‘आपले बोलणे व विचार कितीही श्रेष्ठ आणि आकर्षक असले तरी आपण आपल्या कर्मानुसारच ओळखले जातो..’ सार्वजनिक गणपती उत्सवाच्या वेळी आलेला हा अनुभव आहे. लोकोपयोगी कार्यक्रम या दहा दिवसांत करायचे असा आमचा उद्देश असतो. एक बाई म्हणाल्या, तिचा भाऊ  नेत्रतज्ज्ञ आहे. ती त्याला बोलावून जास्तीत जास्त लोकांचे डोळे तपासून पुढे काय करावे याविषयी सल्ला देण्याची सोय करेल. वेळ, दिवस ठरला. ठरलेल्या वेळी माणसे येऊ  लागली. पण ना त्या बाई आल्या ना तो नेत्रतज्ज्ञ. काय करावे काही कळेना! शेवटी तिला फोन केला. ती म्हणाली, ‘‘मी भावाला आजच्या कार्यक्रमाविषयी काहीच कल्पना दिली नाही. अगदी पूर्णपणे विसरून गेले. जमलेल्या लोकांना सांगा, दोन-तीन दिवसांत व्यवस्था करू.’’ फुकट डोळे तपासून देण्याचा तिचा विचार खूपच चांगला होता, पण प्रत्यक्षात कृती शून्य! या तिच्या वागण्यातून बेजबाबदारपणा सिद्ध झाला.  आमच्याच विभागात एक नेत्रतज्ज्ञ आहेत, ते आदिवासी पाडय़ांवर जाऊन मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया करतात हे आम्हाला माहीत होते. एक जण पटकन जाऊन त्यांना घेऊन आला. त्या दिवशी कोणत्या तरी कारणामुळे ते मोकळे होते. व्यग्र नव्हते म्हणून वेळ निभावली. काहीही वाच्यता न करता त्यांनी जमलेल्या चाळीस जणांचे डोळे तपासले. चष्म्याचा नंबर काढून दिला, मोतीबिंदूविषयी माहिती दिली. दोन व्यक्तींचे बोलणे आणि काम यात असलेले अंतर खूप काही शिकवून गेले. उच्च विचारांच्या पोकळ गप्पा न मारता त्यांनी मदत केली.

याच काळात स्वच्छता अभियान राबवावे, या विचाराने विनय कामाला लागला. वर्षभरात डॉक्टरची पदवी त्याला मिळणार आहे. लोकांचा उत्साह वाढविण्याकरिता तो स्वत: कामाला लागला. टीन एजर्सकडून अधूनमधून तो हे काम करून घेतच असतो. तो डॉक्टर होणार असल्यामुळे स्वच्छतेविषयीचे त्याचे विचार रहिवाशांना पटतात. थोडे पैसे जमा करून, कामगारांना द्यायचे, त्यांच्याकडून स्वच्छता करून घ्यायची, थोडी सर्वानी मिळून करायची असे त्याने ठरवले. आजूबाजूचा कचरा गोळा केला. रस्ते झाडून काढले. छोटय़ा नाल्यातील कचरा काढून ते वाहते केले. ज्याला जेव्हा वेळ असेल तेव्हा त्याने येऊन काम केले. विनय स्वत: काम करीतच असे.  या सर्वामुळे विभाग स्वच्छ झाला. साथीचे रोग दूर झाले. लोकांची घाण करण्याची सवय मोडली, कारण स्वत:ला ती घाण काढावी लागे. मोठी माणसे लहानांना स्वच्छता राखण्याविषयी शिकवू लागली. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. हे सर्वानी अमलात आणले. विनयचे कर्म हीच त्याची ओळख झाली.

आपल्याकडे सार्वजनिक उत्सव, यज्ञ, मिरवणुका यात खूप पैसा खर्च होतो. ध्वनिप्रदूषण, वायुप्रदूषण यामुळे वाढते. हा मुद्दा एका बैठकीत पाटील यांनी मांडला. मिरवणुकातील वाद्यांनी ध्वनिप्रदूषण होते. पैसा खूप खर्च होतो. यावर चर्चा सुरू झाली. काही कला, परंपरेने वाजवली जाणारी वाद्ये यांचे जतन होणे आवश्यक आहे. त्यामुळे मिरवणुकांची संख्या कमी करणे योग्य ठरेल, असाही मुद्दा मांडला गेला.   वैजूताईंनी सगळे ऐकले. त्या पाटील यांना म्हणाल्या, ‘‘दोन वर्षांपूर्वी तुम्ही मुलीचे लग्न थाटामाटात केलेत. सात-आठ लाख खर्च झाला हे अभिमानाने सांगितलेत, गेल्या महिन्यात नातवाचे बारसे केले तेव्हा पण दीड लाख खर्च झाला हे सांगताना तुमचा चेहरा आनंदला होता. तुम्ही लग्नात आणि बारशात खर्च केलेली भली मोठी रक्कम गरिबांमध्ये का नाही वाटली?’’ आता अध्यक्ष उभे राहिले. ते म्हणाले, ‘‘आपण सर्वानीच आपले श्रेष्ठ आणि आकर्षक विचार फक्त बोलून न दाखवता कृतीत, आचरणात आणले पाहिजेत. आपले श्रेष्ठ काम, कर्म यातून समाजाने आपल्याला ओळखले पाहिजे. आपल्याकडे म्हण आहे, ‘शिवाजी जन्मला पाहिजे, पण तो दुसऱ्याच्या घरी, आपल्या नव्हे.’ तर ही म्हण आपण चूक आहे हे सिद्ध करू या! विचारांपेक्षा कृतीला महत्त्व देऊ  या!’’

गीता ग्रामोपाध्ये

geetagramopadhye@yahoo.com