचा ताबा घेतला. ब्रिटिशांनी या लोकांचा १७९६ मध्ये पराभव केला आणि १८०२ मध्ये ब्रिटिशांच्या भाषेत सिलोन ही ब्रिटिश वसाहत झाली. ब्रिटिशांनी कोलंबो ही वसाहतीची राजधानी म्हणून प्रस्थापित केली. हे शहर आजही श्रीलंकेची राजधानी आहे. सिलोन १९४८ मध्ये एक स्वतंत्र, सार्वभौम राष्ट्र झाले आणि १९७२ मध्ये त्याचे नाव बदलून श्रीलंका करण्यात आले. १९८०च्या दशकात श्रीलंकेत सिंहली आणि तमीळ (यांचे नेतृत्व लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ ईलम अर्थात एलटीटीईकडे होते) यांच्यात भीषण वांशिक संघर्ष पेटला. त्यानंतर दोन दशके चाललेल्या हिंसाचारानंतर २००१ मध्ये झालेल्या नॉर्वेच्या मध्यस्थीनंतर श्रीलंकेत युद्धबंदी लागू झाली. हा युद्धबंदीचा करार एलटीटीईने दहा हजारांहून अधिक वेळा मोडल्याचा आरोप करत २००८ मध्ये हा करार मोडीत काढल्याची घोषणा केली आणि आक्रमक पवित्रा घेत अखेर २००९ मध्ये एलटीटीईला पराभव मान्य करण्यास भाग पाडले. पुढचा इतिहास सगळ्यांना माहीत आहेच.

आज माझ्यासारखी प्रवासाची उत्कट आवड असलेली व्यक्ती श्रीलंका नावाच्या रमणीय देशात भ्रमंती करते, तेव्हा एक आधुनिक देश दिसतो. साक्षरतेचे चांगले प्रमाण, वेगवान औद्योगिक वाढ, विस्तारणारे पर्यटनक्षेत्र, हत्तींसाठी अनाथाश्रमासारखे पर्यावरणपूरक उपक्रम, कॅण्डीजवळच्या ऑर्किड्सच्या बागा, नुवारा एलियाची घनदाट आणि शीतल अरण्ये, कॅण्डीतील टेम्पल ऑफ द टूथसारख्या अप्रतिम वास्तू किंवा सिगिरियामधील भित्तिचित्रे, कॅण्डी पेराहेरासारखे रंगतदार उत्सव- ही सगळी श्रीलंकेची वैशिष्टय़े आहेत आणि अविस्मरणीय अनुभव देणारा हा देश माझ्या सर्वात आवडत्या पर्यटनस्थळांपैकी एक आहे!

विमला पाटील

भाषांतर – सायली परांजपे

sayalee.paranjape@gmail.com

chaturang@expressindia.com