हिंसा फक्त शारीर असते असे नाही, ती शाब्दिक असू शकते, भावनिक असू शकते. कधी ती लक्षात येणार नाही इतकी सूक्ष्म असते. मात्र तलवारीच्या वाराइतकेच घाव ती मनावर करते.

कौटुंबिक हिंसा ही संज्ञा रूढ झाली नव्हती, कायद्याच्या कक्षेत येणं दूरच, तेव्हाची गोष्ट. सुधामामीची. उंच नेटक्या बांध्याच्या गोऱ्या सुधामामीचं लग्न अशोकमामाशी ठरलं तेव्हा ती नुकतीच संगीतात बी.ए. झाली होती. वरात निघाली तेव्हा तिनं आपली सतार आवर्जून सामानात चढवली, मात्र सासरघरी उतरवलेल्या सतारीची खोळही पन्नास वर्षांच्या संसारात कधी निघाली नाही, तार छेडणं दूर राहो. अशोकमामाला संगीताची नुस्ती नावड होती असं नाही, त्याला संगीताचा तिटकारा होता! व्यवहारात अतिशय हुशार असणारा अशोकमामा हे मानवी स्वभावाचं अतिशय विचित्र मिश्रण होतं. त्याचे मूड सतत बदलत राहायचे. तो प्रेमळ आहे याचा पुरावा मिळेपर्यंत रागात यायचा आणि कोपिष्ट म्हणून शिक्का मारावा तो क्वचित नमुन्यापुरती कणव दाखवायचा. त्याच्या या तिरसट स्वभावामुळे भावंडांशी सतत भांडणं व्हायची. शेवटी वडिलांनी त्याला होस्टेलला ठेवलं. तिथूनच त्याच्या रागीट स्वभावाला कायमचं खत-पाणी मिळालं. तो थोडा विक्षिप्तही झाला. अभ्यासात हुशार होता, पण खोचक बोलण्यानं शिक्षकांचा राग ओढवून घ्यायचा. नातेसंबंध जोपासावे लागतात हे न उमगल्यानं मित्रांशी कधी जमलं नाही, म्हणून एकलकोंडाच राहिला. तरुण वयात मैत्री जपणं, फुलवणं ही आयुष्यभराची नाती जपण्याच्या कलेतील एक रंगीत तालीम असते. तेव्हा करता आली नाही तर आयुष्यभर जमत नाही. रसायनशास्त्रात पीएच.डी. करून अशोकमामा नोकरीला लागला तोवर त्याच्या स्वभावाची रसायनं आयुष्यभरासाठी घट्ट झाली होती.

Solapur, Son-in-law cuts mother-in-law finger,
सोलापूर : शिळे जेवण दिल्याच्या कारणावरून जावयाने वृद्ध सासूचे बोट छाटले
crow trapped in Dombivli
डोंबिवलीत पतंगीच्या मांजात अडकलेल्या कावळ्याची अग्निशमन जवानांकडून सुखरूप सुटका
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
pune, fergusson college, holi, boy, throwing water, balloons, pedestrians, arrested, police,
होळीच्या दिवशी रस्त्यावर फुगे मारणारी हुल्लडबाज मुले ताब्यात; पोलिसांकडून पालकांवर गुन्हे

लग्नानंतर लवकरच हा सहप्रवास नाही तर फरफट होणार आहे हे सुधामामीच्या लक्षात आलं. अशोकमामाच्या दृष्टीनं जगातलं कुणीच ‘वंद्य’ नव्हतं! त्याच्या मते सगळे राजकारणी एकजात बदमाश, चित्रपट कलाकार चरित्रहीन, कलावंत रिकामटोळ, लेखक भिकार! तो सिनिक होता. त्याच्या डोळ्यांवर चढलेला चष्मा तेच पाहात होता. एकदा असा चष्मा डोळ्यांना घट्ट चिकटला की माणसाला तेच दिसतं जे त्याच्या स्वभावाला पूरक असतं.

