न मिळणाऱ्या गोष्टीचं अप्रूप

मुलांची वाट मखमली पायघडय़ांची केल्यानं त्यांचा वेग वाढत नाही उलट हरवून बसतो.

मुलांची वाट मखमली पायघडय़ांची केल्यानं त्यांचा वेग वाढत नाही उलट हरवून बसतो.  बदल म्हणून का होईना, एकदा ट्रिपला विमानाने न जाता पॅसेंजरने जा. त्याला तहान-भुकेची जाणीव होऊ  द्या. कडकडून लागलेल्या भुकेनंतर प्रयासाने मिळणारे दोन घास आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा ठेवा होतो. मागेल ते देणं हे प्रेम नव्हे. आवश्यक ते द्या, हवं ते देऊ नका. तरच तो वाढेल..

निरोगी, सक्षम आयुष्याला प्रतिकूलता हवी, हा खरे तर निसर्गाचा प्राथमिक सिद्धांत. तसा डार्विनने तो सिद्धही केलेला. मात्र आधुनिक पालकांच्या तो लक्षात येत नाही ही वस्तुस्थिती. एखादी समस्या होऊन ती समोर येते तेव्हा हा सिद्धांत त्यांच्या गळी कसा उतरवावा हा पेच पडतो! ही अतिसमृद्धीच प्रगतीचा महामार्ग खडतर करून टाकते हा प्रत्यय यायला लागतो.

समीर हा डॉक्टर दाम्पत्याचा लाडाकोडात वाढलेला बारावीतला मुलगा. ‘‘आम्ही अगदी शुभमुहूर्त साधण्यासाठी आमच्या गुरूंना विचारून, सायंकाळी पाच छपन्नची गोरज मुहूर्ताची वेळ ठरवून, प्लॅन्ड सिझेरियन केलं!’’ डॉक्टरीणबाई मला सांगत होत्या. या आधुनिक श्रावणबाळाने जन्म घेण्याचेही कष्ट घेतले नव्हते हे उघडच दिसत होतं. आजवर लग्नाचा गोरज मुहूर्त माहीत होता, जन्माचा गोरज मुहूर्त हे नवीनच ऐकत होतो. मग ऑपरेशनपूर्वी स्त्रीरोगतज्ज्ञांनी मंगलाष्टकंम्हटली की काय?

‘‘तो सहा महिन्यांचा रांगता झाला तेव्हाच आम्ही त्याच्यासमोर लॅपटॉप ठेवला. तो की-बोर्डवर बोटं आपटायचा, कॉम्प्युटरशी खेळायचा. मग प्लेग्रुप, नर्सरी, उत्तम शाळेत प्रवेश. त्याच्या सर्वागीण विकासासाठी स्पोर्ट्स, स्विमिंग सगळं केलं. एखादी कला असावी म्हणून संगीतही शिकवलं. गुरुजी घरी येऊन शिकवायचे त्याला स्पेशल. हल्ली वेळ मिळत नाही, बारावी ना, पण यू टय़ूबवरून गिटार शिकतो.’’

अबब! माझं डोकं गरगरायला लागलं. या नरपुंगवापुढे नतमस्तक व्हायचे सोडून मी याचा डॉक्टर व्हायचा प्रमाद कसा करू?

‘‘मग समस्या काय?’’ मी हिंमत करून विचारलं.

‘‘अचानक त्याचा टेम्पो गेला डॉक्टर. पहाटे साडेपाचला उठून त्याच्या पप्पाबरोबर क्लबला टेनिस खेळायला जाणारा पोरगा, सकाळी आठशिवाय उठत नाहीय. कॉलेज मधूनमधून बंक करतो, टीव्ही खूप पाहतो हल्ली. टय़ूशनला निघतो, पण मित्राकडे जाऊन बसतो, टय़ूशनचा कंटाळा आला म्हणतो.’’ जगबुडी आल्यासारखा चेहरा करून बाई सांगत होत्या.

‘‘इतक्यात त्याला काही प्रॉब्लेम?’’

