सत्याच्या स्वीकाराचा क्षण! त्याची प्रखरता डोळ्यांना सहन होत नाही, पण हे अनुभवणं गरजेचं असतं. तिच्या-माझ्यात जणू एक मूक, नि:शब्द संवाद झडला. तिची अगतिकता मला कळली आहे, हे तिला जाणवलं. तिचं जाणवणं माझ्यापर्यंत पोचलं. वर्तुळ पूर्ण झालं. प्रत्येक मनोविकारतज्ज्ञाला हाच क्षण साधता यायला हवा!

बारावीची परीक्षा महिनाभरावर आली असताना, अचानक त्या दिवशी पेपर लिहिता लिहिता श्रुतीचा उजवा हात लुळा पडला, तेव्हा एकच हाहाकार माजला. श्रुतीचे एक्झिक्युटिव्ह बाबा, बँकेत ऑफिसर असलेली तिची आई आणि तिच्या कोचिंग क्लासचे संचालक कोडगे सर, सारेच चक्रावून गेले. कारण श्रुती ही नुसती लाडकी लेक नव्हती, हमखास मेरिटची विद्यार्थिनी होती.

आई-वडिलांच्या चेहऱ्यावर काळजी होती, ती साहजिकही होती. खुद्द श्रुतीचा चेहरा मात्र शांत दिसला. ‘‘माझा हात उचलत नाहीय, त्रास होतो. बोटात पेन धरवत नाही.’’ थोडय़ाफार तपासण्या मी केल्या, पण माझं निदान तसं पक्कं झालं होतं. श्रुतीचा हात मानसिक कारणाने दुर्बल झाला होता. तिला कुठलाही शारीरिक विकार नव्हता.

आई-वडिलांनी आधीच संरक्षक पवित्रे घेतले होते. ‘‘आमचा तिच्यावर अभ्यासासाठी कुठलाही दबाव नाही. अगदी तू नापास झालीस तरी चालेल, असं आम्ही तिला सांगितलं आहे.’’ आता हे विधान हास्यास्पदच होतं. नापास झालेलं कुणाला चालेल? मेरिटची अपेक्षा करणाऱ्या पालकांना?

‘‘आमच्या घरी तशी मेरिटची परंपराच आहे डॉक्टर’’, टायची गाठ सैल करीत वडील मला सांगू लागले, ‘‘माझे बाबा मुंबई विद्यापीठाचे सुवर्ण पदक विजेते, मीही जिल्ह्यत पहिला होतो. माझा भाऊ..’’ या वंशावळीचा नामोच्चार श्रुतीपुढे वारंवार झाला असेल याची मला खात्री होती. मुलांच्या मनावर अपेक्षांचे ओझे असे अप्रत्यक्ष करांसारखे अप्रत्यक्ष वाक्यांनी, सूचक कटाक्षांनी लादले जात असते. संवेदनशील मुलांसाठी ‘बारावी आहे हं यंदा’ एवढं विशिष्ट स्वरांत उच्चारलेलं वाक्यही तणाव निर्माण करायला पुरेसं असतं.

आई-वडिलांना बाहेर पाठवून मी श्रुतीशी संवाद साधायला सुरुवात केली. हाताची तपासणी करीत, मात्र तिच्या विकाराशी अजिबात संबंध नसलेल्या महाविद्यालयीन गप्पा सुरू केल्या. हे तिला नवीन होतं, कारण गेल्या चार दिवसांपासून जो येतो तो तिचा हात सोडून काही बोलतच नव्हता. या सगळ्या हितचिंतकांच्या गराडय़ाची केंद्रबिंदू श्रुती होती, श्रुतीचा हात होता. तो सगळ्यांचं नको तितकं लक्ष वेधून घेत होता, आणि माझ्या मते हेच घातक होतं. श्रुतीच्या मन:स्थितीकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. तिच्या मनानं एक संरक्षक कवच पांघरलेलं होतं जे अपरिपक्व होतं, तिच्यासाठी चांगलं नव्हतं. हे कवच अधिक घट्ट होऊ न देणं ही पहिली गरज होती.

