अनेकदा अनेक गोष्टींच्या गरजा ठरवताना आपण मर्यादेच्याही पुढे जातो. त्यानंतर आपल्याला त्याची जाणीव होतेही, अर्थात ती वेळ मात्र निघून गेलेली असते. ती वेळ एक गोष्ट दाखवत असते, ती म्हणजेच धूसर रेषा. असंख्य गोष्टींतही ही रेषा व्यक्तिश: भले धूसर असो, पण ती असते. ती रेषा ओळखणं आणि पाळणं हे कुणाच्याही हिताचं ठरतं, आनंदाचं ठरतं!

माणूस म्हणून प्रत्येकाला अनेक गरजा आहेत. अन्न-वस्त्र-निवारा या तर आहेतच. माहिती, ज्ञान, मनोरंजन, कला- अशाही आहेत. संबंध म्हणून कुटुंब, समाज, आवडीचे काही गट, मित्रमंडळी, काही संघटना -अशाही आहेत. कुणाच्या आवडीनिवडीनुसार लोकसंग्रह, समाजकारण, राजकारण – अशाही आहेत. वाचन, व्यासंग, भेटीगाठी, प्रवास, देशाटन-अशाही आहेत.

म्हणून मनुष्य अगदी वेगवेगळ्या मार्गानं त्या त्या गरजांच्या प्राथमिकतांनुसार त्या पुऱ्या करण्याचा रोज आणि त्या अर्थानं आयुष्यभर प्रयत्न करीत असताना आपल्याला दिसेल; पण याचबरोबर अशी कामं करताना काही गोष्टी घडत असलेल्या आपल्या लक्षात येतील. अगदी साधं म्हणजे माणसाला भूक लागते. भुकेच्या गरजेपोटी तो जेवतो. त्याच्या ताटात अनेक पदार्थ असतात. जेवणाच्या नादात साहाजिकपणे तो खूप जेवतो. एका क्षणी त्याच्या लक्षात येतं, की आपण भुकेपोटी जेवतो आहोत हे खरं, पण आता तो घास गोड असला तर तोंडात घोळतो आहे आणि तिखट असला, तर जिभेला हाय हाय होते आहे. मग त्याची खाण्याची मर्यादा येते आणि जेवण थांबतं. तो कसाबसा कोचावर जाऊन बसतो किंवा गादीवर लोळत पडतो. त्याचा त्याला कदाचित त्या वेळी किंवा नंतर दुसऱ्या दिवशीही त्रास होतो. वास्तविक, अन्न ही तर प्राथमिक गरजेची गोष्ट आहे. तळमळ होत असली, घशाशी येत असलं, जळजळ होत असली – तरी अशा कुठल्याही कारणानं त्याच्या मनात, त्या वेळेला तरी एक क्षणभर येऊन जातं, आपण थोडं कमी जेवायला हवं होतं. अर्थात ती वेळ निघून गेलेली असते. ती वेळ एक गोष्ट दाखवत असते. तिच्याकडं लक्ष द्यायला हवं. गरजेसाठी खाणं आणि गरज संपल्यावरही मनानं आपल्याला खायला लावणं – यात एक रेषा आहे. तिच्या मागं असलो की सुख आहे, पोषण आहे. तिच्या पुढं असलो की काय होतं, ते आत्ता आपण पाहिलंच.