सुधामामीला पहाटे उठायची, पहाटवारा अंगावर घेत फिरायची आवड, मामा माध्यान्ह कुळातला! तिचे डोळे रात्री नऊला जड व्हायला लागायचे, तेव्हा मामाचा ‘दिवस’ उजाडलेला असायचा. तिला सांगीतिक कार्यक्रमांची आवड, त्याला राजकारणाचा तोच तो विषय चिवडणाऱ्या विद्वानांची जुंपलेली आक्रस्ताळी चर्चा पाहण्याची अन् शेवटी सगळ्यांच्या नावानं शिव्यांची लाखोली वाहण्याची आवड!

आवडीनिवडी भिन्न असणे हा भाग समजण्यासारखा, पण आपली आवडच खरी अन् दुसऱ्याची बेकार, टुकार हा दुराग्रह चुकीचा. एकदा ही विचारसरणी लादणं सुरू झालं, की सूक्ष्म रूपातली हिंसा सुरू होते. आपल्या आवडीचं अमुक एक गाणं किंवा आपल्या जिव्हाळ्याचा अमुक एक लेखक ‘फाल्तू’आहे अशी त्यानं संभावना केली, की तिला तो गाण्याचा किंवा लेखकाचा नाही, आपला अपमान वाटायचा. एक जखम व्हायची जिवाला. त्यावर नाराजी व्यक्त करणं म्हणजे नवऱ्याला अधिक विषारी बोलण्याचं आमंत्रण देणं, म्हणून ती गप्प बसायची. हे जखमेसरशी गप्प बसणं इतकं अंगवळणी पडून गेलं की, तो हा तिचा स्वभावच होऊन गेला. गप्प बसणं, नवऱ्याच्या ‘हो’त हो मिसळणं.

जखमी करायचं तर शब्दांची विशिष्ट फेकदेखील एखाद्याला विद्ध करून टाकते. अशोकमामाच्या प्रत्येक वाक्यात एक तुच्छतादर्शक तुसडेपणा असायचा. सकाळी उठून ‘चहा देणार का’ हे त्याचं साधं वाक्यही धार लावलेल्या सुरीसारखं खुपायचं. मोठय़ा बहिणीनं पळून जाऊन प्रेमविवाह केल्यापासून त्याच्या मनात एकूण स्त्रीविषयक एक खोल तिटकारा बसला होता. त्यामुळे तसा अजिबात धार्मिक नसूनही तो थोडा कर्मठ होता. मग सुधामामीवर सारी बंधनं ओघानं आलीच. सुधामामीने बाहेर अंगणात बसलेलं त्याला आवडायचं नाही. भोवतालचे लोक चांगले नाहीत या स्पष्टीकरणामागे दडलेला, ‘तुझ्यावर माझा विश्वास नाही’ हा विकृत अर्थ तिला वेदनादायक वाटायचा. ‘त्याने मला हीनपणा येतो, कारण अशी विचारसरणी एखाद्या स्त्रीला किती अपमानकारक वाटू शकते याची त्यांना जाणीवच नव्हती,’ मला सुधामामी सांगत होत्या. कधी नाटक-चित्रपट नाही, सांगीतिक कार्यक्रम दूर राहो. सुधामामीनं एखाद्या मोठय़ा व गाजलेल्या नटाच्या भूमिकांची चर्चा करावी, तर अशोकमामानं लगेच त्याच्या दारूबाजपणाचे किस्से सांगावे. दरवेळी जीवनाची काळी बाजूच त्याला दिसायची. अशी काळीच बाजू पाहणाऱ्याच्या आयुष्यात उदंड काळ्या गोष्टी असतात. त्या उगाळल्यानं आपली मनं काळवंडतात हे त्याला समजायचं नाही.

कौटुंबिक हिंसेला आता ‘इंटिमेट पार्टनर व्हायलन्स’ ही संज्ञा प्राप्त झाली आहे. यातला इंटिमेट म्हणजे जिव्हाळ्याचा जोडीदार महत्त्वाचा, कारण त्याने केलेल्या ‘जखमा उरातल्या’ फक्त बायकोलाच समजतात अन् विद्ध करतात, जिव्हाळी लागल्यासारख्या. त्या जखमा कोणाला दिसतही नाहीत, जाणवतही नाहीत. कदाचित आपल्या वागण्याने मनं दुखतात हेही अशा लोकांना कळत असेल की नाही प्रश्नच आहे.

