विशीच्या वयात माणसाचा उगवत्या भविष्याकडे प्रवास सुरू होतो, तर साठी येता येता भवितव्याकडे. या वयात माणसांच्या सुखसमाधानाच्या कल्पनांची एक बंदिस्त चौकट तयार झालेली असते. आनंदाच्या व्याख्या पक्क्या झालेल्या असतात. मात्र भोवतालच्या वेगाने बदलत्या स्थित्यंतरांच्या मागे लागून माणसं या चौकटीचा आकार बदलू पाहतात, उसनी चित्रे त्यात कोंबू पाहतात. जगण्याची ही चौकट लवचीक असावी, पण पुरता आकार बदलू नये! याचा प्रत्यय नानांना आला तो सत्तरीत..

माझी आणि नानांची रोज सकाळी सहाला भेट ठरलेली. मी जिमच्या पायऱ्या चढत असतो आणि नाना त्यांच्या समवयस्क टोळीसोबत योगासनाच्या वर्गाकडे निघालेले असतात. सुरकुतली पण तुकतुकीत त्वचा, थोडं आक्रसलेलं सडपातळ शरीर, शिथिल चेहरा, डोळे फ्रिजमध्ये थिजलेल्या वस्तूएवढेच ताजे! ते हसून ‘गुड मॉर्निग’ करतात. मीही घाईचा ‘गुड मॉर्निग’ घालीत जिममध्ये शिरतो. पहाटे पाचला उठणाऱ्या नानांचा वक्तशीरपणा मी गेली अनेक वर्षे पाहातो आहे. कधी कधी नाना रस्त्यात भेटतात. मी घाईत असतो, नाना चटकन माझे हात आपुलकीने हातात घेतात. त्यांचे हात कमालीचे थंड भासतात. ते मला घरी यायचा आग्रह करतात. मी हो हो म्हणतो आणि सटकतो. नानांकडे जाऊन बोलायचं काय, हा मला प्रश्न पडतो. तशी त्यांची माझी कौटुंबिक ओळख आहे. त्यांची दोन्ही मुलं माझ्या परिचयाची. थोरली मुलगी अमेरिकेत, धाकटा ऑस्ट्रेलियाला असतो. येथे नाना आणि नानी, दोघेच राहतात.

sushma andhare
“दोन वाघांची लढाई, पण कुत्र्यांचा फायदा…”, सुषमा अंधारेंची भाजपावर बोचरी टीका
gold, gold all time high, gold investment, commodity market, money mantra, bazar article, gold all time high reasons, gold and global economy, gold in india, global economy,
क… कमोडिटीजचा : सोन्याचा ‘गाझा’वाजा
Even before the arrival of Padwa festival the price of gold is over 72 thousand
पाडव्याआधीच सोने ७२ हजारांपुढे!
navi mumbai buses marathi news, navi mumbai bus poor condition marathi news
डिझेल बसगाड्यांची दुरवस्था, एनएमएमटीच्या डिझेलवरील बसगाड्यांची तात्पुरती डागडुजी करण्यावर भर

नानांच्या बंगलीत, भिंतीवर तीन घडय़ाळे ओळीने लावलेली आहेत. पहिल्यांदा ती पाहिल्यावर मी दचकलोच. मग नानींनी खुलासा केला, ‘‘यांची कल्पना. एक पोरीच्या फ्लोरिडाची वेळ दाखवणारं साडेदहा तास मागे, दुसरं धाकटय़ाची मेलबर्नची वेळ बजावणारं साडेचार तास पुढचं. मधलं इथलं, आमच्या वेळेचं!’’ नानांची वेळ, काळ यांचं अमेरिका-ऑस्ट्रेलियात सँडविच झालं आहे. ‘‘म्हणजे काय, हे फोन लावायचे तेव्हा त्यांची मध्यरात्र तरी निघायची, नाही तर घाईची वेळ. मग धाकटय़ानंच बजावलं, आम्हीच लावू फोन, तुम्ही नका लावू भलत्या वेळी!’’ ती घडय़ाळं दोघांना एक विरंगुळा होऊन बसला आहे. ‘‘आता रात्रीचे आठ वाजले असतील फ्लोरिडाला, पोरगी लागली असेल स्वयंपाकाला!’’ नानांनी म्हणायचं, लगेच नानी आठवण करून देणार, ‘‘अहो, तिथे सकाळीच स्वयंपाक डीप फ्रीजरमध्ये ठेवून जातात, तोच आल्यावर ओव्हनमध्ये गरम करून खातात!’’

नानांच्या हल्ली फारसं लक्षात राहात नाही. ते मेलबर्नच्या घडय़ाळाकडे पाहात पुटपुटतात, ‘‘या आठवडय़ात फोन नाही आला धाकटय़ाचा.’’ मग नानी आठवण करून देतात, ‘‘अहो, तो फिरतीवर असतो, दर एकआड पंधरवडा. नसेल केला.’’ मग नाना तुटून खाली पडणाऱ्या बदामाच्या पानांकडे खिडकीतून बघत बसतात. नानी घरकामात व्यस्त असतात. त्यांनी स्त्रियांचा एक बचतगटही चालवला आहे. तसा दोघांनीही अमेरिका-ऑस्ट्रेलिया हा बारा बारा तासांचा थकवणारा प्रवास अनुक्रमे पोरीच्या आणि सुनेच्या बाळंतपणात केला आहे. तिथे पुन्हा जाण्याचा विचार खुणावतो, पण पोरांनी आपल्या सोईच्या वेळेसाठी त्यांना वेटिंग लिस्टवर ठेवलंय. आपण आजारी पडून पोरांच्या व्यस्त आयुष्यात व्यत्यय येऊ  नये यासाठी नाना स्वत:ला फिट ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. खरे तर आपण आजारी पडलो आणि पोरं आली नाहीत तर आजारापेक्षा त्या वेदनेचा आपल्याला जास्त त्रास होईल, असं त्यांना वाटतं, म्हणून नानांचा स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न.