‘‘तुझ्या शाळेबद्दल सांग मला,’’ असं मी म्हटल्याबरोबर श्रुती उत्साहाने शाळेच्या गंमती सांगू लागली. आता माझ्या तपासणीला गप्पांचं स्वरूप आलं, जे तिच्या मनाचा थांग लागण्यासाठी गरजेचं होतं. पाण्याच्या खोलीचा अंदाज येण्यासाठी आधी काठाकाठानं पाऊल टाकावं लागतं. गप्पांचा ओघ परीक्षेपर्यंत येऊन पोचला, तेव्हा तिनं सांगितलं की, साधारण तिसरीपासूनच तिला परीक्षांचा ताण जाणवायला सुरुवात झाली. ‘‘दादा, ताई दोघेही वर्गात पहिले असत. मी तेवढी हुशार नव्हते, मात्र पप्पांना वाटायचं मीही परंपरा जपली पाहिजे.’’ मी पुन्हा ट्रॅक बदलला. ‘‘मी शाळेत असताना हस्तलिखित मासिक काढायचो, तुझे असे काही छंद?’’ असं विचारल्याबरोबर श्रुतीचा तणाव एकदम सैल झाला. ‘‘मला चित्र काढायची खूप हौस! खरं म्हणजे आर्टस् घेऊन ‘जे. जे.’ला जायची इच्छा होती, पण पप्पांची इच्छा दादासारखं सायन्स घ्यावं, मेरिटचे मार्क मिळवावे,’’ विषय पुन्हा परीक्षेपाशी येऊन थांबत होता. श्रुतीच्या आयुष्याचा केंद्रबिंदू परीक्षेतले गुण, मेरिट, अधिक अभ्यास, अधिक वरचा नंबर हेच होऊन बसलं होतं.

मी श्रुतीसमोर कोरा कागद टाकला. ‘‘हे बघ, आपल्या हाताच्या विविध कामांसाठी मेंदूत वेगवेगळ्या पेशी असतात. अक्षरं लिहिणं, आकडेमोड करणं यासाठी वेगळ्या पेशी, चित्र काढण्यासाठी वेगळ्या पेशी, बॅडमिंटन खेळण्यासाठी वेगळ्या पेशी. तुझ्या चित्र काढणाऱ्या पेशी मजबूत आहेत, मला खात्री आहे!’’ श्रुतीनं क्षणभर पेन धरलं. काही वर्तृळं काढली. वेलबुट्टी काढली. बघता बघता तिचा हात सफाईदारपणे फिरू लागला. अचानक ती थांबली. हातात सुक्ष्म थरथर आली. ‘‘लहानपणी मी अशीच चित्र काढत बसायचे. परीक्षा जवळ आली आहे याचं भान नसायचं. मग आई म्हणायची, ‘चित्र काढून परीक्षेत मार्क मिळणार आहेत का? चित्र काढून कुणाचं पोट भरतं का?’’

सगळ्या आयुष्याचं प्रयोजन उपयोजित उद्दिष्टांमध्ये झालं होतं! मन भरल्याशिवाय पोटाच्या भरण्याला अर्थ नाही हे कुणाच्या लक्षातही येत नव्हतं!

‘‘इतक्यात कुठली चित्रं काढलीस?’’

‘‘आता कुठली चित्रं? दहावीपासूनच बंद पडली. एका फाइलमध्ये ठेवली आहेत, ती फाइल चाळते अधूनमधून, बरं वाटतं. वाईटही.’’ श्रुती केविलवाणे हसली. आता श्रुतीच्या संरक्षक मनोकवचाचा सामना करायची वेळ आली आहे हे मी ओळखलं. ‘‘तुझा हात रडतो आहे श्रुती. तो घाबरलाही आहे!’’ तिला काय बोलावं ते सुचेना. कळते-न कळतेपणाच्या सीमेवर ती उभी होती. आपले मनोकवच, आपला संरक्षक पवित्रा, आपल्या धारणा यांचा स्वीकार करणं, त्या अपरिपक्व आहेत याची मनोमनी कबुली पचवणं याला फार हिंमत लागते. श्रुतीमध्ये ती हिंमत नाही हे मला माहीत होतं. पण तिला ती हिंमत देणं हे माझं कर्तव्य आहे हेही मी जाणून होतो.