अशोकमामाच्या कर्मठ कचाटय़ात मुलांची मनेही तशी कोमेजलीच. अशा वातावरणात वाढलेल्या मुलांना त्यातून बाहेर पडायला, सावरायला बराच काळ लागतो. सुदैवाने माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातल्या लाटेने मुलांना उचलून नव्या मुक्त, समृद्ध युगात नेऊन टाकलं. मुलांची आयुष्ये विस्तारली. आता नातवांचा नवा काळ आला. या युगातल्या नातवांवर आजोबाची पकड सुटली. कारण अंतरेही खूप झाली होती. परदेशस्थ नातू आजोबा-आजीचे फक्त पाहुणे झाले होते.

ही तिसरी पिढी अशोकमामाच्या पडछायेतून मुक्त होण्यामागे अजून एक कारण घडलं. ती घटना सुधामामीच्या आयुष्यात एक मोठे स्थित्यंतर आणणारी ठरली. अशोकमामाला पॅरालिसिस झाला. त्याची वाचा गेली. उजवं शरीर सुन्न पडलं. (येथेही त्याचा हेकटपणाच कारणीभूत ठरला. ‘काय कळतंय डॉक्टरला? सगळे साले पैशासाठी गोळ्या खायला लावतात’ या आवडत्या मतापोटी त्याने रक्तदाबाच्या गोळ्या बंद केल्या अन् अर्धागवायू होऊन बसला.) चाकांच्या खुर्चीवर खांद्याला हनुवटी टेकवीत कलंडलेला अशोकमामा चिलखत काढलेल्या योद्धय़ासारखा असाहाय्य दिसू लागला. ज्या बोचऱ्या शब्दांच्या फेकीवर त्याची भिस्त होती, ते शब्दच आता लुळे पडले होते. परदेशस्थ दूर राहणाऱ्या मुलांवरची पकड सुटलीच होती, आपल्या राज्यावरची हुकमतही तो गमावून बसला होता.

सत्ता गाजवलेल्या माणसाला आता आपला अधिकार संपला ही जाणीव सगळ्यात दु:खदायक. अधिकाराचे बंध हे माणसाशी नव्हे, अधिकारपदाशी बांधील असतात. अधिकार संपला की ते ताकद हरवून बसतात. क्षीण, विकलांग होतात. अशोकमामाच्या विकलांग देहाची सर्व सूत्रे आता सुधामामीकडे आली. तिनेही अतिशय मनोभावे त्याची शुश्रूषा केली. त्याचे दात घासणं, ब्रश करणं, अंघोळ घालण्यापासून शरीराचा व्यायाम घडवून आणणं, गोळ्या नियमित देणं, जेऊ घालणं. सुधामामी त्याच्या विकलांग भागाची समर्थ बाजू होऊन गेली.

क्षमाशीलता मनाचे घाव भरून काढते. ती हिंसा करणाऱ्याचे शस्त्र बोथट करून टाकते. उदारमनस्कता जखमा करणाऱ्यापेक्षा जखमा झेलणाऱ्याला विशाल करून टाकते. एकदा अशोकमामा व्हीलचेअरवर धडपडत अडगळीच्या खोलीचं दार उघडून आत गेला. सतारीची खोळ धरून ओढू लागला. सुधामामीनं सतार काढली. नखी चढवली. गंजल्या तारा छेडल्या. पडदे ओघळले होते, पण तारा अजून तुटल्या नव्हत्या.

अशोकमामा असाच कधीतरी गेला. अखेरच्या दिवसात तो सुधामामीचा हात धरून नुसता घळघळा अश्रू ढाळायचा. जन्मला तेव्हा रडला असेल तेवढाच काय तो. आताही, बायकोच्या अपार प्रेमानं फक्त नि:शब्द अश्रू गळू लागले. शब्दांना फक्त हिंसा माहीत होती, पण शब्दांची सद्दी संपली होती. कदाचित अर्धागवायूबरोबर हिंसक शब्दांच्या त्या पेशीही सुकून गेल्या असतील.

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in