मात्र मध्यंतरी दोन महिने नाना जिमला आले नाहीत. मलाच चुकचुकल्यासारखं झालं! अन् मी वेळ काढून गेलो. नानांची बंगली टवटवीत दिसली! बदामाची रापली पानं कोपऱ्यात झाडली होती. अंगणात तगरीच्या चांदणं-फुलांचा सडा पडला होता.

फाटकाचा आवाज ऐकल्याबरोबर नानी बाहेर आल्या. ‘‘अरे वा, ये ये’’ म्हणत राहिल्या. सोफ्यावर बसलो, सहज भिंतीकडे पाहतो तो काय, घडय़ाळं गायब! मी काही विचारेस्तोवर ‘अलभ्य लाभ’ म्हणत नाना आले!

‘‘अगं, चहा टाक याला आणि मलाही!’’ नाना मला उगाच खुशीत दिसले. ‘‘नाना जिमला दिसला नाहीत मध्यंतरी? तशी तब्येत छान दिसतेय तुमची!’’ नाना खरंच समाधानी म्हणतात तसे दिसत होते! ‘‘आणि घडय़ाळं कुठे गेली भिंतीवरची?’’ नाना हसले. गरम चहाचा घुटका घेत बोलू लागले, ‘‘दहा वर्षे बांधली ती घडय़ाळं आयुष्याला! दोन्ही पाखरं घरटय़ातून उडून गेलीत, त्यांचा माग ठेवत राहिलो आम्ही. मग लक्षात आलं, असं पायाला दोऱ्या बांधून कुठे माग ठेवायचा असतो पिलांचा? आणि कशाला? आपलं जग मुठीत ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न! वाटलं, सुदूर आपलं भविष्य शोधणाऱ्या नव्या पिढीचं आयुष्य त्यांचं आहे, त्यांनी निवडलेलं. त्याला आपण किती दिवस बांधून घ्यायचं, किती दिवस स्वत:ची फरफट करून घ्यायची?

तंत्रज्ञानाच्या कृपेनं रोज बोलता येतं तेवढेच खरे तर विज्ञानाचे उपकार. अंतरं इतकी आहेत की, बोलण्यापलीकडे फारसं काही आपण करू शकत नाही. त्या घडय़ाळ्यांकडे पाहता पाहाता मी माझीच वेळ विसरलो होतो. माझा काळ विसरलो होतो! स्वत:साठी जगणं अपराधीपणाचं वाटू लागलं होतं. मागे ऑस्ट्रेलियात जुन्या पुस्तकांचं दुकान मांडून बसलेला एक ऑस्ट्रेलियन भेटला. ओळखदेख झाली. कोण-कुठले विचारणा झाली. आपल्या सवयीप्रमाणे मी मुलाबाळांची चौकशी केली. तो थोडा चकित होत बोलला, ‘‘मुलं विखुरली आहेत जगभर! मुलगा दोन वर्षांपूर्वी जर्मनीत होता, आता कुठे आहे माहीत नाही. मुलीनं स्वित्र्झलडहून आठ दिवसांपूर्वी फोन केला होता, ती लग्न करतेय!’’ नवरामुलगा कोण वगैरे विचारण्याचं धाडस झालं नाही; पण वाटलं, किती सहजपणे वाहत्या ओढय़ात कागदाची नाव सोडून द्यावी तसं सोडून दिलंय यानं आयुष्य! आपण भूतकाळाचा कासोटा सुटू नये याची धडपड करीत आपल्या नसलेल्या भविष्याकडे धावतोय. भविष्य तरुण पिढीचं आहे. आमचं वर्तमान आहे, तेही आजच्यापुरतं. तेवढंच समाधानाने जगणं महत्त्वाचं! इथे उगवतो तो सूर्य माझा, इथे मावळते ती माझी रात्र!

नाना क्षणभर थांबले. शेजारच्या टेबलावर एक जुना अल्बम पडला होता- नाना-नानीच्या लग्नाचा! ‘‘परवा लग्नाचा वाढदिवस होता आमचा. अल्बम काढला. प्रसंगांची उजळणी केली. तेवढय़ापुरती आठवणींची धूळ झटकली. मजा आली!  माणसानं भूतकाळात किती डोकवावं? मोटारीच्या आरशात जेवढं दिसतं ना मागचं, तेवढंच! फार मागे जाऊ  नये, नाही तर पुढचा रस्ता चुकायचा. फार पुढचं बघू नये, नाही तरी पायाखालचा खड्डा अडायचा! मी भूतकाळात राहात नाही, मात्र चक्कर जरूर टाकून येतो! भूतकाळात पाय सोडतो, मात्र बसतो वर्तमानकाठावरच!

परवा पोरानं टॅब दिला पाठवून. सगळी पुस्तकं आहेत म्हणे त्याच्यावर. मला खरीखुरी पुस्तकं हवी आहेत, तीच बसतात माझ्या चौकटीत. पुस्तकाची पानं जीर्ण होत जातात नं, ते खूप मानवी वाटतं मला. ते सोबती आहेत माझे असं वाटतं..’’ बोलता बोलता नानी कधी येऊन बसली बाजूला, नानांना कळलंही नाही.

माझ्यासमोर मात्र एक चौकट पूर्ण झाली होती. शिदोरीपुरता भूतकाळ बांधून अटळ भवितव्याची वाट समाधानाने चालणाऱ्या दोघांची!

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in