सहृदय वाचकहो, सादर नमस्कार! ‘चतुरंग’मधून या वर्षांत दर पंधरवडय़ाला सुरू असलेल्या संवादातला आजचा अखेरचा संवाद, निरोपाचा, त्यामुळं थोडा वेगळाही! माणसाचं जीवन प्रगत आणि समाधानाचं होण्यासाठीचे प्रयत्न अज्ञात काळापासून सुरू आहेत. त्यात विशेषत: मानवी क्षमतांची पुरती ओळख करून घेऊन, त्या क्षमता उपयोगात आणण्याचे आणि कुठल्याही माणसाचं जीवन स्वस्थ, आनंदी व्हावं, यासाठी अश्मयुगापासून आजअखेर सामान्यांसह असंख्य लोकोत्तर व्यक्ती, समाजसुधारक, महात्मे, सत्पुरुष हेही आपल्या परीनं याचा शोध घेत आहेत.

त्यातल्या पहिल्यावहिल्या प्रयत्नांचं स्वरूप वेगळं होतं. निवाऱ्यासाठी गुहा शोधणं, रात्रीच्या विश्रांतीसाठी गुहेच्या तोंडाशी जाळ करून हिंस्र श्वापदं दूर ठेवणं, जगण्यासाठी पाळंमुळं, कंद, फळं शोधणं, स्वत:च्या संरक्षणासाठी अणकुचीदार दगड बाळगणं, मारणं, पुढं हळूहळू गदा-भाले-धनुष्यबाण वापरणं – असा हा प्रवास आपल्याला परिचित आहे. त्यात प्रगती दिसत असली तरी, मुळात प्राण्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रवृत्तींचेच ते अधिक प्रगत आविष्कार आहेत, हे लक्षात येणं अवघड नाही. सिंह शत्रूवर थेट झेप घेतो. वानर लांबूनच फळ नाहीतर फांदी फेकून मारतो, हे आपल्याला माहीत आहे. माणूस त्याअर्थानं प्रगत आहे, म्हणून तो कुणाला मारीत नाही असं नाही! उलट, त्याच प्रवृत्तीनं, तेच काम तो ‘प्रगतपणे’ तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं करतो. त्यामुळं कुठंही समोर न येता, तो बसल्याजागी शेकडो मलावरच्या शत्रूंचा बळी घेतो. सिंह एकवेळ एका प्राण्याचा संहार करील, पण ‘प्रगत’ माणूस एकाच वेळेला लाखो जिवांचा बळी घेतो. लाखोंवर दहशत निर्माण करतो, ती वेगळीच!

क्षमतेचाच विचार केला तर, आपण अनेक प्राणी, पशू, पक्षी यांच्यापेक्षा दुबळे आहोत. पण आपला मेंदू इतका गुंतागुंतीचा आणि प्रगल्भ केला गेला आहे की, त्याच्या जोरावर आपण पशू-पक्ष्यांचंच काय, इतर माणसांचं स्वातंत्र्यही बळकावून बसलो आहोत. अधिक विलक्षण यंत्रणा लाभलेला माणूस, स्वत: शांत राहून इतरांना आनंदी करणारा असायला हवा. पण त्याउलट तो भय, काळजी, असुरक्षितता, न्यूनगंड, अहंगंड, चढाओढ, मत्सर, बेफिकिरी, कृतघ्नता, असूया, कुरघोडय़ा, पाताळयंत्रीपणा, दुटप्पीपणा, विश्वासघात, दंभ, बुवाबाजी, फसवणुकी, न सुटणाऱ्या संगणकीय गुतागुंतीच्या गुन्हेगारी-अशांनी अधिकच दु:खी आणि ग्रस्त आहे. त्याचं मोठं कारण अदृश्य आणि अतक्र्य मन हे आहे. ते शक्तिरूप आहे. त्याच्यातली अशुद्धी, सदोषता या साऱ्या दु:खांना कारणीभूत आहे. क्षणभर हाही विचार करावा की, याच माणसाच्या ठिकाणी दया, सहानुभूती, क्षमा, करुणा, आत्मीयता, नि:स्वार्थीपण, तत्परता, त्याग, औदार्य, कळवळा, भक्तिभाव, अर्पणबुद्धी, नम्रता, ऋजुता, विशालता – असे असंख्य आनंद देणारे, स्वत:चं आणि एकूण मानवी जीवन आनंदमय करणारे गुण हातापायांपासून मेंदूपर्यंतच्या कुठल्या अवयवांत नाहीत. ते मनाचेच आहे ना! तेच मनाचे प्रकाशित भाग आहेत.  मनुष्य स्वयंप्रकाशित आहे. त्यानं ठरवलं तर तो पूर्ण प्रकाशित होऊ शकतो.

तसं झालं तर मग, दोघांना आयुष्यभर पुरून उरेल अशा इस्टेटींवरून न्यायालयात आयुष्य दवडली जाणार नाहीत. फायद्यासाठी कुणाला वेठीला धरावंसं वाटणार नाही. घराघरांत हेवेदावे-स्वामित्वाच्या फोल कल्पना रोज त्रस्त करणार नाहीत. हक्क गौण, कर्तव्यं प्रधान होतील.

अशा साऱ्या आनंदी जीवनाच्या क्षमता असतानाही, व्यक्तिगत काय, कौटुंबिक काय, सामाजिक काय – जीवन आधी म्हटली तशी, दु:ख आणि चिंतांनी ग्रस्त असतील तर, मनाचे अंधारमय भाग जाणीवपूर्वक प्रकाशित करण्याकडं आपलं दुर्लक्ष झालं असेल. त्याचबरोबर प्रत्येकाच्या ठिकाणी असलेल्या प्रकाशित भागाचा वापर करून विधायक गोष्टींत स्थर्य आणि विकसन करण्याकडंही आपलं लक्ष गेलं नसेल, हे उघड आहे. आपल्याला अधिक जागृत आनंदी जीवन जगायचं असेल तर, या दोन्ही बाजूंनी आपल्या आयुष्यात घडणाऱ्या प्रसंगांत सावधानतेनं प्रयत्न करणं, हे आपलं कर्तव्यच आहे.