‘‘अहो, कसला प्रॉब्लेम! त्याची स्टडी रूम एसी करून दिलीय, तिथेच बेड आहे त्याचा. सकाळी त्याचे पप्पा उठवतात. मग जिम, रविवारी स्विमिंग. आठला ब्रेक फास्ट, दहाला कॉलेज, तिथे फक्त हजेरी लावून टय़ूशन्स. संपूर्ण एसी हॉल असलेल्या कोल्हेसरांची टय़ूशन लावलीय सगळ्या विषयांची. संध्याकाळी लाइट डिनर, अर्धा तास थोडा टीव्ही. मग अभ्यास, झोप.’’ बाईंना राष्ट्रपतींच्या पीएसारखी समीरची दैनंदिनी वाचली.

‘‘अन् रिक्रिएशन? कधी विश्रांती?’’

‘अहो, दर वर्षी पाच दिवस आम्ही सगळे एखाद्या हिल स्टेशनला ट्रिपवर जातो. त्याला उटी खूप आवडतं. वेळ वाचावा म्हणून जाता-येता प्लेन जर्नी. शिवाय बर्थ डेला फुल-डे सेलिब्रेशन. दवाखाना बंद! संध्याकाळी पार्टी. तसे मित्र नाहीत फार त्याला.’’ समीरच्या आनंदाचा कोटा भरून काढायचं बाईचं प्लॅनिंगही चाट पाडणारं होतं. मी समीरला एकांतात घेतलं.

‘‘कंटाळल्यासारखा वाटतोयस! निराश वाटतंय का? काही स्ट्रेस बारावीचा?’’

‘‘निराशा नाही काका, पण उत्साह नाही वाटत कशातच. बोअर झाल्यासारखं वाटतं. कशाला धडपड करायची नव्वद टक्के मिळवण्यासाठी, असं वाटतं!’’ आयुष्याचं अप्रूप ओसरण्याच्या भीषण विकाराची लक्षणं मला समीरमध्ये दिसायला लागली. यशाच्या अतिसहजसाध्यतेनंही माणूस निरुत्साही होतो. कशाचं अप्रूपच न उरणं हाही एक विकारच!

‘‘बाबांना मला डॉक्टर करायचंय, त्याला माझी ना नाही. मात्र सरकारी महाविद्यालयात प्रवेशासाठी बराच अभ्यास करावा लागतो. ते कष्ट मी केलेही असते. पण.. नाही करावेसे वाटत!’’

समीर आपल्या उद्दिष्टांच्या वाटचालीतला पुढाकार, उत्साह हरवून बसला होता. एखादी गोष्ट मिळवण्याची जिद्द ही त्या वाटेवरच्या अडथळ्यामुळे वाढते. समीरला डॉक्टर करवण्याच्या हट्टापायी त्याच्या वडिलांनी एका खासगी संस्थेशी बोलून, कोटींची उड्डाणे करून त्याचा प्रवेश आधीच निश्चित करून टाकला होता. फोनवर वडिलांना संस्थाचालकांशी बोलताना त्याने ऐकलं अन् एखाद्या रेसमध्ये धावत असतानाच ती फिक्स झाली आहे हे कळावं तसं झालं. त्याचा यशासाठीच्या धडपडीतला रस तिथेच आटला.

‘‘मुलांच्या प्रगतीला पोषक गोष्टी करणं चूक आहे का डॉक्टर?’’ यापुढचे संवाद मला माहीत होते. ‘‘आम्हाला जे कष्ट करावे लागले, ज्या अडचणी आल्या, जे सुख मिळालं नाही, ते मुलांना मिळावं असं वाटणं चूक आहे का? तेव्हा आई-वडिलांजवळ पुरेसे पैसे नव्हते. त्यांची ऐपतही नव्हती; पण आज आमच्याजवळ मुलांना देण्यासाठी सगळं काही असताना ते कशासाठी अडवून ठेवायचं?’’