‘‘आपण आपली भीती, आपलं रडणं दाबतो तेव्हा ते कधी पोटातून बाहेर येतं, कधी हृदयातून, कधी हातातून. तुला अर्जुनाची गोष्ट माहीत आहे. युद्धाच्या पहिल्या दिवशी समोर आजोबा, काका, मामा, भाऊ  पाहून अर्जुनाचे हातपाय गळाले. एवढा श्रेष्ठ धनुर्धारी, ‘सीदन्ति मम गात्राणि’ म्हणू लागला. नावंच ‘विषादयोग’ आहे त्या अध्यायाचं! त्याच्या हातून धनुष्य गळून पडलं. का? कारण त्याचे हातपाय घाबरले. रडायला लागले!’’ या युगातल्या बारावीच्या पोरीच्या नशिबी अवांतर वाचन नसलं तरी किमान महाभारताच्या कथा माहीत असतील याची खात्री होती.

या पलीकडे कुठलंही थेट विधान न करता मी श्रुतीला फक्त तो उजाडण्याचा क्षण अनुभवू दिला. सत्याच्या स्वीकाराचा क्षण! त्याची प्रखरता डोळ्यांना सहन होत नाही, पण हे अनुभवणं गरजेचं असतं. तिच्या-माझ्यात जणू एक मूक, नि:शब्द संवाद झडला. तिची अगतिकता मला कळली आहे, हे तिला जाणवलं. तिचं जाणवणं माझ्यापर्यंत पोचलं. वर्तुळ पूर्ण झालं. प्रत्येक मनोविकारतज्ज्ञाला हाच क्षण साधता यायला हवा असतो!

श्रुतीचा हात काही दिवसांनी हळूहळू हलू लागला, काम करू लागला. आई-वडिलांना आनंद झाला, पण श्रुती उदासीनतेच्या मन:स्थितीत गेली. तिचा चेहरा मलूल झाला. तिच्या नि:शक्त हाताभोवती जमलेली गर्दी पांगली तशी ती एकाकी पडली.

मात्र ही उदासीनता एका परिपक्व स्वीकृतीकडे जाणारं पाऊल होतं हे मी ओळखलं. नि:शक्त हातापेक्षा उदासीन मन ही प्रगती होती. कारण परिस्थितीची स्वीकृती ही माणसाला निराश करीत असली तरी भ्रामक कोषातून बाहेर काढते, सत्याच्या जवळ नेते. डोळे मिटल्यानं संकटे टळत नाहीत, उघडे ठेवल्यानेच काही मार्ग निघू शकतो, सुचू शकतो.

श्रुतीच्या आई-वडिलांची साथ महत्त्वाची होती. परीक्षा फक्त मुलांच्या नसतात, पालकांच्याही असतात. मुलांना भविष्य घडविण्यासाठी मदत करणं वेगळं, त्यांच्या आयुष्याची संहिताच लिहून काढणं वेगळं. ‘‘तुमची मुलगी आनंदी रहाणं जरुरी आहे, मेरिटमध्ये येण्याइतकीच. तिला पेलवणार नाही इतका भार नका टाकू तिच्या हातावर. तिचे हात कलावंताचे आहेत. तिच्या पेशी चित्रकलेच्या आहेत. मोराला काळवीटांच्या रांगेत उभं करून धावायला लावू नका. ती मोरही राहणार नाही, काळवीट तर नाहीच नाही.

श्रुतीने परीक्षा दिली. तिला अपेक्षेइतकंच चांगलं यश मिळालं. मात्र पुढचा मार्ग तिने ठामपणे स्वत: निवडला. आता तिला कुठल्याही अपरिपक्व संरक्षणाची गरज नव्हती. यावेळी पालकांनीही साथ दिली. तेही सप्लिमेंटरी का होईना, परीक्षा पास झाले.

डॉ. नंदू मुलमुले

nandu1957@yahoo.co.in