असा एखाद्या नुसत्या कमी-जास्त जेवणाचा हा प्रश्न नाही. नाही तर यावर मिताहार असं एखाद्या शब्दात उत्तर देऊन आपण मोकळे झालो असतो. थोडय़ाशा प्रयत्नानं ही रेषा सांभाळणं सोपं झालं असतं; पण या रेषेचं प्रकरण आपल्या आयुष्यात असंख्य क्षेत्रांत आणि गुंतागुंतीचं आहे, हे आपल्या लक्षात येईल. आपली तब्येत चांगली राहावी, म्हणून पायी फिरण्यासारखा सोपा व्यायाम नाही. त्याची गरज आहे, यावरही दुमत नाही. ऐन पावसात छत्री घेऊन फिरायला जाणारे निष्ठावंतही काही कमी नाहीत. हे सगळं खरं असलं तरी, आपल्या प्रकृतीप्रमाणं आपण ठरवलं असेल किंवा आपल्या वैद्यांनी आपल्याला सल्ला दिला असेल, त्यानुसार, त्या वेळेला एक मल फिरणं हा आपला गरजेचा व्यायाम ठरतो; पण फिरायला गेल्यावर हवा चांगली असते, मोकळी असते, छान वाटतं – त्या नादात आणखी एक मल पुढं गेलं, तर येताना दमछाक होते. आता ती गरजेच्या व्यायामानं झालेली नाही, तर ही रेषा ओलांडण्यानं झालेली आहे.

तशी या रेषेची आपली आयुष्यात कुठंही गाठ पडू शकते. काही जरुरीच्या कामासाठी आपण खरेदी करायला दुकानात गेलो, तर आजूबाजूला दिसणाऱ्या, आपल्याला त्या क्षणी उगाचच हव्याशा वाटणाऱ्या आणखी चार वस्तू घेऊन येतो, तेव्हा हीच रेषा ओलांडलेली असते. त्यानं नुसताच खिसा रिकामा होत नाही, तर कदाचित घरातल्या अडगळीत आपल्याकडून भर पडल्याचं आपल्या नंतर लक्षात येतं.

ऑफिसमध्ये कुणी उत्साही प्रबंधक बदलून येतात. तसं ऑफिस आधीपासून सुरू असतं. माणसं आपापल्या जागी आपली कामं नीट करीत असतात. त्यात्या ऑफिसला दिलेली कामाची उद्दिष्टंही पुरी होत असतात. अर्थात हे अपेक्षित आहे की, नवीन प्रबंधकांनी ही प्रगती टिकवून धरावी आणि त्यात भरही घालावी. त्यानुसार त्यांनी काही कार्यपद्धतींतल्या सुधारणा, नवे ग्राहक – अशा स्वरूपाचे प्रयत्न करणं गरजेचं असतं; पण आपल्याला हेही आढळेल की, या कर्मचाऱ्याला उठवून तिथं बसव, त्या कर्मचाऱ्याला उठवून इथं बसव, एकमेकांची कामं बदलून टाक, शांततेत चाललेल्या ऑफिसमध्ये धाक निर्माण करण्यासाठी, उगाचच कुणाला फैलावर घे, जुन्या ग्राहकांना कुठल्या किरकोळ कारणावरून उगाचच बोलावून घे – अशा साऱ्या कामांचा त्या मूळ अपेक्षित प्रगतीशी काही संबंध नसतो. उलट ऑफिसमधली आणि ग्राहकांमधलीही शांती आणि गुण्यागोविंदानं चाललेले व्यवहार उगाचच ताणले जातात. लोकही मग नसलेले प्रश्न उपस्थित करतात. पुन्हा एकदा तीच रेषा ओलांडलेली असते. इकडं प्रगतीचंही नुकसान झालेलं असतं.

अंगणवाडीत किंवा खेळांच्या वर्गात जाऊन मुलं घरी आली, की त्यांना पाटीपेन्सिल घेऊन, अभ्यासाला बसवून, शाळेत कुठला कुठला अभ्यास झाला, इतर मुलं काय करत होती, अशा अनेक चौकशा घरी करणं आणि पुढं हरघडी शाळेत, त्यांच्या शिक्षक-शिक्षिकांना रोज आपल्या पाल्याची प्रगती होते आहे की नाही, याची खात्री करून भंडावून सोडणं – असं झाल्यास मुलांचीही चिडचिड होते. त्यांचं खेळण्याचं वय हुकतं. शिक्षकही रोज काय प्रगती होणार, असा विचार करून वैतागतात आणि अशा पालकांना टाळतात. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीवर लक्ष ठेवणं गरजेचं असलं, तरी पुन्हा एकदा हीच रेषा ओलांडली जाते आणि त्रास निर्माण होतो.