हा एक फसवा युक्तिवाद आहे! हा निसर्गविरोधी तर आहेच, पण मुलांचं यशच हवं असेल तर त्या उद्दिष्टाला हरताळ फासणाराही आहे. प्रतिकूलतेशिवाय प्रगती नाही! प्रगतीचा महत्त्वाचा घटक उद्दिष्टाचं अप्रूप, त्याची दुर्दम्य इच्छा आणि त्या इच्छेआड येणारे अडथळे पार करण्याची क्षमता. अशा अडथळ्यांविना आपसूक मिळणारं यश पचत नाही, पेलवत नाही. प्रतिकूलतेशिवाय प्रतिकारशक्ती निर्माण होत नाही. मुलांना लशी का टोचाव्या लागतात? लस म्हणजे जंतूंचा अर्क! तो शरीरात शिरल्याशिवाय त्याची प्रतिकारशक्ती जागृत होत नाही.  मूल जन्म का घेतं? ते जेव्हा पंधरा टक्क्यांच्या वर आईची ऊर्जा वापरू लागतं, तेव्हा निसर्गच त्याला उबदार गर्भाशयातून बाहेर काढतो. संत्र्याच्या झाडाला बहर यावा यासाठी त्याचं पाणी तोडावं लागतं. पाणी मिळेनासं झालं तरच ते झाड फुलतं, फळ धरू लागतं. गरज पुन्हा वंशसातत्याची अन् प्रेरणा प्रतिकूलतेची.

‘‘मग आता आम्ही काय करावं? आयुष्याची भलीसुरती वाट खड्डे करून खडतर कशी करायची? आणि का?’’ बाईंना माझं लॉजिक समजेना.

‘‘खडतर करू नका, पण त्याच्या पायानं तर चालू द्या ना! त्याला खांद्यावर उचलून पांगळं करू नका. मुलांची वाट मखमली पायघडय़ांची केल्यानं त्याचा वेग वाढत नाही, हरवून बसतो. आयुष्याचं अप्रूप, कुतूहल ओसरण्याइतकी समृद्धीची दुसरी वाईट बाजू नाही. बदल म्हणून का होईना, एकदा ट्रिपला विमानाने न जाता पॅसेंजरने जा. त्याला मित्रांसोबत सायकलवर पाठवा. त्याला तहान-भुकेची जाणीव होऊ  द्या. तुम्ही त्याला भुकेची जाणीव होण्यापूर्वीच जेवू घालता. अशाने भूकही मरते आणि अन्नाचे अप्रूपही. कडकडून लागलेल्या भुकेनंतर प्रयासाने मिळणारे दोन घास आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा ठेवा होतो. मागेल ते देणं हे प्रेम नव्हे. आवश्यक ते द्या, हवं ते देऊ  नका. पिलांच्या पंखात बळ यावं म्हणून पक्षीण त्यांना भरवते, पाठीवर घेऊन उडत नाही. त्याला अपंग करीत नाही. फिक्स झालेल्या मॅचच्या यशापेक्षा परिश्रमाअंती झालेला पराभव परवडला, कारण तो जास्त आनंद देतो.

यशातून मिळणारा आनंद हा यशाकडे जाणाऱ्या प्रवासात आहे. तो प्रवास ज्याचा त्याने केला तरच त्याला आनंद मिळेल. असं यश थोडं असलं तरी त्यातून मिळणारा आनंद मोठा असतो. तोच अजून मोठे यश मिळवण्याची प्रेरणा देतो. या प्रवासात ‘जे न मिळे त्यासाठी जगणे’ हा ‘नाद मधुर-कटू’ जडण्यासारखी मजा नाही. मुलांचा तो आनंद हिरावून घेऊ  नका.’’

सवयीने मी प्रिस्क्रिप्शन पॅड ओढलं. समीरचे नाव लिहून ‘आरएक्स’ची खूण केली. आता मी काय औषध लिहितो हे डॉक्टर दाम्पत्य कुतूहलाने पाहात असतानाच बटरड्र रसेलचे हे प्रसिद्ध वाक्य लिहिले – ‘आयुष्यातल्या खऱ्या आनंदासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट म्हणजे, हव्या असलेल्या गोष्टींपैकी काही गोष्टी न मिळणे!’

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मन विकार विचार बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dr nandu mulmule article about childhood psychology

ताज्या बातम्या