‘पौष्टिक अन् चविष्टही’ (८ नोव्हेंबर) या लेखात सुरुवातीलाच ‘बहुसंख्य भारतीय लोक शाकाहारी असल्यामुळे…’ असे संदिग्ध वाक्य आहे. हे वाक्य भारतीय खाद्यासंस्कृतीबद्दल आणि अनेक समाजांबद्दल गैरसमज पसरवणारे आहे. भारत हा काही शाकाहारी लोकांचा देश नाही आणि तसे असेल तर किती टक्के लोक शुद्ध शाकाहारी आहेत, याची आकडेवारी लेखिकेने द्यायला हवी होती. ‘Anthropological Survey of India’ (ASI) च्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण एक अनुसूचित जाती आणि जमातींचे लोक हे पूर्वापार मांसाहारी होते आणि आजही असंख्य आहेत. काही जाती शाकाहारींच्या आणि भक्ती संप्रदायांच्या प्रभावाखाली आल्याने त्यांनी मांसाहार बंद केला असेल, पण ते मुळात मांसाहारी होते. राज्यनिहाय नेमलेल्या ‘Backward class Commission’ ने जातींचे संकलन करून मंडल आयोगाला दिलेल्या यादीत देशभरात ६,७४८ जातीसमूह आहेत हे स्पष्ट झाले आणि त्यानुसार देशातील सगळ्याच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती मांसाहार करणाऱ्या आहेत, हे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यातील बहुतेक सगळ्या जाती या धर्माने हिंदू म्हणून गृहीत धरलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर हिंदूंमधील काही जाती पूर्वापार बीफ आणि पोर्क खाणाऱ्या आहेत, यात लपविण्यासारखे काय आहे. या देशात जितके धर्म आणि जाती आहेत तितक्या खाद्यासंस्कृती आहेत, भारतीय भारतीय म्हणून सांगता येईल अशी कोणतीही खाद्यासंस्कृती या देशात नाही. तरीही भारतीय म्हणून खाद्यासंस्कृतीचा उदो उदो करणाऱ्या खाद्यासंस्कृतीच्या अभ्यासकांना ‘बहुसंख्य हिंदू मांसाहारी आहेत आणि त्यातील काही हिंदू बीफही खातात’ हे सांगताना त्यांची लेखणी आणि जीभ का जड पडते, हेच कळत नाही! भारतीय खाद्यासंस्कृतींमध्ये ‘मांसाहार हा अपवाद नसून शाकाहार हाच अपवाद आहे!’ भारतीय लोक दररोज मांसाहार करीत नाहीत, त्याची कारणं तथाकथित शाकाहारी उच्चवर्णीयांचा सांस्कृतिक, धार्मिक, मानसिक दबाव आणि मांस महाग असणं ही आहेत. असो. लेखात एके ठिकाणी ‘डाळी भरडत असताना जो कणा पडतो तो गव्हात मिसळून त्याच्या पोळ्या करतात,’ असं म्हटलेलं आहे. (दाळी भरडताना आमच्याकडे कणा पडत नाही, त्याला ‘कळना’ म्हणतात). हा खाद्यापदार्थ कोणत्या प्रदेशात केला जातो हे सांगितलं असतं तर वाचकांच्या ज्ञानात आणखी भर पडली असती. कदाचित लेखिकेला दाळी कशा तयार करतात त्याची प्रक्रिया माहीत नसावी. धान्य भिजवून, वाळवून मग दाळ तयार केली जाते. दाळ तयार करताना मुख्य दाळीशिवाय दाळगा, कळणा आणि फोलपटं हे तीन उपपदार्थ निघतात. दाळग्याचे कालवण दाळीच्या कालवणासमान केले जाते आणि कळण्याच्या स्वतंत्रपणे भाकरी केल्या जातात किंवा ज्वारीच्या, बाजरीच्या पिठात कळना मिसळून भाकरी केल्या जातात. शिवाय कळण्याचे पिठलेसुद्धा हाटले जाते. फोलपटं मात्र फेकून दिली जातात. – शाहू पाटोळे, खामगाव (धाराशीव)