या लेखमालेचा भर, हा मनाच्या अशा, विशेषत: अप्रकाशित राहिल्यामुळं त्रस्त करणाऱ्या भागांकडं, आपल्या आयुष्यातल्या साध्यासुध्या उदाहरणांतून लक्ष वेधण्यावर होता. त्यामुळं खऱ्या आनंदाची कल्पना यावी, असा प्रारंभ झाला. पुढं मात्र आपल्याला रोज सामोरं जाव्या लागणाऱ्या अनेक विषयांकडं वेगवेगळ्या लेखांतून वेगवेगळे पलू मांडण्याचा प्रयत्न केला. त्यात अंधारलेल्या मनानं निर्माण केलेले अनेक भ्रामक अडथळे समोर ठेवले होते. त्यात विनाकारण वागवली जाणारी ओझी, तक्रारीचं स्वभावात होणारं रूपांतर, आपल्या कुवतीच्या रास्त आकलनाची गरज, मनाचा नित्यनेमानं करावा लागणारा अपरिहार्य अभ्यास, हवे-नकोपणाचे दूर करायचे अडथळे, एकाग्रतेचे फायदे आणि व्यग्रतेमुळं होणारं नुकसान, मनाच्या अनेक शक्तींचा विघातक कामांसाठी होणारा वापर टाळून, त्या शक्तींचा विधायक उपयोग करून घेण्याचं कौशल्य, अनेक गोष्टींच्या दोन्ही बाजू विचारात घेण्याची गरज, आयुष्यातल्या घटनांना द्यायचं वाजवी स्थान, सातत्यानं वर्तमानाची कास धरण्याची गरज, न बदलता येणाऱ्या परिस्थितीचा स्वीकार, प्रतिकूल गोष्टींचा बाऊ करण्याची मनाची सवय मोडण्याची गरज, स्वतंत्र अस्तित्वाच्या सीमा आणि मर्यादा, अनिश्चिततेसारख्या काही गोष्टींचा मोकळा स्वीकार – अशा अनेक मुद्दय़ांवर आपला संवाद झाला.

संवाद असं म्हणण्याचं कारण, असंख्य लोकांनी आत्मीयतेनं लक्षात ठेवून या सदराचं केलेलं वाचन आणि कळवलेल्या प्रतिक्रिया हे होय. सदराच्या मर्यादेत मनाचे अंधारलेले काही भाग घेता आले नाहीत, काही संक्षेपानं घ्यावे लागले तर, प्रकाशित मनाला बळकट करण्याच्या दिशा मांडता आल्या नाहीत. तरीही, वाचकांनी या उणिवा समजून घेऊन सहकार्य केलं. सदराच्या माध्यमातून पोचू शकलेल्या भागांवर मनापासून विचार केला. त्या सर्वाच्या प्रतिक्रिया उद्धृत करणं इथं शक्य नसलं तरी, साररूपानं त्याचा गोषवारा देत आहे.

अनेकांच्या घरी, व्यक्तिगत जीवनात लेखात मांडलेले प्रसंग घडले होते. तशा अडचणी आल्या होत्या. हे त्यांनी आवर्जून कळवलं. लेखातल्या वेगवेगळ्या दिशांची उपयुक्तताही जाणवल्याचं कळवलं. त्या-त्या वेळी असे विचार माहीत नसले तरी, त्यावेळी आपण काय किंवा इतर काय तसे का वागलो, याचा उलगडा झाला. अधिक आदर्श प्रतिसाद यापुढं देता येईल, हेही अनेकांनी कळवलं. मनाच्या गुंत्यात सापडल्यामुळं निराशेत-अंधकारात जात असलेले दिवस, लेखातल्या काही प्रकाशकिरणांनी एकदम उजळले. मार्ग सापडला आणि उत्साहानं आपण आता कामाला लागलो आहोत, असंही प्रांजळपणे काहींनी कळवलं. इथं दिलेल्या वैचारिक उपायांना पूरक उपायही काहींनी सुचवले. त्या त्या प्रश्नांवर सर्वागीण विचार करायला मिळाल्याचं समाधानही अनेकांनी कळवलं. लेखात दिलेल्या प्रसंगांसारखे त्यांच्या आयुष्यात आलेले प्रसंगही अनेकांनी सविस्तर कळवले. प्रशंसेच्या प्रतिक्रिया हा वाचकांच्या उदार हृदयाचा भाग असल्यामुळं, त्यांचा उल्लेख न करता त्यांचं ऋण फक्त मी नमूद करतो. हे मात्र आवर्जून नमूद करावंसं वाटतं की, राज्यातून, इतर राज्यांतूनच नव्हे तर, परदेशातूनही उत्साहजनक प्रतिक्रिया मिळाल्या. याचं श्रेय अर्थातच ‘लोकसत्ता’च्या विशाल व्यासपीठाला आहे. त्यांचा मी ऋणी आहे.

संतकृपेनं आनंददायी अनुभवांची नित्यनूतन वनश्री इथं सदैव फुललेली असली तरी, अशा माध्यमाच्या संवादाच्या भेटीत देता येतात, ती शब्दमय तुलसीदलंच! ती या सदरातल्या आत्ताच्या निरोपाच्या प्रसंगी कृतज्ञभावानं वाचकांच्या चरणी अर्पण करतो.

सुहास पेठे

drsspethe@gmail.com

(सदर समाप्त)