प्रवेशपरीक्षांच्या निकालांचे दिवस येतात. त्यातल्या गुणांना एकेकदा खूप महत्त्व येतं. विद्यार्थ्यांना विशेषत: आईला अस्वस्थता असते. मुलाच्या आईची चलबिचल, अस्वस्थता बघून ऑफिसमधून परतलेले वडील अनेकदा तिला म्हणतातही, ‘‘उद्या सकाळी दहाला निकाल आहे ना? उद्या उजाडल्यावर बघू.’’ आईची सर्वसाधारण प्रतिक्रिया थोडी फणकारतच असते, ‘‘तुम्हाला काळजी नाही म्हणून ठीक आहे. उद्याच्या एकेक गुणांवर सगळं अवलंबून आहे. पाचसात र्वष मी कष्ट काढले आहेत.’’ वडील शांत राहतात, ‘‘ठीक आहे. मी उद्या रजा घेतो.’’

सकाळी निकाल कळतो. गुण कळल्यावर वडील शांतच राहतात, पण आई आणि मुलाचे चेहरे मात्र विलक्षण पडतात. हळूहळू त्याचं रूपांतर डोळ्यांत पाणी, चिडचिड यांत सुरू होतं. वडील शांततेनं घेतात, ते सारं पाहतात आणि म्हणतात, ‘‘काय अपेक्षेपेक्षा कमी आहेत, एवढंच ना?’’ आईची अस्वस्थता अनावर होते. ती म्हणते, ‘‘एवढंच नाही. ठरलेलं महाविद्यालय गेलं, साईड गेली. कठीण आहे. गुणांवरून ते दिसतंच आहे. अंधार आहे सगळा. मेहनत वाया गेली. सगळे पर्याय संपले नाही का?’’

वडील म्हणतात, ‘‘जरा दमानं घ्या. अजून सगळे पर्याय संपलेले नाहीत. प्रत्यक्ष प्रवेशाच्या प्रक्रिया व्हायच्या आहेत, थोडं थांबू तरी. हेच महाविद्यालय, हीच साईड – हे जरा थोडा वेळ बाजूला ठेवा.’’ प्रत्यक्षात असंच घडतं. प्रवेशप्रक्रियेचे नियम ऐनवेळी बदलतात. विद्यापीठांच्या परीक्षांतले गुणही प्रवेशाच्या वेळेला विचारात घ्यावेत, असा काही नियम ठरतो. कुठं याचिकांमुळं दिशा बदलतात. विशिष्ट महाविद्यालय नाही, पण विशिष्ट साईड मिळते.

अनेकदा अनेक क्षेत्रांत अनेक बाबतीत आयुष्यात अनेक टप्प्यांवर ‘आपले सर्व पर्याय संपले’ अशा स्थितीला माणूस येतो. खरं तर, असे सर्व पर्याय संपतात, अशी परिस्थिती एका अर्थानं कधीही नसते. कदाचित, पर्याय संपतीलही, पण ज्याला स्वत:ला वाटतं तोच पर्याय हवा आहे त्याचे! थोडा विचार केला तर लक्षात येईल, ‘आपण’ काढलेले पर्याय कदाचित संपलेले असतात. कारण शेवटी ते ‘आपण’ काढलेले असतात. आपल्या कुवतीप्रमाणं. म्हणून ते संपल्यासारखे वाटतात. परिस्थिती, जग, त्यातल्या उलाढाली- या इतक्या विशाल आहेत, की आपल्या पर्याय काढणाच्या बुद्धीच्या कुवतीच्या बाहेर असंख्य पर्याय असतात. फक्त हे कळण्याएवढी, मान्य करण्याएवढी परिपक्वता, सबुरी आणि शांतता आपल्यात असावी लागते, याची अनेकांना कल्पना नसते. त्यातही आपल्या कल्पनांप्रमाणं, अनुभवांप्रमाणं, आपल्या कुवतीनं आपलं हित, कल्याण कशात होईल, याचे ते पर्याय असतात. आपला उत्कर्ष, आपलं हित व्हावं हे बरोबरच आहे, पण त्यासाठी काही आपण काढलेल्या पर्यायांचीच मर्यादा गृहीत धरायचं खरं तर कारण नसतं. आपण आजूबाजूचे असंख्य अनुभव पाहावे. सर्वसाधारण पर्याय हे ठरावीक असले, तरी बदलत्या परिस्थितीत इतर पर्यायसुद्धा असतात. आपण पाहिलं असेल, विशिष्ट शाखेत, विशिष्ट विषयांत प्रावीण्य मिळवल्यानं मोठा उत्कर्ष झाल्याच्या घटना आपण आजूबाजूला पाहतो. त्यामुळं तो आपला पहिला पर्याय ठरतो. पण अनेकदा असं होतं की, हेच अनेकांना वाटल्यामुळं त्याच वाटेवरून अनेकजण जातात. अखेर त्या क्षेत्रातली मागणी कमी होते. हा पर्याय घेणारे पस्तावतात. इतर पर्याय घेणारे पुढं निघून जातात. कधी मार्केटमध्ये चढउतार, कधी मागणी-पुरवठय़ाचं गणित, कधी सरकारी कायदेकानू- हे बदलतात. त्यांत ‘आपले पर्याय’ हे कसे अपुरे असतात आणि आपण अकारण ‘पर्याय संपले’ यानं निराश झालो. त्यामुळं उरलेले पर्यायही त्या परिस्थितीत गमावले याची कल्पना येते.