स्त्रीने स्वत:साठी जगावं

‘झपताल सुरूच आहे…’ हा मंगला गोडबोले यांचा लेख (१ नोव्हेंबर) गृहिणी दिनानिमित्त प्रसिद्ध केलेला लेख वाचला आणि खरंच एका गृहिणीची तिच्या मनातील घालमेल. आपलं (होम टू हाऊस) करताना घ्यावे लागलेले कष्ट आणि त्यासाठी स्वत:च्या भावनांना, कलागुणांना, इच्छांना, करिअरला दिलेला विराम… आणि तरीही त्या गोष्टींचे कोणालाही कसलेही सोयरसुतक नसणे ही गोष्टच मुळात किती भयावह आहे. मंगलाताईंनी ज्या तिच्या अवस्था सांगितल्या, सुवासिनी, पक्षिणी आणि संहिता या पार पाडता पाडता तिचे आयुष्य कधी पन्नाशी गाठते हे तिलाही न समजलेलं कोडं असतं… परंतु मला एवढेच सांगायचे आहे की प्रत्येक स्त्रीला गृहिणीला दररोज दिवसातील तीन ते चार तास वेळ हा मिळतच असतो तिने त्या वेळेचा सदुपयोग करून स्वत:साठी जगावं, कारण या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तुम्हाला कोणीही पुढे येऊन म्हणणार नाही की, ‘बाई तू हे कर’. म्हणूनच प्रत्येक गृहिणीने स्वत:ला ओळखून स्वत:च्या कलागुणांना वाव देणे हीच भविष्याची गरज असेल आणि ती एक प्रकारे पुरुषप्रधान संस्कृतीला दिलेली एक चपराक असेल. – मधुरा कापसे, मानवत, परभणी</strong>

बाईनेच स्वत:चा विचार करावा

‘पोळ्यांच्या वर्तुळात कैद झालेलं आकाश’ या सरोज भिरूड यांनी लिहिलेल्या लेखानिमित्ताने (१ नोव्हेंबर) असे सांगावेसे वाटते की, पूर्णवेळ गृहिणी असणे, हे एखाद्या स्त्रीने जरी आपणहून (बाय चॉईस) स्वीकारलेले असले तरी घरातल्या इतर माणसांनी तिला गृहीत धरू नये, अशी परिस्थिती तिने निर्माण करायला हवी. स्वत:बद्दलची अपेक्षा, इतरांच्या (इथे नवरा, सासू सासरे, सगळेच आले.) तिच्याबद्दलच्या अपेक्षा याबद्दल आधीपासून स्पष्टता हवी. नाहीतर कधी काही कारणांनी मान दिला गेला नाही किंवा मनाविरुद्ध काही गोष्टी घडल्या (नकळत मानसिक छळ झाला) तर होणाऱ्या अपमानापेक्षा न्यूनगंडच निर्माण होऊ शकतो. ‘‘मला कामाचं काही वाटत नाही… पण…’’ असं म्हणून डोळ्यात सतत पाणी येत राहतं आणि घरातल्यांनी मला समजून घेतलं नाही असं वाटत राहतं. स्वत:ची कामे कर्तव्य म्हणून करत असताना मुलांना आणि घरातील सर्वांना आपापली कामे करण्यास शिकवणे. पहिल्यापासून मुलांवर (यामध्ये मुलगा आणि मुलगी यातील समानता अपेक्षित आहे. ) कामाची जबाबदारी टाकणे. घरातल्या कामाची वेळेनुसार योग्य वाटणी, प्रसंगी आऊटसोर्स करणे यातच खरी परिपक्वता आहे.