असं आपल्याला आयुष्यभर असंख्य ठिकाणी होताना दिसेल. व्यापाऱ्यांच्या साठेबाजीत, वाचनाच्या अतिरेकात, वक्त्यांच्या लांबलेल्या भाषणात, घरकोंडेपणात, तर सदैव गावभर फिरत राहाण्यात, अकारण चिंता-विचार करण्यात, आपला संबंध नसलेल्या असंख्य विषयांच्या चौकशा करण्यात, कधी तुसडेपणात तर कधी अतिमत्रीत, कधी येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवण्यात, कधी पाचपाच-दहादहा स्थावरं करण्यात, कधी चार खोल्यांचं पुरणारं घर असतानाही, आहे पसा म्हणून, वर दोन मजले काढण्यात – अशा माणसाच्या आयुष्यात नेहमी दिसणाऱ्या व्यवहारांत हा रेषेचा प्रश्न वाढत असलेला आपल्याला दिसेल.

ती रेषा कशी वावरते, हे अनेकांना पूर्वीपासून माहिती असेल, कदाचित त्यावर आपण आज विचार केला असेल; पण तिला नुसते ‘रेषा’ न म्हणता ‘धूसर रेषा’ असं का म्हटलं आहे, याचाही थोडा विचार करणं गरजेचं आहे. अनेक व्यवहारांमध्ये आपण अनुभवलेली एक गोष्ट उदाहरणासाठी पाहू. एखादं घर बांधायचं असेल, तर त्याचा खर्च किती येईल याचा अंदाज आपण ते घर बांधताना तज्ज्ञांकडून विचारून घेतो. ते अगदी इंचाचा, फुटाचासुद्धा विचार करून जास्तीत जास्त अचूकपणे तो अंदाज काढून देतात. तरीही घर बांधायला लागणारा कच्चा माल, लागणारा वेळ, मजुरांची उपलब्धता, बाजारभावांची परिस्थिती – अशा अनेक गोष्टींत होणारे संभाव्य फेरफार लक्षात घेऊन, त्या खर्चाला ते अंदाजे खर्च म्हणतात, तसंच शेवटी एकूण खर्चात कमीअधिक दहा टक्के गृहीत धरा, असं सांगतात.

हीच गोष्ट अशा गरजा ठरवताना घडते. म्हणून तिला धूसर रेषा म्हणावं लागतं. अगदी सुरुवातीला आपण ज्या गरजेच्या आहाराचा उल्लेख केला, त्यात मूळ गरजेचा आहार ठरवताना काही सर्वसाधारण प्रमाण काढलेलं असतं. त्या रेषेपर्यंतचा आहार हा सर्वाना आवश्यक आणि हिताचा असतो. तरीही व्यक्तिपरत्वे त्याच्या त्या वेळच्या भुकेच्या प्रमाणात, इतर आजार-पथ्यं – अशा गोष्टी लक्षात घेता, ही प्रमाणाची रेषा ‘धूसर’ बनते. व्यक्तीनुसार कमीजास्त होऊ शकते; पण जी रेषा त्या व्यक्तीनुसार ठरेल, ती रेषा ओळखून, त्यानं खाणं हिताचं असतं, हे नि:संशय!

आपल्या लक्षात येईल की, आधी म्हटल्या तशा आयुष्यातल्या – फिरणं, बोलणं, नोकरी, पसा, मुलांचं संगोपन, घरंदारं, मिळकती-मालमत्ता – अशा असंख्य गोष्टींतही ही रेषा व्यक्तिश: भले धूसर असो, पण ती असते. ती रेषा ओळखणं आणि पाळणं हे कुणाच्याही हिताचं ठरतं, आनंदाचं ठरतं!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com