एका गृहस्थांचा आठवडय़ाच्या अखेरीला ठरलेल्या रेल्वेनं आपल्या गावी जाण्याचा परिपाठ होता. त्या रेल्वेनं गेलं तर ती गाडी पुढं वेगळ्या दिशेनं जात असली तरी वाटेतल्या जंक्शनवर दुसऱ्या मार्गानं येणारी कनेक्टिंग ट्रेन त्यांना मिळत असे. त्या दिवशी नेहमीप्रमाणं ते वेळेत निघणार होते. तत्पूर्वी, आयुक्तांची भेट होणार असल्यामुळं कुणी अधिकाऱ्यांनी ते येऊन गेल्याशिवाय ऑफिस सोडू नये, असा संदेश आला. आयुक्त ऑफिस सुटण्यापूर्वी आले, सर्वाची बैठक घेतली गेली. सर्व खात्यांचे आढावे झाले. या गृहस्थांची अस्वस्थता वाढू लागली. अगदी आयत्या वेळेला जाऊनसुद्धा आपण मुलाला गाडीनं स्टेशनवर सोडायला सांगू असा एकच पर्याय त्यांच्यासमोर होता. आयुक्तांचं भाषण सुरू झालं. त्यानंतर थोडय़ा वेळात गाडी सुटण्याची वेळही झाली. आयुक्त काय म्हणताहेत, यापेक्षा त्यांच्या डोक्यात वेळेवर सुटणारी ती गाडी आता सुटली आणि शेवटचा पर्याय संपला, अशीच जणू ट्रेनची शिटी वाजत होती. अस्वस्थता वाढली,  कारण पुढची कनेिक्टग ट्रेन मिळण्याचा पर्याय संपला. खेडेगावी वाट पाहणारे आजारी आईवडील भेटण्याची शक्यता संपली.

पुढं तासाभरानं मीटिंग संपल्यावर सारे पर्याय संपल्याच्या हताशपणानं ते घरी परतले. मुलगा नुकताच परत आला होता. त्यानं एक पर्याय म्हणून स्टेशनला फोन लावला. गाडी वेळेवर निघून गेलेली होती. त्या मार्गावरच्या इतर गाडय़ांची त्यानं चौकशी केली. त्याच मार्गावरून जाणारी पुढची गाडी सुटायला अजून अर्धा तास होता. मुलानं वडिलांना सुचवलं की एक पर्याय अजूनही आहे. त्या मार्गावरची ही दुसरी गाडी आपल्याला मिळू शकते. वडिलांचं म्हणणं होतं की, दोन तास उशिरा पोचल्यामुळं वाटेतल्या जंक्शनवर उतरून आपण पुढं काय करणार? कारण पुढं गावाकडं जाणारी गाडी नाही. मुलानं सुचवलं, ती नसली, दुसरा काही पर्याय नसला तर तुम्ही परत येऊ शकाल. पण आजी-आजोबांसाठी तेवढी धडपड केल्याचं समाधान तुम्हाला मिळेल. त्यांना ते ऐकावंस वाटलं. मागच्या गाडीनं ते गेले. जंक्शनवर पोचल्यावर त्यांना कळलं, ती कनेक्टिंग ट्रेन त्या दिवशी अडीच तास लेट होती. हा पर्याय वेगळाच होता, परिस्थितीतनं निघालेला होता. थोडी सबुरी, थोडे प्रयत्न आणि पर्याय संपल्याच्या कल्पनेचा त्याग केल्यामुळं, त्यांचं काम झालं होतं.

हेच आयुष्याला वळण देणाऱ्या अनेक गोष्टींत घडताना दिसेल. आपले पर्याय चुकीचे असतात, असं अर्थातच नाही. पण ते काढणारी बुद्धी, आपले अनुभव- यांच्या मर्यादा ओळखण्याची गरज मात्र नक्की असते. अनेकांच्या बाबतीत, विवाहापूर्वी काही पर्याय असतात. काही कारणांनी ते हुकतात. पर्याय संपल्याच्या भावनेनं निराशा येते. पण अनपेक्षित ठिकाणाहून वेगळा पर्याय, परिस्थिती समोर आणते. तो आपण काढलेल्या पर्यायापेक्षाही चांगला ठरतो, आयुष्य मार्गी लागतं. एखाद्या नोकरीची संधी हुकते. त्यावेळी तेवढाच पर्याय दिसत असतो, चांगला वाटतो. हुकल्याचं दु:ख होतं. पण इतर ठिकाणी प्रयत्न होतात. दुसऱ्या कुठल्या कंपनीत त्यावेळी तरी कमी पगाराची नोकरी स्वीकारावी लागते. काही काळानं संधी मिळून तिथं पूर्णपणे अनपेक्षित हुद्दे मिळतात, संधी मिळतात. विशिष्ट ठिकाणी बदली, पोस्टिंग- अशा असंख्य बाबतीत वेळोवेळी असं घडत असतं. याच नव्हे, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या प्रश्नांच्या बाबतीतही!

आपल्या स्वास्थ्याच्या ध्येयापर्यंत पोचणारे मार्ग, पर्याय आपण काढतो तेवढेच नसतात, ते इतरही अनेक असतात. कारण, आपले अनुभव, कल्पना, मतं, बुद्धी, संस्कार-एवढय़ावर आपण पर्याय काढतो. ते सारं मर्यादित असतं. पण परिस्थिती बदलत असते, जग फार विशाल आहे. ते आपल्यासाठी कितीही पर्याय काढू शकतं, देऊ शकतं, आपल्या उत्कर्षांची, कल्याणाची काळजी घेऊ शकतं. हवी आहे ती, ‘पर्याय संपत नाहीत’ या वस्तुस्थितीची जाणीव, खात्री आणि सबुरी!

सुहास पेठे

drsspethe@gmail.com