चार माणसांच्या स्वयंपाकाला असा कितीसा वेळ लागतो किंवा माझ्या हातचं जेवण सगळ्यांना आवडतं म्हणून ती स्वत:च करते. सणाच्या दिवशी किंवा दिवाळीला काही पदार्थ विकत आणण्यामध्ये अपराधीपणाची भावना असते. त्यामुळे ‘तिच्या’ डोक्यात सतत स्वयंपाक आणि त्याच कामाबद्दलच विचार असतात. अगदी कामाला बाई जरी लावली तरी तिला काम काय सांगायचं याचा निर्णयही तिलाच घ्यावा लागतो म्हणजे सकाळपासून दिवसभरात ४ वेळा, प्रत्येकाच्या आवडीनुसार खाणे, पिणे, चहा, कॉफी, नाश्ता या गोष्टी ठरवणे, त्यासाठी पूर्वतयारी करणे, त्यातच पाहुणे, मित्र मंडळी येणार असतील तर विचारायलाच नको. यातून वेळ काढून तिने स्वत:साठी नवीन काही करायचं ठरवलं तरी त्यात अनेक समस्या, तडजोडी, त्याग याला तिला सामोरे जावे लागते. किंवा तिला नमते घ्यावे लागते.

काही जणांच्या मते, जोपर्यंत मुलगी लग्न होऊन सासरी जाते आहे, आपण पुरुष प्रधान संस्कृतीचे पालन करतो आहोत, तोपर्यंत हे असेच चालत राहणार. आजकाल बरीच मुले काही कारणाने बाहेर (परदेशात) स्थायिक होतात. त्यात काही गैर नाही. आई-बाबांना त्याचं कौतुकही वाटतं. एकदा त्यांना तिकडच्या छानछोकीची, चकचकीतपणाची सवय लागली की इकडे यावंसं वाटत नाही. पण ती पालकांना मात्र आठवणीने तिकडे घेऊन जातात. (पहिल्यांदा तो देश दाखवायला नंतर मुलीच्या किंवा सुनेच्या बाळंतपणासाठी किंवा त्यांच्या मुलांना सांभाळायला.) हे सगळं एकवेळ ठीक आहे, पण काही शिकलेल्या मुलीही केवळ नवरा अमेरिकेत किंवा युरोपमध्ये नोकरीसाठी (करियर नव्हे) जाणार आहे, म्हणून त्याच्या बरोबर उत्साहाने जातात आणि नंतर प्रयत्न करूनही स्वत:ला नोकरी करता आली नाही म्हणून घरात स्वयंपाक करत बसतात, मग त्यांच्या शिक्षणाचा उपयोग काय?

यासाठी स्त्रियांनी विशेषत: गृहिणींनी घरातल्या कोणत्या कामात वेळ जास्त घालवतो याचा विचार करावा. सतत प्रत्येक कामात perfectionist / super woman व्हायचा प्रयत्न करू नये. रोज नाही जमल्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित, तर बिघडले कुठे? हा thankless job आहे. सुरुवातीपासूनच काही गोष्टींची सवय लावणे आवश्यक आहे. घरातून काम करणे (part- time job), छोटा व्यवसाय (केवळ पैसे मिळवण्यासाठी नव्हे तर अशा बाहेरच्या कामातून आत्मविश्वास वाढतो), स्वत:साठी वेळ देणे, वाचन करणे हे मुलं लहान असतानासुद्धा करता येण्यासारखे आहे. एकटीने ट्रिपला जाणे, शक्य असेल तर देशात परदेशात एकटं राहणं. आवडीच्या गोष्टींसाठी वेळ काढणं, या गोष्टी प्रयत्नपूर्वक करायला हव्यात. मुद्दाम एखादे अवघड काम करून बघावे, यामधून आपला आत्मविश्वास वाढतो. रोजचा पेपर घडी करून नीट लावून ठेवण्यापेक्षा तो वाचून त्यावर चर्चा करणे. जगातल्या विशेष घडामोडींची माहिती करून घेणे, स्वत:ची स्पेस निर्माण करणे, स्वत:साठी तरी रोज काहीतरी लिखाण करणे. छंद जोपासणे हे सहज शक्य आहे. – निशा किर्लोस्कर कोथरुड, पुणे</strong>